॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥
॥ अथ नवमोऽध्यायःअध्याय ॥ अध्याय नववा ॥
॥ राजविद्याराजगुह्ययोग ॥
तरी अवधान एकलें दीजे । मग सर्वसुखासि पात्र होईजे ।
हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका
॥9-1॥
श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, – अहो श्रोते हो तर तुम्ही एकवेळ श्रवणाकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका. ॥9-1॥
परी प्रौढी न बोलों हो जी । तुम्हां सर्वज्ञांच्या समाजीं ।
देयावें अवधान हे माझी । विनवणी
सलगीची ॥9-2॥
परंतु महाराज, तुमच्या सारख्या सर्व जाणत्यांच्या सभेमधे मी हे आढ्यतेने बोलत नाही. ‘लक्ष द्यावे’ ही माझी लडिवाळपणाची विनंती आहे. ॥9-2॥
कां जे लळेयांचे लळे सरती । मनोरथांचे मनोरथ पुरती ।
जरी माहेरें श्रीमंतें होती । तुम्हां
ऐसीं ॥9-3॥
कारण तुमच्यासारखे जर समर्थ आईबाप असतील तर हट्ट घेणारांचे लाड पुरतात व मनोरथ करणारांचे उंच डोलारे पूर्ण होतात. (मनाने रचलेले कल्पित पदार्थही) प्रत्यक्ष प्राप्त होतात. ॥9-3॥
तुमचे या दिठिवेयाचिये वोलें । सासिन्नले प्रसन्नतेचे मळे ।
ते साउली देखोनि लोळें । श्रांतु
जी मी ॥9-4॥
तुमच्या त्या कृपारूप दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नतारूप मळा टवटवित झाला. त्य़ाची ती सावली पाहून महाराज, तेथे मी भागलेला लोळत आहे. ॥9-4॥
प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणौनि आम्हीं आपुलिया स्वेच्छा वोलावो लाहों ।
येथही जरी
सलगी करूं बिहों । तरी निवों कें पां ? ॥9-5॥
महाराज, आपण सुखरूपी अमृताचे डोह अहात, म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरूप गारवा प्राप्त करून घेतो. येथे देखील जर आम्ही लडिवाळपणा करण्यास भ्यालो तर मग आम्ही शांत कोठे व्हावे ? ॥9-5॥
नातरी बालक बोबडां बोलीं । कां वांकुडा विचुका पाउलीं ।
ते चोज करूनि माउली । रिझे जेवीं
॥9-6॥
अथवा लेकरु बोबडे बोलत असले, अथवा वेडेवाकडे पाऊल टाकीत असले तर त्यावरून त्याचे कौतुक करून आई जशी समाधान पावते, ॥9-6॥
तेवीं तुम्हां संतांचा पढियावो । कैसेनि तरी आम्हांवरी हो ।
या बहुवा आळुकिया जी आहों । सलगी
करीत ॥9-7॥
त्याप्रमाणे तुम्हा संतांचे प्रेम कशाने तरी आमच्यावर व्हावे अशी आमची फार इच्छा असल्यामुळे महाराज, आम्ही सलगी करत आहोत. ॥9-7॥
वांचूनि माझिये बोलतिये योग्यते । सर्वज्ञ भवादृश श्रोते ।
काय धड्यावरी सारस्वतें । पढों
सिकिजे ॥9-8॥
वास्तविक पाहिले तर आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांपुढे ‘माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या म्हणजे सर्व सुखाला पात्र व्हाल’ असे बोलण्याची माझी योग्यता काय आहे ? (आपण सर्वज्ञ असल्यामुळे आपणास केव्हा कोठे लक्ष द्यावे हे सहजच कळते. तसेच आपण स्वत: सुखरूप असल्यामुळे ‘माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, म्हणजे सुखाला प्राप्त व्हाल’ हे माझे बोलणे धारीष्ट्याचे आहे). सरस्वतीच्या मुलाला धडा घेऊन शिकवायचे आहे काय ? (तर नाही, सरस्वतीचा मुलगा स्वभावत:च सर्व जाणतो). ॥9-8॥
अवधारा आवडे तेसणा धुंधुरु । परि महातेजीं न मिरवे काय करूं ।
अमृताचिया ताटीं वोगरूं । ऐसी
रससोय कैंची ? ॥9-9॥
ऐका, वाटेल तेवढा जरी काजवा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही, त्याला काय करावे ? अमृताच्या ताटात वाढण्यासारखे पक्वान्न कोठून असणार ? ॥9-9॥
हां हो हिमकरासी विंजणें । कीं नादापुढें आइकवणें ।
लेणियासी लेणें । हें कहीं आथी ? ॥9-10॥
अहो शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा नादब्रह्मापुढे गाणे करणे, किंवा स्वत: अलंकारास दागिन्याने सजवणे असे कोठे झाले आहे काय ? ॥9-10॥