॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥
॥ अथ अष्टमोऽध्यायः ॥ अध्याय आठवा ॥
॥ अक्षरब्रह्मयोग ॥
मग अर्जुनें म्हणितलें । हां हो जी अवधारिलें ।
जें म्यां पुसिलें । तें निरूपिजो ॥8-1॥
मग अर्जुन म्हणाला, अहो महाराज, ऐकले का ? जे मी विचारले ते सांगावे. ॥8-1॥
सांगा कवण तें ब्रह्म । कायसया नाम कर्म ।
अथवा अध्यात्म । काय म्हणिपे ॥8-2॥
सांगा, ते ब्रह्म कोणते ? कर्म कशाचे नाव आहे ? आणि अध्यात्म म्हणतात ते काय ? ॥8-2॥
अधिभूत तें कैसें । एथ अधिदैव तें कवण असे ।
हें उघड मी परियेसें । ऐसें बोला ॥8-3॥
अधिभूत म्हणतात ते कसे आहे ? यात अधिदैव कोण आहे ? हे मला स्पष्ट समजेल असे सांगा. ॥8-3॥
देवा अधियज्ञ तो काई । कवण पां इये देहीं ।
हें अनुमानासि कांहीं । दिठी न भरे ॥8-4॥
देवा, अधियज्ञ तो काय आहे ? व या देहात तो कोण आहे ? हे अनुमानाने पाहू म्हटले तर काहीच समजुतीस येत नाही. ॥8-4॥
आणि नियता अंतःकरणीं । तूं जाणिजसी देहप्रयाणीं ।
तें कैसेनि हे शारङ्गपाणी । परिसवा
मातें ॥8-5॥
आणि हे श्रीकृष्णा, ज्या पुरुषांनी आपले अंत:करण स्वाधीन करून घेतले आहे, त्या पुरुषाकडून त्यांच्या प्रयाणकाळी तू जाणला जातोस तो कसा जे मला ऐकवा. ॥8-5॥
देखा धवळारीं चिंतामणीचा । जरी पहुडला होय दैवाचा ।
तरी वोसणतांही बोलु तयाचा । सोपु न
वचे ॥8-6॥
(ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) पहा एकदा भाग्यवान पुरुष जर चिंतामणीचे घरात निजला असेल तर त्याचे बरळाण्यातले शब्द सुद्धा व्यर्थ जाणार नाहीत. ॥8-6॥
तैसें अर्जुनाचिया बोलासवें । आलें तेंचि म्हणितलें देवें ।
तें परियेसें गा बरवें । जे
पुसिलें तुवां ॥8-7॥
त्याप्रमाणे अर्जुनाच्या विचारण्याबरोबरच श्रीकृष्णाच्या मनात जे आले तेच श्रीकृष्ण सांगू लागले, ‘अरे, जे तू विचारलेस ते चांगले ऐक.’ ॥8-7॥
किरीटी कामधेनूचा पाडा । वरी कल्पतरूचा आहे मांदोडा ।
म्हणौनि मनोरथसिद्धीचिया चाडा । तो
नवल नोहे ॥8-8॥
अर्जुन हा कामधेनूचा बछडा असून शिवाय तो कल्पतरूच्या मांडवाखाली आहे. म्हणून त्याने आपले मनोरथ सिद्धीस जावेत अशी इच्छा केली तर ते आश्चर्य नाही. ॥8-8॥
श्रीकृष्ण कोपोनि ज्यासी मारी । तो पावे परब्रह्मसाक्षात्कारीं ।
मा कृपेनें उपदेशु करी
। तो कैशापरी न पवेल ॥8-9॥
श्रीकृष्ण रागावून ज्याचा वध करतात त्यास ब्रह्माचा साक्षात्कार होतो, मग ज्याला कृपेने उपदेश करतील तो ब्रह्मसाक्षात्काराला कसा पावणार नाही ? ॥8-9॥
जैं कृष्णचि होइजे आपण । तैं कृष्ण होय आपुलें अंतःकरण ।
मग संकल्पाचें आंगण । वोळगती
सिद्धी ॥8-10॥
जेव्हा आपण कृष्णाचे अनन्य भक्त व्हावे तेव्हा आपले अंत:करण कृष्ण होते व मग त्यावेळी आपल्या संकल्पाच्या अंगणात अष्टमहासिद्धी राबतील. ॥8-10॥