॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥
॥ अथ सप्तमोऽध्यायः – अध्याय सातवा ॥
॥ ज्ञानविज्ञानयोग ॥
आइका मग तो श्रीअनंतु । पार्थातें असे म्हणतु ।
पैं गा तूं योगयुक्तु । जालासि आतां ॥7-1॥
ऐका. मग तो अर्जुनाला म्हणाला, अरे तू आता योग्याच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस. ॥7-1॥
मज समग्रातें जाणसी ऐसें । आपुलिया तळहातींचें रत्न जैसें ।
तुज ज्ञान सांगेन तैसें । विज्ञानेंसीं ॥7-2॥
आपल्या तळहातात घेतलेल्या रत्नाप्रमाणे मला संपूर्णाला तू जाणशील, असे विज्ञान (प्रपंचज्ञानासह) तुला स्वरूपज्ञान सांगतो. ॥7-2॥
एथ विज्ञानें काय करावें । ऐसें घेसी जरी मनोभावें ।
तरी पैं आधीं जाणावें । तेंचि लागे ॥7-3॥
येथे विज्ञानाशी काय करावयाचे आहे ? अशी जर तुझी मनापासून समजूत झाली असेल तर तेच अगोदर समजणे जरुर आहे. ॥7-3॥
मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे ।
जैसी तीरीं नाव न ढळे । टेकलीसांती ॥7-4॥
कारण की स्वरूपज्ञानाचे वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. ज्याप्रमाणे होडी नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही ॥7-4॥
तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउलीं निघे ।
तर्कु आयणी नेघे । आंगीं जयांच्या ॥7-5॥
त्याप्रमाणे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही ॥7-5॥
अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान ।
तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ॥7-6॥
अर्जुना त्याचे नाव ज्ञान होय. दुसरा जो प्रपंच ते विज्ञान आहे आणि प्रपंचाचे ठिकाणी खरेपणाची बुद्धी असणे त्यास अज्ञान म्हणतात, हेही तू समज. ॥7-6॥
आतां अज्ञान अवघें हरपे । विज्ञान निःशेष करपे ।
आणि ज्ञान तें स्वरूपें । होऊनि जाइजे ॥7-7॥
आता अज्ञान संपूर्ण नाहीसे होईल व प्रपंच पूर्णपणे बाधित होईल आणि ज्ञान आपण स्वत:च बनून जाऊ. ॥7-7॥
जेणें सांगतयाचें बोलणें खुंटे । ऐकतयाचें व्यसन तुटे ।
हें जाणणें सानें मोठें । उरों नेदी ॥7-8॥
अशी जी गूढ मुद्याची गोष्ट आहे, ती शब्दात आणली जाईल व त्याच्या थोड्या प्रतिपादनानेच मनातील पुष्कळ इच्छा तृप्त होतील. (म्हणजे मनाचे पूर्ण समाधान होईल). ॥7-8॥
ऐसें वर्म जें गूढ । तें किजेल वाक्यारूढ ।
जेणें थोडेन पुरे कोड । बहुत मनींचें ॥7-9॥
त्या योगाने व्याख्यात्याचे प्रतिपादन थांबते व ऐकणाराचा ऐकण्याचा छंद नाहीसा होतो. हे ज्ञान लहानमोठा असा भेद राहू देत नाही. ॥7-9॥
पैं गा मनुष्यांचिया सहस्तशां- । माजीं विपाइले याचि धिंवसा ।
तैसें या धिंवसेकरां बहुवसां । माजीं विरळा जाणे ॥7-10॥
अरे अर्जुना, हजारो मनुष्यांमधे एखाद्यासच याविषयी इच्छा असते व अशा अनेक इच्छा करणार्यांमधे स्वरूपज्ञान एखादाच करून घेतो. ॥7-10॥