॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥
॥ अथ षष्ठोऽध्यायः – अध्याय सहावा ॥
॥ आत्मसंयमयोग ॥
मग रायातें म्हणे संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो ।
कृष्ण सांगती आतां जो । योगरूप ॥6-1॥
मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला – कृष्ण जो पाचव्या अध्यायात दाखवलेला योगरूप अभिप्राय अर्जुनाला सांगतील तो ऐका. ॥6-1॥
सहजें ब्रह्मरसाचें पारणें । केलें अर्जुनालागीं नारायणें ।
कीं तेचि अवसरीं पाहुणे । पातलों
आम्ही ॥6-2॥
श्रीकृष्णांनी अर्जुनास ब्रह्मज्ञानाचे पारणे (आजपर्यंतच्या अज्ञानरूपी उपासानंतर ज्ञानामृताची मेजवानी) केले, त्या समयी आम्ही सहजगत्या पाहुणे म्हणून प्राप्त झालो. ॥6-2॥
कैसी दैवाची आगळिक नेणिजे । जैसें तान्हेलिया तोय सेविजे ।
कीं तेंचि चवी करूनि पाहिजे । तंव
अमृत आहे ॥6-3॥
आमचे दैव किती थोर आहे हे कळत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेल्या पुरुषाने पाणी पिण्य़ास लागावे व पाण्याचा घोट घेऊन त्याची रुचि पहावी, तो त्यास ते पाणी नसून अमृत आहे असे समजावे. ॥6-3॥
तैसें आम्हां तुम्हां जाहलें । जे आडमुठीं तत्त्व फावलें ।
तंव धृतराष्ट्रें म्हणितलें । हें
न पुसों तूतें ॥6-4॥
तसे आम्हाला व तुम्हाला झाले आहे. कारण मिळण्याचा संभव नसतांना ब्रह्मज्ञान आपणास मिळाले आहे. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला आम्ही तुला ही गोष्ट विचारीत नाही. ॥6-4॥
तया संजया येणें बोलें । रायाचें हृदय चोजवलें ।
जें अवसरीं आहे घेतलें । कुमारांचिया ॥6-5॥
या बोलण्याने त्या संजयाला धृतराष्ट्राचे हृदय मुलांविषयीच्या स्नेहाने या वेळी घेरले आहे असे कळून आले. ॥6-5॥
हें जाणोनि मनीं हांसिला । म्हणे म्हातारा मोहें नाशिला ।
एऱ्हवीं बोलु तरी भला जाहला ।
अवसरीं इये ॥6-6॥
हे लक्षात येऊन संजय मनात हसला व आपल्याशीच म्हणाला – हा म्हातारा मोहाने अगदीच बिघडून गेला आहे. येर्हवी या वेळेला प्रतिपादन तर फार चांगले झाले आहे. ॥6-6॥
परि तें तैसें कैसेनि होईल । जात्यंधु कैसें पाहेल ।
तेवींचि ये रुसें घेईल । म्हणौनि बिहे
॥6-7॥
पण ते तसे कसे होईल ? (पण धृतराष्ट्राला हे प्रतिपादन गोड कसे लागणार ?) जन्मांधाला उजाडेल कसे त्याचप्रमाणे (ही गोष्ट धृतराष्ट्रास उघड सांगितली तर) तो मनात रोष ठेवील म्हणून संजय उघड बोलण्यास भ्यायला. ॥6-7॥
परि आपण चित्तीं आपुला । निकियापरी संतोषला ।
जे तो संवादु फावला । कृष्णार्जुनांचा ॥6-8॥
पण तो मात्र आपल्याला कृष्ण व अर्जुन यांचा संवाद प्राप्त झाला म्हणून आपल्या मनात चांगल्या प्रकारे खूष झाला. ॥6-8॥
तेणें आनंदाचेनि धालेपणें । साभिप्राय अंतःकरणें ।
आतां आदरेंसीं बोलणें । घडेल तया ॥6-9॥
त्या तृप्तीने श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय मनामधे घेऊन तो संजय धृतराष्ट्रास आदराने सांगता होईल ॥6-9॥
तो गीतेमाजी षष्ठींचा । प्रसंगु असे आयणीचा ।
जैसा क्षीरार्णवीं अमृताचा । निवाडु जाहला
॥6-10॥
ते संजयाचे बोलणे हाच गीतेच्या सहाव्या अध्यायाचा प्रसंग आहे. व तो जाणण्यास (चांगलीच बुद्धी पाहिजे. ज्याप्रमाणे क्षीरसमुद्रातून अमृताची निवड झाली ॥6-10॥