Home

||ॐ नमो ज्ञानेश्वरा||

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अर्थात् श्रीमद् भगवद्‌गीतेवरील मराठी टीका ॥
॥ अथ पञ्चमोऽध्यायः– अध्याय पाचवा ॥
॥ संन्यासयोग ॥

मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे । हां हो हें कैसें तुमचें बोलणें ।
एक होय तरी अंतःकरणें । विचारूं ये ॥5-1॥

मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, अहो हे असे कसे तुमचे बोलणे ? यात एकवाक्यता असेल तर त्यासंबाधाने काही विचार करता येईल. ॥5-1॥

मागां सकळ कर्माचा सन्यासु । तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु ।
तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु । पोखीतसां पुढती ? ॥5-2॥

सर्व कर्मांचा त्याग करावा असे तुम्हीच मागे पुष्कळ रीतीने सांगितले होते. तर आता कर्मयोगाविषयीच्या भराला जास्त उत्तेजन का देता ? ॥5-2॥

ऐसें द्व्यर्थ हें बोलतां । आम्हां नेणतयांच्या चित्ता ।
आपुलिये चाडें श्रीअनंता । उमजु नोहे ॥5-3॥

श्रीअनंता (कृष्णा), असे हे दुटप्पी बोलले असता आमच्यासारख्या अल्पसमजुतीच्या लोकांच्या मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाही. ॥5-3॥

ऐकें एकसारातें बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे ।
हें आणिकीं काय सांगिजे । तुम्हांप्रति ॥5-4॥

ऐक. एक तत्व जर सांगावयाचे असेल तर एकच निश्चित सांगितले पाहिजे, हे तुम्हाला दुसर्‍यांनी सांगवयास पाहिजे काय ? ॥5-4॥

तरी याचिलागीं तुमतें । म्यां राउळासि विनविलें होतें ।
जे हा परमार्थु ध्वनितें । न बोलावा ॥5-5॥

एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या श्रेष्ठांना विनंती केली होती की हे तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नये. ॥5-5॥

परी मागील असो देवा । आतां प्रस्तुतीं उकलु देखावा ।
सांगें दोहींमाजि बरवा । मार्गु कवण ॥5-6॥

परंतु देवा, मागे झाले ते राहू द्या. आता ह्यावेळी उलगडा करा आणि या दोन मार्गांपैकी चांगला कोणता ते सांगा. ॥5-6॥

जो परिणामींचा निर्वाळा । अचुंबितु ये फळा ।
आणि अनुष्ठितां प्रांजळा । सावियाचि ॥5-7॥

ज्याचा शेवट शुद्ध असून ज्याचे फळ अचूक प्राप्त होते व ज्याचे अनुष्ठान सहजच सरळ आहे. ॥5-7॥

जैसें निद्रेचें सुख न मोडे । आणि मार्गु तरी बहुसाल सांडे ।
तैसें सोहोकासन सांगडें । सोहपें होय ॥5-8॥

ज्याप्रमाणे झोपेच्या सुखात व्यत्यय न येता रस्ता तर पुष्कळ काटत जातो अशा सुखकारक वाहना सारखा जो सोईचा मार्ग असेल तो सांगा. ॥5-8॥

येणें अर्जुनाचेनि बोलें । देवो मनीं रिझले ।
मग होईल ऐकें म्हणितलें । संतोषोनियां ॥5-9॥

ह्या अर्जुनाच्या बोलण्याने देव मनात खूष झाले. मग संतुष्ट होऊन म्हणाले, ऐक तसेही होईल. ॥5-9॥

देखा कामधेनु ऐसी माये । सदैवा जया होये ।
तो चंद्रुही परी लाहे । खेळावया ॥5-10॥

पहा ज्या दैववानाला कामधेनुसारखी आई मिळते त्याला चंद्र पण तो सुद्धा खेळावयास मिळतो. ॥5-10॥

पाहे पां श्रीशंभूची प्रसन्नता । तया उपमन्यूचिया आर्ता ।
काय क्षीराब्धि दूधभाता । देइजेचिना ? ॥5-11॥

हे पहा, शंकरांनी प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्याला दूधभाताकरता क्षीरसमुद्र दिला नाही का ? ॥5-11॥

तैसा औदार्याचा कुरुठा । श्रीकृष्णु आपु जाहलिया सुभटा ।
कां सर्व सुखांचा वसौटा । तोचि नोहावा ॥5-12॥

त्याप्रमाणे उदारपणाचे घर जो श्रीकृष्ण, तो अर्जुनाच्या स्वाधीन झाल्यावर मग तो अर्जुन सर्व सुखांचे वसतीस्थान का होऊ नये ? ॥5-12॥

एथ चमत्कारु कायसा । गोसावी श्रीलक्ष्मीकांतासा ।
आतां आपुलिया सवेसा । मागावा कीं ॥5-13॥

यात आश्चर्य कसले ? लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला असतांना आता आपल्याला हवे तसे त्याने का मागून घेऊ नये ? ॥5-13॥

म्हणौनि अर्जुनें म्हणितलें । तें हांसोनि येरें दिधलें ।
तेंचि सांगेन बोलिलें । काय कृष्णें ॥5-14॥

म्हणून अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन दिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीकृष्ण जे काय म्हणाले ते मी सांगेन. ॥5-14॥

तो म्हणे गा कुंतीसुता । हे संन्यासयोगु विचारितां ।
मोक्षकरु तत्त्वता । दोनीही होती ॥5-15॥

श्रीकृष्ण म्हणाले – अर्जुना हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर तात्विक दृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. ॥5-15॥

तरी जाणानेणा सकळां । हा कर्मयोगु कीर प्रांजळा ।
जैसी नाव स्त्रियां बाळां । तोयतरणीं ॥5-16॥

तरी पण जाणते व नेणते या सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आचरण्याला सरळ आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरून जाण्याला स्त्रियांना व बालकांना होडी हे सुलभ साधन आहे त्याप्रमाणे भवसागरातून तरून जाण्यास हा कर्मायोग साधन आहे. ॥5-16॥

तैसें सारासार पाहिजे । तरी सोहपा हाचि देखिजे ।
येणें संन्यासफळ लाहिजे । अनायासें ॥5-17॥

त्याचप्रमाणे सारासाराचा विचार केला तर हाच सोपा दिसतो. याने कर्माच्या संन्यासापासून मिळणार्‍या फलाची प्राप्ती कष्टावाचून होते. ॥5-17॥

आतां याचिलागीं सांगेन । तुज संन्यासियाचें चिन्ह ।
मग सहजें हें अभिन्न । जाणसी तूं ॥5-18॥

आता एवढ्याकरता मी तुला कर्मसंन्य़ास करणाराचे लक्षण सांगेन, मग हे दोन्ही मार्ग सहजच एक आहेत असे तू जाणशील. ॥5-18॥

तरी गेलियाची से न करी । न पवतां चाड न धरी ।
जो सुनिश्चळु अंतरीं । मेरु जैसा ॥5-19॥

तरी गत गोष्टींची जो आठवण धरत नाही, काही मिळाले तर त्याची इच्छा करत नाही, जो मेरु पर्वताप्रमाणे अंत:करणात अगदी अचळ असतो ॥5-19॥

आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंतःकरण ।
पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ॥5-20॥

आणि ज्याच्या अंत:करणात मी व माझे यांचे स्मरण राहिलेले नाही. अर्जुना तो सदोदित संन्यासीच आहे हे जाणावे. ॥5-20॥

जो मनें ऐसा जाहला । संगीं तोचि सांडिला ।
म्हणौनि सुखें सुख पावला । अखंडित ॥5-21॥

ज्याच्या मनाची अशी तयारी झाली, त्याला संगच सोडून जातात, म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनायासे प्राप्ती होते. ॥5-21॥

आतां गृहादिक आघवें । तें कांहीं नलगे त्यजावें ।
जे घेतें जाहलें स्वभावें । निःसंगु म्हण‍ऊनि ॥5-22॥

अशा स्थितीत घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची काही जरुरी नाही. कारण त्यांची आसक्ती घेणारे मन तेच स्वभावत: नि:संग झाले आहे म्हणून. ॥5-22॥

देखें अग्नि विझोनि जाये । मग जे राखोंडी केवळु होये ।
तैं ते कापुसें गिंवसूंये । जियापरी ॥5-23॥

पहा अग्नी विझून गेल्यावर मग जो राखेचा ढेपसा शिल्लक रहातो तेव्हा त्याला कापसामधे सुद्धा ज्याप्रमाणे गुंडाळून ठेवता येते. ॥5-23॥

तैसा असतेनि उपाधी । नाकळिजे तो कर्मबंधीं ।
जयाचिये बुद्धी । संकल्पु नाहीं ॥5-24॥

त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प नाहीत तो परिवारात असून सुद्धा कर्मबंधात पडत नाही. ॥5-24॥

म्हणोनि कल्पना जैं सांडे । तैंचि गा संन्यासु घडे ।
इयें कारणें दोनी सांगडे । संन्यासयोगु ॥5-25॥

म्हणून ज्यावेळेला कल्पना सुटते त्याच वेळेला संन्यास घडतो. या कारणाने कर्मसंन्यास व कर्मयोग दोन्ही सारखेच आहेत. ॥5-25॥

एर्‍हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा ।
ते सांख्ययोगुसंस्था । जाणती केवीं ? ॥5-26॥

एरव्ही अर्जुना, जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्ययोग व कर्मयोग यातील भेद कसे जाणतील ? ॥5-26॥

सहजें ते अज्ञान । म्हणोनि म्हणती ते भिन्न ।
एर्‍हवीं दीपाप्रति काई आनान । प्रकाशु आहाती ? ॥5-27॥

ते स्वभावत:च मूर्ख असतात. म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. नाही तर प्रत्येक दिव्याचा प्रकाश काय वेगवेगळे आहेत काय ? ॥5-27॥

पैं सम्यक् येणें अनुभवें । जिहीं देखिलें तत्त्व आघवें ।
तें दोहींतेंही ऐक्यभावें । मानिती गा ॥5-28॥

एकाचेच चांगले आचरण करून ज्यांनी संपूर्ण तत्व समजावून घेतले ते दोघांनाही एकच रूपाने समजतात. ॥5-28॥

आणि सांख्यीं जें पाविजे । तेंचि योगीं गमिजे ।
म्हणोनि ऐक्य दोहींतें सहजें । इयापरी ॥5-29॥

आणि सांख्य मार्गाने जे मिळते तेच योगाने प्राप्त होते. अशा रीतीने या दोन मार्गात सहजच एकता आहे. ॥5-29॥

देखें आकाशा आणि अवकाशा । भेदु नाहीं जैसा ।
तैसें ऐक्य योगसंन्यासा । वोळखे जो ॥5-30॥

पहा आकाश आणि पोकळी यांच्यामधे ज्याप्रमाणे भिन्नता नाही त्याप्रमाणे कर्मयोग व आणि सांख्ययोग यांची एकता ज्याला पटलेली असते ॥5-30॥

तयासींचि जगीं पाहलें । आपणपें तेणेंचि देखिलें ।
जया सांख्ययोग जाणवले । भेदेंविण ॥5-31॥

ज्याला सांख्य व कर्मयोग अभिन्नतेने पटले त्यालाच जगात उजाडले, ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले. ॥5-31॥

जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता ।
तो महासुखाचा निमथा । वहिला पावे ॥5-32॥

अर्जुना, जो निष्काम कर्म करण्याची हातवटीरूपी रस्त्याने मोक्षरूप पर्वतावर चढतो, तो परमानंदरूप शिखर त्वरेने गाठतो. ॥5-32॥

येरा योगस्थिति जया सांडे । तो वायांचि गा हव्यासीं पडे ।
परि प्राप्ति कहीं न घडे । संन्यासाची ॥5-33॥

त्याहून दुसरा, ज्याचे हातून कर्मयोगाचे अनुष्ठान होत नाही, तो व्यर्थच (संन्यासाच्या) छंदात पडतो. परंतु त्याला संन्यासाची प्राप्ती कधीच होत नाही. ॥5-33॥

जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें । गुरुवाक्यें मन धुतलें ।
मग आत्मस्वरूपीं घातलें । हरौनियां ॥5-34॥

ज्याने भ्रमापासून हिरावून घेतलेले आपले मन गुरूपदेशाने स्वच्छ करून आत्मस्वरूपात मुरवून ठेवले, ॥5-34॥

जैसें समुद्रीं लवण न पडे । तंव वेगळें अल्प आवडे ।
मग होय सिंधूचि एवढें । मिळे तेव्हां ॥5-35॥

ज्याप्रमाणे समुद्रात मीठ पडले नाही तोपर्यंत ते मर्यादित असे दिसते, मग ज्यावेळी समुद्राशी त्याचा योग होतो, त्यावेळी ते समुद्राएवढे होते ॥5-35॥

तैसें संकल्पोनि काढिलें । जयाचें मनचि चैतन्य जाहलें ।
तेणें एकदेशियें परी व्यापिलें । लोकत्रय ॥5-36॥

त्याप्रमाणे संकल्पापासून दूर गेल्यामुळे ज्याचे चित्त चिद्रूप झाले तो मर्यादित दिसत असला तरी त्याने तिन्ही लोक व्यापले आहेत. असे समज. ॥5-36॥

आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें ।
आणि करी जर्‍ही आघवें । तर्‍ही अकर्ता तो ॥5-37॥

आता कर्ता-कर्म-कार्य हा त्रिपुटीचा व्यवहार स्वभावत:च बंद पडतो, आणि यावर त्याने सर्व जरी केले तरी तो तत्वत: त्याचा कर्ता होत नाही. ॥5-37॥

जे पार्था तया देहीं । मी ऐसा आठऊ नाहीं ।
तरी कर्तृत्व कैचैं काई । उरे सांगें ? ॥5-38॥

कारण अर्जुना त्याच्या ठिकाणी ‘मी देह’ अशी आठवणच नसते. तर मग कर्तेपणा कोठचा ? तो कर्तेपणा तेथे राहील काय ? सांग. ॥5-38॥

ऐसें तनुत्यागेंवीण । अमूर्ताचे गुण ।
दिसती संपूर्ण । योगयुक्तां ॥5-39॥

याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याशिवाय अव्यक्त परमात्म्याचे सर्व स्वभाव त्या कर्मयोग्याच्या ठिकाणी स्पष्टपणे अनुभवास येतात. ॥5-39॥

एर्‍हवीं आणिकांचिये परी । तोही एक शरीरी ।
अशेषाही व्यापारीं । वर्ततु दिसे ॥5-40॥

एरवी तोही इतर लोकांप्रमाणे शरीरात असून, सर्व व्यवहार करीत असतांना दिसतो. ॥5-40॥

तोही नेत्रीं पाहे । श्रवणीं ऐकतु आहे ।
परि तेथींचा सर्वथा नोहे । नवल देखें ॥5-41॥

तो देखील इतर लोकांसारखा डोळ्यांनी पहातो, कानांनी ऐकतो, परंतु आश्चर्य पहा की तो त्या व्यवहारात मुळीच लिप्त होत नाही. ॥5-41॥

स्पर्शासि तरी जाणे । परिमळु सेवी घ्राणें ।
अवसरोचित बोलणें । तयाहि आथी ॥5-42॥

तो इतरांसारखा स्पर्शासही समजतो, नाकाने गंधाचा अनुभव घेतो व समयोचित बोलण्याचा व्यवहारही त्याच्याकडून घडतो. ॥5-42॥

आहारातें स्वीकारी । त्यजावें तें परिहरी ।
निद्रेचिया अवसरीं । निदिजे सुखें ॥5-43॥

आहाराचे सेवन करतो, टाकायचे ते टाकतो व झोपेच्या वेळेला समाधानाने झोप घेतो. ॥5-43॥

आपुलेनि इच्छावशें । तोही गा चालतु दिसे ।
पैं सकळ कर्म ऐसें । रहाटे कीर ॥5-44॥

तो आपल्या इच्छेनुरूप चालतांना दिसतो. असे तो सर्व कर्मांचे खरोखर आचरण करतो. ॥5-44॥

हें सांगों काई एकैक । देखें श्वासोच्छ्वासादिक ।
आणि निमिषोन्निमिष । आदिकरूनि ॥5-45॥

हे एकेक काय सांगावे ? पहा, श्वास घेणे व सोडणे, आणि पापण्यांची उघडझाप करणे इत्यादी कर्मे ॥5-45॥

पार्था तयाचे ठायीं । हें आघवेंचि आथि पाहीं ।
परी तो कर्ता नव्हे कांहीं । प्रतीतिबळें ॥5-46॥

अर्जुना त्याच्या ठिकाणी ही सर्वच असतात असे समज. परंतु तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर ह्यांचा कर्ता मुळीच होत नाही. ॥5-46॥

जैं भ्रांतिसेजे सुतला । तैं स्वप्नसुखें भुतला ।
मग तो ज्ञानोदयीं चेइला । म्हणौनियां ॥5-47॥

ज्यावेळी भ्रांतिरूप अंथरुणावर झोपला होता त्यावेळी तो स्वप्नाच्या सुखाने घेरला होता, मग ज्ञानाचा उदय झाला असतांना जागा झाला म्हणून तो आपल्याला कर्ता समजत नाही ॥5-47॥

आतां अधिष्ठानसंगती । अशेषाही इंद्रियवृत्ती ।
आपुलालिया अर्थीं । वर्तत आहाती ॥5-48॥

आता चैतन्याच्या आश्रयाने सर्वेंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयाकडे धाव घेत असतात. ॥5-48॥

दीपाचेनि प्रकाशें । गृहींचे व्यापार जैसे ।
देहीं कर्मजात तैसे । योगयुक्ता ॥5-49॥

दिव्याच्या उजेडावर घरातील सर्व व्यवहार चालतात, त्याप्रमाणे ज्ञानाच्या आश्रयाने योगयुक्तांची सर्व कर्मे देहात चालतात. ॥5-49॥

तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे ।
जैसें न सिंपे जळीं जळें । पद्मपत्र ॥5-50॥

ज्याप्रमाणे कमलाचे पान पाण्यात असून पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मे करतो, परंतु धर्माधर्मरूप कर्मबंधाने आकळला जात नाही. ॥5-50॥

देखैं बुद्धीची भाष नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे ।
ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥5-51॥

पहा जे कर्म बुद्धीला समजण्याचे पूर्वी व मनात विचार उद्भवण्याच्या अगोदर होते त्या व्यवहाराला कायिक व्यवहार म्हणतात. ॥5-51॥

हेंच मराठे परियेशीं । तरी बाळकाची चेष्टा जैशी ।
योगिये कर्में करिती तैशीं । केवळा तनु ॥5-52॥

हेच स्पष्ट पाहिजे असेल तर ऐक. ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाची हालचाल असते त्याप्रमाणे योगी केवळ शरीरानेच कर्म करतात. ॥5-52॥

मग पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असे निदेलें ।
तेथ मनचि रहाटें एकलें । स्वप्नीं जेवीं ॥5-53॥

शरीर हे पाच भूतांचे बनलेले असते, त्यावेळेला ज्याप्रमाणे एकटे मनच स्वप्नात व्यवहार करते ॥5-53॥

नवल ऐकें धनुर्धरा । कैसा वासनेचा पसारा ।
देहा होऊं नेदी उजगरा । परी सुखदुःखें भोगी ॥5-54॥

अर्जुना, एक आश्चर्य पहा. या वासनेचा विस्तार केवढा आहे ! ती देहाला जागे होऊ देत नाही पण सुखदु:खाचा भोग भोगवते. ॥5-54॥

इंद्रियांच्या गांवीं नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे ।
तो केवळु गा म्हणिजे । मानसाचा ॥5-55॥

इंद्रियांना ज्यांचा पत्ता नसतो, असे जे कर्म उत्पन्न होते त्याला केवळ मानसिक कर्म म्हणतात. ॥5-55॥

योगिये तोही करिती । परी कर्में तें न बंधिजती ।
जे सांडिली आहे संगती । अहंभावाची ॥5-56॥

योगी तेही कर्म करतात, पण त्या कर्माने बांधले जात नाहीत. कारण त्यांनी अहंकाराची संगती टाकलेली असते. ॥5-56॥

आतां जाहालिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त ।
मग इंद्रियांचें चेष्टित । विकळु दिसे ॥5-57॥

आता ज्याप्रमाणे भूतांचा संचार झाल्यामुळे चित्त भ्रमाच्या स्वाधीन झाल्यावर मग संचार झालेल्या माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया अमेळ दिसतात ॥5-57॥

स्वरूप तरी देखे । आळविलें आइके ।
शब्दु बोले मुखें । परी ज्ञान नाहीं ॥5-58॥

त्यास रूप तर दिसते, हाका मारलेले ऐकू येते, तो तोंडाने शब्दाचा उच्चारही करतो परंतु हे सर्व केल्याची त्यास जाणीव नसते. ॥5-58॥

हें असो काजेंविण । जें जें कांहीं करण ।
तें केवळ कर्म जाण । इंद्रियांचें ॥5-59॥

हे राहू दे, तो प्रयोजनावाचूनच जे काही करतो ते सर्व केवळ इंद्रियाचे कर्म आहे असे समज. ॥5-59॥

मग सर्वत्र जें जाणतें । ते बुद्धीचें कर्म निरुतें ।
ओळख अर्जुनातें । म्हणे हरी ॥5-60॥

मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व ठिकाणी जाणण्याचे जे काम आहे, ते खरोखर बुद्धीचे आहे असे ओळख. ॥5-60॥

ते बुद्धी धुरे करुनी । कर्म करिती चित्त देऊनी ।
परी ते नैष्कर्म्यापासुनी । मुक्त दिसती ॥5-61॥

ते बुद्धीच्या प्रामुख्याने मन:पूर्वक कर्मे करतात पण ते कर्मयोगी नैष्कर्म्य स्थितीस प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षाही मुक्त दिसतात. ॥5-61॥

जें बुद्धीचिये ठावूनि देही । तयां अहंकाराची सेचि नाहीं ।
म्हणौनि कर्म करितां पाहीं । चोखाळले ॥5-62॥

कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही अहंकाराचे स्मरणच नसते. म्हणून अशा कर्माचे आचरण करीत असताही ते शुद्धच असतात असे समज. ॥5-62॥

अगा करितेनवीण कर्म । तेंचि तें नैष्कर्म्य ।
हें जाणती सुवर्म । गुरुगम्य जें ॥5-63॥

अर्जुना, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले जे कर्म तेच निष्कर्म होय. ही गुरूकडून कळणारी मर्माची गोष्ट प्राप्तपुरुष समजतात. ॥5-63॥

आतां शांतरसाचें भरितें । सांडीत आहे पात्रातें ।
जें बोलणें बोलापरौतें । बोलवलें ॥5-64॥

आता शांतरसाचा पूर मर्यादा सोडून उचंबळत आहे. कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टींचे व्याख्यान करता आले. ॥5-64॥

एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु ।
तयासीचि आथि लागु । परिसावया ॥5-65॥

ज्यांचा इंद्रियांविषयींचा पराधीनपणा चांगल्या तर्‍हेने नाहीसा झाला आहे, त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे. ॥5-65॥

हा असो अतिप्रसंगु । न संडी पां कथालागु ।
होईल श्लोकसंगति भंगु । म्हणौनियां ॥5-66॥

(या ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यावर संत श्रोते म्हणतात) हे विषयांतर करणे पुरे. कथेचा संबंध सोडू नकोस. कारण तसे करण्याने श्लोकसंगतीचा बिघाड होईल. ॥5-66॥

जें मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धी नातुडे ।
तें दैवाचेनि सुरवाडें । सांगवलें तुज ॥5-67॥

जे मनाने आकलन करणे कठिण आहे, घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही, ते दैवाच्या अनुकूलतेने तुला सहज सांगता आले. ॥5-67॥

जें शब्दातीत स्वभावें । तें बोलींचि जरी फावे ।
तरी आणिकें काय करावें । कथा सांगैं ॥5-68॥

जे स्वभावत: शब्दाच्या पलीकडचे आहे, ते बोलण्यात सापडले तर इतरांचे काय प्रयोजन ? तेव्हा तू श्रीकृष्ण संवादाची चाललेली कथा सांग. ॥5-68॥

हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दास निवृत्तीचा ।
म्हणे संवादु दोघांचा । परिसोनि परिसा ॥5-69॥

श्रोत्यांची अशी ही अतिशय उत्कंठा जाणून निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, कृष्ण व अर्जुन या दोघात चाललेले हे संभाषण एवढा वेळ ऐकले ते लक्षात देऊन यापुढे ऐका. ॥5-69॥

मग श्रीकृष्ण म्हणे पार्थातें । आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें ।
सांगेन तुज निरुतें । चित्त देईं ॥5-70॥

मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आता तुला कृतकृत्य झालेल्या पुरषाचे चिन्ह संपूर्ण सांगेन. तू चांगले लक्ष दे. ॥5-70॥

तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला ।
तो घर रिघोनि वरिला । शांति जगीं ॥5-71॥

तरी ज्ञानयोगाने जो संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफलाचा वीट आलेला आहे त्याला या जगात शांती घरात घुसून वरते. ॥5-71॥

येरु कर्मबंधें किरीटी । अभिलाषाचिया गांठीं ।
कळासला खुंटी । फळभोगाच्या ॥5-72॥

अर्जुना त्याहून दुसरा प्रपंची कर्माच्या बंधामुळे अभिलाषेच्या दाव्याने फलभोगाच्या खुंट्याला बांधला जातो. ॥5-72॥

जैसा फळाचिये हांवें । तैसें कर्म करी आघवें ।
मग न कीजेचि येणें भावें । उपेक्षी जो ॥5-73॥

फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे तो सर्व कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या समजुतीने त्याविषयी उदासीन रहातो. ॥5-73॥

तो जयाकडे वासु पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये ।
तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ॥5-74॥

तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो जेथे सांगेल तेथे महाबोध नांदतो. ॥5-74॥

नवद्वारें देहीं । तो असतुचि परि नाहीं ।
करितुचि न करी कांहीं । फलत्यागी ॥5-75॥

नऊ छिद्रांच्या देहामध्ये वागत असूनही त्याचे देहाशी तादात्म्य नसते. तो फलांचा त्याग करणारा कर्मे करीत असताही (परिणामाच्या दृष्टीने पाहिले असता) काहीच करत नाही. ॥5-75॥

जैसा कां सर्वेश्वरू । पाहिजे तंव निर्व्यापारु ।
परि तोचि रची विस्तारु । त्रिभुवनाचा ॥5-76॥

ज्याप्रमाणे सर्वेश्वर जर पाहिला तर तो वस्तुत: क्रियाशून्य असतो, परंतु तोच तिन्ही लोकांच्या विस्ताराची रचना करतो. ॥5-76॥

आणि कर्ता ऐसें म्हणिपे । तरी कवणें कर्मीं न शिंपें ।
जे हातुपावो न लिंपे । उदासवृत्तीचा ॥5-77॥

आणि त्यास कर्ता असे म्हणावे, तर तो कोणत्याही कर्मात लिप्त होत नाही. कारण त्याच्या ठिकाणी असणार्‍या उदासीनतेचा कोणताही अवयव अशुद्ध होत नाही. (ज्याची उदासीनता किंचितही बिघडत नाही. ॥5-77॥

योगनिद्रा तरी न मोडे । अकर्तेपणा सळु न पडे ।
परी महाभूतांचें दळवाडें । उभारी भले ॥5-78॥

त्याच्या सहज स्थितीचा तर भंग होत नाही व त्याचा अकर्तेपणा चोळवटत नाही असे असूनही तो महाभूतांचे समुदाय चांगल्या तर्‍हेने उत्पन्न करतो. ॥5-78॥

जगाच्या जीवीं आहे । परी कवणाचा कहीं नोहे ।
जगचि हें होय जाये । तो शुद्धीहि नेणे ॥5-79॥

तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो. परंतु केव्हाही कोणाचीही आसक्ती धरत नाही. हे जग उत्पन्न होते व नाहीसे होते ह्याची त्य़ास खबरही नसते. ॥5-79॥

पापपुण्यें अशेषें । पासींचि असतु न देखें ।
आणि साक्षीही होऊं न ठके । येरी गोठी कायसी ? ॥5-80॥

प्राणिमात्राकडून होणारी संपूर्ण पापपुण्ये ही त्याच्या अगदी जवळ असतात, तरी तो त्यांना जणत नाही फार काय तो त्यांचा साक्षीही होऊन रहात नाही. तर मग दुसरी गोष्ट कशाला बोलायला पाहिजे ? ॥5-80॥

पैं मूर्तीचेनि मेळें । तो मूर्तचि होऊनि खेळे ।
परि अमूर्तपण न मैळे । दादुलयाचें ॥5-81॥

सगुण स्वरूपाच्या संगतीने तो सगुण होऊन क्रीडा करतो, परंतु त्या समर्थाच्या निर्गुणपणाला भ्रष्टता येत नाही. ॥5-81॥

तो सृजी पाळी संहारी । ऐसें बोलती जे चराचरीं ।
तें अज्ञान गा अवधारीं । पंडुकुमरा ॥5-82॥

तो उत्पन्न करतो, पालन करतो, असे त्याच्या कर्तृत्वाविषयी सर्व लोकात वर्णन होते. अर्जुना ऐक. ते केवळ अज्ञान आहे. ॥5-82॥

तें अज्ञान जैं समूळ तुटे । तै भ्रांतीचें मसैरें फिटे ।
मग अकर्तृत्व प्रगटे । मज ईश्वराचें ॥5-83॥

ते अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसे होते, त्यावेळेला भ्रांतिरूप काजळी दूर होते आणि मग ईश्वराचे अकर्तृत्व प्रतीतीला येते. ॥5-83॥

एथ ईश्वरु एकु अकर्ता । ऐसें मानलें जरी चित्ता ।
तरी तोचि मी हें स्वभावता । आदीचि आहे ॥5-84॥

आणि ईश्वर एक अकर्ता आहे, असे जर चित्ताला पटले आणि मुळापासून स्वभावत: तोच (ईश्वरच) मी आहे. (तर मीही उघडच अकर्ता आहे) ॥5-84॥

ऐसेनि विवेकें उदो चित्तीं । तयासी भेदु कैंचा त्रिजगतीं ।
देखें आपुलिया प्रतीति । जगचि मुक्त ॥5-85॥

अशा विचाराने चित्तात उदय केला असता, त्याला तिन्ही लोकात भेद कशाचा ? तो आपल्या अनुभवाने सर्व जगच मुक्त आहे असे पहातो. ॥5-85॥

जैशी पूर्वदिशेच्या राउळीं । उदया येतांचि सूर्य दिवाळी ।
कीं येरीही दिशां तियेचि काळीं । काळिमा नाहीं ॥5-86॥

ज्याप्रमाणे पूर्वदिशारूपी राजवाड्यात सूर्योदयरूपी दिवाळी झाली असता त्याच वेळेला दुसर्‍याही दिशातील काळोख नाहीसा होतो. ॥5-86॥

बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरूप भावी आपणा आपण ।
ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशीं ॥5-87॥

बुद्धीच्या निश्चयाने आत्मज्ञान झाले, म्हणजे साधक आपणच आपल्याला ब्रह्मरूप मानू लागतो, आणि आपली वृत्ति पूर्ण ब्रह्माकार ठेऊन तो रात्रंदिवस त्याच अनुसंधानात असतो. ॥5-87॥

ऐसें व्यापक ज्ञान भलें । जयांचिया हृदया गिंवसित आलें ।
तयांची समता दृष्टि बोलें । विशेषूं काई ॥5-88॥

असे चांगले व्यापक ज्ञान ज्यांच्या हृदयांचा तपास करत आले आहे (ज्यांना प्राप्त झाले आहे) त्यांची जी समतादृष्टी होते, तिचे शब्दांनी विशेष काय वर्णन करू ? ॥5-88॥

एक आपणपांचि जैसें । ते देखतीं विश्व तैसें ।
हें बोलणें कायसें । नवलु एथ ॥5-89॥

ते जसे आपल्यालाचा ब्रह्मरूप पहातात, हे येथे सांगण्यात काय मोठे आश्चर्य आहे ? ॥5-89॥

परी दैव जैसें कवतिकें । कहींचि दैन्य न देखे ।
कां विवेकु हा नोळखे । भ्रांतीतें जेवीं ॥5-90॥

परंतु ज्याप्रमाणे दैव हे लीलेने देखील केव्हाच दरिद्रतेला पहात नाही किंवा विचार हा ज्याप्रमाणे ओळखत नाही. ॥5-90॥

नातरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं ।
अमृत नायके कानीं । मृत्युकथा ॥5-91॥

किंवा अंधकाराचा मासला ज्याप्रमाणे सूर्याला स्वप्नातही दिसत नाही किंवा अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ताही येत नाही ॥5-91॥

हें असो संतापु कैसा । चंद्रु न स्मरे जैसा ।
भूतीं भेदु नेणती तैसा । ज्ञानिये ते ॥5-92॥

हे राहू दे, उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवूनही लक्षात येणार नाही, त्याप्रमाणे ते ज्ञानी लोक प्राण्यांच्या ठिकाणी भेदाला जाणत नाही. ॥5-92॥

मग हा मशकु हा गजु । कीं हा श्वपचु हा द्विजु ।
पैल इतरु हा आत्मजु । हें उरेल कें ? ॥5-93॥

मग त्यांचे ठिकाणी हे चिलट, आणि हा हत्ती, किंवा हा चांडाळ आणि हा ब्राह्मण, किंवा हा आपला मुलगा आणि हा पलिकडे असलेला परका, हा भेद कोठून उरणार ? ॥5-93॥

ना तरी हे धेनु हें श्वान । एक गुरु एक हीन ।
हें असो कैचें स्वप्न । जागतया ॥5-94॥

अथवा ही गाय आणि हे कुत्रे अथवा एक थोर आणि एक नीच हे कोठले ? हे राहू दे, जागा असलेल्याला स्वप्न कोठून पडणार ? ॥5-94॥

एथ भेदु तरी कीं देखावा । जरी अहंभाव उरला होआवा ।
तो आधींचि नाहीं आघवा । आतां विषमु काई ॥5-95॥

जर अहंकार उरलेला असेल तरच भेदाची प्रतीती येईल. तो अहंकार तर अगोदरच सर्व नाहीसा झाला आता भेदभाव कोठला ? ॥5-95॥

म्हणौनि सर्वत्र सदा सम । तें आपणचि अद्वय ब्रह्म ।
हें संपूर्ण जाणें वर्म । समदृष्टीचें ॥5-96॥

म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सारखे असणारे जे अद्वय ब्रह्म तेच आपण आहोत हे जे समदृष्टीचे तत्व ते तो संपूर्णपणे जाणतो. ॥5-96॥

जिहीं विषयसंगु न सांडितां । इंद्रियांतें न दंडितां ।
परी भोगिली निसंगता । कामनेविण ॥5-97॥

ज्यांनी विषयांचा संबंध टाकला नाही आणि इंद्रियांना शासन केले नाही, परंतु एक आपले ठिकाणी इच्छा नसल्यामुळे ज्यांनी अलिप्तता भोगली. ॥5-97॥

जिहीं लोकांचेनि आधारें । लौकिकेंचि व्यापारें ।
परि सांडिलें निदसुरें । लौकिकु हें ॥5-98॥

जे लोकांना अनुसरून, लोक करतात त्याप्रमाणे व्यवहार करतात, परंतु ज्यांनी लोकांचे ठिकाणी असणार्‍या अज्ञानाचा त्याग केला आहे ॥5-98॥

जैसा जनामाजि खेचरु । असतुचि जना नोहे गोचरु ।
तैसा शरीरीं परी संसारु । नोळखे तयांतें ॥5-99॥

ज्याप्रमाणे पिशाच जगात असून जगाला दिसत नाही, त्याप्रमाणे तो देहधारी असूनही संसारी लोक त्याला ओळखत नाहीत. ॥5-99॥

हें असो पवनाचेनि मेळें । जैसें जळींचि जळ लोळे ।
तें आणिकें म्हणती वेगळें । कल्लोळ हे ॥5-100॥

हे राहू दे, वार्‍याच्या संगतीने ज्याप्रमाणे पाण्यावरच पाणी (लाटारूपाने) खेळते (पण) लोक त्य़ास, ह्या लाटा पाण्याहून वेगळ्या आहेत असे म्हणतात. ॥5-100॥

तैसें नाम रूप तयाचें । एर्‍हवीं ब्रह्मचि तो साचें ।
मन साम्या आलें जयाचें । सर्वत्र गा ॥5-101॥

त्याप्रमाणे त्याचे नामरूपाची गोष्ट आहे. एरवी ज्याचे मन सर्व ठिकाणी साम्याला आलेले आहे, तो खरोखर ब्रह्मच आहे. ॥5-101॥

ऐसेनि समदृष्टी जो होये । तया पुरुषा लक्षणही आहे ।
अर्जुना संक्षेपें सांगेन पाहें । अच्युत म्हणे ॥5-102॥

अशा तर्‍हेने जो समदृष्टीने असतो. त्या पुरुषाला लक्षण देखील आहे. अच्युत म्हणाले, अर्जुना, मी तुला ते थोडक्यात सांगतो, त्याचा तू विचार कर, ॥5-102॥

तरी मृगजळाचेनि पूरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें ।
तैसा शुभाशुभीं न विकरे । पातलिया जो ॥5-103॥

मृगजलाच्या लोंढ्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत किंचितही ढकलला जात नाही, त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता ज्याच्यामधे विकार उत्पन्न होत नाहीत ॥5-103॥

तोचि तो निरुता । समदृष्टी तत्त्वतां ।
हरि म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ॥5-105॥

तोच खरोखर तात्विकदृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय. कृष्ण म्हणाले अर्जुना, ब्रह्म ते तोच समज. ॥5-104॥

जया आपणपें सांडूनि कहीं । इंद्रियग्रामावरी येणेंचि नाहीं ।
तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ ॥5-104॥

जो आत्मस्वरूपाला सोडून केव्हाही इंद्रियरूपी गावात येत नाही, (म्हणजे तो इंद्रियांशी तादात्म्य पावत नाही) तो विषयसेवन करत नाही, यात काय आश्चर्य आहे ? ॥5-105॥

सहजें स्वसुखाचेनि अपारें । सुरवाडलेनि अंतरें ।
रचिला म्हणौनि बाहिरें । पाउल न घाली ॥5-106॥

अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंत:करणातच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकत नाही. (विषयांकडे प्रवृत्त होत नाही. ॥ ॥5-106॥

सांगैं कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटें ।
तो चकोरु काई वाळुवंटें । चुंबितु असे ? ॥5-107॥

सांग कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो शुद्ध चंद्रकिरणांचे भोजन करतो, तो चकोर पक्षी वाळवंटातील दगड चाटत बसेल काय ? ॥5-107॥

तैसें आत्मसुख उपाइलें । जयासि आपणपेंचि फावलें ।
तया विषयो सहजें सांडवले । म्हणो काई ? ॥5-108॥

त्याप्रमाणे ज्याला स्वत:च्या आपल्या ठिकाणी उत्कृष्ठ आत्मसुख प्राप्त झाले त्याला विषय सुटले हे काय सांगावयास पाहिजे ? ॥5-108॥

एर्‍हवीं तरी कौतुकें । विचारूनि पाहें पां निकें ।
या विषयांचेनि सुखें । झकविती कवण ॥5-109॥

एरवी सहजच चांगला विचार करून पहा, या विषयांच्या सुखाने कोण फसले जातात ? ॥5-109॥

जिहीं आपणपें नाहीं देखिलें । तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले ।
जैसें रंकु कां आळुकैलें । तुषांतें सेवी ॥5-110॥

ज्याप्रमाणे भुकेलेला दरिद्री पुरुष कोंडा खातो, त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या विषयात रंगतात. ॥5-110॥

नातरी मृगें तृषापीडितें । संभ्रमें विसरोनि जळांतें ।
मग तोयबुद्धी बरडीतें । ठाकूनि येती ॥5-111॥

अथवा तहानेने त्रस्त झालेली हरणे भ्रमाने खर्‍या पाण्याला विसरून (मृगजळाला) पाणी आहे असे समजून माळरानावरच येऊन पोहोचतात. ॥5-111॥

तैसें आपणपें नाहीं दिठे । जयातें स्वसुखाचे सदा खरांटे ।
तयासीचि विषय हे गोमटे । आवडती ॥5-112॥

तसेच ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही (अर्थात) ज्यांचे ठिकाणी स्वरूपानंदाचा नेहेमी पूर्ण अभाव असतो त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात. ॥5-112॥

एर्‍हवीं विषयीं सुख आहे । हे बोलणेंचि सारिखें नोहे ।
तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजीं ॥5-113॥

एरवी विषयांमधे काही सुख आहे, हे म्हणणे बोलण्यात जमा होणारे नाही. नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामधे का उजाडत नाही ? ॥5-113॥

सांगैं वात वर्ष आतपु धरे । ऐसे अभ्रच्छायाचि जरी सरे ।
तरी त्रिमाळिकें धवळारें । करावीं कां ॥5-114॥

सांग, वारा, पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगांच्या सावलीनेच होईल, तर तीन मजल्यांची चुनेगच्ची घरे बांधण्याचा खटाटोप कशाला ? ॥5-114॥

म्हणौनि विषयसुख जें बोलिजे । तें नेणतां गा वायां जल्पिजे ।
जैसें महूर कां म्हणिजे । विषकंदातें ॥5-115॥

म्हणून ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला (बचनागाला) मधुर म्हणावे, त्याप्रमाणे विषयात सुख आहे असे जे म्हणतात ती (विषयांचे खरे स्वरूप न जाणताच) व्यर्थ केलेली बडबड आहे असे समज. ॥5-115॥

नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु ।
तैसा सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा ॥5-116॥

किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असे म्हणतात, (पण त्याचा परिणाम पीडाकारक दिसून येतो) किंवा मृगजळालाच जल असे म्हणतात, त्याप्रमाणे विषयांपासून येणार्‍या अनुभवाला सुख म्हणणे व्यर्थ आहे. ॥5-116॥

हे असो आघवी बोली । सांग पां सर्पफणीचा साउली ।
ते शीतल होईल केतुली । मूषकासी ? ॥5-117॥

हे सर्व प्रतिपादन राहू दे, तूच सांग, सर्पाच्या फडेची सावली आहे ती उंदराला कितपत शांत करणारी होईल बरे ? ॥5-117॥

जैसा आमिषकवळु पांडवा । मीनु न सेवी तंवचि बरवा ।
तैसा विषयसंगु आघवा । निभ्रांत जाणें ॥5-118॥

अर्जुना, ज्याप्रमाणे गळाला लावलेल्या आमीषाचा पिंड जोपर्यंत मासा गिळत नाही तोपर्यंतच ठीक. त्याप्रमाणे विषयांचा सर्व संग आहे, हे तू नि:संशय समज. ॥5-118॥

हे विरक्तांचिये दिठी । जैं न्याहाळिजे किरीटी ।
तैं पांडुरोगाचिये पुष्टी- । सारिखें दिसे ॥5-119॥

विरक्तांच्या नजरेने पाहिले तर हे विषय, अर्जुना, पंडुरोगामधे आलेल्या लठ्ठपणाप्रमाणे घातक आहेत असे समज. ॥5-119॥

म्हणौनि विषयभोगीं जें सुख । तें साद्यंतचि जाण दुःख ।
परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥5-120॥

म्हणून विषयांच्या उपभोगामधे जे सुख असते ते प्रारंभापासून शेवटपर्यंत दु:खच आहे हे समज. परंतु काय करतील वेडे ? विषयांचे सेवन केल्याशिवाय त्यांचे चालतच नाही. ॥5-120॥

तें अंतर नेणती बापुडे । म्हणौनि अगत्य सेवणें घडे ।
सांगैं पूयपंकींचे किडे । काय चिळसी घेती ॥5-121॥

ते बिचारे वेडे लोक आतले स्वरूप जाणत नाहीत. म्हणून त्यांच्याकडून विषयांचे सेवन होते. तूच सांग, पुवाच्या चिखलातील किडे पुवाची किळस घेतात काय ? ॥5-121॥

तयां दुःखियां दुःखचि जिव्हार । ते विषयकर्दमींचे दर्दुर ।
ते भोगजळींचे जळचर । सांडिती केवीं ॥5-122॥

त्या दु:खी लोकांना दु:खच जीवन होऊन राहिलेले असते. ते विषयरूपी चिखलातील बेडूकच बनतात. ते विषयासक्त लोकरूपी मासे विषयभोगरूपी पाण्याला कसे टाकतील ? ॥5-122॥

आणि दुःखयोनि जिया आहाती । तिया निरर्थका तरी नव्हती ।
जरी विषयांवरी विरक्ती । धरिती जीव ॥5-123॥

शिवाय जर हे जीव विषयांवर अनासक्त होतील तर दु:खदायक योनी ज्या आहेत, त्या निरर्थक होणार नाहीत काय ? ॥5-123॥

नातरी गर्भवासादि संकट । कां जन्ममरणींचे कष्ट ।
हे विसांवेवीण वाट । वाहावी कवणें ॥5-124॥

अथवा गर्भात रहाणे वगैरे संकट किंवा जन्म आणि मरण यापासून होणारे कष्ट हा मार्ग अविश्रांतपणे कोणी चालावा ? ॥5-124॥

जरी विषयीं विषयो सांडिजेल । तरी महादोषीं कें वसिजेल ।
आणि संसारु हा शब्दु नव्हेल । लटिका जगीं ? ॥5-125॥

जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील तर मोठमोठ्या दोषांना रहायला जागा कशी मिळणार ? आणि या जगामधे संसार हा शब्दच खोटा ठरणार नाही का ? ॥5-125॥

म्हणौनि अविद्याजात नाथिलें । तें तिहींचि साच दाविलें ।
जिहीं सुखबुद्धी घेतलें । विषयदुःख ॥5-126॥

म्हणून ज्यांनी विषयांपासून होणारे दु:खच सुख या समजुतीने स्वीकारले त्यांनीच मिथ्या असलेले सर्व अविद्यादिक खरे करून दाखवले. ॥5-126॥

या कारणें गा सुभटा । हा विचारितां विषय वोखटा ।
तूं झणें कहीं या वाटा । विसरोनि जाशी ॥5-127॥

अर्जुना, यामुळेच विचार करून पाहिले तर हे विषय वाईट आहेत. तू विस्मरणाने कदाचित चुकून जरी कधी त्या मार्गाला लागशील तर जाऊ नकोस. ॥5-127॥

पैं यातें विरक्त पुरुष । त्यजिती कां जैसें विष ।
निराशा तयां दुःख । दाविलें नावडे ॥5-128॥

हे जे विरक्त पुरुष आहेत ते या विषयांना जसे काही विषच आहेत असे मानून त्यांचा त्याग करतात. कारण ते निरीच्छ असल्या कारणाने विषयांनी दाखवलेले दु:खरूपी सुख त्यांना आवडत नाही. ॥5-128॥

ज्ञानियांच्या हन ठायीं । याची मातुही कीर नाहीं ।
देहीं देहभावो जिहीं । स्ववश केले ॥5-129॥

आत्मज्ञान्यांच्या ठिकाणी तर या दु:खरूपी विषयांची गोष्टसुद्धा नाही. कारण त्यांनी देहात असतानाच काम-क्रोधादी वृत्ती आपल्या स्वाधीन ठेवल्या आहेत. ॥5-129॥

जयांतें बाह्याची भाष । नेणिजेचि निःशेष ।
अंतरीं सुख । एक आथि ॥5-130॥

त्यांना अंत:करणात एक ब्रह्मसुखच अनुभावाला आलेले असते, म्हणूण ते बाह्य विषयांची गोष्ट मुळीच जाणत नाहीत. ॥5-130॥

परि तें वेगळेपणें भोगिजे । जैसें पक्षियें फळ चुंबिजे ।
तैसें नव्हे तेथ विसरिजे । भोगितेपणही ॥5-131॥

परंतु पक्षी जसे फळ खातो (म्हणजे खाणारा पक्षी, खाण्याचा विषय फळ आणि क्रिया ही त्रिपुटी स्पष्ट भासते) तसे ते ब्रह्मसुख वेगळेपणाने (भोक्ता, भोग्य व भोग ही त्रिपुटी कायम ठेऊन) भोगण्यासारखे नाही. तर तेथे भोक्तेपणही विसरले पाहिजे. (म्हणजे हे भोगणे त्रिपुटीविरहित म्हणजेच तद्रूपतेने असते). ॥5-131॥

भोगीं अवस्था एकी उठी । ते अहंकाराचा अंचळु लोटी ।
मग सुखेंसि घे आंटी । गाढेपणें ॥5-132॥

त्या भोगामधे वृत्तीची अशी एक स्थिती उत्पन्न होते की ती स्थिती अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग तो जीव सुखाला गाढ आलिंगन देतो ॥5-132॥

तिये आलिंगनमेळीं । होय आपेंआप कवळी ।
तेथ जळ जैसें जळीं । वेगळें न दिसे ॥5-133॥

पाण्यात पाणी मिळाले असता जसे वेगळे दिसत नाही, त्याप्रमाणे त्या आलिंगनाच्या संबंधात आपणच आपल्याला मिठी मारतो. (म्हणजे आपलेच आपल्याशी सहजच ऐक्य होते.) ॥5-133॥

कां आकाशीं वायु हारपे । तेथ दोन्ही हे भाष लोपे ।
तैसे सुखचि उरे स्वरूपें । सुरतीं तिये ॥5-134॥

अथवा आकाशामधे वायूचा लय झाला की आकाश व वायु हे दोन आहेत असे म्हणता येत नाही, तसे या भोगामधे केवळ एक ब्रह्मसुखच स्वरूपाने रहाते. ॥5-134॥

ऐसी द्वैताची भाष जाय । मग म्हणों जरी एक होय ।
तरी तेथ साक्षी कवणु आहे । जाणते जें ॥5-135॥

अशी द्वैताची गोष्टच गेली म्हणजे ऐक्य होते, असे जर म्हणावे अर तसे ऐक्य जाणून ‘ऐक्य आहे’ असे म्हणणारा तेथे साक्षी तरी कोण उरला आहे ? ॥5-135॥

म्हणौनि असो हें आघवें । एथ न बोलणें काय बोलावें ।
ते खुणाचि पावले स्वभावें । आत्माराम ॥5-136॥

म्हणून हे मागील सगळे असू दे. जे न बोलण्यासारखे आहे ते काय बोलावे ? जे ब्रह्मनिष्ठ आहेत तेच हे मर्म सहज जाणतील. ॥5-136॥

जे ऐसेनि सुखें मातले । आपणपांचि आपण गुंतले ।
ते मी जाणें निखिळ वोतले । सामरस्याचे ॥5-137॥

जे अशा सुखाने मस्त अथवा धुंद झाले आहेत, ते पूर्णपणे सामरस्याचे (ब्रह्मैक्य भावाचे) ओतलेले पुतळेच आहेत, असे मी समजतो. ॥5-137॥

ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर ।
कीं महाबोधें विहार । केले जैसे ॥5-138॥

ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे ओतलेले कोंब आहेत, जणु काही महाबोधाने आपल्याला रहाण्याला मंदिर केले आहेत. ॥5-138॥

ते विवेकाचें गांव । कीं परब्रह्मींचे स्वभाव ।
नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ॥5-139॥

ते शुद्ध सत्वाचे सात्विक आहेत अथवा चैतन्याचे अवयव आहेत. ते विवेकाचे मूळ वसतिस्थान आहेत किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव किंवा जणु काय मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजवलेले अवयवच आहेत. ॥5-139॥

ते सत्त्वाचे सात्त्विक । कीं चैतन्याचे आंगिक ।
हें बहु असो एकैक । वानिसी काई ॥5-140॥

यावर श्रीगुरु निवृत्तिनाथ म्हणाले, हा बोलण्याचा विस्तार पुरे कर. तू एक एक कोठवर वर्णन करणार ? ॥5-140॥

तूं संतस्तवनीं रतसी । तरी कथेची से न करिसी ।
कीं निराळीं बोल देखसी । सनागर ॥5-141॥

तू जेव्हा संतांच्या स्तुतीत तन्मय होतोस तेव्हा चालू विषयाचे स्मरण तुला रहात नाही आणि विषयाला सोडून पण चांगले बोल तू बोलतोस. ॥5-141॥

परि तो रसातिशयो मुकुळीं । मग ग्रंथार्थदीपु उजळीं ।
करी साधुहृदयराउळीं । मंगळ‌उखा ॥5-142॥

परंतु हा रसाचा अधिकपणा आवरता घे आणि आता ग्रंथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलित कर. तू सज्जनांच्या अंत:करणरूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्रात:काल कर. ॥5-142॥

ऐसा श्रीगुरूचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला ।
मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला । तेंचि आइका ॥5-143॥

याप्रमाणे श्रीगुरूंचा इशारा निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव यांना मिळाला. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, श्रीकृष्ण जे म्हणाले तेच ऐका. ॥5-143॥

अर्जुना अनंत सुखाच्या डोहीं । एकसरा तळुचि घेतला जिहीं ।
मग स्थिराऊनि तेही । तेंचि जाहले ॥5-144॥

अर्जुना, अमर्याद सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोहोचले आहेत ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रूपतेला प्राप्त झाले. ॥5-144॥

अथवा आत्मप्रकाशें चोखें । जो आपणपेंचि विश्व देखे ।
तो देहेंचि परब्रह्म सुखें । मानूं येईल ॥5-145॥

अथवा शुद्ध आत्मज्ञानाने जो, आपणच आहोत असे जाणतो, तो देहामधेच परब्रह्म आहे असे खुशाल म्हणता येईल. ॥5-145॥

जें साचोकारें परम । ना तें अक्षर निःसीम ।
जिये गांवींचे निष्काम । अधिकारिये ॥5-146॥

जे खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे अथवा जे क्षयरहित व अमर्याद आहे व कामनाशून्य लोक ज्या ठिकाणची प्राप्ती करून घेण्यास अधिकारी आहेत ॥5-146॥

जे महर्षीं वाढले । विरक्तां भागा फिटलें ।
जे निःसंशया पिकलें । निरंतर ॥5-147॥

ते थोर ऋषींकरताच काढून ठेवले आहे किंवा वैराग्यावानांच्या वाट्याला आलेले आहे व जे नेहेमी संशयरहितास फालद्रूप होते. ॥5-147॥

जिहीं विषयांपासोनि हिरतलें । चित्त आपुलें आपण जिंतिलें ।
ते निश्चित जेथ सुतले । चेतीचिना ॥5-148॥

ज्यांनी आपण आपले चित्त विषयांपासून हिरावून घेऊन आपले स्वाधीन करून ठेवले आहे, असे पुरुष निश्चयाने ज्या स्वरूपात लीन झाले असता पुन: जागे होत नाहीत (वृत्तीवर येत नाहीत) ॥5-148॥

तें परब्रह्म निर्वाण । जें आत्मविदांचें कारण ।
तेंचि ते पुरुष जाण । पंडुकुमरा ॥5-149॥

आत्मज्ञान्यांचे साध्य, जे मोक्षरूप ब्रह्म तेच ते पुरुष आहेत. असे अर्जुना, तू समज. ॥5-149॥

ते ऐसे कैसेंनि जहाले । जे देहींचि ब्रह्मत्वा आले ।
हें पुससी तरी भलें । संक्षेपें सांगों ॥5-150॥

(वर सांगितलेले) जे देहधारी असतांनाच ब्रह्मभावास आले ते असे कशाने झाले हेही विचारशील तर ते आम्ही चांगले पण थोडक्यात सांगतो. ॥5-150॥

तरी वैराग्याचेनि आधारें । जिहीं विषय दवडूनि बाहिरें ।
शरीरीं एकंदरें । केलें मन ॥5-151॥

तरी वैराग्याच्या आश्रयाने अंत:करणातील विषयवासना बाहेर काढून देऊन त्यांनी मनाच्या वृत्ती शरीरामधे अंतर्मुखतेने एकाग्र केल्या. ॥5-151॥

सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रूपल्लवां पडे गांठी ।
तेथ पाठिमोरी दिठी । पारखोनियां ॥5-152॥

इडा, पिंगळा व सुषुम्ना या तिघींच्या संधीत जेथे भुवयांच्या टोकांचा मिलाफ होतो तेथे दृष्टि स्थिर करून मागे फिरवतात ॥5-152॥

सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम ।
चित्तेंसीं व्योम- । गामिये करिती ॥5-153॥

उजव्या (पिंगळा) व डाव्या (इडा) नाकपुडीतून जात येत असलेल्या वायूची गति (रेचक व पूरक) बंद करून (म्हणजे कुंभक करून) प्राण (हृदयस्थ वायु) व अपान (गुदस्थ वायु) यांची समगति म्हणजे ऐक्य करून त्यासह चित्तास ते व्योमगामी (म्हणजे मूर्ध्नी आकाशाकडे जाणारे) करतात. ॥5-153॥

तेथ जैसीं रथ्योदकें सकळें । घेऊनि गंगा समुद्रीं मिळे ।
मग एकेकु वेगळें । निवडूं नये ॥5-154॥

तेथे ज्याप्रमाणे रस्त्यावरून वहाणारे पाणी आपल्या पोटात घेऊन गंगा समुद्राला मिळते, त्यावेळेला (एक हे गटारातील पाणी एक हे गंगेचे पाणी अशी वेगवेगळी निवड करता येत नाही. ॥5-154॥

तैसी वासनांतराची विवंचना । मग आपैसी पारुखे अर्जुना ।
जे वेळीं गगनीं लयो मना । पवनें कीजे ॥5-155॥

त्याप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी प्राणापानांच्या निरोधाने मूर्ध्न्याकाशात मनाचा लय केला जातो, त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांची निवड सहजच थांबते. ॥5-155॥

जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरूपु पटु फाटे ।
जैसें सरोवर आटे । मग प्रतिभा नाहीं ॥5-156॥

त्यावेळी ज्या ठिकाणी हे संसाररूप चित्र उमटते तो मनोरूपी पडदा (वस्त्र) फाटून जातो. ज्याप्रमाणे सरोवर आटले म्हणजे प्रतिबिंब नाहीसे होते, ॥5-156॥

तैसें मन एथ मुद्दल जाय । मग अहंभावादिक कें आहे ।
म्हणौनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥5-157॥

त्याप्रमाणे मनाचे मनपण मुळीच नाहीसे झाल्यावर मग ‘मी देह’ वगैरे अहंकारादी विकार कोठे राहिले ? (देहाहंकारादी विकार नाहीसे झाले) म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो. ॥5-157॥

आम्हीं मागां हन सांगितलें । जे देहींचि ब्रह्मत्व पावले ।
ते येणें मार्गें आले । म्हणौनियां ॥5-158॥

देहधारी असतांनाच ब्रह्मभावाला पावले, असे जे आम्ही मागे सांगितले, ते या मार्गाने आले म्हणून ॥5-158॥

आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर ।
क्रमोनि हे पार । पातले ते ॥5-159॥

आणि यमनियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते ह्या पलीकडच्या तीराला ब्रह्मत्वाला पोचले. ॥5-159॥

तिहीं आपणपें करूनि निर्लेप । प्रपंचाचें घेतलें माप ।
मग साचाचेंचि रूप । होऊनि ठेले ॥5-160॥

त्यांनी आपणा स्वत:ला शुद्ध करून प्रपंचाची योग्य किंमत केली आणि मग सत्य पदार्थ जे ब्रह्म, ते तद्रूप होऊन ते राहिले. ॥5-160॥

ऐसा योगयुक्तीचा उद्देशु । जेथ बोलिला हृषीकेशु ।
तेथ अर्जुनु सुदंशु । म्हणौनि चमत्कारला ॥5-161॥

जेव्हा श्रीकृष्णांनी योगमार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला, तेव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्याकारणाने आश्चर्यचकित झाला. (कारण त्याने कधी ऐकला नाही असा योगाचा हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला.) ॥5-161॥

तें देखिलिया कृष्णें जाणितलें । मग हांसोनि पार्थातें म्हणितलें ।
काई पां चित्त उवाइलें । इये बोलीं तुझें ? ॥5-162॥

श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनाची ही स्थिती जाणली व मग ते हसून अर्जुनाला म्हणाले, ‘आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का ? ॥5-162॥

तंव अर्जुन म्हणे देवो । परचित्तलक्षणांचा रावो ।
भला जाणितला जी भावो । मानसु माझा ॥5-163॥

यावर अर्जुन म्हणाला श्रीकृष्णा, आपण मनकवड्यांचे राजे अहात. आपण माझ्या चित्तातला अभिप्राय चांगलाच ओळखलात. ॥5-163॥

म्यां जें कांहीं विवरोनि पुसावें । तें आधींचि जाणितलें देवें ।
तरी बोलिलें तेंचि सांगावें । विवळ करूनि ॥5-164॥

मी जे काही विचार करून तुम्हास विचारावे, ते देवा, आपण आधीच जाणलेत. तरी आपण जे बोललात तेच स्पष्ट करून सांगा. ॥5-164॥

एर्‍हवीं तरी अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसारा ।
तो पव्हण्याहूनि पाय‌उतारा । सोहपा जैसा ॥5-165॥

सहज विचार करून पाहिले तर देवा, ऐका, तुम्ही जो मार्ग दाखवला, तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे ॥5-165॥

तैसा सांख्याहूनि प्रांजळा । परी आम्हांसारिखियां अभोळां ।
एथ आहाति परि कांहीं काळा । तो साहों ये वर ॥5-166॥

तसा हा योगमार्ग सांख्यमार्गाहून सोपा आहे. परंतु आमच्यासारख्या दुर्बळांना येथे काही विलंब लागेल, पण तो सहन करता येईल. ॥5-166॥

म्हणौनि एक वेळ देवा । तोचि पडताळा घेयावा ।
विस्तरेल तरी सांगावा । साद्यंतुचि ॥5-167॥

म्हणून देवा, एक वेळ त्याचाच अनुवाद करावा, जरी विस्तार झाला तरी हरकत नाही. पण तो योगमार्ग आरंभापासून अखेरपर्यंत सांगाच. ॥5-167॥

तंव श्रीकृष्ण म्हणती हो कां । तुज हा मार्गु गमला निका ।
तरी काय जाहलें आईकीजो कां । सुखें बोलों ॥5-168॥

तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे का ? तुला हा मार्ग चांगला वाटतो, तर सांगायला आमची काय हरकत आहे ? ऐक, आम्ही तो आनंदाने सांगतो. ॥5-168॥

अर्जुना तूं परिससी । परिसोनि अनुष्ठिसी ।
तरी आम्हांसीचि वानी कायसी । सांगावयाची ? ॥5-169॥

अर्जुना तू ऐकतोस व ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस असे जर आहे, तर आम्हीच सांगावयास का कमी करू ? ॥5-169॥

आधींचि चित्त मायेचें । वरी मिष जाहले पढियंतयाचें ।
आतां तें अद्‍भुतपण स्नेहाचें । कवण जाणे ॥5-170॥

(ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की) अगोदरच आईचे अंत:करण, त्यात आवडतेपणाचे निमित्त झाले, मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल ? ॥5-170॥

तें म्हणो कारुण्यरसाची वृष्टि । कीं नवया स्नेहाची सृष्टि ।
हें असो नेणिजे दृष्टी । हरीची वानूं ॥5-171॥

ती हरीची कृपादृष्टि करुणरसाचा वर्षाव आहे असे म्हणू ! अथवा नव्या स्नेहाची सृष्टि आहे असे म्हणू ? हे राहू द्या. कृष्णाच्या दृष्टीचे वर्णन कसे करावे हे आम्हाला कळत नाही. ॥5-171॥

जे अमृताची वोतली । कीं प्रेमचि पिऊनि मातली ।
म्हणौनि अर्जुनमोहें गुंतली । निघों नेणें ॥5-172॥

ही हरीची दृष्टी (जणू काय) अमृताचीच ओतलेली होती अथवा अर्जुनाविषयीचे प्रेम पिऊन मस्त झाली होती. म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या त्या हरीच्या दृष्टीस बाहेर निघण्याचे कळेना. ॥5-172॥

हें बहु जें जें जल्पिजेल । तेथें कथेसि फांकु होईल ।
परि तें स्नेहरूपा न येल । बोलवरी ॥5-173॥

या हरीच्या दृष्टांता संबंधाने जितकी जास्त जास्त बडबड करावी तितकी तितकी कथेची संगती सुटून या वर्णनाचा विस्तार वाढेल. परंतु शेवटी हरीच्या अर्जुनाविषयीच्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाही. ॥5-173॥

म्हणौनि विसुरा काय येणें । तो ईश्वरु कवळावा कवणें ।
जो आपुलें मान नेणें । आपणचि ॥5-174॥

यात आश्चर्य ते काय ? कारण जो आपले मोजमाप आपणच जाणत नाही तो ईश्वर कोणी आकलन करावा ? ॥5-174॥

तरी मागीला ध्वनीआंतु । मज गमला सावियाचि मोहितु ।
जे बलात्कारें असे म्हणतु । परिस बापा ॥5-175॥

तर मागील बोलण्याच्या अभिप्रायावरून मला सहज असे वाटते की देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले आहेत कारण ते अर्जुनाला बलात्काराने अरे बाबा, ऐक, असे म्हणत होते. ॥5-175॥

अर्जुना जेणें जेणें भेदें । तुझें कां चित्त बोधे ।
तैसें तैसें विनोदें । निरूपिजेल ॥5-176॥

अर्जुना, ज्या प्रकाराने तुझ्या चित्ताला कळेल त्या त्या रीतीने कौतुकाने सांगण्यात येईल. ॥5-176॥

तो काइसया नाम योगु । तयाचा कवण उपेगु ।
अथवा अधिकारप्रसंगु । कवणा येथ ॥5-177॥

योग हे कशाला नाव आहे ? त्याचा उपयोग काय ? अथवा योगाचा कोणाला अधिकार आहे ॥5-177॥

ऐसें जें जें कांहीं । उक्त असे इये ठाईं ।
तें आघवेंचि पाहीं । सांगेन आतां ॥5-178॥

याप्रमाणे जे जे काही या बाबतीत शास्त्रात सांगितलेले असेल ते सर्वच मी तुला आता सांगेन, पहा. ॥5-178॥

तूं चित्त देऊनि अवधारीं । ऐसें म्हणौनि श्रीहरी ।
बोलिजेल ते पुढारी । कथा आहे ॥5-179॥

तू मन लाऊन ऐक. असे म्हणून श्रीहरी जे बोलले ती कथा पुढे आहे, ती सांगण्यात येईल. ॥5-179॥

श्रीकृष्ण अर्जुनासी संगु । न सांडोनि सांगेल योगु ।
तो व्यक्त करूं प्रसंगु । म्हणे निवृत्तिदासु ॥5-180॥

अर्जुनाशी असलेल्या सख्ख्यात बिघाड येऊ न देता श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांगयोग सांगतील, तो प्रसंग निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात की मी स्पष्ट रीतीने सांगेन ॥ ॥5-180॥

॥ इति श्री ज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां – कर्मसंन्यासयोगोनाम् पञ्चमोऽध्यायः॥5॥