॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥
॥ अथ चतुर्थोऽध्यायः – अध्याय चवथा ॥
॥ ज्ञाकर्मसंन्यासयोग ॥
आजि श्रवणेंद्रियां पाहलें । जें येणें गीतानिधान देखिलें ।
आतां स्वप्नचि हें तुकलें ।
साचासरिसें ॥4-1॥
आज श्रवणेंद्रियांना सुकाळ झाला, कारण गीतेसारखा ठेवा पहावयास मिळाला. जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता झाले आहे. ॥4-1॥
आधींचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी ।
आणि भक्तराजु किरीटी । परिसत
असे ॥4-2॥
अगोदरच ही विचाराची कथा, त्यात तिचे प्रतिपादन जगात श्रेष्ठ असे श्रीकृष्ण करीत असून भक्तांमधे श्रेष्ठ असणारा अर्जुन ते ऐकत आहे. ॥4-2॥
जैसा पंचमालापु सुगंधु । कीं परिमळु आणि सुस्वादु ।
तैसा भला जाहला विनोदु । कथेचा इये
॥4-3॥
ज्याप्रमाणे पंचमस्वर व सुवास किंवा सुवास व उत्तम रुचि यांच्या गोड मिलाफाचा योग यावा (त्याप्रमाणे) या कथेतील चर्चेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे. ॥4-3॥
कैसी आगळिक दैवाची । जे गंगा जोडली अमृताची ।
हो कां जपतपें श्रोतयांचीं । फळा आलीं
॥4-4॥
काय दैवाचा जोर आहे पहा ! कारण या जोरामुळे ही अमृताची गंगाच लाभली म्हणावयाची, किंवा श्रोत्यांची जपतपादी अनुष्ठाने या कथेच्या रूपाने फळास आली आहेत. ॥4-4॥
आतां इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचें घर रिघावें ।
मग संवादसुख भोगावें । गीताख्य
हें ॥4-5॥
आता एकूण एक इंद्रियांनी श्रवणेंद्रियांचा आश्रय करावा आणि मग गीता नावाच्या या संवादाचे सुख भोगावे. ॥4-5॥
हा अतिसो अतिप्रसंगें । सांडूनि कथाचि ते सांगें ।
जे कृष्णार्जुन दोघे । बोलत होते
॥4-6॥
हा अप्रासंगिक पाल्हाळ पुरे कर व कृष्ण व अर्जुन हे दोघे जे काही बोलत होते ती हकिकत सांग. असे श्रोते म्हणाले. ॥4-6॥
ते वेळीं संजयो रायातें म्हणे । अर्जुनु अधिष्ठिला दैवगुणें ।
जे अतिप्रीति श्रीनारायणें
। बोलतु असे ॥4-7॥
ज्ञानदेव सांगतात की त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला – खरोखर भाग्यानेच अर्जुनाचा आश्रय केला. असे म्हटले पाहिजे. कारण प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्याच्याशी मोठ्या प्रेमाने बोलत आहेत ॥4-7॥
जें न संगेचि पितया वसुदेवासी । जें न संगेचि माते देवकीसी ।
जें न संगेचि बंधु
बळिभद्रासी तें गुह्य अर्जुनेंशीं बोलत ॥4-8॥
आपला बाप वसुदेव याला जे सांगितले नाही, आपली आई देवकी हिला जे सांगितले नाही, आपला भाऊ बळिभद्र यालाही जे सांगितले नाही ते रहस्य श्रीकृष्ण अर्जुनाजवळ बोलत आहे. ॥4-8॥
देवी लक्ष्मीयेवढी जवळिक । परी तेही न देखे या प्रेमाचें सुख ।
आजि कृष्णस्नेहाचें बिक ।
यातेंचि आथी ॥4-9॥
देवी लक्ष्मी एवढी जवळ असणारी पण या प्रेमाचे सुख तिलाही कधी दिसले नाही. कृष्णाच्या प्रेमाचे फळ यालाच आज लाभत आहे ॥4-9॥
सनकादिकांचिया आशा । वाढीनल्या होतिया कीर बहुवसा ।
परी त्याही येणें मानें यशा ।
येतीचिना ॥4-10॥
सनकादिकांच्या (परमात्मसुखाबद्दलच्या) आशा खरोखर खूपच बळावल्या होत्या, पण त्याही इतक्या प्रमाणात यशाला आल्याच नाहीत. ॥4-10॥