॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥
॥अथ तृतीयोऽध्यायः – अध्याय तिसरा॥
॥कर्मयोग॥
मग आइका अर्जुनें म्हणितलें ।देवा तुम्ही जें वाक्य बोलिलें ।
तें निकें म्यां परिसिलें
। कमळापती ॥3-1॥
मग अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा ऐका. देवा, तुम्ही जे काही बोललात ते मी चांगले ऐकले. ॥3-1॥
तेथ कर्म आणि कर्ता । उरेचिना पाहतां ।
ऐसें मत तुझें श्रीअनंता । निश्चित जरी ॥3-2॥
श्रीअनंता श्रीकृष्णा, तुमच्या मागील व्याख्यानाचा विचार करून पाहिला असतां त्या ठिकाणी
कर्म व त्याचा कर्ता हे उरतच नाहीत व हेच जर तुझे निश्चित मत असेल ॥3-2॥
तरी मातें केवीं श्रीहरी । म्हणसी पार्था संग्रामु करीं ।
इये लाजसी ना महाघोरीं ।
कर्मीं सुतां ॥3-3॥
तर मग श्रीकृष्णा ‘अर्जुना, तू युद्ध कर; असे मला कसे सांगतोस ? ह्या मोठ्या घोर कर्मामधे
मला घालतांना तुला काही लाज वाटत नाही काय ? ॥3-3॥
हां गा कर्म तूंचि अशेष । निराकरिसी निःशेष ।
तरी मजकरवीं हें हिंसक । कां करविसी ॥3-4॥
अरे तूच जर सर्व कर्मांचा निषेध करतोस तर मग हे हिंसात्मक कृत्य माझ्याकडून तू का करवतोस ?
॥3-4॥
तरी हेंचि विचारीं ऋषीकेशा । तूं मानु देसी कर्मलेशां ।
आणि येसणी हे हिंसा । करवीतु
आहासी ॥3-5॥
तर हृषीकेशा, याचा तू विचार करून पहा. की तू कर्माला मान देऊन माझ्याकडून ही एवढी मोठी
हिंसा करवीत आहेस. (याचा मेळ कसा घालावा ?) ॥3-5॥
देवा तुवांचि ऐसें बोलावें । तरी आम्हीं नेणती काय करावें ।
आतां संपले म्हण पां आघवें ।
विवेकाचें ॥3-6॥
श्रीकृष्णा, तूच असे असंबद्ध बोलू लागलास तर मग आमच्या सारख्या अजाण माणसांनी काय करावे ?
आता सारासार विचार जगातून पार नाहीसा झाला आहे, असे म्हणेनास. ॥3-6॥
हां गा उपदेश जरी ऐसा । तरी अपभ्रंशु तो कैसा ।
आतां पुरला आम्हां धिंवसा । आत्मबोधाचा
॥3-7॥
अरे याला जर हित सांगणे म्हणायचे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून वेगळे ते काय राहिले
? आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली म्हणायची ॥3-7॥
वैद्यु पथ्य वारूनि जाये । मग जरी आपणचि विष सुये ।
तरी रोगिया कैसनि जिये । सांगैं मज
॥3-8॥
वैद्याने प्रथम रोग्याने काय खावे व काय खाऊ नये हे सांगून गेल्यावर मग त्यानेच जर रोग्यास
विष दिले तर मग तो रोगी कसा वाचावा ? हे मला सांग बरे. ॥3-8॥
जैसें आंधळें सुईजे आव्हांटा । कां माजवण दीजे मर्कटा ।
तैसा उपदेशु हा गोमटा । वोढवला
आम्हां ॥3-9॥
आंधळ्याला जसे मुद्दाम आशामार्गात घालावे किंवा आधीच माकड आणि त्यात त्याला मादक पदार्थ
पाजावा, त्याप्रमाणे तुझा हा उपदेश आम्हाला चांगला लाभला आहे. ॥3-9॥
मी आधींचि कांहीं नेणें । वरी कवळिलों मोहें येणें ।
श्रीकृष्णा विवेकु या कारणें ।
पुसिला तुज ॥3-10॥
मला अगोदरच काही समजत नाही, शिवाय या भ्रमाने मला घेरले आहे, म्हणून कृष्णा, तुला सारासार
विचार पुसला. ॥3-10॥
तंव तुझी एकेक नवाई । एथ उपदेशामाजीं गोवाई ।
तरी अनुसरलिया काई । ऐसें कीजे ? ॥3-11॥
पण तुझे एकेक पहावे तो सर्व आश्चर्यच आहे. इकडे उपदेश करतोस आणि त्यात घोटाळ्यात घालतोस. तर
तुझ्या उपदेशप्रमाणे चालावयाचे असा ज्यांचा विचार आहे त्यांच्याशी तू असे का वागावेस ?
॥3-11॥
आम्हीं तनुमनुजीवें । तुझिया बोला वोटंगावें ।
आणि तुवांचि ऐसें करावें । तरी सरलें म्हण
॥3-12॥
आम्ही शरीराने, मनाने व जीवाने तुझ्या शब्दावर अवलंबून रहावे आणि तूच असे भलतेच करावेस तर
मग सर्व संपले म्हणावयाचे. ॥3-12॥
आतां ऐसियापरी बोधिसी । तरी निकें आम्हां करिसी ।
एथ ज्ञानाची आस कायसी । अर्जुन म्हणे
॥3-13॥
आता याप्रमाणे जर तू उपदेश करणार असशील तर मग आमचे चांगलेच कल्याण करतोस म्हणावयाचे. अर्जुन
म्हणाला, आता येथे ज्ञान मिळाण्याची आशा कशाची ? ॥3-13॥
तरी ये जाणिवेचें तरी सरलें । परी आणिक एक असे जाहलें ।
जें थितें हें डहुळलें । मानस
माझें ॥3-14॥
ज्ञान मिळाविण्याची गोष्ट तर खरोखरच संपली, पण यात आणखी एक असे झाले की माझे निश्चित असलेले
विचार यामुळे गडबडले. ॥3-14॥
तेवींचि श्रीकृष्णा हें तुझें । चरित्र कांहीं नेणिजे ।
जरी चित्त पाहसी माझें । येणे
मिषें ॥3-15॥
त्याचप्रमाणे श्रीकृष्णा, तुझे हे चरित्र काही समजत नाही. कदाचित या निमित्ताने तू माझे मन
पहातोस की काय ? (ते न कळे). ॥3-15॥
ना तरी झकवीतु आहासी मातें । कीं तत्त्वचि कथिले ध्वनितें ।
हें अवगमितां निरुतें ।
जाणवेना ॥3-16॥
अथवा तू आम्हाला फसवीत आहेस ? किंवा गूढार्थाने तत्वज्ञानच सांगितले आहेस हे विचार करून
पाहिले तरी निश्चित असे काहीच समजत नाही. ॥3-16॥
म्हणौनि आइकें देवा । हा भावार्थु आतां न बोलावा ।
मज विवेकु सांगावा । मर्हाटा जी
॥3-17॥
एवढ्याकरता देवा ऐक. हा उपदेश गूढार्थाने आम्हाला सांगू नकोस. महाराज, मला तो विचार माझ्या
भाषेत मला समजेल असा सोपा करून सांगावा. ॥3-17॥
मी अत्यंत जड असें । परी ऐसाही निकें परियेसें ।
श्रीकृष्णा बोलावें तुवां तैसें ।
एकनिष्ठ ॥3-18॥
मी अतिशय मंद आहे. परंतु कृष्णा, अशाही मला चांगले समजेल असे एक निश्चयात्मक सांग. ॥3-18॥
देखैं रोगातें जिणावें । औषध तरी देयावें ।
परी तें अति रुच्य व्हावें । मधुर जैसें
॥3-19॥
हे पहा रोगाला हटवण्याकरता औषध तर द्यावे, पण ते औषध ज्याप्रमाणे अतिशय रुचकर आणि गोड असावे
॥3-19॥
तैसें सकळार्थभरित । तत्त्व सांगावें उचित ।
परी बोधें माझें चित्त । जयापरी ॥3-20॥
त्याप्रमाणे सर्वार्थाने भरलेले योग्य तत्व तर सांगावे, पण ते असे सांगावे की जेणेकरून ते
माझ्या मनाला नि:संशय कळेल ॥3-20॥
देवा तुज ऐसा निजगुरु । आजि आर्तीधणी कां न करूं ।
एथ भीड कवणाची धरूं । तूं माय आमुची
॥3-21॥
देवा, तुझ्यासारखा मला आज गुरु मिळाला आहे, तेव्हा आज मी आपल्या इच्छेची तृप्ती का करून घेऊ
नये ? तू आमची आई आहेस तर मग येथे भीड कोणाची धरायची ? ॥3-21॥
हां गां कामधेनूचें दुभतें । दैवें जाहलें जरी आपैतें ।
तरीं कामनेची कां तेथें । वानी
कीजे ? ॥3-22॥
अहो, दैववशात कामधेनूचे दुभते जर प्राप्त झाले तर तशा प्रसंगी ते मागण्यास कमी का करावे ?
॥3-22॥
जरी चिंतामणी हाता चढे । तरी वांछेचें कवण सांकडें ।
कां आपुलेनि सुरवाडें । इच्छावें ना
? ॥3-23॥
चिंतामणी जर हाताला लागला तर मग हवी ती वस्तु मागण्याची अडचण का वाटावी ? आपल्याला हवे तसे
का इच्छू नये ? ॥3-23॥
देखा अमृतसिंधूतें ठाकावें । मग ताहाना जरी फुटावें ।
तरी सायासु कां करावे । मागील ते ?
॥3-24॥
पहा अमृताच्या समुद्राजवळ प्राप्त होऊन तेथे तहानेने तडफडत रहावयाचे तर मग तेथेपर्यंत
येण्याकरता केलेले श्रम कशाकरता करावयाचे ? ॥3-24॥
तैसा जन्मांतरीं बहुतीं । उपासितां श्रीलक्ष्मीपती ।
तूं दैवें आजि हातीं । जाहलासी जरी
॥3-25॥
त्याप्रमाणे श्रीकृष्णा, अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळे, तू आज दैववशात जर हातात आला आहेस
॥3-25॥
तरी आपुलिया सवेशा । कां न मागावासि परेशा ? ।
देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥3-26॥
तर मग हे परमेश्वरा श्रीकृष्णा, आपल्या इच्छेला येईल तसे तुझ्याजवळून मागून का घेऊ नये ?
देवा, माझ्या मनातील हेतु पूर्ण सफल होण्याची वेळ आली आहे. ॥3-26॥
देखैं सकळार्तींचें जियाले । आजि पुण्य यशासि आलें ।
हें मनोरथ जहाले । विजयी माझे
॥3-27॥
पहा, माझ्या सर्व मनोरथांचे जीवित सफल झाले. आज माझे पूर्व पुण्य यशस्वी झाले व माझ्या
मनातील हे हेतू आज तडीस गेले. ॥3-27॥
जी जी परममंगळधामा । सकळ देवदेवोत्तमा ।
तूं स्वाधीन आजि आम्हां । म्हणौनियां ॥3-28॥
कारण अहो महाराज, सर्वोत्कृष्ट मंगलाचे स्थान आणि सर्व देवात श्रेष्ठ अशा देवा, तू आमच्या
ताब्यात आला आहेस, म्हणून ॥3-28॥
जैसें मातेच्या ठायीं । अपत्या अनवसरू नाहीं ।
स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी ॥3-29॥
पहा, जसे लहान मुलाला स्तनपान करण्यास आईच्या ठिकाणी वेळ अवेळ अशी काही नसते, ॥3-29॥
तैसें देवा तूतें । पुसिजतसे आवडे तें ।
आपुलेनि आर्तें । कृपानिधीं ॥3-30॥
तसे हे कृपानिधी देवा, मी आपल्या इच्छेला येईल तसे तुला वाटेल ते विचारीत आहे. ॥3-30॥
तरीं पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित ।
तें सांगैं एक निश्चित । पार्थु म्हणे
॥3-31॥
तर मग परलोकी कल्याणकारक व इहलोकी आचरण्याला तर योग्य असे जे एक असेल ते एक मला निश्चित
करून सांग. असे अर्जुन म्हणाला ॥3-31॥
या बोला श्रीअच्युतु । म्हणतसे विस्मितु ।
अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ॥3-32॥
अर्जुनाच्या या भाषणाने श्रीकृष्ण आश्चर्यचकित होऊन म्हणू लागले, अर्जुना, आम्ही तुला
थोडक्यात मतलब सांगितला. ॥3-32॥
जे बुद्धियोगु सांगतां । सांख्यमतसंस्था ।
प्रकटिली स्वभावता । प्रसंगें आम्हीं ॥3-33॥
कारण की निष्काम कर्मयोग सांगत असतांना प्रसंगाने सहजच आम्ही ज्ञानमार्गाची व्यवस्था ज्या
हेतूने स्पष्ट केली ॥3-33॥
तो उद्देशु तूं नेणसीचि । म्हणौनि क्षोभलासि वायांचि ।
तरी आतां जाणें म्यांचि । उक्त
दोन्ही ॥3-34॥
तो आमच्या प्रतिपादनाचा हेतू तू जाणला नाहीस. म्हणून उगीचच रागावला आहेस. तर आता ध्यानात
ठेव की हे दोन्ही मार्ग मीच सांगितले आहेत. ॥3-34॥
अवधारीं वीरश्रेष्ठा । ये लोकीं या दोन्ही निष्ठा ।
मजचिपासूनि प्रगटा । अनादिसिद्धा
॥3-35॥
हे वीरश्रेष्ठा अर्जुना, ऐक, या लोकामधे हे दोन्ही मार्ग माझ्यापासूनच प्रगट झालेले आहेत. व
ते मुळापासून तसेच चालत आलेले आहेत. ॥3-35॥
एकु ज्ञानयोगु म्हणिजे । जो सांख्यीं अनुष्ठिजे ।
जेथ ओळखीसवें पाविजें । तद्रूपता
॥3-36॥
त्यापैकी एकाला ज्ञानयोग म्हणातात व त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात. आणि त्याने ओळखीबरोबर
परमात्मरूपाशी तन्मयता प्राप्त होते. ॥3-36॥
एक कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण ।
होऊनियां निर्वाण । पावती वेळे ॥3-37॥
दुसरा तो कर्ममार्ग समज, जेथे साधक लोक निष्णात होऊन परमगतीला पावतात परंतु ते काही कालाने
पावतात. ॥3-37॥
हे मार्गु तरी दोनी । परी एकवटतीं निदानीं ।
जैसी सिद्धसाध्य भोजनीं । तृप्ती एक ॥3-38॥
हे मार्ग तर दोन आहेत, परंतु ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात. ज्याप्रमाणे तयार असलेल्या
व तयार करावयाच्या अशा दोन्ही जेवणात सारखीच तृप्ती असते. ॥3-38॥
कां पूर्वापर सरितां । भिन्न दिसती पाहतां ।
मग सिंधुमिळणीं ऐक्यता । पावती शेखीं ॥3-39॥
किंवा पूर्वेकडून व पश्चिमेकडून वहाणार्या नद्या पाहिल्या तर वहातांना वेगवेगळ्या दिसतात.
मग समुद्रात मिळाल्या असता शेवटी एकच होतात. ॥3-39॥
तैसीं दोनीही मतें । सूचितीं एका कारणातें ।
परी उपास्ति ते योग्यते- । आधीन असे ॥3-40॥
त्याप्रमाणे ज्ञानयोग व कर्मयोग हे मार्ग जरी दोन आहेत, तरी ते एकाच साध्याला सुचवतात.
परंतु त्यांचे आचरण करणे आचरणार्याच्या योग्यतेवर अवलंबून असते. ॥3-40॥
देखैं उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासि झोंबें जैसा ।
सांगैं नरु केवीं तैसा । पावे वेगा ?
॥3-41॥
हे पहा, पक्षी उड्डाणाबरोबर ज्याप्रमाणे फळाला बिलगतो, परंतु त्याप्रमाणे मनुष्याला
त्यावेगाने ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल ? सांग बरे. ॥3-41॥
तो हळूहळू ढाळेंढाळें । केउतेनि एके वेळे ।
तया मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥3-42॥
तो हलके हलके एका फांदीवरून दुसर्या फांदीवर जात जात काही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने
त्या फलापर्यंत खात्रीने पोचतो. ॥3-42॥
तैसे देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें ।
सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥3-43॥
पहा तसे विहंगम मार्गाने ज्ञानमार्गाचा आश्रय करून ज्ञानी तत्क्षणीच मोक्ष आपल्या स्वाधीन
करून घेतात. ॥3-43॥
येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें ।
पूर्णता अवसरें । पावते होती ॥3-44॥
दुसरे जे कर्मयोगी ते कर्ममार्गाच्या आश्रयाने वेदात सांगितलेला आपला आचारच पाळून काही
कालाने पूर्णतेस पोचतात. ॥3-44॥
वांचोनि कर्मारंभ उचित । न करितां सिद्धवत ।
कर्महीना निश्चित । होईजेना ॥3-45॥
शिवाय योग्य कर्माचा आरंभ न करताच कर्महीनाला सिद्धाप्रमाणे निष्कर्म निश्चयाने होता येणार
नाही. ॥3-45॥
कीं प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्य होईजे ।
हें अर्जुना वायां बोलिजे ।
मूर्खपणें ॥3-46॥
किंवा अधिकारपरत्वे आपल्या भागाला आलेले कर्म टाकून द्यावे व एवढ्यानेच निष्कर्म व्हावे हे
बोलणे अर्जुना व्यर्थ व मूर्खपणाचे आहे. ॥3-46॥
सांगैं पैलतीरा जावें । ऐसें व्यसन कां जेथ पावे ।
तेथ नावेतें त्यजावें । घडे केवीं ?
॥3-47॥
जेथे पलीकडील तीराला कसे जावे अशी अडचण पडली आहे, तेथे होडीचा त्याग करून कसे चालेले बरे ?
॥3-47॥
ना तरी तृप्ति इच्छिजे । तरी कैसेनि पाकु न कीजे ।
कीं सिद्धुही न सेविजे । केवीं सांगैं
? ॥3-48॥
अथवा जर भोजनापासून तृप्तीची इच्छा करावयाची तर स्वयंपाक न करता कसे चालेल ? किंवा तयार
असलेला स्वयंपाक न सेवन काता कसे चालेल ? सांग बरे. ॥3-48॥
जंव निरार्तता नाहीं । तंव व्यापारु असे पाहीं ।
मग संतुष्टीच्या ठायीं । कुंठें सहजें
॥3-49॥
जोपर्यंत निरिच्छता प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्म करणे हे रहाणारच, असे समज. व मग
आत्मतृप्ती प्राप्त झाली असता कर्म सहजच थांबते. ॥3-49॥
म्हणौनि आईकें पार्था । जयां नैष्कर्म्यपदीं आस्था ।
तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य
नोहे ॥3-50॥
म्हणून अर्जुना, ऐक. ज्याला नैष्कर्म्य स्थितीची तीव्र इच्छा आहे, त्याने आपली विहित कर्मे
टाकणे मुळीच योग्य होणार नाही. ॥3-50॥
आणि आपुलिये चाडे । आपादिलें हें मांडे ।
कीं त्यजिलें कर्म सांडे । ऐसें आहे ? ॥3-51॥
आणखी असे पहा की आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता ते घडते आणि कर्म सोडल्याने
त्याचा त्याग होतो, असे आहे काय ? ॥3-51॥
हें वायांचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखोनि पाहिजे ।
परी त्यजिता कर्म न त्यजे ।
निभ्रांत मानीं ॥3-52॥
हे (कर्माचा इच्छेनुरूप त्याग करता येतो) उगाचच काहीतरी बोलणे आहे. याचा नीट विचार करुन
पाहिले तर कर्म करण्याचे टाकले म्हणजे कर्मत्याग होतो असे नाही हे तू नि:संशय समज. ॥3-52॥
जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान ।
जे चेष्टा ते गुणाधीन । आपैसी
असे ॥3-53॥
जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे तोपर्यंत मी कर्म टाकीन अथवा करीन हे म्हणणे मूर्खपणाचे आहे.
कारण की जेवढे म्हणून कर्म घडणे आहे ते स्वभावत: गुणांच्या स्वाधीन आहे. ॥3-53॥
देखैं विहित कर्म जेतुलें । तें सळें जरी वोसंडिलें ।
तरी स्वभाव काय निमाले ।
इंद्रियांचे ॥3-54॥
पहा जेवढे म्हणून विहित कर्म आहे तेवढे हट्टाने जरी करायचे सोडून दिले तरी इंद्रियांचे
स्वभाव नाहीसे झाले आहेत काय ? ॥3-54॥
सांगै श्रवणीं ऐकावें ठेलें ? । कीं नेत्रींचें तेज गेलें ? ।
हें नासारंध्र बुझालें ।
परिमळु नेघे ? ॥3-55॥
सांग. कानांनी ऐकण्याचे बंद झाले आहे काय ? अथवा डोळ्यातील पाहाण्याचे सामर्थ्य गेले आहे
काय ? या नाकपुड्या बुजून वास घेईनाशा झाल्या आहेत काय ? ॥3-55॥
ना तरी प्राणापानगति । कीं निर्विकल्प जाहली मती ।
कीं क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया ॥3-56॥
अथवा प्राण व अपान, या दोन वायूंच्या क्रिया थांबल्या आहेत का ? किंवा बुद्धीने कल्पना
करण्याचे सोडले आहे का ? किंवा भूक व तहान इत्यादींची पीडा होण्याचे थांबले आहे काय ?
॥3-56॥
हे स्वप्नावबोधु ठेले । कीं चरण चालों विसरले ।
हें असो काय निमाले । जन्ममृत्यु ?
॥3-57॥
जागृति व स्वप्न या अवस्था थांबल्या आहेत काय ? अथवा पाय चालायचे विसरले आहेत का ? हे सर्व
असू दे, जन्म व मरण संपली आहेत काय ? ॥3-57॥
हें न ठकेचि जरी कांहीं । तरी सांडिलें तें कायी ।
म्हणौनि कर्मत्यागु नाहीं ।
प्रकृतिमंता ॥3-58॥
हे जर काही रहात नाही तर मग त्याग तो काय केला ? म्हणून शरीराच्या आश्रयाने असणारांना
कर्मत्याग केव्हाही घडत नाही. ॥3-58॥
कर्म पराधीनपणें । निपजतसे प्रकृतिगुणें ।
येरी धरीं मोकलीं अंतःकरणें । वाहिजे वायां
॥3-59॥
कर्म हे परतंत्र असल्यामुळे ते शरीरातील सत्वादी गुणांनुसार उत्पन्न होते. म्हणून एखाद्याने
मी कर्म करीन अथवा टाकीन, असा अंत:करणात अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे. ॥3-59॥
देखैं रथीं आरूढिजे । मग जरी निश्चळा बैसिजे ।
तरी चळु होऊनि हिंडिजे । परतंत्रा ॥3-60॥
पहा, रथावर स्वार होऊन मग जरी स्थिर बसले तरी तेथे बसणारा रथाच्या स्वाधीन असल्याने सहजच
रथाच्या हालचालीमुळे त्याला प्रवास घडतो. ॥3-60॥
कां उचलिलें वायुवशें । चळे शुष्क पत्र जैसें ।
निचेष्ट आकाशें । परिभ्रमें ॥3-61॥
अथवा वायूच्या सपाट्यात सापडून उंच उडालेले वाळलेले पान ज्याप्रमाणे आपण स्वत: हालचाल न
करता वायुवेगामुळे आकाशात इकडे तिकडे फिरत रहाते, ॥3-61॥
तैसें प्रकृतिआधारें । कर्मेंद्रियविकारें ।
नैष्कर्म्युही व्यापारे । निरंतर ॥3-62॥
त्याप्रमाणे कर्मातीत अवस्थेस प्राप्त झालेला पुरुषही शरीराच्या अश्रयाने कर्मेंद्रियांच्या
हालचालींच्या द्वारा, नेहेमी कर्मे करीत असतो. ॥3-62॥
म्हणौनि संगू जंव प्रकृतीचा । तंव त्यागु न घडे कर्माचा ।
ऐसियाहि करूं म्हणती तयांचा ।
आग्रहोचि उरे ॥3-63॥
म्हणून जोपर्यंत शरीराशी संबंध आहे, तोपर्यंत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही, असे असूनही
‘त्याग करू’ असे जे कोणी म्हणतील तर त्यांचा तो केवळ हट्ट मात्र उरेल. ॥3-63॥
जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती ।
परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधुनी
॥3-64॥
जे पुरुष योग्य कर्म टाकतात व त्या योगे कर्मातीत अवस्थेला पोहोचू पहातात, परंतु केवळ
कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा विरोध करूनच. ॥3-64॥
तयां कर्मत्यागु न घडे । जें कर्तव्य मनीं सांपडे ।
वरी नटती तें फुडें । दरिद्र जाण
॥3-65॥
त्यास कर्मत्याग तर घडत नाही, कारण त्यांचे ठिकाणी कर्तव्यबुद्धी असते, असे असूनही ते
बाह्यात्कारी कर्मत्यागाचा जो डौल आणतात, ते खरोखर दैन्य आहे असे समज. ॥3-65॥
ऐसे ते पार्था । विषयासक्त सर्वथा ।
ओळखावे तत्त्वता । भ्रांति नाहीं ॥3-66॥
अर्जुना असे लोक खरोखरच विषयासक्त आहेत, असे नि:संशय समज. ॥3-66॥
आतां देईं अवधान । प्रसंगें तुज सांगेन ।
या नैराश्याचें चिन्ह । धनुर्धरा ॥3-67॥
अर्जुना, प्रसंग आलेला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो. इकडे तू लक्ष दे.
॥3-67॥
जो अंतरीं दृढ । परमात्मरूपीं गूढ ।
बाह्य भागु तरी रूढ । लौकिकु जैसा ॥3-68॥
जो अंतर्यामी निश्चळ व परमात्म्याच्या स्वरूपात गढलेला असतो आणि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे
व्यवहार करीत असतो, ॥3-68॥
तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचें भय न धरी ।
प्राप्त कर्म नाव्हेरी । उचित जें जें
॥3-69॥
तो इंद्रियांना हुकुम करत नाही, आणि विषय वाढतील अशी त्यास भीती नसते, तो अधिकारपरत्वे
प्राप्त झालेले जे जे विहित कर्म, त्याचा अनादर करत नाही. ॥3-69॥
तो कर्मेंद्रियें कर्मीं । राहटतां तरी न नियमी ।
परी तेथिचेनि उर्मीं । झांकोळेना
॥3-70॥
तो पुरुष कर्मेंद्रिये कर्मे करीत असली तरी त्यांना आवरत नाही, पण त्यामुळे उत्पन्न
होणार्या विकारांनी तो लिप्त होत नाही. ॥3-70॥
तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपें ।
जैसें जळीं जळें न शिंपे । पद्मपत्र ॥3-71॥
ज्याप्रमाणे पाण्यातील कमळाचे पान पाण्याने लिप्त होत नाही व अविवेकरूपी मलाच्या योगाने तो
मलीन होत नाही. ॥3-71॥
तैसा संसर्गामाजीं असे । सकळांसारिखा दिसे ।
जैसें तोयसंगें आभासे । भानुबिंब ॥3-72॥
त्या कमलाच्या पानाप्रमाणे तो अलिप्तपणाने संगामध्ये रहातो. तो दिसण्यात सामान्य
लोकांप्रमाणे दिसतो. ज्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनही (प्रतिबिंबामुळे)
पाण्याच्या संगतीत रहातांना दिसते ॥3-72॥
तैसा सामान्यत्वें पाहिजे । तरी साधारणुचि देखिजे ।
येरवीं निर्धारितां नेणिजे । सोय
जयाची ॥3-73॥
त्याप्रमाणे वरवर पाहिले तर तो इतर सामान्य लोकांसारखाच दिसतो. बाकी त्याच्या संबंधी
निश्चित विचार ठरवू म्हटले तर त्याच्या स्थितीसंबंधी काहीच कल्पना करता येत नाही ॥3-73॥
ऐशा चिन्हीं चिन्हितु । देखसी तोचि मुक्तु ।
आशापाशरहितु । वोळख पां ॥3-74॥
अशा लक्षणांनी युक्त असलेला जो तुला दिसेल तोच आशापाशरहित व मुक्त आहे, असे तू ओळख. ॥3-74॥
अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं ।
म्हणौनि ऐसा होय यालागीं । म्हणिपे तूतें ॥3-75॥
अर्जुना, जगामधे ज्याचे विशेष वर्णन केले जाते, असा तोच योगी होय. याकरता तू असा हो म्हणून
मी तुला म्हणतो. ॥3-75॥
तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरीं ।
मग कर्मेंद्रियें व्यापारीं । वर्ततु सुखें
॥3-76॥
तू मनाला आवरून धर. व अंत:करणात स्थिर हो. मग ही कर्मेंद्रिये आपापले व्यवहार करीत खुशाल
राहू देत. ॥3-76॥
म्हणौनी नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवे ।
आणि निषिद्ध केवीं राहाटावें ।
विचारीं पां ॥3-77॥
कर्मातीत व्हावे असे म्हणशील तर विहित कर्मे करणे टाकून कर्मातीत होणे देहधार्यास संभवत
नाही. असे आहे तर मग शास्त्रबाह्य कर्माचे आचरण काय म्हणून करावे, याचा तू विचार कर. ॥3-77॥
म्हणौनि जें जें उचित । आणि अवसरेंकरूनि प्राप्त ।
तें कर्म हेतुरहित । आचरें तूं ॥3-78॥
म्हणून जे जे करणीय व प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे, ते तू फलाशा सोडून करीत जा.
॥3-78॥
पार्था आणीकही एक । नेणसी तूं हें कवतिक ।
जें ऐसें कर्ममोचक । आपैसें असे ॥3-79॥
अर्जुना, अशा या निष्काम कर्माचे आणखीही एक आश्चर्य आहे, ते तुला ठाऊक नाही. ते हे की असे
(अहंकाररहित व निष्कामबुद्धीने केलेले विहित व नित्यनैमित्तिक) कर्म प्राण्यांना
कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते. ॥3-79॥
देखैं अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे ।
तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे
॥3-80॥
पहा वर्णाश्रमधर्माप्रमाणे जो आपणास योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो, त्यास त्या आचरणाने
खचितच मोक्षाची प्राप्ती होते. ॥3-80॥
स्वर्धमु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां ।
म्हणौनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं
॥3-81॥
अरे बाबा आपला जो धर्म आहे तोच नित्ययज्ञ होय, असे समज. म्हणून त्याचे आचरण करत असतांना
त्यात पापाचा प्रवेश होत नाही.
॥3-81॥
हा निजधर्मु जैं सांडे । आणि कुकर्मीं रति घडे ।
तैंचि बंधु पडे । संसारिक ॥3-82॥
हे स्वधर्माचरण सुटले म्हणजे वाईट कर्माच्या ठिकाणी आसक्ति उत्पन्न होते आणि तेव्हाच त्या
वाईट कर्मे करणार्या पुरुषास संसारबंध प्राप्त होतो. ॥3-82॥
म्हणौनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञ याजन ।
जो करी तया बंधन । कहींच न घडे ॥3-83॥
म्हणून स्वधर्माचे आचरण करणे, हेच नित्य यज्ञयाजन करण्यासारखे होय. जो असे स्वधर्माचरण
करतो, तो केव्हाच बंधनात पडत नाही. ॥3-83॥
हा लोकु कर्में बांधिला । जो परतंत्रा भूत झाला ।
तो नित्य यज्ञातें चुकला । म्हणौनियां
॥3-84॥
हे कर्माधिकारी लोक आपल्या नित्ययज्ञाला चुकले, म्हणून कर्माने बद्ध होऊन परतंत्र अशा
देहाच्या स्वाधीन झाले. ॥3-84॥
आतां येचिविशीं पार्था । तुज सांगेन एक मी कथा ।
जैं सृष्ट्यादि संस्था । ब्रह्मेनें
केली ॥3-85॥
अर्जुना, याच संबंधीची तुला एक गोष्ट सांगतो. ब्रह्मदेवाने सृष्ट्यादी रचना जेव्हा केली
॥3-85॥
तैं नित्ययागसहितें । सृजिलीं भूतें समस्तें ।
परी नेणतीचि तियें यज्ञातें । सूक्ष्म
म्हणौनि ॥3-86॥
तेव्हा नित्ययज्ञासहित (कर्मासहित) सर्व प्राणी त्याने उत्पन्न केले, परंतु कर्म हे सूक्ष्म
असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्यकर्मांना मुळीच जाणत नव्हते. ॥3-86॥
ते वेळीं प्रजीं विनविला ब्रह्मा । देवा काय आश्रयो एथ आम्हां ।
तंव म्हणे तो कमळजन्मा ।
भूतांप्रति ॥3-87॥
त्यावेळी सर्व प्राण्यांनी ब्रह्मदेवाची विनंती केली की देवा, या लोकात आम्हाला आधार काय ?
तेव्हा ब्रह्मदेव लोकांना म्हणाला, – ॥3-87॥
तुम्हां वर्णविशेषवशें । आम्हीं हा स्वधर्मुचि विहिला असे ।
यातें उपासा मग आपैसे ।
पुरती काम ॥3-88॥
तुम्हाला वर्णानुसार हा आम्ही स्वधर्मच सांगितला आहे, त्याचे आचरण करा. म्हणजे तुमच्या
मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील. ॥3-88॥
तुम्हीं व्रत नियमु न करावे । शरीरातें न पीडावें ।
दुरी केंही न वचावें । तीर्थासी गा
॥3-89॥
याखेरीज तुम्हाला आणखी व्रते व नियम करण्याची जरुरी नाही, शारीराला पीडा देण्याची जरुरी
नाही. व दूर कोठे तीर्थयात्रेला जाण्याचे कारण नाही. ॥3-89॥
योगादिकें साधनें । साकांक्ष आराधनें ।
मंत्रयंत्रविधानें । झणीं करा ॥3-90॥
योग वगैरे साधने, कामनायुक्त आराधना अथवा मंत्रयंत्र इत्यादी कर्मे कदाचित कराल तर करू नका.
॥3-90॥
देवतांतरा न भजावें । हें सर्वथा कांहीं न करावें ।
तुम्हीं स्वधर्मयज्ञीं यजावें ।
अनायासें ॥3-91॥
स्वधर्मे सोडून अन्य देवतास भजावयाचे कारण नाही. तात्पर्य वर सांगितलेल्या गोष्टी करण्याचे
मुळीच कारण नाही. तर तुम्ही कष्टात न पडता स्वधर्माचरणरूप यज्ञ करावा. ॥3-91॥
अहेतुकें चित्तें । अनुष्ठा पां ययातें |पतिव्रता पतीतें ।
जियापरी ॥3-92॥
ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीला एकनिष्ठतेने भजते, त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतू
न धरता याचे आचरण करा. ॥3-92॥
तैसा स्वधर्मरूपमखु । हाचि सेव्यु तुम्हां एकु ।
ऐसें सत्यलोकनायकु । बोलता जाहला ॥3-93॥
अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्मरूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे, असे सत्यलोकाचा
अधिपती ब्रह्मदेव बोलला. ॥3-93॥
देखा स्वधर्मातें भजाल । तरी कामधेनु हा होईल ।
मग प्रजाहो न संडील । तुमतें कदा ॥3-94॥
पहा स्वधर्माचे आचरण जर कराल, तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरवणारा होईल. मग लोकहो, ही
स्वधर्मरूपी कामधेनू तुम्हाला नेहेमी सोडणार नाही. ॥3-94॥
जैं येणेंकरूनि समस्तां । परितोषु होईल देवतां ।
मग ते तुम्हां ईप्सिता । अर्थातें देती
॥3-95॥
कारण या धर्माच्या आचरणामुळे सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छिलेले
विषय देतील. ॥3-95॥
या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणां समस्तां ।
योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा ॥3-96॥
या स्वधर्मरूप पूजेने सर्व देवतांना आराधिले असता, त्या तुमचा खात्रीने योगक्षेम चालवतील.
॥3-96॥
तुम्हीं देवांतें भजाल । देव तुम्हां तुष्टतील ।
ऐसी परस्परें घडेल । प्रीति जेथ ॥3-97॥
तुम्ही देवांचे आराधन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील, त्याप्रमाणे तुमचे एकमेकांवर
जेव्हा प्रेम जडेल ॥3-97॥
तेथ तुम्हीं जें करूं म्हणाल । तें आपैसें सिद्धि जाईल ।
वांछितही पुरेल । मानसींचें
॥3-98॥
तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहजच सिद्धीस जाईल आणि मनातील इच्छित गोष्टीही पूर्ण होतील.
॥3-98॥
वाचासिद्धि पावाल । आज्ञापक होआल ।
म्हणियें तुमतें मागतील । महाऋद्धि ॥3-99॥
तुम्ही बोलाल ते खरे होईल आणि तुम्ही आज्ञा करणारे व्हाल. तुम्हाला ‘आपली काय आज्ञा आहे’
म्हणून महाऋद्धी विचारतील. ॥3-99॥
जैसें ऋतुपतीचें द्वार । वनश्री निरंतर ।
वोळगे फळभार । लावण्येसी ॥3-100॥
ऋतुश्रेष्ठ वसंताचे द्वारात वनशोभा ज्याप्रमाणे फलभार व सौंदर्यासह निरंतर सेवा करते
॥3-100॥
तैसें सर्व सुखेंसहित । दैवचि मूर्तिमंत ।
येईल देखा काढत । तुम्हांपाठीं ॥3-101॥
पहा, त्याप्रमाणे सर्व सुखांसह मूर्तिमंत दैवच तुमच्यामागे शोध काढीत येईल. ॥3-101॥
ऐसें समस्त भोगभरित । होआल तुम्ही अनार्त ।
जरी स्वधर्मेंनिरत । वर्ताल बापा ॥3-102॥
अशारीतीने बाबांनो, जर तुम्ही एकनिष्ठपणे स्वधर्माचे आचरण कराल तर सर्व भोगांनी संपन्न होऊन
तुम्ही निरीच्छ व्हाल. ॥3-102॥
कां जालिया सकळ संपदा । जो अनुसरेल इंद्रियमदा ।
लुब्ध होऊनियां स्वादा । विषयांचिया
॥3-103॥
अथवा (उलटपक्षी) सर्व संपदा प्राप्त झाली असता जो विषयांचे गोडीला लालचावून उन्मत्त
इंद्रिये जसे सांगतील तसे वागतो ॥3-103॥
तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हे संपत्ति दिधली पुरी ।
तयां स्वधर्मीं सर्वेश्वरीं । न
भजेल जो ॥3-104॥
यज्ञाने संतुष्ट होणार्या त्या देवांनी जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे त्या संपत्तीच्या
योगाने (स्वधर्मरूप) मार्गाने जो परमेश्वरास भजणार नाही, ॥3-104॥
अग्निमुखीं हवन । न करील देवता पूजन ।
प्राप्तवेळे भोजन । ब्राह्मणाचें ॥3-105॥
जो अग्नीचे मुखात हवन करणार नाही अथवा देवतांचे आराधन करणार नाही किंवा योग्य वेळी
ब्राह्मणांना भोजन देणार नाही ॥3-105॥
विमुख होईल गुरुभक्ती । आदर न करील अतिथी ।
संतोषु नेदील ज्ञाती । आपुलिये ॥3-106॥
जो गुरुभक्तीला पाठमोरा होईल, अतिथीचा मान करणार नाही व आपल्या जातीला संतोष देणार नाही
॥3-106॥
ऐसा स्वधर्मक्रियारहितु । आथिलेपणें प्रमत्तु ।
केवळ भोगासक्तु । होईल जो ॥3-107॥
अशा रीतीने जो आपल्या धर्माचे आचरण टाकून आणि संपन्नतेने उनत्त होऊन केवळ भोगामधे गढून
जाईल, ॥3-107॥
तया मग अपावो थोर आहे । जेणें तें हातींचें सकळ जाये ।
देखा प्राप्तही न लाहे । भोग
भोगूं ॥3-108॥
त्याला पुढे मोठा धोका आहे. तो असा की त्याच्या जवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होईल. हे
पहा मिळवलेले भोग सुद्धा त्याला भोगावयास मिळाणार नाहीत. ॥3-108॥
जैसें गतायुषी शरीरीं । चैतन्य वासु न करी ।
कां निदैवाच्या घरीं । न राहे लक्ष्मी
॥3-109॥
जसे आयुष्य संपलेल्या शरीरात प्राण रहात नाहीत किंवा दैवहीनाच्या घरात लक्ष्मी रहात नाही
॥3-109॥
तैसा स्वधर्मु जरी लोपला । तरी सर्व सुखांचा थारा मोडला ।
जैसा दीपासवें हरपला । प्रकाशु
जाय ॥3-110॥
जसा दिवा मालवल्या बरोबर त्याचा प्रकाश नाहीसा होतो, तसा धर्म जर लोपून गेला, तर सर्व
सुखाचे आश्रयस्थान नाहीसे होते. ॥3-110॥
तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे ।
आइका प्रजाहो हे फुडें ।
विरंचि म्हणे ॥3-111॥
वरीलप्रमाणे आपला आचार जेथे सुटतो त्या ठिकाणी आत्मस्वातंत्र्य रहात नाही. प्रजाहो, हे नीट
ऐका असे ब्रह्मदेव म्हणाला ॥3-111॥
म्हणौनि स्वधर्मु जो सांडील । तयातें काळु दंडील ।
चोरु म्हणौनि हरील । सर्वस्व तयाचें
॥3-112॥
म्हणून आपला धर्म जो टाकील त्याला यमधर्म शिक्षा करील व तो केवळ चोर आहे असे समजून त्याची
मालमत्ता हिरावून घेईल. ॥3-112॥
मग सकळ दोषु भंवते । गिंवसोनि घेति तयातें ।
रात्रिसमयीं स्मशानातें । भूतें जैसीं
॥3-113॥
रात्रीच्या वेळी ज्याप्रमाणे पिशाचे स्मशान वेढून टाकतात त्याप्रमाणे मग त्याला सर्व पापे
घेरतात. ॥3-113॥
तैसीं त्रिभुवनींचीं दुःखें । आणि नानाविधें पातकें ।
दैन्यजात तितुकें । तेथेंचि वसे
॥3-114॥
त्याप्रमाणे त्रैलोक्यात असणारी सर्व दु::खे आणि अनेक प्रकारची पापे व सर्व दैन्य त्याच्याच
जवळ रहातात. ॥3-114॥
ऐसें होय तया उन्मत्ता । मग न सुटे बापा रुदतां ।
कल्पांतींही सर्वथा । प्राणिगणहो
॥3-115॥
त्या उन्मत्त मनुष्याची अशी स्थिती होते, आणि मग प्रजाहो, रडले तरी मग कल्पाच्या अंतापर्यंत
देखील त्याची त्यातून मुळीच सुटका होत नाही ॥3-115॥
म्हणौनि निजवृत्ती हे न संडावी । इंद्रियें बरळों नेदावीं ।
ऐसें प्रजांतें शिकवी ।
चतुराननु ॥3-116॥
म्हणून स्वधर्माचरण सोडू नये. इंद्रियांना भलत्याच मार्गाला जाऊ देऊ नये. असा ब्रह्मदेवाने
प्रजांना उपदेश केला. ॥3-116॥
जैसे जळचरा जळ सांडे । आणि तत्क्षणीं मरण मांडे ।
हा स्वधर्मु तेणें पाडें । विसंबों नये
॥3-117॥
ज्याप्रमाणे माशांना पाण्याचा वियोग झाला की त्याच क्षणी मरण येते (म्हणून माशाने पाण्याचा
त्याग करू नये), त्याप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो. म्हणून त्याने
ह्या स्वधर्माचरणाला विसरू नये. ॥3-117॥
म्हणौनि तुम्हीं समस्तीं । आपुलालिया कर्मीं उचितीं ।
निरत व्हावें पुढत पुढती । म्हणिपत
असे ॥3-118॥
म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या विहित कर्माचरणामधे तत्पर असावे हेच आमचे वारंवार सांगणे
आहे, ॥3-118॥
देखा विहित क्रियाविधि । निर्हेतुका बुद्धि ।
जो असतिये समृद्धि । विनियोगु करी ॥3-119॥
पहा निर्हेतुक बुद्धीने स्वधर्माचरण करण्यात जो जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो
॥3-119॥
गुरु गोत्र अग्नि पूजी । अवसरीं भजे द्विजीं ।
निमित्तादिकीं यजी । पितरोद्देशें ॥3-120॥
गुरु, गोत्र व अग्नी यांचे पूजन करतो, योग्य वेळेला ब्राह्मणांची सेवा करतो आणि पितरांकरता
श्राद्धादी नैमित्तिक कर्मे करतो ॥3-120॥
या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेशीं हवन करितां ।
हुतशेष स्वभावतः । उरे जें जें ॥3-121॥
वर सांगितलेल्या विहितकर्माचरणारूप यज्ञाने यज्ञपुरुषाचे ठिकाणी यजन करून जे जे यज्ञशेष
सहजच राहील ॥3-121॥
तें सुखें आपुले घरीं । कुटुंबेंसी भोजन करी ।
कीं भोग्यचि तें निवारी । कल्मषातें
॥3-122॥
त्याचे आपल्या घरी आपल्या कुटुंबासह सुखाने सेवन करतो, ते सेव्यच त्याच्या पापाचा नाश करते.
॥3-122॥
तें यज्ञावशिष्ट भोगी । म्हणौनि सांडिजे तो अघीं ।
जयापरीं महारोगी । अमृतसिद्धि ॥3-123॥
ते यज्ञ करून राहिलेले शेष तो भोगतो. म्हणून ज्याप्रमाणे अमृत मिळाले असता मोठाले रोग
रोग्याला सोडून जातात, त्याप्रमाणे पातके त्यास सोडून जातात. ॥3-123॥
कीं तत्त्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा ।
तो शेषभोगी तैसा । नाकळे दोषा ॥3-124॥
अथवा ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ पुरुष भ्रांतीला (देहतादात्म्याला) यत्किंचितही वश होत नाहीत
त्याप्रमाणे यज्ञातील तो शेष भोगणारा पापाच्या तडाख्यात सापडत नाही. ॥3-124॥
म्हणौनि स्वधर्में जें अर्जे । तें स्वधर्मेंचि विनियोगिजे ।
मग उरे तें भोगिजे ।
संतोषेंसीं ॥3-125॥
म्हणून स्वधर्माचरणाने जे मिळेल ते स्वधर्म करण्यातच खर्च करावे. व मग जे शिल्लक राहील
त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. ॥3-125॥
हें वांचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा ।
ऐसी आद्य हे कथा । श्रीमुरारी सांगे ॥3-126॥
अर्जुना, अशा रीतीने वागण्याखेरीज दुसर्या रीतीने वागू नये. अशी ही सृष्टीआरंभाची कथा
श्रीकृष्णांनी सांगितली. ॥3-126॥
जे देहचि आपणपें मानिती । आणि विषयांतें भोग्य म्हणती ।
यापरतें न स्मरती । आणिक कांहीं
॥3-127॥
आपण देहच आहोत, असे मानून जे लोक विषय हे भोग्यवस्तु आहेत असे समजतात आणि ज्यास या पलिकडे
दुसरी काहीच कल्पना नसते ॥3-127॥
हें यज्ञोपकरण सकळ । नेणतसां ते बरळ ।
अहंबुद्धि केवळ । भोगूं पाहती ॥3-128॥
ते भ्रमिष्ट लोक आपल्या जवळ असलेली संपत्ति वगैरे सर्व काही यज्ञाची सामग्री आहे असे न
समजता केवळ आपणच अहंकाराने भोग घेण्याकडे प्रवृत्त होतात. ॥3-128॥
इंद्रियरुचीसारिखें । करविती पाक निके ।
ते पापिये पातकें । सेविती जाण ॥3-129॥
इंद्रियांना आवडतील असे चटकदार पदार्थ ते तयार करतात, ते पापी लोक या पदार्थांच्या रूपाने
वस्तुत: पापच सेवन करतात असे समज. ॥3-129॥
संपत्तिजात आघवें । हें हवनद्रव्य मानावें ।
मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषीं
॥3-130॥
वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ति आहे, ती सर्व यज्ञात उपयोगी पडणारी आहे असे समजून मग ती
स्वधर्मरूप यज्ञाने परमेश्वराला अर्पण करावी. ॥3-130॥
हें सांडोनियां मूर्ख । आपणपेंयालागीं देख ।
निपजविती पाक । नानाविध ॥3-131॥
अशा रीतीने वागायचे टाकून, पहा ते मूर्ख लोक आपल्या स्वत:करता नाना प्रकारची पक्वान्ने तयार
करतात. ॥3-131॥
जिहीं यज्ञु सिद्धी जाये । परेशा तोषु होये ।
तें हें सामान्य अन्न न होये । म्हणौनियां
॥3-132॥
ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो, म्हणून हे अन्न कमी
योग्यतेचे नाही ॥3-132॥
हें न म्हणावें साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण ।
जें जीवनहेतु कारण । विश्वा यया ॥3-133॥
ते अन्न सामान्य समजू नये. अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज, कारण की अन्न हे सर्व जगाला
जगण्याचे साधन आहे. ॥3-133॥
अन्नास्तव भूतें । प्ररोहो पावती समस्तें ।
मग पर्जन्यु या अन्नातें । सर्वत्र प्रसवे
॥3-134॥
ही सर्व भूते अन्नापासून वाढतात व या अन्नाला पाऊस चोहीकडे उत्पन्न करतो. ॥3-134॥
तया पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञातें प्रगटी कर्म ।
कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ॥3-135॥
तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो. तो यज्ञ कर्मापासून प्रगट होतो आणि वेदरूप ब्रह्म हे
कर्माचे मूळ आहे. ॥3-135॥
मग वेदांतें परात्पर । प्रसवतसे अक्षर ।
म्हणौनि हे चराचर । ब्रह्मबद्ध ॥3-136॥
दूर व जवळ असणारे (सर्वत्र असणारे) जे ब्रह्म ते वेदांना उत्पन्न करते, म्हणून हे स्थावर
जंगमात्मक विश्व ब्रह्मात गोवलेले आहे. ॥3-136॥
परी कर्माचिये मूर्ति । यज्ञीं अधिवासु श्रुति ।
ऐकें सुभद्रापति । अखंड गा ॥3-137॥
अर्जुना ऐक, परंतु मूर्तिमंत कर्मरूप यज्ञामध्ये वेदाचे निरंतर रहाणे आहे. ॥3-137॥
ऐशी हे आदि परंपरा । संक्षेपें तुज धनुर्धरा ।
सांगितली या अध्वरा । लागूनियां ॥3-138॥
अर्जुना, याप्रमाणे ही मुळातली कार्यकारणाची मालिका तुला या यज्ञाकरता थोडक्यात सांगितली.
॥3-138॥
म्हणौनि समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु ।
नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ॥3-139॥
म्हणून जो उन्मत्त पुरुष या लोकांमध्ये योग्य असलेल्या या स्वधर्मरूप यज्ञाचे साद्यंत आचरण
करणार नाही ॥3-139॥
तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी ।
जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ॥3-140॥
जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड पुरवतो तो पापाची राशी असून भूमीला केवळ भार आहे.
असे समज. ॥3-140॥
तें जन्म कर्म सकळ । अर्जुना अति निष्फळ ।
जैसें कां अभ्रपटल । अकाळींचें ॥3-141॥
जसे भलत्याच वेळेला आलेली मेघांची फळी निरुपयोगी असते, त्याप्रमाणे अर्जुना, त्याचे जन्म व
कर्म निष्फळ आहेत ॥3-141॥
कां गळां स्तन अजेचे । तैसें जियालें देखैं तयाचें ।
जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडेचिना
॥3-142॥
किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही, त्याचे जगणे शेळीच्या गळ्यास असलेल्या
स्तनाप्रमाणे निरर्थक आहे असे समज. ॥3-142॥
म्हणौनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणें न संडावा ।
सर्वभावें भजावा । हाचि एकु ॥3-143॥
म्हणून अर्जुना ऐक. आपला हा धर्म कोणीही सोडू नये. काया-वाचा-मने करून ह्या एकाचेच आचरण
करावे. ॥3-143॥
हां गा शरीर जरी जाहलें । तरी कर्तव्य वोघें आलें ।
मग उचित कां आपुलें । ओसंडावें ?
॥3-144॥
अरे, हे जे शरीर प्राप्त झाले आहे, ते तरी पूर्वकर्मानुसार मिळालेले आहे. असे आहे तर मग
आपल्यास विहित असलेले कर्म आपण का टाकावे ? ॥3-144॥
परिस पां सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची ।
खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ॥3-145॥
अर्जुना, ऐक, मनुष्यशरीर मिळाले असता जे कर्मांचा कंटाळा करतात ते अडाणी आहेत. ॥3-145॥
देखैं असतेनि देहधर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में ।
जो अखंडित रमे । आपणपांचि
॥3-146॥
पहा, जो निरंतर आपल्या स्वरूपात गढलेला आसतो, तोच एक या जगात देहधर्माने युक्त असूनही
कर्माने लिप्त होत नाही. ॥3-146॥
जे तो आत्मबोधें तोषला । तरी कृतकार्यु देखैं जाहला ।
म्हणौनि सहजें सांडवला । कर्मसंगु
॥3-147॥
कारण की पहा, तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो. म्हणून त्याचा कर्माशी
संबंध सहज सुटलेला असतो. ॥3-147॥
तृप्ति जालिया जैसीं । साधनें सरती आपैसीं ।
देखैं आत्मतुष्टीं तैसीं । कर्में नाहीं
॥3-148॥
पहा, ज्याप्रमाणे पोट भारल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजच संपतो, त्याप्रमाणे
आत्मानंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट सहजच संपते. ॥3-148॥
जंववरी अर्जुना । तो बोधु भेटेना मना ।
तंवचि यया साधना । भजावें लागे ॥3-149॥
अर्जुना जोपर्यंत अंत:करणाची व त्या ज्ञानाची गाठ पडत नाही तोपर्यंतच या साधनांची खटपट
करावी लागते. ॥3-149॥
म्हणौनि तूं नियतु । सकळ कामरहितु ।
होऊनियां उचितु । स्वधर्में रहाटें ॥3-150॥
म्हणून तू सर्व आसक्ती टाकून देऊन निरंतर आपल्या धर्माप्रमाणे वाग. ॥3-150॥
जे स्वधर्में निष्कामता । अनुसरले पार्था ।
ते कैवल्यपद तत्त्वतां । पातले जगीं ॥3-151॥
अर्जुना, जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगतामध्ये तत्वत: श्रेष्ठ अशा
मोक्षाला पोहोचतात. ॥3-151॥
देख पां जनकादिक । कर्मजात अशेख ।
न सांडितां मोक्षसुख । पावते जाहले ॥3-152॥
पहा, कर्ममात्राचा मुळीच त्याग न करता जनकादिकांना मोक्षाचे सुख मिळाले. ॥3-152॥
याकारणें पार्था । होआवी कर्मीं आस्था ।
हे आणिकाहि एका अर्था । उपकारैल ॥3-153॥
अर्जुना यास्तव कर्माचे ठिकाणी आस्था असणे जरूर आहे. ही आस्था आणखीही एका कामाला उपयोगी
पडेल. ॥3-153॥
जे आचरतां आपणपयां । देखी लागेल लोका यया ।
तरी चुकेल अपाया । प्रसंगेंचि ॥3-154॥
कारण आपण आचरण केले असता या लोकांना तो कित्ता होईल. आणि अर्थात सहजच त्यांची कर्मलोपाने
होणारी हानी टळेल. ॥3-154॥
देखैं प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले ।
तयाही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं
॥3-155॥
पहा, मिळवावयाचे ते ज्यांनी मिळावले व म्हणून जे निरिच्छ झाले, त्यांना देखील लोकांना वळण
लावण्याकरता, कर्म करणे प्राप्त आहे. ॥3-155॥
मार्गीं अंधासरिसा । पुढें देखणाही चाले जैसा ।
अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनी
॥3-156॥
रस्त्याने आंधळ्याच्या बरोबर पुढे चालणारा डोळस, आंधळ्यास सांभाळून घेऊन, त्याचे बरोबर
चालतो, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुषाला ज्ञान्याने आपण आचरण करून धर्म स्पष्ट करून दाखवावा.
॥3-156॥
हां गा ऐसें जरी न कीजे । तरी अज्ञाना काय उमजे ? ।
तिहीं कवणे परी जाणिजे । मार्गातें
या ? ॥3-157॥
असे जर (ज्ञानी पुरुषाने ) केले नाही तर अज्ञानी लोकांना काय कळणार आहे ? त्यांना आपल्याला
योग्य असलेला मार्ग कोणत्या प्रकाराने समजेल ? ॥3-157॥
एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती ।
तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ
॥3-158॥
या जगात थोर लोक जे कर्म आचरतात, त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात, आणि सामान्य
प्रतीचे इतर सर्व लोक त्याचेच आचरण करतात. ॥3-158॥
हें ऐसें असे स्वभावें । म्हणौनि कर्म न संडावें ।
विशेषें आचरावें । लागे संतीं ॥3-159॥
अशी ही स्थिती असल्यामुळे (ज्ञानी पुरुषाने) कर्म सोडणे बरोबर नाही. (इतकेच काय पण) संतांनी
तर याचे आचरण विशेष काळजीने केले पाहिजे. ॥3-159॥
आतां आणिकांचिया गोठी । कायशा सांगों किरीटी ।
देखैं मीच इये राहाटी । वर्तत असें
॥3-160॥
अर्जुना, आता दुसर्याच्या गोष्टी कशाला सांगू ? हे पहा, मी सुद्धा याच मार्गाने वागतो.
॥3-160॥
काय सांकडें कांहीं मातें । कीं कवणें एकें आर्तें ।
आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी
॥3-161॥
मला काही कमी आहे म्हणून किंवा काही एक इच्छा धरून मी धर्माचे आचरण करतो असे जर म्हणशील
॥3-161॥
तरी पुरतेपणालागीं । आणिकु दुसरा नाहीं जगीं ।
ऐसी सामुग्री माझ्या अंगीं । जाणसी तूं
॥3-162॥
तर पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्या तोडीला या जगात दुसरा कोणीही नाही. अशा
तर्हेचे सामर्थ्य माझा अंगात आहे, हे तुला माहीत आहे. ॥3-162॥
मृत गुरुपुत्र आणिला । तो तुवां पवाडा देखिला ।
तोही मी उगला । कर्मीं वर्तें ॥3-163॥
मी आपल्या गुरूचा मेलेला मुलगा परत आणला, तो माझा पराक्रम तू पाहिलाच आहेस. असा मी देखिल
निपूटपणे कर्मे करत असतो. ॥3-163॥
परी स्वधर्मीं वर्तें कैसा । साकांक्षु कां होय जैसा ।
तयाचि एका उद्देशा- । लागोनियां ॥3-164॥
परंतु ती कर्मे मी कशी करतो म्हणून विचारशील, तर सकाम पुरुष केवळ फलाच्या उद्देशाने ज्या
दक्षतेने कर्मे करतो तितक्याच दक्षतेने मीही पण कर्माचरण करतो. पण ते केवळ त्याच एका हेतूने
की – ॥3-164॥
जे भूतजात सकळ । असे आम्हांचि आधीन केवळ ।
तरी न व्हावें बरळ । म्हणौनियां ॥3-165॥
सर्व प्राणिसमूह आमच्याच तंत्राने चालणारा आहे. तेव्हा तो भडकू नये म्हणून ॥3-165॥
आम्ही पूर्णकाम होउनी । जरी आत्मस्थिति राहुनी ।
तरी प्रजा हे कैसेनि । निस्तरेल ?
॥3-166॥
आम्ही निरीच्छ होऊन आपल्या स्वरूपस्थितीतच राहिलो तर ही प्रजा कशा तर्हेने भवसागरातून पार
पडेल ? ॥3-166॥
इहीं आमुची वास पाहावी । मग वर्ततीपरी जाणावी ।
ते लोकस्थिति आघवी । नासिली होईल ॥3-167॥
यांनी आमच्या मार्गाकडे पहावे आणि मग वागण्याची रीत समजून घ्यावी, असा प्रकार असल्यामुळे
(आम्ही कर्म सोडून राहिलो तर) ती लोकांची रहाणीच बिघडेल. ॥3-167॥
म्हणौनि समर्थु जो येथें । आथिला सर्वज्ञते ।
तेणें सविशेषें कर्मातें । त्यजावें ना
॥3-168॥
म्हणून या लोकात जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल, त्याने तर विशेष करून कर्माचा
त्याग करू नये. ॥3-168॥
देखैं फळाचिया आशा । आचरे कामकु जैसा ।
कर्मीं भरु होआवा तैसा । निराशाही ॥3-169॥
पहा फलाच्या आशेने फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेने कर्माचे आचरण करतो तितक्याच उत्सुकतेने
फलाशा नसलेल्या लोकांनीही कर्मे केली पाहिजेत. ॥3-169॥
जे पुढतपुढतीं पार्था । हे सकळ लोकसंस्था ।
रक्षणीय सर्वथा । म्हणौनियां ॥3-170॥
कारण अर्जुना, लोकांचीही वागणूकीची रीत सर्व प्रकारे नेहेमी कायम ठेवणे योग्य आहे. म्हणून
॥3-170॥
मार्गाधारें वर्तावें । विश्व हें मोहरें लावावें ।
अलौकिक नोहावें । लोकांप्रति ॥3-171॥
शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगास सरळ मार्गाला लावावे आणि आपण लोकांशी लोकबाह्य
वागू नये. ॥3-171॥
जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी ।
म्हणौनि बाळका जैशीं नेदावीं ।
धनुर्धरा ॥3-172॥
जे तान्हे बालक मोठ्या कष्टाने आईचे दूध पिते, ते पक्वान्न कसे खाणार ? म्हणून अर्जुना ती
पक्वान्ने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाला देऊ नयेत ॥3-172॥
तैशी कर्मीं जयां अयोग्यता । तयांप्रति नैष्कर्म्यता ।
न प्रगटावी खेळतां । आदिकरुनी
॥3-173॥
त्याप्रमाणे ज्यांना कर्मे चांगल्या तर्हेने करण्याचीही पूर्ण योग्यता आली नाही, त्यांना
लीलेने देखील नैष्कर्म्यतेचा उपदेश करू नये. ॥3-173॥
तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी ।
नैष्कर्मींही दावावी । आचरोनी ॥3-174॥
त्यास योग्य कर्माची वागणूक लाऊन द्यावी हे योग्य आहे. त्यांच्याजवळ त्या सत्कर्माचरणाचीच
स्तुती करावी आणि कर्मातीत पुरुषांनीही सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे. ॥3-174॥
तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगीं ।
तो कर्मबंधु आंगीं । वाजैल ना ॥3-175॥
लोकांच्या कल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचे आचरण केले तरी कर्माचे बंधन त्यांना प्राप्त
होणार नाही. ॥3-175॥
जैसी बहुरुपियांचीं रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं ।
परी लोकसंपादणी । तैशीच
करिती ॥ १७६ ॥
॥3-176॥
बहुरूपी जेव्हा राजाराणीचे सोंग आणतात त्यावेळी त्यांच्या मनात आपण स्त्रीपुरुष आहोत अशी
कल्पनाही नसते. तथापि ते जसे घेतलेल्या सोंगाची यथास्थितपणे लोकात बतावणी करतात.
(त्याप्रमाणे लोकसंग्रहाकरता निष्काम पुरुष जरी कर्म करीत असले तरी त्यांना कर्माचे बंधन
प्राप्त होत नाही.) ॥ १-१७६ ॥
॥3-176॥
देखैं पुढिलाचें वोझें । जरी आपुला माथां घेईजे ।
तरी सांगैं कां न दटिजे । धनुर्धरा ?
॥3-177॥
अर्जुना, पहा, दुसर्याचे ओझे आपण आपल्या शिरावर घेतले तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही
का ? सांग बरं ॥3-177॥
तैसीं शुभाशुभें कर्में । जियें निपजती प्रकृतिधर्में ।
तियें मूर्ख मतिभ्रमें । मी
कर्ता म्हणे ॥3-178॥
तसे प्रकृतीच्या गुणांनी जी बरी वाईट कर्मे होतात ती अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळे मी
करतो असे म्हणतो. ॥3-178॥
ऐसा अहंकारादिरूढ । एकदेशी मूढ ।
तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना ॥3-179॥
अशा रीतीने देहाहंकार धरणारा व स्वत:स मर्यादित समजणारा जो मूर्ख, त्य़ास हे गूढ तत्वज्ञान
उघड करून सांगू नये. ॥3-179॥
हें असो प्रस्तुत । सांगिजैल तुज हित ।
तें अर्जुना देऊनि चित्त । अवधारीं पां ॥3-180॥
हे राहू दे, अर्जुना, आता तुला हिताची गोष्ट सांगतो, ती तू चित्त देऊन ऐक. ॥3-180॥
जें तत्त्वज्ञानियांच्या ठायीं । प्रकृतिभावो नाहीं ।
जेथ कर्मजात पाहीं । निपजत असे
॥3-181॥
ती अशी की ज्या प्रकृतीच्या गुणांपासून ही सर्व कर्मे उत्पन्न होतात, तिच्याशी
ब्रह्मनिष्ठांचे तादात्म्य नसते. ॥3-181॥
ते देहाभिमानु सांडुनी । गुणकर्में वोलांडुनि ।
साक्षीभूत होउनी । वर्तती देहीं ॥3-182॥
ते देहाचा अभिमान टाकून, गुण व गुणांपासून उत्पन्न होणारी जी कर्मे, त्यांचे उल्लंघन करून,
देहामध्ये उदासीनतेने रहातात. ॥3-182॥
म्हणौनि शरीरी जरी होती । तरी कर्मबंधा नातळती ।
जैसा कां भूतचेष्टा गभस्ती । घेपवेना
॥3-183॥
म्हणून सूर्याच्या प्रकशात जरी प्राण्यांची सर्व कर्मे होतात, तरी सूर्य हा प्राण्यांच्या
कर्माने लिप्त होत नाही, तसे हे शरीरधारी जरी असतात तरी ते कर्मबंधाच्या ताब्यात जात नाहीत.
॥3-183॥
एथ कर्मीं तोचि लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे ।
प्रकृतीचेनि आटोपे । वर्ततु असे ॥3-184॥
या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो, तोच कर्मानी बद्ध होतो.
॥3-184॥
इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें ।
तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ॥3-185॥
गुणांच्या योगाने इंद्रिये आपापले व्यापार करतात. त्या दुसर्यांनी (गुणांनी) केलेल्या
कर्माचा कर्तेपणा जो बळेच आपणाकडे घेतो (तो वर सांगितल्याप्रमाणे कर्माने बद्ध होतो.)
॥3-185॥
तरी उचितें कर्में आघवीं । तुवां आचरोनि मज अर्पावीं ।
परी चित्तवृत्ति न्यासावी ।
आत्मरूपीं ॥3-186॥
सर्व विहित कर्मे करून, ती तू मला अर्पण कर. परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव.
॥3-186॥
आणि हें कर्म मी कर्ता । कां आचरैन या अर्था ।
ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिगों देसीं
॥3-187॥
हे विहित कर्म, मी त्याचा कर्ता, अथवा अमूक कारणाकरता मी त्या कर्माचे आचरण करीन असा अभिमान
तुझ्या चित्तात येईल तर तो येऊ देऊ नकोस. ॥3-187॥
तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें ।
मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥3-188॥
तू केवळ देहासक्त होऊन राहू नकोस. सर्व कामनांना टाकून दे आणि मग सर्व भोगांचा यथाकाली
उपभोग घे. ॥3-188॥
आतां कोदंड घेऊनि हातीं । आरूढ पां इयें रथीं ।
देईं आलिंगन वीरवृत्ती । समाधानें
॥3-189॥
आता तू आपल्या हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा अंगीकार कर. ॥3-189॥
जगीं कीर्ति रूढवीं । स्वधर्माचा मानु वाढवीं ।
इया भारापासोनि सोडवीं । मेदिनी हे
॥3-190॥
या जगात तू आपली कीर्ती वाढव व आपल्या धर्माचा मान वाढव. आणि पृथ्वीला या दुष्टांच्या
ओझ्यापासून सोडव. ॥3-190॥
आतां पार्था निःशंकु होईं । या संग्रामा चित्त देईं ।
एथ हें वांचूनि कांहीं । बोलों नये
॥3-191॥
आता अर्जुना, संशय टाकून दे आणि या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरे काही
बोलू नकोस ॥3-191॥
हें अनुपरोध मत माझें । जिहीं परमादरें स्वीकारिजे ।
श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे । धनुर्धरा
॥3-192॥
अर्जुना, हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्यबुद्धीने मान्य करतात आणि विश्वासपूर्वक
त्याप्रमाणे वागतात ॥3-192॥
तेही सकळ कर्मीं वर्ततु । जाण पां कर्मरहितु ।
म्हणौनि हें निश्चितु । करणीय गा ॥3-193॥
ते सर्व कर्म करीत असले तरी ते कर्मरहित आहेत असे अर्जुना, तू समज. म्हणून हे कर्म अवश्य
करणीय आहे. ॥3-193॥
नातरी प्रकृतिमंतु होउनी । इंद्रियां लळा देउनी ।
जें हें माझें मत अव्हेरुनी । ओसंडिती
॥3-194॥
नाहीतर प्रकृतीच्या स्वाधीन होऊन व इंद्रियांचे लाड करून जे लोक ह्या माझ्या मताचा तिरस्कार
करून, ते टाकून देतात ॥3-194॥
जे सामान्यत्वें लेखिती । अवज्ञा करूनि देखती ।
कां हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणें ॥3-195॥
जे याला एक साधारण गोष्ट समजतात, जे याच्याकडे अनादराने पहातात किंवा जे वाचाळपणे याला
पुष्पितवाणी म्हणतात ॥3-195॥
ते मोहमदिरा भुलले । विषयविखें घारले ।
अज्ञानपंकीं बुडाले । निभ्रांत मानीं ॥3-196॥
ते लोक अविवेकरूपी दारूने मत्त झाले आहेत व विषयरूपी विषाने व्यापलेले आहेत व अज्ञानरूपी
चिखलामधे फसलेले आहेत असे नि:संसय समज. ॥3-196॥
देखैं शवाच्या हातीं दिधलें । जैसें रत्न कां वायां गेलें ।
नातरी जात्यंधा पाहलें ।
प्रमाण नोहे ॥3-197॥
पहा प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे व्यर्थ जाते अथवा जन्मांधाला दिवस उगवल्याचा
उपयोग नाही ॥3-197॥
कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा न वचे वायसा ।
मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना
॥3-198॥
किंवा ज्याप्रमाणे चंद्राचा उदय कावळ्यांना उपयोगी पडत नाही त्याप्रमाणे हा विचार मूर्खांना
रुचणार नाही. ॥3-198॥
तैसे जे पार्था । विमुख या परमार्था ।
तयांसी संभाषण सर्वथा । करावेना ॥3-199॥
अर्जुना, याप्रमाणे जे या परमार्थाला पाठमोरे असतील, त्यांच्याशी मुळीच भाषण करू नये.
॥3-199॥
म्हणौनि ते न मानिती । आणि निंदाही करूं लागती ।
सांगैं पतंगु काय साहती । प्रकाशातें ?
॥3-200॥
ते या उपदेशाला मानीत नाहीत आणि उलट त्याची निंदा देखील करतात. म्हणून त्यांना न सांगणेच
बरे. सांग बरं, पतंग प्रकाशाला सहन करू श्कतील का ? ॥3-200॥
पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचुक मरण ।
तेंवीं विषयाचरण । आत्मघाता ॥3-201॥
ज्याप्रमाणे दिव्याला आलिंगन देण्यात पतंगाला अचूक मरण येते, त्याप्रमाणे विषयाचरणात अचूक
आत्मनाश होतो. ॥3-201॥
म्हणौनि इंद्रियें एकें । जाणतेनि पुरुखें ।
लाळावीं ना कौतुकें । आदिकरुनी ॥3-202॥
म्हणून कोणीही शहाण्या मनुष्याने या इंद्रियाचे लीलेने देखील लाड करू नयेत. ॥3-202॥
हां गा सर्पेसीं खेळों येईल ? । कीं व्याघ्रसंसर्ग सिद्धि जाईल ? ।
सांगैं हाळाहाळ जिरेल
। सेविलिया काई ? ॥3-203॥
अरे सापाबरोबर खेळता येईल काय ? किंवा वाघाची संगत नीटपणे शेवटास जाईल काय ? सांग बरं.
हालाहल विष प्याले तर पचेल काय ? ॥3-203॥
देखैं खेळतां अग्नि लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला ।
तैसा इंद्रियां लळा दिधला । भला
नोहे ॥3-204॥
पहा खेळता खेळता जर आग लागली आणि मग ती जर बळावली तर ती जशी आटोपत नाही, त्याप्रमाणे
इंद्रियांचे लाड केले तर ते चांगले नाही. ॥3-204॥
एर्हवीं तरी अर्जुना । या शरीरा पराधीना ।
कां नाना भोगरचना । मेळवावी ? ॥3-205॥
अर्जुना सहज विचार करून पाहिले तर या प्रकृतीच्या आधीन असणार्या शरीराला नाना प्रकारचे
व्यवस्थित भोग का द्यावेत ? ॥3-205॥
आपण सायासेंकरुनि बहुतें । सकळहि समृद्धिजातें ।
उदोअस्तु या देहातें । प्रतिपाळावें कां
? ॥3-206॥
आपण अतिशय कष्ट करून जेवढी म्हणून संपत्ती आहे तेवढी सर्व एकूणएक खर्चून, रात्रंदिवस या
देहाची जोपासना का करावी ? ॥3-206॥
सर्वस्वें शिणोनि एथें । अर्जवावीं संपत्तिजातें ।
तेणें स्वधर्मु सांडुनि देहातें ।
पोखावें काई ॥3-207॥
या लोकात सर्व प्रकारे कष्ट करून सर्व प्रकारची संपत्ती संपादन करावी आणि मग आपला धर्म
टाकून देऊन त्या संपत्तीने या देहाचे पालनपोषण करावे, हे योग्य आहे काय ? ॥3-207॥
मग हे तंव पांचमेळावा । शेखीं अनुसरेल पंचत्वा ।
ते वेळीं केला कें गिंवसावा । शीणु
आपुला ॥3-208॥
मग हे शरीर पाहिले तर पाच भूतांच्या मिलाफाने झालेले आहे व ते शेवटी पाच भूतातच मिळून
जाणार. त्यावेळी आपण केलेले श्रम कोठे शोधून काढावेत ? (म्हणजे आपल्या कष्टाचा मोबदला कोणास
विचारावा ?) ॥3-208॥
म्हणौनि केवळ देहभरण । ते जाणें उघडी नागवण ।
यालागीं एथ अंतःकरण । देयावेंना ॥3-209॥
म्हणून देहाचे पोषण करणे, हा उघड उघड घात आहे. याकरता तू देहपोषणाकडे लक्ष देऊ नकोस.
॥3-209॥
एर्हवीं इंद्रियांचिया अर्था । सारिखा विषो पोखितां ।
संतोषु कीर चित्ता । आपजेल
॥3-210॥
एरवी इंद्रियांना पाहिजे त्याप्रमाणे विषय देत गेले तर खरोखर मनाला संतोष प्राप्त होईल
॥3-210॥
परी तो संवचोराचा सांगातु । जैसा नावेक स्वस्थु ।
जंव नगराचा प्रांतु । सांडिजेना
॥3-211॥
परंतु तो संतोष म्हणजे सभ्य दिसणार्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे, सभ्य दिसणारा चोर गावची
शीव ओलांडली नाही तेथेपर्यंतच क्षणभर स्वस्थ असतो. (पुढे वनात गेल्यावर तोच आपल्या घातास
प्रवृत्त होतो). ॥3-211॥
बापा विषाची मधुरता । झणें आवडी उपजे चित्ता ।
परी तो परिणामु विचारितां । प्राणु हरी
॥3-212॥
बाबा, बचनागादि विषे गोड आहेत खरी पण त्यांच्याविषयी अंत:करणात कदाचित इच्छा उत्पन्न होईल,
तरीपण तू ती उत्पन्न होऊ देऊ नकोस. कारण त्यांच्या परिणामाचा विचार केला तर ती घातक आहेत.
॥3-212॥
देखैं इंद्रियीं कामु असे । तो लावी सुखदुराशे ।
जैसा गळीं मीनु आमिषें । भुलविजे गा
॥3-213॥
पहा, ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला भुलवते, त्याचप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी
असणारी विषयांची लालसा प्राण्यांना सुखाच्या खोट्या आशेकडे ओढते. ॥3-213॥
परी तयामाजीं गळु आहे । जो प्राणातें घेऊनि जाये ।
तो जैसा ठाउवा नोहे । झांकलेपणें
॥3-214॥
परंतु त्या आमिषाखाली प्राण घेणारा गळ आहे, हे तो गळ झाकला गेला असल्यामुळे ज्याप्रमाणे
माशाला कळत नाही ॥3-214॥
तैसें अभिलाषें येणें कीजेल । विषयांची आशा धरिजेल ।
तरी वरपडा होईजेल । क्रोधानळा
॥3-215॥
त्या विषयांच्या लालसेने तशीच स्थिती होईल. जर विषयांचा अभिलाष धरला तर क्रोधरूपी अग्नीत
पडावे लागेल. ॥3-215॥
जैसा कवळोनियां पारधी । घातेचिये संधी ।
आणी मृगातें बुद्धि । साधावया ॥3-216॥
जसा पारधी मारण्याच्या हेतूने हरणाला चहूकडून घेरून माराच्या कचाट्यात आणतो ॥3-216॥
एथ तैसीची परी आहे । म्हणौनि संगु हा तुज नोहे ।
पार्था दोन्ही कामक्रोध हे । घातुक
जाणें ॥3-217॥
येथे तसाच प्रकार आहे. म्हणून तू विषयांचा संग धरू नकोस. अर्जुना, काम व क्रोध हे दोन्ही
घात करणारे आहेत, असे समज. ॥3-217॥
म्हणौनि हा आश्रोचि न करावा । मनेंहि आठवो न धरावा ।
एकु निजवृत्तीचा वोलावा । नासों
नेदी ॥3-218॥
म्हणून विषयेच्छेला थाराच देऊ नये. या विषयांची मनातही आठवण आणू नये. फक्त हा स्वधर्माचा
जिव्हाळा नासू देऊ नकोस. ॥3-218॥
अगा स्वधर्मु हा आपुला । जरी कां कठिणु जाहला ।
तरी हाचि अनुष्ठिला । भला देखैं ॥3-219॥
पहा, अरे आपला स्वत:चा धर्म आचरण्यास कठिण असला तरी त्याचेच आचरण केलेले चांगले. ॥3-219॥
येरु आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा ।
परी आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥3-220॥
याहून दुसरा जो परकीयांचा आचार, तो खरोखर दिसावयास जरी चांगला असला तरी आचरण करणार्याने
आपणास विहित असलेल्या कर्माचेच आचरण करावे. ॥3-220॥
सांन्नें शूद्र घरीं आघवीं । पक्वान्नें आहाति बरवीं ।
तीं द्वीजें केंवीं सेवावीं ।
दुर्बळु जरी जाहला ॥3-221॥
शूद्राच्या घरी सर्व चांगली पक्वान्ने आहेत, ती ब्राह्मण जरी दरिद्री असला तरी त्याने ती
कशी सेवन करावीत ? सांग बरं ॥3-221॥
हें अनुचित कैसेनि कीजे । अग्राह्य केवीं इच्छिजे ।
अथवा इच्छिलेंही पाविजे । विचारीं
पां ॥3-222॥
अशी ही अयोग्य गोष्ट कशी करावी ? जे प्राप्त करून घेणे योग्य नाही त्याची इच्छा कशी करावी ?
अथवा विचार कर, इच्छा जरी झाली, तरी त्याचे सेवन करावे काय ? ॥3-222॥
तरी लोकांचीं धवळारें । देखोनियां मनोहरें ।
असतीं आपुलीं तणारें । मोडावीं केवीं ?
॥3-223॥
दुसर्यांची सुंदर चुनेगच्ची घरे पाहून आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून
टाकाव्यात ? ॥3-223॥
हें असो वनिता आपुली । कुरूप जरी जाहली ।
तर्ही भोगितां तेचि भली । जियापरी ॥3-224॥
हे असू दे. आपली बायको जरी रूपाने वाईट असली तरी ज्याप्रमाने तिच्याबरोबर संसार करावा हे
चांगले. ॥3-224॥
तेवीं आवडे तैसा सांकडु । आचरतां जरी दुवाडु ।
तर्ही स्वधर्मुचि सुरवाडु । परत्रींचा
॥3-225॥
त्याप्रमाणे वाटेल तसा अडचणीचा प्रसंग आला अथवा आचरण्यास त्रास पडला तरी आपला धर्मच परलोकी
सुख देणारा आहे. ॥3-225॥
हां गा साकर आणि दूध । हें गौल्य कीर प्रसिद्ध ।
परी कृमिदोषीं विरुद्ध । घेपे केवीं ?
॥3-226॥
बाबा, साखर आणि दूध हे पदार्थ गोड आहेत. हे उघड आहे. पण जंताच्या रोगात त्यांचा परिणाम वाईट
होत असल्यामुळे ज्यांना तो रोग आहे त्यांनी ते पदार्थ कसे सेवन करावेत ? ॥3-226॥
ऐसेनिही जरी सेविजेल । तरी ते अळुकीची उरेल ।
जे तें परिणामीं पथ्य नव्हेल । धनुर्धरा
॥3-227॥
असे असूनही जर त्यांचे सेवन केले तर सेवन करणाराचा तो आग्रहच उरेल. कारण अर्जुना, त्याचे ते
करणे परिणामी हितकर होणार नाही. ॥3-227॥
म्हणौनि आणिकांसी जें विहित । आणि आपणपेयां अनुचित ।
तें नाचरावें जरी हित । विचारिजे
॥3-228॥
म्हणून दुसर्यांना जे विहित, पण आपणास जे अकरणीय म्हणून ठरले आहे ते हिताचा विचार करून
पाहिले तर आचरण करू नये हे बरे. ॥3-228॥
या स्वधर्मातें अनुष्ठितां । वेचु होईल जिविता ।
तोहि निका वर उभयतां । दिसत असे ॥3-229॥
(फार काय?) या आपल्या धर्माचे आचरण करीत असता करी प्राण खर्ची पडले तरी तरीही इहपरलोकीच्या
दृष्टीने तो धर्म चांगलाच आहे. ॥3-229॥
ऐसें समस्तसुरशिरोमणी । बोलिले जेथ शारङ्गपाणी ।
तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा
॥3-230॥
सर्व देवात श्रेष्ठ असलेले श्रीकृष्ण ज्यावेळी असे बोलले, त्यावेळी अर्जुन म्हणाला, माझी एक
विनंती ऐका. ॥3-230॥
हें जें तुम्हीं सांगितलें । तें सकळ कीर म्यां परिसिलें ।
परी आतां पुसेन कांहीं आपुलें
। अपेक्षित ॥3-231॥
तुम्ही मला जे वर सांगितले ते खरोखर मी सर्व ऐकले. परंतु आता मला काही पाहिजे आहे ते मी
तुम्हाला विचारतो. ॥3-231॥
तरी देवा हें ऐसें कैसें । जे ज्ञानियांही स्थिति भ्रंशे ।
मार्गु सांडुनी अनारिसे ।
चालत देखों ॥3-232॥
तर देवा, हे असे कसे की ज्ञान्यांचीही स्थिती बिघडून ते मार्ग सोडून भलत्याच वाटेने चालत
असल्याचे नजरेस येते. ॥3-232॥
सर्वज्ञुही जे होती । हेयोपादेयही जाणती ।
तेही परधर्में व्यभिचरिति । कवणें गुणें ?
॥3-233॥
ज्यांना सर्व कळते व ज्याना उपायही ठाऊक असतात ते देखील परधर्माच्या आचरणाने स्वधर्मापासून
कशामुळे भ्रष्ट होतात ? ॥3-233॥
बीजा आणि भूसा । अंधु निवाडू नेणें जैसा ।
नावेक देखणाही तैसा । बरळे कां पां ? ॥3-234॥
आंधळा ज्याप्रमाणे धान्य व कोंडा यांची निवड जाणत नाही त्याप्रमाणे कधी कधी डोळासालाही कळात
नाही, असे का व्हावे ? ॥3-234॥
जे असता संगु सांडिती । तेचि संसर्गु करितां न धाती ।
वनवासीही सेविती । जनपदातें
॥3-235॥
जे असलेल्या सर्व संगाचा त्याग करतात, तेच परत कितीही संग केला तरी तृप्त होत नाहीत. सर्व
सोडून अरण्यात राहिलेले लोक सुद्धा पुन्हा लोकात येऊन रहातात. ॥3-235॥
आपण तरी लपती । सर्वस्वें पाप चुकविती ।
परी बळात्कारें सुइजती । तयाचि माजीं ॥3-236॥
आपण स्वत: पापांना चुकवण्याकरता लपून बसतात. तात्पर्य सर्व प्रकारे पाप चुकवण्याचा पयत्न
करतात, परंतु पुन्हा बळजबरीने त्यातच कोंबले जातात. ॥3-236॥
जयाची जीवें घेती विवसी ।तेचि जडोनि ठाके जीवेंसीं ।
चुकवितां ते गिंवसी । तयातेंचि ॥3-237॥
ज्यांचा मनापासून कंटाळा येतो, तेच अंत:करणाला येऊन चिकटतात व ज्यांना टाळण्याचा प्रयत्न
करावा तेच उलट त्यांनाच घेरतात. ॥3-237॥
ऐसा बलात्कारु एकु दिसे । तो कवणाचा एथ आग्रहो असे ।
हें बोलावें हृषीकेशें । पार्थु
म्हणे ॥3-238॥
अशी एक बळजबरी दिसून येते. हा येथे कोणाचा बलात्कार आहे ? हे देवांनी मला सांगावे, असे
अर्जुन म्हणाला. ॥3-238॥
तंव हृदयकमळआरामु । जो योगियांचा निष्कामकामु ।
तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक
॥3-239॥
तेव्हा हृदयरूपी कमलामधे विश्रांती घेणारा व निरिच्छ झालेले योगी जेथे विश्रांती घेतात असा
तो श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला ऐक. ॥3-239॥
तरी हे काम क्रोधु पाहीं । जयांतें कृपेची सांठवण नाहीं ।
हें कृतांताच्या ठायीं ।
मानिजती ॥3-240॥
तर बाबा (बलात्कार करणारे) हे काम व क्रोध आहेत. असे समज. हे असे आहेत की ज्यांच्या मनात
दयेचा साठा अजिबात नाही. हे काम व क्रोध प्रत्यक्ष यमधर्मच आहेत. असे समजले जाते. ॥3-240॥
हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरीचे वाघ ।
भजनमार्गींचे मांग । मारक जे ॥3-241॥
हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले सर्प आहेत, हे विषयरूपी दर्यांमधे रहाणारे वाघ आहेत. हे
भजनरूपी रस्त्यावरील वाटमारे करणारे मांग आहेत. ॥3-241॥
हे देहदुर्गींचे धोंड । इंद्रियग्रामींचें कोंड ।
यांचें व्यामोहादिक दबड । जगावरी
॥3-242॥
हे देहरूपी डोंगरी किल्ल्यावरचे कोठे मोठे दगड आहेत. हे इंद्रियरूपी गावाचे गावकूस आहेत.
यांचे अविवेकादिकाच्या रूपाने यांचे जगावर मोठे बंड आहे. ॥3-242॥
हे रजोगुण मानसींचे । समूळ आसुरियेचे ।
धालेपण ययांचें । अविद्या केलें ॥3-243॥
हे मनात असलेल्या रजोगुणाचे वळलेले आहेत व मुळापासूनच आसुरी संपत्तीचे आहेत. यांचे पालन
पोषण अविचाराने केलेले आहे. ॥3-243॥
हे रजाचे कीर जाहले । परी तमासी पढियंते भले ।
तेणें निजपद यां दिधलें । प्रमादमोहो
॥3-244॥
हे वास्तविक रजोगुणाचे जरी बनलेले आहेत तरी ते तमोगुणाला फार प्रिय होऊन राहिले आहेत. त्या
तमोगुणाने प्रमाद व मोहरूपी आपली गादी यांना बहाल केलेली आहे. ॥3-244॥
हे मृत्युच्या नगरीं । मानिजती निकियापरि ।
जे जीविताचे वैरी । म्हणौनियां ॥3-245॥
ह्यांची मृत्यूच्या नगरात चांगली पत आहे. कारण की हे जीविताचे शत्रु आहेत. ॥3-245॥
जयांसि भुकेलिया आमिषा । हें विश्व न पुरेचि घांसा ।
कुळवाडियांचिया आशा । चाळीत असे
॥3-246॥
भूक लागली असता खाण्यास हे जग ज्यांना एका घासासही पुरत नाही अशा या कामक्रोधांचा जो
(नशाकारक) व्यापार आहे त्या व्यापारावर देखरेख आशा करते. ॥3-246॥
कौतुकें कवळितां मुठीं । जिये चवदा भुवनें थेंकुटी ।
तिये भ्रांतिही धाकुटी ।
वाल्हीदुल्ही ॥3-247॥
सहज मुठीत धरण्यास जिला चौदाही भुवने थोडी आहेत अशी जी भ्रांती ती या आशेची नव्या नवसाची
धाकटी बहीण आहे. ॥3-247॥
जे लोकत्रयाचें भातुकें । खेळतांचि खाय कवतिकें ।
तिच्या दासीपणाचेनि बिकें । तृष्णा
जिये ॥3-248॥
जी खेळत असता त्रैलोक्यरूपी खाऊ सहज खाऊन टाकते त्या भ्रांतीच्या दासीपणाच्या जोरावर तृष्णा
जगली आहे. ॥3-248॥
हें असो मोहें मानिजे । यांतें अहंकारें घेपे दीजे ।
जेणें जग आपुलेनि भोजें । नाचवीत
असे ॥3-249॥
हे असो. या कामक्रोधांना मोहाचे घरी मान आहे. आपल्या करामतीने जो सर्व जगास नाचवतो तो
अहंकार या कामक्रोधांपाशी देवघेव करतो. ॥3-249॥
जेणें सत्याचा भोकसा काढिला । मग अकृत्य तृणकुटा भरिला ।
तो दंभु रूढविला । जगीं इहीं
॥3-250॥
ज्याने सत्याच्या पोटी असलेला मालमसाला काढून त्या ऐवजी अकृत्याचा पेंढा भरला असा जो दंभ तो
या कामक्रोधांनी जगात प्रसिद्धीस आणला. ॥3-250॥
साध्वी शांती नागविली । मग माया मांगी शृंगारिली ।
तियेकरवीं विटाळविलीं । साधुवृंदें
॥3-251॥
या काम-क्रोधांनी पतिव्रता जी शांती तिला वस्त्रहीन केले व मग त्या वस्त्रालंकारांनी
मायारूपी मांगीण सजवली. नंतर मग या अशा सजवलेल्या मायेकडून साधूंचे समुदाय या कामक्रोधांनी
भ्रष्ट करवले. ॥3-251॥
इहीं विवेकाची त्र्याय फेडिली । वैराग्याचि खाल काढिली ।
जितया मान मोडिली । उपशमाची
॥3-252॥
यांनी विचाराचा आश्रय नाहीसा केला, वैराग्याची कातडी काढली व निग्रहाची मान जिवंतपणीच
मुरगाळून टाकली. ॥3-252॥
इहीं संतोषवन खांडिलें । धैर्यदुर्ग पाडिले ।
आनंदरोप सांडिले । उपडूनियां ॥3-253॥
यांनी संतोषरूपी अरण्य तोडून टाकले, व धैर्यरूपी किल्ले पाडले व आनंदरूपी लहान रोपटे उपटून
टाकले. ॥3-253॥
इहीं बोधाचीं रोपें लुंचिलीं । सुखाची लिपी पुसिली ।
जिव्हारीं आगी सूदली । तापत्रयाची
॥3-254॥
यांनी बोधरूपी रोपे उपटली, आणि सुखाची भाषा पुसून टाकली. यांनी हृदयात त्रिविध तापांचे
निखारे पसरवले. ॥3-254॥
हे आंगा तंव घडले । जीवींची आथी जडले ।
परी नातुडती गिंवसिले । ब्रह्मादिकां ॥3-255॥
हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत. व अंत:करणाला सारखे चिकटून राहिले आहेत. परंतु शोधूनही
ते ब्रह्मादी देवांना हाती लागत नाहीत, ॥3-255॥
हे चैतन्याचे शेजारीं । वसती ज्ञानाच्या एका हारीं ।
म्हणौनि प्रवर्तले महामारी ।
सांवरती ना ॥3-256॥
हे कामक्रोध जीवात्म्याच्या जवळ असतात व वृत्तिज्ञानाच्या पंक्तीला रहातात, म्हणून हे हल्ला
करावयास उसळले म्हणजे आटोपत नाहीत. ॥3-256॥
हे जळेंविण बुडविती । आगीवीण जाळिती ।
न बोलतां कवळिती । प्राणियांतें ॥3-257॥
हे पाण्यावाचून बुडवतात, अग्नीवाचून जाळतात आणि न बोलताच प्राण्यांना घेरतात. ॥3-257॥
हे शस्त्रेंविण साधिती । दोरेंविण बांधिती ।
ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेउनि ॥3-258॥
हे शस्त्रावाचून ठार करतात, दोरावाचून बांधतात आणि ज्ञान्यांची तर प्रतिज्ञापूर्वक मान
कापतात. ॥3-258॥
हे चिखलेंवीण रोवितीं । पाशिकेंवीण गोंविती ।
हे कवणाजोगें न होती । आंतौटेपणें ॥3-259॥
हे चिखलावाचून रोवतात व जाळ्यावाचून अडकवतात, हे फार आत असल्यामुळे कोणालाही आटोपण्यासारखे
नाहीत. ॥3-259॥
जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनि घेपे व्याळीं ।
नातरी उल्बाची खोळी । गर्भस्थासी ॥3-260॥
जसे चंदनाच्या मुळीला साप वेढे घालून बसतात, किंवा पोटात असणार्या गर्भाला वेष्टणाची गवसणी
असते ॥3-260॥
कां प्रभावीण भानु । धूमेवीण हुताशनु ।
जैसा दर्पण मळहीनु । कहींच नसे ॥3-261॥
अथवा प्रकाशावाचून सूर्य, धुरावाचून अग्नी किंवा मळाशिवाय आरसा केव्हाच नसतो ॥3-261॥
तैसें इहींवीण एकलें । आम्हीं ज्ञान नाहीं देखिलें ।
जैसें कोंडेनि पां गुंतलें । बीज
निपजे ॥3-262॥
तसे या कामक्रोधांशिवाय एकटे असलेले ज्ञान आमच्या नजरेला आले नाही. ज्याप्रमाणे बी
कोंड्यासकट उत्पन्न होते ॥3-262॥
तैसें ज्ञान तरी शुद्ध । परी इहीं असे प्ररुद्ध ।
म्हणौनि तें अगाध । होऊनि ठेले ॥3-263॥
तसे ज्ञान स्वभावत: निर्लेप आहे. परंतु ते या कामक्रोधांकडून पूर्ण आच्छादलेले असते. म्हणून
ते मिळण्यास कठिण झाले आहे. ॥3-263॥
आधीं यांतें जिणावें । मग तें ज्ञान पावावें ।
तंव पराभवो न संभवे । रागद्वेषां ॥3-264॥
अगोदर यांना जिंकावे आणि मग ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. परंतु या कामक्रोधांचा तर पराभव
होऊ शकत नाही. ॥3-264॥
यांतें साधावयालागीं । जें बळ आणिजे आंगीं ।
तें इंधनें जैसीं आगी । सावावो होय ॥3-265॥
उलट यांचा नाश करण्याकरता जेवढे सामर्थ्य अंगात आणावे तेवढे अग्नीला ज्याप्रमाणे सर्पण
त्याप्रमाणे यांनाच उलट सहाय्य करणारे होते. ॥3-265॥
तैसे उपाय कीजती जे जे । ते ते यांसीचि होती विरजे ।
म्हणौनि हटियांतें जिणिजे । इहींचि
जगीं ॥3-266॥
अशारीतीने ज्या ज्या युक्त्या योजाव्यात त्या सर्व या कामक्रोधांनाच सहाय्य करतात. म्हणून
या जगात हेच हटयोग्यांना जिंकतात. ॥3-266॥
ऐसियांही सांकडां बोला । एक उपायो आहे भला ।
तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज
॥3-267॥
असे हे काम व क्रोध जिंकण्याला कठिण म्हटले तरी त्यांना जिंकण्याचा एक चांगला उपाय आहे. जर
तो तुझ्याकडून होईल तर पहा, तुला सांगतो. ॥3-267॥
यांचा पहिला कुरुठा इंद्रियें । एथूनि प्रवृत्ति कर्मातें विये ।
आधीं निर्दळुनि घाली
तियें । सर्वथैव ॥3-268॥
तर यांचे पहिले आश्रयस्थान इंद्रिये आहेत आणि तेथूनच कर्माची प्रवृत्ती होते. तेव्हा अगोदर
त्या इंद्रियांचेच पूर्णापणे दमन कर. ॥3-268॥
मग मनाची धांव पारुषेल । आणि बुद्धीची सोडवण होईल ।
इतुकेन थारा मोडेल । या पापियांचा
॥3-269॥
मग मनाचे धावणे थांबेल आणि बुद्धी मोकळी होईल. एवढे झाले म्हणजे या दुष्टांचा आश्रय नाहीसा
होईल. ॥3-269॥
हे अंतरींहूनि जरी फिटले । तरी निभ्रांत जाण निवटले ।
जैसें रश्मिवीण उरलें । मृगजळ
नाहीं ॥3-270॥
हे कामक्रोध अंत:करणातून पार गेले की ते नि:संशय नाहीसे झाले असे समज. ज्याप्रमाणे
सूर्यकिरणांशिवाय मृगजळ रहात नाही ॥3-270॥
तैसे रागद्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मींचें स्वराज्य आलें ।
मग तो भोगी सुख आपुलें ।
आपणचि ॥3-271॥
तसे कामक्रोध जर नि:शेष गेले तर ब्रह्मप्राप्तीरूप स्वराज्य मिळाले असे समज. मग तो पुरुष
आपणच आपले सुख उपभोगतो. ॥3-271॥
ते गुरुशिष्याचि गोठी । पदपिंडाची गांठी ।
तेथ स्थिर राहोनि नुठी । कवणे काळीं ॥3-272॥
गुरुशिष्यांच्या संवादात येणार्या विचाराने प्राप्त झालेली जीवपरमात्म्याची जी एकता तिच्या
ठिकाणी स्थिर होऊन तू कधी हलू नकोस. ॥3-272॥
ऐसें सकळ सिद्धांचा रावो । देवी लक्ष्मीयेचा नाहो ।
राया ऐकें देवदेवो । बोलता जाहला
॥3-273॥
सर्व सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा पती व देवांचा देव जो श्रीकृष्ण तो असे म्हणाला, ‘हे
राजा धृतराष्ट्रा ऐक; (असे संजय म्हणाला. ॥3-273॥
आतां पुनरपि तो अनंतु । आद्य एकी मातु ।
सांगैल तेथ पंडुसुतु । प्रश्नु करील ॥3-274॥
आता पुन्हा तो श्रीकृष्ण आणखी एक प्राचीन कथा सांगेल त्यावेळी अर्जुन प्रश्न करील, ॥3-274॥
तया बोलाचा हन पाडु । कीं रसवृत्तीचा निवाडु ।
येणें श्रोतयां होईल सुरवाडु ।
श्रवणसुखाचा ॥3-275॥
त्या प्रतिपादनाची योग्यता अथवा त्या प्रतिपादनात स्पष्ट अनुभवास येणारे शांतादी रस या
योगाने श्रोत्यांना ऐकण्याच्या सुखाची रेलचेल होईल. ॥3-275॥
ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा । चांग उठावा करूनि उन्मेषाचा ।
मग संवादु श्रीहरिपार्थाचा ।
भोगावा बापा ॥3-276॥
निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, बुद्धीला चांगले जागे करून मग बाबांनो, या
कृष्णार्जुनांचा संवाद ऐका. ॥3-276॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
कर्मयोगोनाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां तृतीयोऽध्यायः ॥