॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥
। अथ द्वितीयोऽध्यायः – अध्याय दुसरा
॥साङ्ख्ययोग॥
मग संजयो म्हणे रायातें ।आईके तो पार्थु तेथें ।
शोकाकुल रुदनातें । करितु असे ॥ १ ॥
मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला – ऐक. तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळी रडू लागला. ॥२-१॥
तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत ।
तेणें द्रवलें असे चित्त । कवणेपरी ॥ २ ॥
तो सर्व आप्त समुदाय पाहून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्यायोगाने त्याचे चित्त द्रवले. कसे म्हणाल तर ॥२-२॥
जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले ।
तैसें सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥
३ ॥
ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरघळते किंवा वार्याने मेघ हलतात, त्याप्रमाणे त्याचे खंबीर हृदय खरे, परंतु त्यावेळी द्रवले. ॥२-३॥
म्हणौनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला ।
जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥ ४ ॥
म्हणून मोहाधीन झालेला तो आर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला. ॥२-४॥
तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अति जर्जरु ।
देखोनि श्रीशारङ्गधरु । काय बोले ॥ ५ ॥
पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे महामोहाने जर्जर झालेला पाहून श्रीकृष्ण काय बोलला ते ऐका. ॥२-५॥
म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं ।
तूं कवण हें कायी । करीत आहासी ॥ ६ ॥
तो म्हणाला, अर्जुना, ह्या ठिकाणी हे करणे योग्य आहे काय ? तू कोण आहेस आणि हे काय करत आहेस याचा अगोदर विचार कर. ॥२-६॥
तुज सांगे काय जाहलें । कवण उणें आलें ।
करितां काय ठेलें । खेदु कायिसा ॥ ७ ॥
सांग तुला झाले तरी काय ? काय कमी पडले ? काय करावयाचे चुकले ? हा खेद कशाकरता ॥२-७॥
तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कहीं न संडिसी ।
तुझेनि नामें अपयशी । दिशा लंघिजे ॥ ८ ॥
तू अयोग्य गोष्टीकडे लक्ष देत नाहीस व कधीही धीर सोडत नाहीस. तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडीस पळून जावे ॥२-८॥
तूं शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो ।
तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ॥ ९ ॥
तू शूरवृत्तीचे ठिकाण आहेस, क्षत्रियांचा राजा आहेस. तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे. ॥२-९॥
तुवां संग्रामीं हरु जिंकिला । निवातकवचांचा ठावो फेडिला ।
पवाडा तुवां केला । गंधर्वांसीं ॥
१० ॥
तू युद्धात शंकराला जिंकलेस, निवातकवचांचा मागमूस नाहीसा केलास. तू गंधर्वांवरही पराक्रम गाजवलास. ॥२-१०॥