॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥
॥ अथ सप्तदशोऽध्यायः ॥अध्याय सतरवा॥
॥ श्रद्धात्रयविभाग ॥
विश्वविकासित मुद्रा । जया सोडी तुझी योगमुद्रा ।
तया नमोजी गणेंद्रा । श्रीगुरुराया ॥17-1॥
ज्या तुझी योगमाया विश्वरूपी प्रफुल्लित आकाराला प्रगट करते व जो जीवरूपी गणांचा तू स्वामी गणपति) त्या सद्गुरो तुला नमस्कार असो. ॥17-1॥
त्रिगुणत्रिपुरीं वेढिला । जीवत्वदुर्गीं आडिला ।
तो आत्मशंभूनें सोडविला । तुझिया स्मृती ॥17-2॥
(पूर्वी त्रिपुरासुराचा वध करून देवांस मुक्त करण्याचे वेळी शंकरास गणपतीची स्तुती करावी लागली. तो प्रसंग मनात आणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) सत्व रज तमरूपी तीन शहरांनी वेढलेला व जीवभावरूपी किल्ल्यात अडकलेला जो आपला आत्मा तो शिवाने गुरुरूपी तू जो गणेश त्या तुझे स्मरण करून सोडवला. ॥17-2॥
म्हणौनि शिवेंसीं कांटाळा । गुरुत्वें तूंचि आगळा ।
तर्ही हळु मायाजळा- । माजीं तारूनि ॥17-3॥
म्हणून शिवाबरोबर तुझी तुलना केली असता श्रेष्ठत्वाने तूच अधिक आहेस. तरी पण (मुमुक्षु जीवांना) मायारूपी जळातून तारतोस म्हणून तू (भोपळ्यासारखा) हलका आहेस. ॥17-3॥
जे तुझ्याविखीं मूढ । तयांलागीं तूं वक्रतुंड ।
ज्ञानियांसी तरी अखंड । उजूचि आहासी ॥17-4॥
जे तुझ्यावीषयी अज्ञानी आहेत त्यांचेपासून तू आपले मुख एकीकडे फिरवले आहेस आणि ज्ञानवानांना तर तू नेहेमी सन्मुखच आहेस. ॥17-4॥
दैविकी दिठी पाहतां सानी । तर्ही मीलनोन्मीलनीं ।
उत्पत्ति प्रळयो दोन्ही । लीलाचि करिसी ॥17-5॥
आपली दृष्टी (डोळे) पाहिली तर बारीक आहे तरी त्या दृष्टीच्या झाकण्यात व उघडण्यात (ज्ञानाच्या संकोच व व्कासात) (जगाचे) उत्पत्ति व प्रलय हे दोन्ही आपण सहज करता. ॥17-5॥
प्रवृत्तिकर्णाच्या चाळीं । उठली मदगंधानिळीं ।
पूजीजसी नीलोत्पलीं । जीवभृंगांच्या ॥17-6॥
प्रवृत्तिरूपी कानाच्या हालण्याने जो गंडस्थळातून वाहणार्या मदाच्या सुवासाने युक्त असलेला वारा सुटला त्याला भुलून जीवरूपी भ्रमर तुझ्या मस्तकावर जमा झाले. त्या जीवभ्रमररूपी निळ्या कमळांनी तू पूजिला गेला आहेस. ॥17-6॥
पाठीं निवृत्तिकर्णताळें । आहाळली ते पूजा विधुळे ।
तेव्हां मिरविसी मोकळें । आंगाचें लेणें ॥17-7॥
नंतर निवृत्तिरूपी कानाच्या हलण्याने ती बांधलेली पूजा उधळून जाते तेव्हा आपल्या मोकळ्या शरीराचा अलंकार तू मिरवतोस. ॥17-7॥
वामांगीचा लास्यविलासु । जो हा जगद्रूप आभासु ।
तो तांडवमिसें कळासु । दाविसी तूं ॥17-8॥
माया हीच कोणी तुझी स्त्री तिची नृत्यक्रीडा हाच जगद्रूपी आभास त्यातील कौशल्य (मायेचे आपल्या नृत्यक्रीडेत जगदाभास दाखवणे हे) तू आपल्या द्वारे दाखवतोस. (तुझ्या आश्रयाने असणारी जी माया तिची जगदाभासरूपी नृत्यक्रीडा तू आपल्या अस्तित्वावर दाखवतोस). ॥17-8॥
हें असो विस्मो दातारा । तूं होसी जयाचा सोयरा ।
सोइरिकेचिया व्यवहारा । मुकेचि तो ॥17-9॥
हे श्रीगुरो हे राहू द्या. आश्चर्य हे आहे की तू ज्याचा सोयरा होतोस तो सोयरेपणाच्या व्यवहाराला मुकतोच. (म्हणजे तू ज्याच्यावर प्रेम करतोस त्याला सर्वत्र आत्मप्रतीती होत असल्यामुळे त्याची आपपरभावना नाहीशी होते) ॥17-9॥
फेडितां बंधनाचा ठावो । तूं जगद्बंधु ऐसा भावो ।
धरूं वोळगे उवावो । तुझाचि आंगीं ॥17-10॥
तू (अहंकारादि संसार) बंधनाचा ठावठिकाणा नाहीसा करणारा आहेस म्हणून जगद्बंधु या नावाचा अभिप्राय तुझ्याच ठिकाणी प्रशस्तपणे लागतो. (जगद्बंधु हे नाव तुला यथार्थपणे शोभते). ॥17-10॥