Home

||ॐ नमो ज्ञानेश्वरा||

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अर्थात् श्रीमद् भगवद्‌गीतेवरील मराठी टीका ॥
॥ अथ षोडशोऽध्यायः ॥अध्याय सोळावा॥
॥ दैवासुरसंपद्विभागयोग ॥

मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडांशु ।
अद्वयाब्जिनीविकाशु । वंदूं आतां ॥16-1॥

जगत्संबंधीच्या ज्ञानाला नाहीसा करणारा व अद्वैतस्थितिरूपी कमलाचा विकास करणारा हा (श्रीगुरुनिवृत्तिरूपी) आश्चर्यकारक सूर्य उगवला आहे. (हा सूर्य आश्चर्यकारक आहे कारण लौकिक सूर्य उगवला की जगताचे प्रकाशन करतो व द्वैत वाढवतो आणि हा श्रीगुरुरूपी सूर्य जगदाभास नाहीसा करतो व अद्वैतस्थितीचा विकास करतो) त्याला आता आम्ही नमस्कार करतो. ॥16-1॥

जो अविद्याराती रुसोनियां । गिळी ज्ञानाज्ञानचांदणिया ।
जो सुदिनु करी ज्ञानियां । स्वबोधाचा ॥16-2॥

जो गुरुरूपी सूर्य मायेच्या रात्रीचा नाश करून ज्ञान व अज्ञानरूपी चांदण्या नाहीशा करतो व जो ज्ञानीलोकांना अध्यात्मज्ञानाच्या चांगल्या निरभ्र दिवसाची जोड करून देतो. ॥16-2॥

जेणें विवळतिये सवळे । लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे ।
सांडिती देहाहंतेचीं अविसाळें । जीवपक्षी ॥16-3॥

ज्याने उदयाने प्रकाशित होणार्‍या प्रात:काळी आत्मज्ञानदृष्टि प्राप्त होऊन जीवरूपी पक्षी मी देह आहे अशा समजुतीची घरटी टाकतात. ॥16-3॥

लिंगदेहकमळाचा । पोटीं वेंचु तया चिद्‍भ्रमराचा ।
बंदिमोक्षु जयाचा । उदैला होय ॥16-4॥

ज्या श्रीगुरुरूपी सूर्याचा उदय झाला असता लिंगदेहरूपी कमळाच्या पोटात (अडकल्यामुळे) नाश पावणार्‍या जीवचैतन्यरूपी भ्रमराची त्या लिंगदेहरूपी कमळाच्या बंधनापासून सुटका होते. ॥16-4॥

शब्दाचिया आसकडीं । भेद नदीच्या दोहीं थडीं ।
आरडाते विरहवेडीं । बुद्धिबोधु ॥16-5॥

भेदरूपी नदीच्या दोन्ही काठावर बुद्धीला मोह पाडणार्‍या शास्त्रादिकांचा असंगतपणा हीच कोणी अडचणीची जागा त्या जागेत एकमेकांच्या वियोगाने वेडी होऊन बुद्धी व बोध (हेच कोणी चक्रवाक पक्षी) ओरडणारे ॥16-5॥

तया चक्रवाकांचें मिथुन । सामरस्याचें समाधान ।
भोगवी जो चिद्‍गगन । भुवनदिवा ॥16-6॥

अशा त्या बुद्धि व बोधरूपी चक्रवाकांच्या जोडप्याला जो चिदाकाशरूपी भुवनातील श्रीगुरुरूपी सूर्य ऐक्याचा आनंद भोगवितो ॥16-6॥

जेणें पाहालिये पाहांटे । भेदाची चोरवेळ फिटे ।
रिघती आत्मानुभववाटे । पांथिक योगी ॥16-7॥

ज्या गुरुरूपी सूर्याने प्रकाशलेल्या पहाटेच्या वेळी भेदाची चोरवेळ नाहीशी होते व प्रवास करणारे (आत्मप्राप्तीचा मुक्काम गाठण्याकरता ध्यानादिक अभ्यास करणारे) साधक आत्मानुभावाच्या वाटेने निघतात. ॥16-7॥

जयाचेनि विवेककिरणसंगें । उन्मेखसूर्यकांतु फुणगे ।
दीपले जाळिती दांगें । संसाराचीं ॥16-8॥

ज्याच्या विवेकरूपी किरणांच्या संबंधाने बुद्धिरूपी सूर्यकांतमण्यातून निघालेल्या ज्ञानरूपी ठिणग्या पेटल्या असता त्या संसाराची जंगले जाळून टाकतात. ॥16-8॥

जयाचा रश्मिपुंजु निबरु । होता स्वरूप उखरीं स्थिरु ।
ये महासिद्धीचा पूरु । मृगजळ तें ॥16-9॥

ब्रह्मस्वरूपी माळजमिनीवर ज्याच्या प्रखर किरणांचा समुदाय स्थिर झाला असता त्या ठिकाणी अष्टमहासिद्धिरूप मृगजळाचा पूर येतो ॥16-9॥

जो प्रत्यग्बोधाचिया माथया । सोऽहंतेचा मध्यान्हीं आलिया ।
लपे आत्मभ्रांतिछाया । आपणपां तळीं ॥16-10॥

ते ब्रह्म मी आहे अशा या मध्यानकाळी शिष्याचा अंतर्मुखवृत्तीरूपी माथ्यावर श्रीगुरुसूर्य आला असता शिष्याची आत्मस्वरूपाविषयी भ्रांति हीच कोणी छाया ती शिष्याच्या आत्मानुभवरूपी पायाखाली दडते. (नाहीशी होते). ॥16-10॥

ते वेळीं विश्वस्वप्नासहितें । कोण अन्यथामती निद्रेतें ।
सांभाळी नुरेचि जेथें । मायाराती ॥16-11॥

त्यावेळी जर मायारूपी रात्रच उरत नाही तर (त्या रात्रीतील) विश्वाभासरूपी स्वप्नासहित विपरीतज्ञानरूप निद्रेचा कोण सांभाळ करणार आहे ? (म्हणजे कोण याची आठवण ठेवणार आहे ?) ॥16-11॥

म्हणौनि अद्वयबोधपाटणीं । तेथ महानंदाची दाटणी ।
मग सुखानुभूतीचीं घेणीं देणीं । मंदावो लागती ॥16-12॥

म्हणून त्या अद्वैतज्ञानरूप नगरात ब्रह्मानंदाची रेलचेल होते आणि मग त्या आनंदानुभावाची देवघेव कमी पडावयास लागते. ॥16-12॥

किंबहुना ऐसैसें । मुक्तकैवल्य सुदिवसें ।
सदा लाहिजे कां प्रकाशें । जयाचेनि ॥16-13॥

फार काय सांगावे ? ज्याच्या (श्रूगुरुसूर्याच्या) प्रकाशाने अशा अशा प्रकारे मोकळे कैवल्य (केवलस्वरूपभाव) रूपी उत्तम दिवस सदा प्राप्त होतो. ॥16-13॥

जो निजधामव्योमींचा रावो । उदैलाचि उदैजतखेंवो ।
फेडी पूर्वादि दिशांसि ठावो । उदोअस्तूचा ॥16-14॥

जो श्रीगुरुसूर्य आत्मस्वरूपी आकशाचा राजा आहे तो आपल्या स्वरूपाने नेहेमी उगवलेलाच आहे. परंतु तो उगवत्या स्वरूपाने नेहेमी उगवलेलाच आहे. तो पूर्वादि दिशांसह उदय व अस्ताचा ठावठिकाणा नाहीसा करतो. न दिसणे ॥16-14॥

न दिसणें दिसणेंनसीं मावळवी । दोहीं झांकिलें ते सैंघ पालवी ।
काय बहु बोलों ते आघवी । उखाचि आनी ॥16-15॥

(अज्ञान) दिसण्यासह (ज्ञानासह) नाहीसे करतो व या दोन्हींनी (ज्ञान व अज्ञान यांनी) ते झाकलेले स्वरूप आहे ते (ज्ञानाज्ञानातीत स्वरूप) चहूकडून प्रगट करतो. फार काय सांगू ? तो सर्व प्रात:कालच वेगळा आहे. ॥16-15॥

तो अहोरात्रांचा पैलकडु । कोणें देखावा ज्ञानमार्तंडु ।
जो प्रकाश्येंवीण सुरवाडु । प्रकाशाचा ॥16-16॥

जो रात्र व दिवस या सापेक्ष भावापलीकडला केवळ प्रकशरूप ज्ञानसूर्य आहे व जो प्रकाशाशिवाय (प्रकाशित होणार्‍या पदार्थाशिवाय) प्रकाशाचा सुकाळ आहे तो ज्ञनरूपी सूर्य कोणी पहावा ? (जाणावा ?) ॥16-16॥

तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती । आतां नमों म्हणों पुढतपुढती ।
जे बाधका येइजतसे स्तुती । बोलाचिया ॥16-17॥

श्रीगुरूंची शब्दांनी केलेली स्तुती ही बाधकतेला येत असल्यामुळे त्या श्रीनिवृत्तिरूप ज्ञानसूर्याला आता वारंवार नमस्कार असो असे मी (ज्ञानदेव) म्हणतो. ॥16-17॥

देवाचें महिमान पाहोनियां । स्तुति तरी येइजे चांगावया ।
जरी स्तव्यबुद्धीसीं लया । जाईजे कां ॥16-18॥

गुरूचा महिमा पाहिला असता जर स्तव्यबुद्धिसह स्तवन करणारा लयाला जाईल तरच स्तुती चांगलेपणाला येईल. (अभिप्राय हा की जेव्हा स्तव्य स्तविता व स्तवन ही त्रिपुटी श्रीगुरुच्या स्वरूपात लयाला जाईल तेव्हाच श्रीगुरूच्या माहात्म्याला शोभेल अशी स्तुती होईल). ॥16-18॥

जो सर्वनेणिवां जाणिजे । मौनाचिया मिठीया वानिजे ।
कांहींच न होनि आणिजे । आपणपयां जो ॥16-19॥

काही न जाणल्याने जे श्रीगुरु जाणले जातात व मौनाला नाहीसे करून (म्हणजे मौन ही कल्पना टाकून) ज्यांचे वर्णन केले जाते व आपण काही न होऊन जे श्रीगुरु आपल्या ठिकाणी आणता येतात (म्हणजे जीव शिव अथवा ब्रह्म वहैरे काहीच अहंकार आपण न घ्यावा तेव्हाच जे श्रीगुरु आपल्या ठिकाणी वास्तव्यास येतात). ॥16-19॥

तया तुझिया उद्देशासाठीं । पश्यंती मध्यमा पोटीं ।
सूनि परेसींही पाठीं । वैखरी विरे ॥16-20॥

ज्या तुझी स्तुती करण्याच्या हेतूने मध्यमा व पश्यन्ती या वाचा पोटात घालून नंतर परेसह वैखरी विरते (नाहीशी होते). ॥16-20॥

तया तूतें मी सेवकपणें । लेववीं बोलकेया स्तोत्राचें लेणें ।
हें उपसाहावेंही म्हणतां उणें । अद्वयानंदा ॥16-21॥

असा जो तू त्या तुला मी सेवकपणाच्या नात्याने शब्दांनी स्तुति करण्याचा अलंकार घालतो तर हे माझे करणे सहन करावे हेही माझे आपणास म्हणणे अहो अद्वितीय आनंदा श्रीगुरो आपणास कमीपणा आणणारे आहे. ॥16-21॥

परी रंकें अमृताचा सागरु । देखिलिया पडे उचिताचा विसरु ।
मग करूं धांवे पाहुणेरु । शाकांचा तया ॥16-22॥

परंतु दरिद्री पुरुषाला अमृताच्या सागराचे दर्शन झाल्यावर त्याचे (त्यास अति हर्ष होतो व त्या हर्षाचे भरात त्या अमृतसागराचे) योग्य आदरातिथ्य कसे करावे याचा त्यास विसर पडतो आणि मग तो त्या अमृतसागराला भाजीपाल्याची मेजवानी करण्यास धावतो. ॥16-22॥

तेथ शाकुही कीर बहुत म्हणावा । तयाचा हर्षवेगुचि तो घ्यावा ।
उजळोनि दिव्यतेजा हातिवा । ते भक्तीचि पाहावी ॥16-23॥

अशा स्थितीत त्याचा भाजीपाला देखील (खरोखर पक्वान्नाप्रमाणे) फार किंमतीचा समजावा व केवळ त्याच्या भाजीपाल्याकडे न पहाता अमृतसागराच्या दर्शनाने त्यास होणार्‍या आनंदाकडेच लक्ष द्यावे. सूर्याला काडवातीने ओवाळण्यात काडवातीकडे लक्ष न देता (सूर्याने) त्या ओवाळणार्‍याची भक्तीच पहावी. ॥16-23॥

बाळा उचित जाणणें होये । तरी बाळपणचि कें आहे ? ।
परी साचचि येरी माये । म्हणौनि तोषे ॥16-24॥

बालकाला जर योग्य काय ते कळेल तर मग बाळपणच कोठे आहे ? (त्याच्या अज्ञानपणाने कोणासही संतोष वाटणार नाही). परंतु जी बाई त्याची आई असते तिला खरोखरच संतोष होतो. ॥16-24॥

हां गा गांवरसें भरलें । पाणी पाठीं पाय देत आलें ।
तें गंगा काय म्हणितलें । परतें सर ? ॥16-25॥

अहो गावातील घाणीने भरलेले ओढ्याचे पाणी गंगेला तुडवीत येऊन मिळाले तर त्याला ‘गंगा बाजूस सर’ असे म्हणते काय ? ॥16-25॥

जी भृगूचा कैसा अपकारु । कीं तो मानूनि प्रियोपचारु ।
तोषेचिना शारङ्गधरु । गुरुत्वासीं ? ॥16-26॥

महाराज भृगूचा अन्याय कसा चीड आणण्यासारखा होता ? पण भृगूने मारलेली ती लाथ हा प्रेमाचा उपचार आहे समजून भगवान् तो लत्ताप्रहार म्हणजे गुरूचा अनुग्रहच आहे असे मानून संतोष पावले नाहीत काय ? ॥16-26॥

कीं आंधारें खतेलें अंबर । झालेया दिवसनाथासमोर ।
तेणें तयातें पर्‍हा सर । म्हणितलें काई ? ॥16-27॥

अंधाराने भरलेले आकाश सूर्यासमोर आले असता सूर्याने त्यास ‘पलीकडे सर’ असे म्हटले आहे काय ? ॥16-27॥

तेवीं भेदबुद्धीचिये तुळे । घालूनि सूर्यश्लेषाचें कांटाळे ।
तुकिलासि तें येकी वेळे । उपसाहिजो जी ॥16-28॥

त्याप्रमाणे भेदबुद्धीच्या ताजव्यात एका पारड्यात तुम्हास (श्रीगुरूस) घालून तुमचे वजन केले महाराज ते एकवेळ आपण सहन करावे. ॥16-28॥

जिहीं ध्यानाचा डोळां पाहिलासी । वेदादि वाचां वानिलासी ।
जें उपसाहिलें तयासी । तें आम्हांही करीं ॥16-29॥

ज्यांनी तुला ध्यानाच्या डोळ्यांनी पाहिले व ज्या वेदादिकांच्या वाचेकडून तू वर्णन केला गेला आहेस त्यांना जे सहन केले ते आम्हालाही करा. (त्यांचे अपराध सहन केले तसे आमचेही करा). ॥16-29॥

परी मी आजि तुझ्या गुणीं । लांचावलों अपराधु न गणीं ।
भलतें करीं परी अर्धधणीं । नुठी कदा ॥16-30॥

परंतु मी आज तुझ्या गुणांचे वर्णन करण्याला चटावलो आहे म्हणून (वास्तविक तुझे वर्णन करणे हा जरी अपराध आहे तरी) मी तो अपराध मोजणार नाही (त्याबद्दल) तुम्ही वाटेल ते करा. (तुम्ही अपराध सहन करा अथवा करू नका) पण मी अर्धपोटी कधीही उठणार नाही. (माझी तृप्ती होईपर्यंत मी तुमचे वर्णन करीन). ॥16-30॥

मियां गीता येणें नांवें । तुझें पसायामृत सुहावें ।
वानूं लाधलों तें दुणेन थावें । दैवलों दैवें ॥16-31॥

मी गीता या नावाने तुझे प्रसादामृत सेवावे म्हणून मी ते वर्णन करू लागलो ते माझे दैव दुप्पट जोराने उत्कर्षाला पावले ॥16-31॥

माझिया सत्यवादाचें तप । वाचा केलें बहुत कल्प ।
तया फळाचें हें महाद्वीप । पातली प्रभु ॥16-32॥

महाराज माझ्या वाचेने सत्य बोलण्याचे तप पुष्कळ कल्पपर्यंत केले त्या तपाचे जे फळ त्या फळाचे हे गीताव्याख्यानरूपी मोठे बेट तिला (माझ्या वाचेला) प्राप्त झाले. ॥16-32॥

पुण्यें पोशिलीं असाधरणें । तियें तुझें गुण वानणें ।
देऊनि मज उत्तीर्णें । जालीं आजी ॥16-33॥

मी लोकोत्तर पुण्यकर्माचे आचरण केले त्या पुण्यकर्मांनी तुझे गुणवर्णन करणे मला देऊन ती पुण्यकर्मे आज ऋणमुक्त झाली. ॥16-33॥

जी जीवित्वाच्या आडवीं । आतुडलों होतों मरणगांवीं ।
ते अवदसाची आघवी । फेडिली आजी ॥16-34॥

महाराज जीवदशेच्या रानातील मरणरूपी गावात सापडलो होतो (तेथे माझी फार दुर्दशा उडाली होती) ती सर्व दुर्दशा आज तुम्ही नाहीशी केलीत. ॥16-34॥

जे गीता येणें नांवें नावाणिगी । जे अविद्या जिणोनि दाटुगी ।
ते कीर्ती तुझी आम्हांजोगी । वानावया जाली ॥16-35॥

कारण की जी तुझी कीर्ती गीता या नावाने नावाजलेली आहे आणि जी (गीता) अविद्या जिंकून बलिष्ट झालेली आहे ती गीतारूपी तुझी कीर्ती आम्हाला वर्णन करण्यायोग्य झाली आहे. ॥16-35॥

पैं निर्धना घरीं वानिवसें । महालक्ष्मी येऊनि बैसे ।
तयातें निर्धन ऐसें । म्हणों ये काई ? ॥16-36॥

दरिद्री पुरुषाचे घरी सहज कौतुकाने महालक्ष्मीच जर येऊन बसेल तर त्याला दरिद्री म्हणता येईल काय ? ॥16-36॥

कां अंधकाराचिया ठाया । दैवें सुर्यु आलिया ।
तो अंधारुचि जगा यया । प्रकाशु नोहे ? ॥16-37॥

अथवा अंधाराच्या जागी दैववशात सूर्य आला तर तो अंधारच या जगाला प्रकाश (होणार) नाही काय ? ॥16-37॥

जया देवाची पाहतां थोरी । विश्व परमाणुही दशा न धरी ।
तो भावाचिये सरोभरी । नव्हेचि काई ? ॥16-38॥

ज्या दैवाचे थोरपण पाहिले असता (एवढे मोठे विश्व (पण ते) परमाणूच्याही योग्यतेला येत नाही तो भक्तांच्या भावासारखा होत नाही काय ? ॥16-38॥

तैसा मी गीता वाखाणी । हे खपुष्पाची तुरंबणी ।
परी समर्थें तुवां शिरयाणी । फेडिली ते ॥16-39॥

त्याप्रमाणे मी गीतेचे व्याख्यान करणे हे आकाशपुष्पाचा वास घेण्यासारखे असंभवनीय आहे. परंतु तुम्ही ती आवड पुरवली. ॥16-39॥

म्हणौनि तुझेनि प्रसादें । मी गीतापद्यें अगाधें ।
निरूपीन जी विशदें । ज्ञानदेवो म्हणे ॥16-40॥

म्हणून महाराज तुमच्या प्रसादाने मी गीतेचे गंभीर अर्थाने भरलेले श्लोक स्पष्ट रीतीने व्याख्यान करून सांगेन असे ज्ञानदेव म्हणतात. ॥16-40॥

तरी अध्यायीं पंधरावा । श्रीकृष्णें तया पांडवा ।
शास्त्रसिद्धांतु आघवा । उगाणिला ॥16-41॥

तर पंधराव्या अध्यायात श्रीकृष्णांनी त्या अर्जुनाला शास्त्रांचा संपूर्ण सिद्धांत सांगितला ॥16-41॥

जे वृक्षरूपक परीभाषा । केलें उपाधि रूप अशेषा ।
सद्वैद्यें जैसें दोषा । अंगलीना ॥16-42॥

कारण की (देवांनी) वृक्षरूपकाच्या परिभाषेने संपूर्ण (कारण) उपाधीचे स्वरूप सांगितले. (ते कसे तर) अंगात गुप्त असलेल्या सर्व दोषांना जसा चांगला वैद्य स्पष्टरूपाने सांगतो तसे. ॥16-42॥

आणि कूटस्थु जो अक्षरु । दाविला पुरुषप्रकारु ।
तेणें उपहिताही आकारु । चैतन्या केला ॥16-43॥

आणि कूटस्थ (मायारूप उपाधीचा आश्रय करून रहाणारा) अक्षर म्हणून जो पुरुषाचा प्रकार दाखवला त्या योगाने उपहित चैतन्य देखील (क्षर अक्षर दोन्ही) स्पष्ट दाखवले. ॥16-43॥

पाठीं उत्तम पुरुष । शब्दाचें करूनि मिष ।
दाविलें चोख । आत्मतत्त्व ॥16-44॥

नंतर उत्तम पुरुष या शब्दाचे निमित्त करून शुद्ध आत्मतत्व दाखवले. ॥16-44॥

आत्मविषयीं आंतुवट । साधन जें आंगदट ।
ज्ञान हेंही स्पष्ट । चावळला ॥16-45॥

आत्म्याविषयी (आत्मप्राप्तीविषयी) अंतरंग बळकट साधन जे ज्ञान तेही स्पष्ट सांगितले. ॥16-45॥

म्हणौनि इये अध्यायीं । निरूप्य नुरेचि कांहीं ।
आतां गुरुशिष्यां दोहीं । स्नेहो लाहणा ॥16-46॥

म्हणून या अध्यायात सांगण्यास योग्य असे काही राहिले नाही. आता गुरु व शिष्य या दोघांना प्रेमाचीच जोड होणार. ॥16-46॥

एवं इयेविषयीं कीर । जाणते बुझावले अपार ।
परी मुमुक्षु इतर । साकांक्ष जाले ॥16-47॥

याप्रमाणे या विषयाविषयी असंख्य ज्ञाते लोकांची पुरी समजूत पटली. परंतु त्याच्याहून इतर जे मोक्षाची इच्छा करणारे होते त्यांची ह्याविषयीची इच्छा जास्तच वाढली. ॥16-47॥

त्या मज पुरुषोत्तमा । ज्ञानें भेटे जो सुवर्मा ।
तो सर्वज्ञु तोचि सीमा । भक्तीचीही ॥16-48॥

हे मर्मज्ञ अर्जुना त्या मला पुरुषोत्तमाला जो भेटतो (ऐक्याला पावतो) तोच सर्वज्ञ आहे व भक्तीची सीमाही तोच आहे. ॥16-48॥

ऐसें हें त्रैलोक्यनायकें । बोलिलें अध्यायांत श्लोकें ।
तेथें ज्ञानचि बहुतेकें । वानिलें तोषें ॥16-49॥

पंधराव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात त्रैलोक्याचे स्वामी भगवान श्रीकृष्ण परमात्मा असे बोलले. त्या प्रसंगी त्यांनी आनंदाने पुष्कळसे ज्ञानाचेच वर्णन केले. ॥16-49॥

भरूनि प्रपंचाचा घोंटु । कीजे देखतांचि देखतया द्रष्टु ।
आनंदसाम्राज्यीं पाटु । बांधिजे जीवा ॥16-50॥

हे ज्ञान सर्व संसाराचा निरास करून पहाता पहाता पाहणार्‍या जीवालाच त्याच्या स्वत:च्या आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देते व त्या जीवास सुखाचे साम्राज्यावर पट्टाभिषेक करते. ॥16-50॥

येवढेया लाठेपणाचा उपावो । आनु नाहींचि म्हणे देवो ।
हा सम्यक्‍ज्ञानाचा रावो । उपायांमाजीं ॥16-51॥

(प्रपंचाचा बाध करून जीवाला ब्रह्मसाक्षात्कार करून देणारा ज्ञानाशिवाय) एवढ्या सामर्थ्याचा दुसरा उपाय नाहीच. या यथार्थ-ज्ञानाचा उपाय सर्व उपायांमधे राजा आहे असे देव म्हणाले. ॥16-51॥

ऐसे आत्मजिज्ञासु जे होते । तिहीं तोषलेनि चित्तें ।
आदरें तया ज्ञानातें । वोंवाळिलें जीवें ॥16-52॥

म्हणून असे जे आत्मजिज्ञासू होते (आत्म्याला जाणण्याची इच्छा करणारे होते) त्यांनी संतुष्ट चित्ताने व आदराने त्या ज्ञानावरून आपला जीव ओवाळून टाकला. ॥16-52॥

आतां आवडी जेथ पडे । तयाचि अवसरीं पुढें पुढें ।
रिगों लागें हें घडे । प्रेम ऐसें ॥16-53॥

आता असे आहे की ज्या वस्तूवर प्रेम जडते तीच वस्तु इतर वस्तूंना मागे सारून वेळोवेळी मनात पुढे पुढे घुसू लागते असा प्रकार होतो. प्रेमाची गोष्टच अशी आहे. ॥16-53॥

म्हणौनि जिज्ञासूंच्या पैकीं । ज्ञानी प्रतीती होय ना जंव निकी ।
तंव योग क्षेमु ज्ञानविखीं । स्फुरेलचि कीं ॥16-54॥

म्हणून एकंदर जिज्ञासूंपैकी जे मुमुक्षु होते त्यास जोपर्यंत ज्ञानाचा वास्तविक संशयविपर्ययरहित अनुभव आला नाही तोपर्यंत ते ज्ञान कसे प्राप्त होईल व प्राप्त झालेल्या ज्ञानाचे संरक्षण कशाने घडेल अशाविषयी त्यांच्या मनात वारंवार विचार घोटाळत रहाणे हे स्वाभाविकच आहे. ॥16-54॥

म्हणौनि तेंचि सम्यक् ज्ञान । कैसेनि होय स्वाधीन ।
जालिया वृद्धियत्‍न । घडेल केवीं ॥16-55॥

म्हणून तेच यथार्थज्ञान कशाने हस्तगत होईल व हस्तगत झाल्यावर त्याच्या वाढण्याचा प्रयत्न कसा घडेल ? ॥16-55॥

कां उपजोंचि जें न लाहे । जें उपजलेंही अव्हांटा सूये ।
तें ज्ञानीं विरुद्ध काय आहे । हें जाणावें कीं ॥16-56॥

अथवा जे ज्ञानास उत्पन्नच होऊ देत नाही अथवा ज्ञान उत्पन्न झाले असता जे भलत्या मार्गात घालते असे ज्ञानाच्या विरुद्ध काय आहे हे समजले पाहिजे ॥16-56॥

मग जाणतयां जें विरू । तयाचीं वाट वाहती करूं ।
ज्ञाना हित तेंचि विचारूं । सर्वभावें ॥16-57॥

मग ज्ञानाला जे विरुद्ध असेल त्याची वाट मोकळी करून देऊ (त्यास घालवून देऊ) व जे ज्ञानाला अनुकूल असेल त्याचाच सर्व भावांनी विचार करू. ॥16-57॥

ऐसा ज्ञानजिज्ञासु तुम्हीं समस्तीं । भावो जो धरिला असे चित्तीं ।
तो पुरवावया लक्ष्मीपती । बोलिजेल ॥16-58॥

अशी तुम्ही सर्व जिज्ञासूंनी जी इच्छा मनात धरली आहे ती इच्छा पूर्ण करण्याकरता देव (आता या अध्यायात) बोलतील. (असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात). ॥16-58॥

ज्ञानासि सुजन्म जोडे । आपली विश्रांतिही वरी वाढे ।
ते संपत्तीचे पवाडे । सांगिजेल दैवी ॥16-59॥

जिच्या योगाने ज्ञान चांगले उत्पन्न होईल शिवाय आपली विश्रांतीही जिच्या योगाने वाढेल अशी जी दैवी संपत्ती त्या दैवी संपत्तीचे वर्णन (देवाकडून) सांगण्यात येईल. ॥16-59॥

आणि ज्ञानाचेनि कामाकारें । जे रागद्वेषांसि दे थारे ।
तिये आसुरियेहि घोरे । करील रूप ॥16-60॥

आणि ज्ञानाचे काम काढून (ज्ञानाला नाहीसे करून) जी आसुरी संपत्ती राग व द्वेष यांना आश्रय देते त्या भयंकर आसुरी संपत्तीचेही स्वरूप देव सांगेल ॥16-60॥

सहज इष्टानिष्टकरणी । दोघीचि इया कवतुकिणी ।
हे नवमाध्यायीं उभारणी । केली होती ॥16-61॥

इष्टानिष्ट करणे हे स्वभावत:च ज्यांचे कौतुक आहे अशा या दोघी (दैवी व आसुरी) संपत्ती आहेत. यांची मांडणी नवव्या अध्यायात (श्लोक १३ मधे) केली होती. ॥16-61॥

तेथ साउमा घेयावया उवावो । तंव वोडवला आन प्रस्तावो ।
तरी तयां प्रसंगें आतां देवो । निरूपीत असे ॥16-62॥

त्या नवव्या अध्यायातच त्यांचा विस्तार प्रत्यक्ष करावयास पाहिजे होता तो तितक्यात दुसरा प्रसंग प्राप्त झाला. तर आता प्रसंगानुसार देव त्याचे (दैवी व आसुरी संपत्तीचे) व्याख्यान करत आहेत. ॥16-62॥

तया निरूपणाचेनि नांवें । अध्याय पद सोळावें ।
लावणी पाहतां जाणावें । मागिलावरी ॥16-63॥

मागील क्रमाप्रमाणे संख्या पहाता हे निरूपण म्हणजे सोळावा अध्याय समजावा. ॥16-63॥

परी हें असो आतां प्रस्तुतीं । ज्ञानाच्या हिताहितीं ।
समर्था संपत्ती । इयाचि दोन्ही ॥16-64॥

परंतु ते आता राहू दे. सांप्रत ज्ञानाचे इष्ट व अनिष्ट करण्याचे कामी सांगोतलेल्या याच दोन संपत्ती समर्थ आहेत. ॥16-64॥

जे मुमुक्षुमार्गींची बोळावी । जे मोहरात्रीची धर्मदिवी ।
ते आधीं तंव दैवी । संपत्ती ऐका ॥16-65॥

जी मुमुक्षूंना (आत्मस्वरूपाच्या) मार्गाने पोहोचवणारी व जी मोहरूप रात्रीत धर्मार्थ लावलेला दिवा आहे ती दैवी संपत्ती प्रथम ऐका. ॥16-65॥

जेथ एक एकातें पोखी । ऐसे बहुत पदार्थ येकीं ।
संपादिजती ते लोकीं । संपत्ति म्हणिजे ॥16-66॥

जेथे एकमेकाला पोसणारे असे पुष्कळ पदार्थ एके ठिकाणी मिळावले जातात त्याला (अशा पदार्थसमूहाला) लोकात संपत्ती म्हटले जाते. ॥16-66॥

ते दैवी सुखसंभवी । तेथ दैवगुणें येकोपजीवीं ।
जाली म्हणौनि दैवी । संपत्ति हे ॥16-67॥

ती दैवी संपत्ती सुखाला उत्पन्न करणारी आहे व सर्व दैवी गुणांना ही एकच निर्वाहाचे साधन आहे. म्हणून हिला दैवी संपत्ती असे म्हटले आहे. ॥16-67॥

आतां तयाचि दैवगुणां- । माजीं धुरेचा बैसणा ।
बैसे तया आकर्णा । अभय ऐसें ॥16-68॥

आता त्याच दैवी संपत्तीच्या गुणात श्रेष्ठ अशा पहिल्या आसनावर जो बसतो त्या गुणाला ‘अभय’ असे म्हणतात. ऐका. ॥16-68॥

तरी न घालूनि महापुरीं । न घेपे बुडणयाची शियारी ।
कां रोगु न गणिजे घरीं । पथ्याचिया ॥16-69॥

तर ज्याप्रमाणे महापुरात उडीच घातली नाही म्हणजे बुडण्याचे भय धरण्याचे कारण नाही अथवा पथ्याच्या घरी रोगाचा हिशेब नाही (पथ्याने वागत असता तेथे रोगाचे भय नाही) ॥16-69॥

तैसा कर्माकर्माचिया मोहरा । उठूं नेदूनि अहंकारा ।
संसाराचा दरारा । सांडणें येणें ॥16-70॥

त्याप्रमाणे विहित व निषिद्ध कर्म यांच्या संबंधाने अहंकाराला उत्पन्न होऊ न देणे व अशा रीतीने संसाराचा धाक टाकणे (याला अभय असे म्हणतात. ॥16-70॥

अथवा ऐक्यभावाचेनि पैसें । दुजे मानूनि आत्मा ऐसें ।
भयवार्ता देशें । दवडणें जें ॥16-71॥

अथवा दुसर्‍या रीतीने अद्वैतभावाच्या विकासाने आपल्याहून दुसरे हे आपला आत्मा आहे असे मानून भयाची गोष्ट हद्दपार करून जे टाकणे (त्यास अभय म्हणावे). ॥16-71॥

पाणी बुड{ऊं} ये मिठातें । तंव मीठचि पाणी आतें ।
तेवीं आपण जालेनि अद्वैतें । नाशे भय ॥16-72॥

पाणी मिठाला बुडवायला येते तो मीठच पाणी होते (मग त्यास बुडण्याचे भय कसले ?) त्याप्रमाणे आपण अद्वैतरूप झालो असता भयाचा नाश होतो ॥16-72॥

अगा अभय येणें नांवें । बोलिजे तें हें जाणावें ।
सम्यक्‍ज्ञानाचें आघवें । धांवणें हें ॥16-73॥

बाबा अर्जुना अभय नावाने ज्याचा उल्लेख केला जातो ते हे समजावे. हे अभय म्हणजे सम्यक् (यथार्थ) ज्ञानाच्या बरोबर असणारा व त्याचे सर्व प्रकारे रक्षण करणारा शिपाई आहे. ॥16-73॥

आतां सत्त्वशुद्धी जे म्हणिजे । ते ऐशा चिन्हीं जाणिजे ।
तरी जळे ना विझे । राखोंडी जैसी ॥16-74॥

आता सत्वशुद्धि म्हणून जिला म्हणतात ती ही अशा लक्षणांनी ओळखावी. तर राखुंडी जशी जळत नाही व विझत नाही ॥16-74॥

कां पाडिवा वाढी न मगे । अंवसे तुटी सांडूनि मागे ।
माजीं अतिसूक्ष्म अंगें । चंद्रु जैसा राहे ॥16-75॥

अथवा शुक्ल प्रतिपदेच्या कलेची वाढ व घेऊन किंवा अवसेस झालेला कलांचा र्‍हास मागे टाकून या दोन स्थितींच्या मध्ये चंद्र जसा अतिशय सूक्ष्म रूपाने राहतो ॥16-75॥

नातरी वार्षिया नाहीं मांडिली । ग्रीष्में नाहीं सांडिली ।
माजीं निजरूपें निवडली । गंगा जैसी ॥16-76॥

अथवा वर्षाऋतूतील पूर ओसरला आहे व ग्रीष्म ऋतूतील ओहोटीस आरंभ झाला नाही या दरम्यानचे काळात गंगेचे स्वाभविक स्वरूप जसे स्पष्ट दिसते ॥16-76॥

तैसी संकल्पविकल्पाची वोढी । सांडूनि रजतमाची कावडी ।
भोगितां निजधर्माची आवडी । बुद्धि उरे ॥16-77॥

त्याप्रमाणे संकल्प-विकल्पांची ओढ टाकून आणि रजतमाचे कावड (ओझे) टाकून आत्मचिंतनाचे प्रेम भोगणारी बुद्धी (आपल्या मूळ स्वरूपाने) राहाते. ॥16-77॥

इंद्रियवर्गीं दाखविलिया । विरुद्धा अथवा भलीया ।
विस्मयो कांहीं केलिया । नुठी चित्तीं ॥16-78॥

वाईट अथवा चांगल्या विषयांना इंद्रियसमुदायाने दाखवले असता काही केल्या चित्तात चलबिचल उत्पन्न होत नाही ॥16-78॥

गांवा गेलिया वल्लभु । पतिव्रतेचा विरहक्षोभु ।
भलतेसणी हानिलाभु । न मनीं जेवीं ॥16-79॥

पति गावाला गेला असता पतिवियोगजन्य मोठ्या दु:खात कितीही नुकसान अथवा लाभ हे झाले असता जशी पतिव्रता मनावर घेत नाही ॥16-79॥

तेवीं सत्स्वरूप रुचलेपणें । बुद्धी जें ऐसें अनन्य होणें ।
ते सत्त्वशुद्धी म्हणे । केशिहंता ॥16-80॥

त्याप्रमाणे आत्मस्वरूपाची गोडी लागल्यावर बुद्धीने जे पतिव्रतेप्रमाणे आत्मस्वरूपी अनन्य होणे त्या बुद्धीच्या अनन्य होण्याला केशी दैत्याला मारणारे जे (भगवान श्रीकृष्ण) ते सत्वशुद्धि असे म्हणतात. ॥16-80॥

आतां आत्मलाभाविखीं । ज्ञानयोगामाजीं एकीं ।
जे आपुलिया ठाकी । हांवें भरे ॥16-81॥

आता आत्मप्राप्तिविषयी ज्ञान व अष्टांग योग या दोहोंपैकी जे आपल्याला अधिकारानुरूप साधेल त्याची उत्कट इच्छा अंत:करणात बाळगणे ॥16-81॥

तेथ सगळिये चित्तवृत्ती । त्यागु करणें या रीती ।
निष्कामें पूर्णाहुती । हुताशीं जैसी ॥16-82॥

ज्ञान अथवा अष्टांग योग या दोहोंपैकी ज्याची उत्कट इच्छा उत्पन्न होईल त्या ठिकाणी सर्व चित्तवृत्तींना अशा रीतीने अर्पण करावे की जसे निष्काम पुरुषाने अग्नीमधे पूर्णाहुती द्यावी. ॥16-82॥

कां सुकुळीनें आपुली । आत्मजा सत्कुळींचि दिधली ।
हें असो लक्ष्मी स्थिरावली । मुकुंदीं जैसी ॥16-83॥

अथवा ज्याप्रमाणे कुलवान पुरुषाने आपली मुलगी चांगल्या कुळातच दिली. हा दृष्टांत राहू द्या. ज्याप्रमाने लक्ष्मी भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाली ॥16-83॥

तैसे निर्विकल्पपणें । जें योगज्ञानींच या वृत्तिक होणें ।
तो तिजा गुण म्हणे । श्रीकृष्णनाथु ॥16-84॥

त्याप्रमाणे अनन्यभावाने योगाचे ठिकाणी अथवा ज्ञानाचे ठिकाणी हे वतनदार होऊन रहाणे तो दैवी संपत्तीचा तिसरा गुण होय असे श्रीकृष्णनाथ म्हणतात. ॥16-84॥

आतां देहवाचाचित्तें । यथासंपन्नें वित्तें ।
वैरी जालियाही आर्तातें । न वंचणे जें कां ॥16-85॥

आता जो कोणी संकटाने पीडित असेल तो शत्रु देखील असेना त्याला आपल्या अनुकूलतेप्रमाणे द्रव्याने कायावाचमनाने प्रतारणा न करता जे अर्पण करणे ॥16-85॥

पत्र पुष्प छाया । फळें मूळ धनंजया ।
वाटेचा न चुके आलिया । वृक्षु जैसा ॥16-86॥

अर्जुना ज्याप्रमाणे वृक्ष वाटेने येणार्‍यास पाने फुले मुळे देण्यास चुकत नाही ॥16-86॥

तैसें मनौनि धनधान्यवरी । विद्यमानें आल्या अवसरीं ।
श्रांताचिये मनोहारीं । उपयोगा जाणें ॥16-87॥

त्याप्रमाणे मनापासून धनापर्यंत जे काही आपल्याला प्राप्त असेल त्या योगाने प्रसंगानुसार (पीडेने) श्रमलेल्यांना मनास आनंद होईल अशा प्रकारे उपयोगास येणे ॥16-87॥

तयां नांव जाण दान । जें मोक्षनिधानाचें अंजन ।
हें असो आइक चिन्ह । दमाचें तें ॥16-88॥

त्याला दान म्हणावयाचे असे समज. ते दान मोक्षरूपी ठेवा दाखवणारे अंजनच आहे. हे दानाचे लक्षण पुरे आता दमाचे लक्षण ऐक. ॥16-88॥

तरी विषयेंद्रियां मिळणी । करूनि घापे वितुटणी ।
जैसें तोडिजे खड्गपाणी । पारकेया ॥16-89॥

तर विषयांशी इंद्रियांच्या झालेल्या एकतानतेची जी ताटातूट करून ठेवावी (त्याला दम म्हणतात). ज्याप्रमाणे माती मिसळलेल्या गढूळ पाण्यात निवळीचे बी घातले तर ते पाण्यातील मातीस तळास नेऊन स्वच्छ पाण्यास अलग करते ॥16-89॥

तैसा विषयजातांचा वारा । वाजों नेदिजे इंद्रियद्वारां ।
इये बांधोनि प्रत्याहारा । हातीं वोपी ॥16-90॥

त्याप्रमाणे कोणत्याही विषयाचा वारा इंद्रियांच्या द्वारात वाहू देत नाही (विषयांचा व इंद्रियांचा संबंध घडू देत नाही). इंद्रियास नियमाने जखडून प्रत्याहाराच्या हातात त्यास कायमचे देऊन टाकतो. ॥16-90॥

आंतुला चित्ताचें अंगवरीं । प्रवृत्ति पळे पर बाहेरी ।
आगी सुयिजे दाहींहि द्वारीं । वैराग्याची ॥16-91॥

प्रवृत्ति आत चित्तापर्यंत सर्वांचा त्याग करून साधकाला संपूर्णतया सोडून बाहेर निघून जाते व (पुन्हा प्रवृत्ति उत्पन्न होऊ नये म्हणून दहाही इंद्रियांच्या द्वारात वैराग्याचा अग्नि ठेवतो. ॥16-91॥

श्वासोश्वासाहुनी बहुवसें । व्रतें आचरे खरपुसें ।
वोसंतिता रात्रिदिवसें । नाराणुक जया ॥16-92॥

श्वासोच्छ्वासाहून पुष्कळ व कडक अशा व्रतांचे आचरण करतो व ती व्रते रात्रंदिवस आचरण करीत असता ज्याला एक क्षणभरही विश्रांती सापडत नाही ॥16-92॥

पैं दमु ऐसा म्हणिपे । तो हा जाण स्वरूपें ।
यागार्थुही संक्षेपें । सांगों ऐक ॥16-93॥

दम असे ज्याला म्हणतात त्याचे हे वर सांगितल्याप्रमाणे लक्षण आहे असे समज. आता यज्ञाचाही अर्थ थोडक्यात सांगतो ऐक. ॥16-93॥

तरी ब्राह्मण करूनि धुरे । स्त्रियादिक पैल मेरे ।
माझारीं अधिकारें । आपुलालेनि ॥16-94॥

तर मुख्य ब्राह्मणापासून आरंभ करून तो अखेर स्त्रियादिक शेवटापर्यंत मधील सर्वांनी आपापल्या वर्णाश्रमधर्मानुसार जे काही करणे ॥16-94॥

जया जे सर्वोत्तम । भजनीय देवताधर्म ।
ते तेणें यथागम । विधी यजिजे ॥16-95॥

ज्याला जे आश्रय करण्याला योग्य असे सर्वात चांगले देवधर्म वगैरे असतील त्यांचे त्याने शास्त्रात सांगितलेल्या विधिप्रमाणे अनुष्ठन करावे. ॥16-95॥

जैसा द्विज षट्कर्में करी । शूद्र तयातें नमस्कारी ।
कीं दोहींसही सरोभरी । निपजे यागु ॥16-96॥

उदाहरणार्थ ब्राह्मण अध्ययनादि सहा प्रकारची कर्मे करतो तर शूद्र त्याला नमस्कार करतो. की दोघांनाही सारखाच यज्ञ उत्पन्न होतो. (म्हणजे दोघांनाही आपापल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ केल्याचे सारखेच फळ मिळते). ॥16-96॥

तैसें अधिकारपर्यालोचें । हें यज्ञ करणें सर्वांचें ।
परी विषय विष फळाशेचें । न घापे माजीं ॥16-97॥

त्याप्रमाणे आपापल्या अधिकाराचा विचार करून हे सर्वांचे यज्ञ करणे आहे परंतु त्या यज्ञाचे आचरण करण्यात फलाशेचे विष कालवू नये. ॥16-97॥

आणि मी कर्ता ऐसा भावो । नेदिजे देहाचेनि द्वारें जावों ।
ना वेदाज्ञेसि तरी ठावो । होइजे स्वयें ॥16-98॥

आणि देहाच्या हातून होणार्‍या कर्मांच्या कर्तेपणाचा अहंकार उत्पन्न होऊ देऊ नये. पण वेदाने करावयास सांगितलेल्या कर्मांच्या विधानांना आपण स्वत:च ठिकाण होऊन रहावे. ॥16-98॥

अर्जुना एवं यज्ञु । सर्वत्र जाण साज्ञु ।
कैवल्यमार्गींचा अभिज्ञु । सांगाती हा ॥16-99॥

अर्जुना अशा प्रकारचे लक्षण असलेला व सर्वांच्या आचरणात येणारा हा यज्ञ आहे असे समज. हा यज्ञ म्हणजे मोक्षाच्या वाटेवरील माहितगार वाटाड्या आहे. ॥16-99॥

आतां चेंडुवें भूमी हाणिजे । नव्हे तो हाता आणिजे ।
कीं शेतीं बीं विखुरिजे । परी पिकीं लक्ष ॥16-100॥

आता चेंडू जमिनीवर आपटावयाचा तो चेंडूने जमिनीला मारण्याकरता नव्हे तर चेंडूला उशी येऊन तो आपल्या हातात परत यावा म्हणून. अथवा शेतात बी जे फेकायचे (पेरायचे) ते नुसते बी फेकणे नसते परंतु त्या पेकण्यात पिकावर नजर असते. ॥16-100॥

नातरी ठेविलें देखावया । आदर कीजे दिविया ।
कां शाखा फळें यावया । सिंपिजे मूळ ॥16-101॥

अथवा अंधारात ठेवलेली वस्तु दिसण्याकरता जसा दिवा हातात घ्यावा अथवा फांद्या फळे येण्याकरता ज्याप्रमाणे वृक्षांच्या मुळांना पाणी घालावे ॥16-101॥

हें बहु असो आरिसा । आपणपें देखावया जैसा ।
पुढतपुढती बहुवसा । उटिजे प्रीती ॥16-102॥

हे फार बोलणे राहू दे ज्याप्रमाणे आपण आपल्याला पहाण्याकरता आरसा आवडीने वारंवार पुष्कळ स्वच्छ करावा ॥16-102॥

तैसा वेदप्रतिपाद्यु जो ईश्वरु । तो होआवयालागीं गोचरु ।
श्रुतीचा निरंतरु । अभ्यासु करणें ॥16-103॥

त्याप्रमाणे श्रुतींनी ज्याचे प्रतिपादन केले असा जो ईश्वर त्याचा साक्षात्कार होण्याकरता श्रुतींचा नेहेमी अभ्यास करणे ॥16-103॥

तेंचि द्विजांसीच ब्रह्मसूत्र । येरा स्तोत्र कां नाममंत्र ।
आवर्तवणें पवित्र । पावावया तत्त्व ॥16-104॥

पवित्र आत्मतत्व पावण्याकरता द्विजांनीच ते ब्रह्मसूत्र घोकावे (अभ्यास करावा) इतरांनी स्तोत्रे अथवा नाममंत्र घोकावेत ॥16-104॥

पार्था गा स्वाध्यावो । बोलिजे तो हा म्हणे देवो ।
आतां तप शब्दाभिप्रावो । आईक सांगों ॥16-105॥

अर्जुना स्वाध्याय म्हणून जो म्हटला जातो तो हा असे देव म्हणतात. आता तप शब्दाचा अभिप्राय सांगतो ऐक. ॥16-105॥

तरी दानें सर्वस्व देणें । वेंचणें तें व्यर्थ करणें ।
जैसे फळोनि स्वयें सुकणें । इंद्रावणी जेवीं ॥16-106॥

तर दान म्हणजे सर्वस्व देणे दानामधे जो खर्च करावयाचा तो व्यर्थ करावयाचा (म्हणजे त्याच्या फलाची आशा टाकावयाची). ज्याप्रमाणे वनस्पति स्वत: फळून सुकते (म्हणजे ती जशी फलाशा टाकून व्यर्थ जाते तसे फलाशा टाकून दान व्यर्थ करावयाचे). ॥16-106॥

नाना धूपाचा अग्निप्रवेशु । कनकीं तुकाचा नाशु ।
पितृपक्षु पोषिता र्‍हासु । चंद्राचा जैसा ॥16-107॥

अथवा धूपाचा अग्नीत प्रवेश झाल्यावर धूप नाहीसा होतो हिणकस सोन्याला शुद्ध करण्यात त्याचे वजन कमी होत जाते अथवा पक्ष वाढत असतांना चंद्र जसा कमी कमी होत जातो. ॥16-107॥

तैसा स्वरूपाचिया प्रसरा -। लागीं प्राणेंद्रियशरीरां ।
आटणी करणें जें वीरा । तेंचि तप ॥16-108॥

अर्जुना त्याप्रमाणे आत्मानुभावाच्या विकासाकरता प्राण इंद्रिये व शरीर यांची जी आटणी करावयाची (म्हणजे प्राण व शरीर यांस आत्मप्राप्तीच्या मार्गात झिजवणे) तेच तप होय. ॥16-108॥

अथवा अनारिसें । तपाचें रूप जरी असे ।
तरी जाण जेवीं दुधीं हंसें । सूदली चांचू ॥16-109॥

अथवा वर सांगितलेल्या तपाच्या स्वरूपापेक्षा जर काही तपाचे दुसरे स्वरूप असेल तर ते दुधामधे (जलमिश्रित दुधामधे) हंसाने जशी चोच घालावी (तसे आहे म्हणजे हंस जसा दूध व पाणी आपल्या चोचीने वेगळे करतो) ॥16-109॥

तैसें देहजीवाचिये मिळणीं । जो उदयजत सूये पाणी ।
तो विवेक अंतःकरणीं । जागवीजे ॥16-110॥

त्याप्रमाणे जो उत्पन्न होताच देह व आत्मा यांच्या कालवाकालवीत हात घालतो (व पाण्यापासून हंसाची चोच ज्याप्रमाणे दुधास अलग करते त्याप्रमाणे आत्म्यास देहापासून समजुतीने अलग करतो). तो आत्मानात्मविचार आपल्या अंत:करणात सारखा जागृत ठेवावा. ॥16-110॥

पाहतां आत्मयाकडे । बुद्धीचा पैसु सांकडें ।
सनिद्र स्वप्न बुडे । जागणीं जैसें ॥16-111॥

(अनात्म पदार्थात पांगलेली जी बुद्धी तिचा संकोच होणे कठिण आहे) परंतु ती बुद्धि आत्म्यास पहावयास लागली असता तिचा संकोच होतो. (ती एकवटून अंतर्मुख होते). कसे तर जागृतीमधे निद्रेसकट स्वप्न नाहीसे होते तसे. ॥16-111॥

तैसा आत्मपर्यालोचु । प्रवर्ते जो साचु ।
तपाचा हा निर्वेचु । धनुर्धरा ॥16-112॥

त्याप्रमाणे अर्जुना जो आत्मानात्मविचार चालू होतो हाच तप शब्दाचा वास्तविक अभिप्राय आहे. ॥16-112॥

आतां बाळाच्या हितीं स्तन्य । जैसें नानाभूतीं चैतन्य ।
तैसें प्राणिमात्रीं सौजन्य । आर्जव तें ॥16-113॥

आता स्तनातील दूध जसे सर्व मुलांचे हित करणारे असते (अथवा) भिन्न भिन्न प्राण्यांच्या ठिकाणी जसे चैतन्य सारखे असते त्याप्रमाने प्राणिमात्रांशी वागण्याचा जो सर्रास भलेपणा ते आर्जव होय. ॥16-113॥

आणि जगाचिया सुखोद्देशें । शरीरवाचामानसें ।
राहाटणें तें अहिंसे । रूप जाण ॥16-114॥

आणि जगाला सुख व्हावे म्हणून शरीराने वाचेने व मनाने जे वागणे ते अहिंसेचे स्वरूप होय असे समज. ॥16-114॥

आतां तीख होऊनि मवाळ । जैसें जातीचें मुकुळ ।
कां तेज परी शीतळ । शशांकाचें ॥16-115॥

आता कमळकळिका जशी स्वभावत: तीक्ष्ण असून मऊ असते. ( कारण ती पाण्याचे भेदन करते म्हणून तिला तीक्ष्ण म्हणावयाचे आणि स्पर्शाला मऊ असते म्हणून तिला मऊ म्हणावयाचे). अथवा चंद्राचे तेजच खरे पण ते थंड असते. ॥16-115॥

शके दावितांचि रोग फेडूं । आणि जिभे तरी नव्हे कडु ।
ते वोखदु नाहीं मा घडू । उपमा कैंची ॥16-116॥

दाखविल्याबरोबर रोग नाहीसा करू शकेल आणि जिव्हेला जे कडू लागणार नाही असे औषधच नाही; मग मी असल्या औषधाची उपमा कोठची देऊ ? ॥16-116॥

तरी मऊपणें बुबुळे । झगडतांही परी नाडळे ।
एर्‍हवीं फोडी कोंराळें । पाणी जैसें ॥16-117॥

तरी जसे पाणी बुबुळाला घासले तरी ते मऊपणामुळे (डोळ्यामधे) खुपत नाही पण त्याच पाण्यासंबंधी विचार करून पाहिले तर ज्याप्रमाणे ते डोंगराचा कडा फोडते ॥16-117॥

तैसें तोडावया संदेह । तीख जैसें कां लोह ।
श्राव्यत्वें तरी माधुर्य । पायीं घालीं ॥16-118॥

त्याप्रमाणे जे सत्यभाषण संशय नाहीसा करण्याचे कामी तरवारीसारखे तीक्ष्ण असते आणि ऐकण्याच्या बाबतीत गोडपणाला पायाखाली तुडवते (ऐकले असता ते कानाला इतके मधुर लागते की त्याच्यापुढे इतर गोडी फिकी पडते). ॥16-118॥

ऐकों ठातां कौतुकें । कानातें निघती मुखें ।
जें साचारिवेचेनि बिकें । ब्रह्मही भेदी ॥16-119॥

जे सत्यभाषण ऐकत असता कानालाच मुखे उत्पन्न होतात. (पुन्हा पुन्हा ऐकावे अशा कानाला इच्छा उत्पन्न होते आणि जे सत्यभाषण आपल्या खरेपणाच्या जोरावर ब्रह्मालाही भेदून जाते. (ब्रह्माचा साक्षात्कार करून देते). ॥16-119॥

किंबहुना प्रियपणे । कोणातेंही झकऊं नेणे ।
यथार्थ तरी खुपणें । नाहीं कवणा ॥16-120॥

फार काय सांगाचे ? जे सत्यभाषण कोणालाही फसवू जाणत नाही व जरी ते खरे असते तरी ते कोणाला खुपत नाही. ॥16-120॥

एर्‍हवीं गोरी कीर काना गोड । परी साचाचा पाखाळीं कीड ।
आगीचें करणें उघड । परी जळों तें साच ॥16-121॥

बाह्य दृष्टीने पाहिले असता पारध्याचे गाणे खरोखर गोड लागते पण खर्‍या पक्षाने पाहिले असता ते अति घातकर असल्याचे दिसून येते. अग्नि आपले जाळण्याचे काम खरोखर उघडपणे करतो. पण (तो त्याचा उघडपणा काय करावयाचा ? असल्या प्रकारच्या सत्यास आग लागो. (त्याची काही किंमत नाही). ॥16-121॥

कानीं लागतां महूर । अर्थें विभांडी जिव्हार ।
तें वाचा नव्हे सुंदर । लांवचि पां ॥16-122॥

जे भाषण कानाने ऐकले असता गोड लागते परंतु अर्थाने जे काळजाला झोंबते असे भाषण हे भाषणच नाही तर ते भषण म्हणजे सुंदर रूप धारण करणारी हडळच आहे. ॥16-122॥

परी अहितीं कोपोनि सोप । लालनीं मऊ जैसें पुष्प ।
तिये मातेचें स्वरूप । जैसें कां होय ॥16-123॥

परंतु मुलाच्या कल्याणाच्या बाबतीत (मुलावर) लटके रागावणारी व लाड करण्यात फुलासारखी मऊ अशा त्या आईचे स्वरूप जसे असते ॥16-123॥

तैसें श्रवणसुख चतुर । परीणमोनि साचार ।
बोलणें जें अविकार । तें सत्य येथें ॥16-124॥

त्याप्रमाणे जे ऐकल्याने सुख देण्यात वस्ताद जे परिणामी सत्य असते व ज्या बोलण्याने ऐकणाराच्या अंत:करणात द्वेषादि विकार येत नाहीत त्या बोलण्यास येथे सत्य असे म्हटले आहे. ॥16-124॥

आतां घालितांही पाणी । पाषाणीं न निघे आणी ।
कां मथिलिया लोणी । कांजी नेदी ॥16-125॥

आता दगडाला पाणी घातले तरी देखील जसा अंकुर फुटत नाही अथवा कांजी घुसळली तरी लोणी मिळणार नाही. ॥16-125॥

त्वचा पायें शिरीं । हालेयाही फडे न करी ।
वसंतींही अंबरीं । न होती फुलें ॥16-126॥

सर्पाच्या कातीच्या मस्तकावर लाथ मारली असता ती जशी फडा काढत नाही अथवा वसंत ऋतूत देखील आकाशात फुले येत नाहीत. ॥16-126॥

नाना रंभेचेनिही रूपें । शुकीं नुठिजेचि कंदर्पें ।
कां भस्मीं वन्हि न उद्दीपे । घृतेंही जेवीं ॥16-127॥

अथवा रंभेच्याही रूपाने शुकाच्या ठिकाणी काम उत्पन्न झालाच नाही अथवा राखेमधे तुपानेही अग्नी प्रदीप्त होत नाही ॥16-127॥

तेवींचि कुमारु क्रोधें भरे । तैसिया मंत्राचीं बीजाक्षरें ।
तियें निमित्तेंही अपारें । मीनलिया ॥16-128॥

त्याप्रमाणे लहान मुलाला देखील राग येईल अशा शेलक्या शिव्या उच्चारल्या आणि तशी दुसरी आणखी कित्येक कारणे एकत्र मिळाली असताही ॥16-128॥

परी धातयाही पायां पडतां । नुठी गतायु पंडुसुता ।
तैसी नुपजे उपजवितां । क्रोधोर्मी गा ॥16-129॥

परंतु अर्जुना ब्रह्मदेवाच्याही पाया पडले असता आयुष्य संपलेला पुरुष ज्याप्रमाणे उठत नाही त्याप्रमाणे क्रोध उत्पन्न होण्याची शिकस्त केली असता त्याच्या ठिकाणी क्रोधाचा विकार उत्पन्न होत नाही. ॥16-129॥

अक्रोधत्व ऐसें । नांव तें ये दशे ।
जाण ऐसें श्रीनिवासें । म्हणितलें तया ॥16-130॥

अक्रोधत्व असे ज्यास म्हणतात ते या स्थितीलाच होय असे समज. असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले. ॥16-130॥

आतां मृत्तिकात्यागें घटु । तंतुत्यागें पटु ।
त्यजिजे जेवीं वटु । बीजत्यागें ॥16-131॥

आता मातीचा त्याग केला असता जसा घटाचा (सकारण) त्याग होतो व सुताचा त्याग केला असता वस्त्राचा त्याग होतो अथवा वडाच्या बीजाचा त्याग केला असता जसा वडाच्या झाडाचा त्याग होतो ॥16-131॥

कां त्यजुनि भिंतिमात्र । त्यजिजे आघवेंचि चित्र ।
कां निद्रात्यागें विचित्र । स्वप्नजाळ ॥16-132॥

अथवा ज्याप्रमाणे सर्व भिंतींचा त्याग केला असता त्या भितीवरील सर्व चित्रांचा त्याग होतो अथवा झोपेच्या त्याग केला असता नाना प्रकारच्या स्वप्नांच्या समुदायाचा त्याग होतो ॥16-132॥

नाना जळत्यागें तरंग । वर्षात्यागें मेघ ।
त्यजिजती जैसे भोग । धनत्यागें ॥16-133॥

अथवा जलाचा त्याग केला असता जसा लाटांचा त्याग होतो अथवा वर्षाऋतूचा त्याग केला असता जसा मेघांचा त्याग होतो अथवा द्रव्याचा त्याग केला असता भोगांचा त्याग होतो ॥16-133॥

तेवीं बुद्धिमंतीं देहीं । अहंता सांडूनि पाहीं ।
सांडिजे अशेषही । संसारजात ॥16-134॥

अर्जुना पहा त्याप्रमाणे बुद्धिमान पुरुष देहाच्या ठिकाणी असलेल्या अहंतेचा त्याग करून सर्वही संसारमात्राचा (कारणासह) त्याग करतात. ॥16-134॥

तया नांव त्यागु । म्हणे तो यज्ञांगु ।
हे मानूनि सुभगु । पार्थु पुसे ॥16-135॥

त्याला त्याग असे नाव आहे. असे यज्ञस्वरूप श्रीकृष्ण म्हणाला. त्या दैववान् अर्जुनाला हे श्रीकृष्णाचे सांगणे मान्य होऊन तो विचारू लागला ॥16-135॥

आतां शांतीचें लिंग । तें व्यक्त मज सांग ।
देवो म्हणती चांग । अवधान देईं ॥16-136॥

अर्जुन म्हणाला आता महाराज मला शांतीचे लक्षण स्पष्ट करून सांगा. तेव्हा देव म्हणाले चांगले लक्ष देऊन ऐक. ॥16-136॥

तरी गिळोनि ज्ञेयातें । ज्ञाता ज्ञानही माघौतें ।
हारपें निरुतें । ते शांति पैं गा ॥16-137॥

अर्जुना ज्ञेयाला (जाणावयाच्या विषयाला) गिळून (बाध करून) मागून ज्ञाता (जाणणारा) व ज्ञान देखील खरोखर जेथे नाहीसे होते ती शांति होय. ॥16-137॥

जैसा प्रळयांबूचा उभडु । बुडवूनि विश्वाचा पवाडु ।
होय आपणपें निबिडु । आपणचि ॥16-138॥

ज्याप्रमाणे प्रळयकाळच्या पाण्याचा लोट विश्वाचा पसारा बुडवून आपणच आपल्या ठिकाणी घनदाट भरून असतो ॥16-138॥

मग उगम ओघ सिंधु । हा नुरेचि व्यवहारभेदु ।
परी जलैक्याचा बोधु । तोही कवणा ? ॥16-139॥

मग नद्यांचे प्रवाह व समुद्र (नद्या मिळण्याचे ठिकाण) हा भेदाचा व्यवहार उरतच नाही. (इतकेच नाही) परंतु उदकाच्या एकरसतेचा बोध तो तरी कोणाला आहे ? ॥16-139॥

तैसी ज्ञेया देतां मिठी । ज्ञातृत्वही पडे पोटीं ।
मग उरे तेंचि किरीटी । शांतीचें रूप ॥16-140॥

त्याप्रमाणे ज्ञेयाचा लय झाल्यावर ज्ञातेपणाचाही लय होतो. मग अर्जुना (ज्ञेय व ज्ञाता गेल्यावर) जे काही रहाते तेच शांतीचे स्वरूप होय. ॥16-140॥

आतां कदर्थवीत व्याधी । बळीकरणाचिया आधीं ।
आपपरु न शोधी । सद्वैद्यु जैसा ॥16-141॥

आता रोग नाहीसा करून (रोग्याला) बळकट करण्याच्या काळजीत जसा चांगला वैद्य आपले व परके असा भेद करत नाही (तर काळजीपूर्वक औषधाची योजना करतो). ॥16-141॥

का चिखलीं रुतली गाये । धडभाकड न पाहे ।
जो तियेचिया ग्लानी होये । कालाभुला ॥16-142॥

अथवा गाळात फसलेली गाय दृष्टीस पडल्यावर ती दूध देणारी आहे किंवा नाही हे न पाहता तिची दीनवाणी स्थिती पाहून त्या योगाने कासावीस होतो. ॥16-142॥

नाना बुडतयातें सकरुणु । न पुसे अंत्यजु कां ब्राह्मणु ।
काढूनि राखे प्राणु । हेंचि जाणे ॥16-143॥

अथवा दयावान् पुरुष बुडणार्‍या मनुष्याला तू ब्राह्मण आहेस की चांडाळ आहेस हे विचारीत नाही तर तो त्याला पाण्याबाहेर काढून त्याचे प्राण वाचवणे हे जाणतो ॥16-143॥

कीं माय वनीं पापियें । उघडी केली विपायें ।
ते नेसविल्यावीण न पाहे । शिष्टु जैसा ॥16-144॥

मोठ्या अरण्यात एखाद्या पापी मनुष्याने (एखाद्या स्त्रीला) अकस्मात उघडी केली असता तिला वस्त्र नेसविल्यावाचून जसा सभ्य गृहस्थ तिला पहात नाही ॥16-144॥

तैसे अज्ञानप्रमादादिकीं । कां प्राक्तनहीन सदोखीं ।
निंदत्वाच्या सर्वविखीं । खिळिले जे ॥16-145॥

त्याप्रमाणे अज्ञान उन्मत्तपणा वगैरेंमुळे अथवा वाईट नशिबामुळेही निंद्यपणाच्या सर्व बाबतीत जे जखडले गेले आहेत ॥16-145॥

तयां आंगीक आपुलें । देऊनियां भलें ।
विसरविजती सलें । सलतीं तियें ॥16-146॥

त्यास आपल्या अंगचे गुण देऊन त्यांना डाचत असणारी शल्ये विसरावयास लावतात. ॥16-146॥

अगा पुढिलाचा दोखु । करूनि आपुलिये दिठी चोखु ।
मग घापे अवलोकु । तयावरी ॥16-147॥

अरे अर्जुना दुसर्‍याचे दोष आपल्या दृष्टीने (आपल्या समजुतीने) शुद्ध करून मग त्याच्याकडे दृष्टी फेकावी. ॥16-147॥

जैसा पुजूनि देवो पाहिजे । पेरूनि शेता जाइजे ।
तोषौनि प्रसादु घेइजे । अतिथीचा ॥16-148॥

ज्याप्रमाणे पुजून देव पहावा शेतात धान्य पेरून मग शेतात जावे व अतिथीला संतुष्ट करून मग त्याचा आशीर्वाद घ्यावा. ॥16-148॥

तैसें आपुलेनि गुणें । पुढिलाचें उणें ।
फेडुनियां पाहणें । तयाकडे ॥16-149॥

त्याप्रमाणे आपल्या चांगलेपणाने दुसर्‍याचा कमीपणा नाहीसा करून मग त्याच्याकडे पहावे. ॥16-149॥

वांचूनि न विंधिजें वर्मीं । नातुडविजे अकर्मीं ।
न बोलविजे नामीं । सदोषीं तिहीं ॥16-150॥

एरवी असे न करता कोणाच्या वर्मावर टोचू नये पापकर्मांमधे (त्या पापकर्माचे समर्थन करून) कोणास गुंतवू नये आणि ज्या नामामधे त्यांच्या दोषाचा उल्लेख होतो अशा नामांनी त्य़ास हाका मारू नये ॥16-150॥

वरी कोणे एकें उपायें । पडिलें तें उभें होये ।
तेंच कीजे परी घाये । नेदावे वर्मीं ॥16-151॥

शिवाय वाईट स्थिती असेल तर तो ज्या कोणत्या उपायांनी चांगल्या स्थितीला येईल तेच करावे परंतु वर्मावर घाव घालू नयेत. ॥16-151॥

पैं उत्तमाचियासाठीं । नीच मानिजे किरीटी ।
हें वांचोनि दिठी । दोषु न घेपे ॥16-152॥

अर्जुना नीच मनुष्याला उत्तम मनुष्याच्या बरोबरचे मानावे याशिवाय आणखी आपल्या दृष्टीने कोणाचा दोष पाहू नये. ॥16-152॥

अगा अपैशून्याचें लक्षण । अर्जुना हें फुडें जाण ।
मोक्षमार्गींचें सुखासन । मुख्य हें गा ॥16-153॥

अर्जुना हे अपैशून्याचे लक्षण आहे असे तू पक्के समज. व हे अपैशून्य मुमुक्षूंना मोक्षमार्गीचे सुखकर वाहन आहे. ॥16-153॥

आतां दया ते ऐसी । पूर्णचंद्रिका जैसी ।
निववितां न कडसी । सानें थोर ॥16-154॥

आता दया ती अशी की ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे थंडावा देत असता लहान थोर अशी निवड करत नाही ॥16-154॥

तैसें दुःखिताचें शिणणें । हिरतां सकणवपणें ।
उत्तमाधम नेणें । विवंचूं गा ॥16-155॥

त्याप्रमाणे (ती दया) दु:खितांचे क्लेश कृपाळूपणे हरण करीत असता श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असा भेद करणे जाणत नाही ॥16-155॥

पैं जगीं जीवनासारिखें । वस्तु अंगवरी उपखें ।
परी जातें जीवित राखे । तृणाचेंहि ॥16-156॥

जगामधे पाण्यासारखी वस्तु स्वत: अंगाने नाश पावते परंतु गवताच्या देखील जात असलेल्या जीविताचे रक्षण करते. ॥16-156॥

तैसें पुढिलाचेनि तापें । कळवळलिये कृपें ।
सर्वस्वेंसीं दिधलेंहि आपणपें । थोडेंचि गमे ॥16-157॥

त्याप्रमाणे दुसर्‍यांच्या दु:खाने कृपेने कळवळले असता (व त्यांच्या दु:खनिवारणार्थ) सर्वस्वासह आपल्या स्वत:ला अर्पण केले तरी देखील त्यास अर्पण करणारास ते थोडेच वाटते. ॥16-157॥

निम्न भरलियाविणें । पाणी ढळोंचि नेणे ।
तेवीं श्रांता तोषौनि जाणें । सामोरें पां ॥16-158॥

वाहात असलेले पाणी खड्डा अपुरा भरला तर पुढे सरकावयाचे जाणतच नाही त्याप्रमाणे पुढे आलेल्या दु:खिताला संतुष्ट करून मग (ज्याचे) पुढे जाणे ॥16-158॥

पैं पायीं कांटा नेहटे । तंव व्यथा जीवीं उमटे ।
तैसा पोळे संकटें । पुढिलांचेनि ॥16-159॥

पायात काटा शिरतो व त्याच क्षणी ते दु:ख अंत:करणात प्रगट होते त्याप्रमाणे दुसर्‍याच्या दु:खाने जो पोळला जातो ॥16-159॥

कां पावो शीतळता लाहे । कीं ते डोळ्याचिलागीं होये ।
तैसा परसुखें जाये । सुखावतु ॥16-160॥

अथवा पायाला थंडावा मिळातो तो डोळ्यांच्या उपयोगास येतो त्याप्रमाणे जो दुसर्‍याच्या सुखाने सुखी होत असतो ॥16-160॥

किंबहुना तृषितालागीं । पाणी आरायिलें असे जगीं ।
तैसें दुःखितांचे सेलभागीं । जिणें जयाचें ॥16-161॥

फार काय सांगावे ? तहानलेल्याकरता जसे जगात पाणी राहिले आहे त्याप्रमाणे अत्यंत दु:खितांच्या दु:खनिवारणार्थ ज्यांचे आयुष्य खर्ची होते. ॥16-161॥

तो पुरुषु वीरराया । मूर्तिमंत जाण दया ।
मी उदयजतांचि तया । ऋणिया लाभें ॥16-162॥

हे वीरांच्या राजा (अर्जुना) तो पुरुष दयेची प्रत्यक्ष मूर्ति आहे असे समज. व ती दया त्याचे ठिकाणी उत्पन्न होताच मी त्याचा ऋणी होतो. ॥16-162॥

आतां सूर्यासि जीवें । अनुसरलिया राजीवें ।
परी तें तो न शिवे । सौरभ्य जैसें ॥16-163॥

आता सूर्यकमळ सूर्याला जीवाभावाने अनुसरले असते (हे खरे) परंतु तो सूर्य जसा त्या कमळाच्या सुवासाला स्पर्श करीत नाही ॥16-163॥

कां वसंताचिया वाहाणीं । आलिया वनश्रीच्या अक्षौहिणी ।
ते न करीतुचि घेणी । निगाला तो ॥16-164॥

अथवा वसंतऋतूच्या ओघात वनाच्या शोभेचे अनेक समुदाय आले असता त्यांचा स्वीकार न करताच तो वसंतऋतु निघून जातो. ॥16-164॥

हें असो महासिद्धीसी । लक्ष्मीही आलिया पाशीं ।
परी महाविष्णु जैसी । न गणीच ते ॥16-165॥

हे राहू दे अष्टमहासिद्धीसह लक्ष्मी देखील जवळ आली तरी पण महाविष्णूने जसे तिला मोजलेच नाही ॥16-165॥

तैसे ऐहिकींचे कां स्वर्गींचे । भोग पाईक जालिया इच्छेचे ।
परी भोगावे हें न रुचे । मनामाजीं ॥16-166॥

त्याप्रमाणे इहलोकीचे व स्वर्गातले भोग हे आपल्या इच्छेचे दास झाले असता ते भोगावे हे ज्यास मनातून आवडत नाही ॥16-166॥

बहुवें काय कौतुकीं । जीव नोहे विषयाभिलाखी ।
अलोलुप्‍त्वदशा ठाउकी । जाण ते हे ॥16-167॥

फार काय सांगावे ? सहज कौतुकाने सुद्धा जीव विषयांची इच्छा धरत नाही. अलोलुपत्वाची (अनासक्ततेची) प्रसिद्ध अवस्था ती ही आहे असे समज. ॥16-167॥

आतां माशियां जैसें मोहळ । जळचरां जेवीं जळ ।
कां पक्षियां अंतराळ । मोकळें हें ॥16-168॥

आता मधमाशांना जसे मोहोळ सुखकर वाटते अथवा जलचरांना जल जसे सुखकर वाटते अथवा पक्षांना जसे आकाश संचार करण्याला मोकळे असते ॥16-168॥

नातरी बाळकोद्देशें । मातेचें स्नेह जैसें ।
कां वसंतीच्या स्पर्शें । मऊ मलयानिळु ॥16-169॥

अथवा आईचे लेकराविषयी प्रेम जसे हळूवार असते अथवा वसंतऋतूतील मलयपर्वतावरून वाहात येणारा वारा स्पर्शाला जसा मऊ असतो ॥16-169॥

डोळ्यां प्रियाची भेटी । कां पिलियां कूर्मीची दिठी ।
तैसीं भूतमात्रीं राहटी । मवाळ ते ॥16-170॥

डोळ्यांना प्रिय वस्तूची भेट जशी सुखकर असते अथवा कासवीची दृष्टी तिच्या पिलांना जशी सुखकर असते त्याप्रमाणे जे प्राणिमात्रांचे ठिकाणी वागणे मऊ सुखकर असते ॥16-170॥

स्पर्शें अतिमृदु । मुखीं घेतां सुस्वादु ।
घ्राणासि सुगंधु । उजाळु आंगें ॥16-171॥

स्पर्शाला अति मऊ तोंडात टाकला असता चांगला रुचकर आणि नाकाला वास देणारा आणि अंगाने स्वच्छ (निर्मळ). ॥16-171॥

तो आवडे तेवढा घेतां । विरुद्ध जरी न होतां ।
तरी उपमे येता । कापूर कीं ॥16-172॥

तो वाटेल तेवढा घेतला असता जर कोणालाही अपायकारक झाला नसता तर तो कापूर या (मार्दवाच्या) उपमेला आला असता. ॥16-172॥

परी महाभूतें पोटीं वाहे । तेवींचि परमाणूमाजीं सामाये ।या विश्वानुसार होये । गगन जैसें ॥ १७३ ॥ जसे आकाश आपल्या पोटात (वायू वगैरे) महाभूतांस धारण करते परंतु त्याचप्रमाणे ते (आकाश) परमाणूमध्ये मावले जाते आणि जसे हे विश्व आहे तसे ते होते. ॥१६-१७३॥फ

काय सांगों ऐसें जिणें । जें जगाचेनि जीवें प्राणें ।
तया नांव म्हणें । मार्दव मी ॥16-173॥

ार काय सांगू ? असे जे जगाच्या जीवाप्राणांकरता जगणे आहे त्याचे नाव मार्दव आहे असे मी (श्रीकृष्ण) म्हणतो. ॥16-173॥

आतां पराजयें राजा । जैसा कदर्थिजे लाजा ।
कां मानिया निस्तेजा । निकृष्टास्तव ॥16-174॥

आता ज्याप्रमाणे राजा पराभवामुळे लज्जेने कष्टी होतो अथवा मानी पुरुष हीनदशेमुळे (लाजेने) निस्तेज होतो ॥16-174॥

नाना चांडाळ मंदिराशीं । अवचटें आलिया संन्याशी ।
मग लाज होय जैसी । उत्तमा तया ॥16-175॥

अथवा अंत्यजाच्या घराला चुकून संन्यासी आला (व हे घर चांडाळाचे आहे असे त्यास कळले तर) मग त्या उत्तम पुरुषाला जशी लाज वाटते ॥16-175॥

क्षत्रिया रणीं पळोनि जाणें । तें कोण साहे लाजिरवाणें ।
कां वैधव्यें पाचारणें । महासतियेतें ॥16-176॥

क्षत्रियाने रणातून पळून जाणे हे लाजिरवाणे कृत्य कोणता क्षत्रिय सहन करील ? अथवा महापतिव्रतेला वैधव्य दाखवणार्‍या नावाने हाका मारणे कसे सहन होईल ? ॥16-176॥

रूपसा उदयलें कुष्ट । संभावितां कुटीचें बोट ।
तया लाजा प्राणसंकट । होय जैसें ॥16-177॥

रूपवानाला जर कोड फुटले तर अथवा संभावित पुरुषाला जर आळाचा डाग लागला तर त्या लाजेने त्यांना प्राणांवर संकट बेतल्यासारखे होते. ॥16-177॥

तैसें औटहातपणें । जें शव होऊनि जिणें ।
उपजों उपजों मरणें । नावानावा ॥16-178॥

त्याप्रमाणे साडेतीन हात (शरीरच) स्वत:स समजून जे प्रेतासारखे होऊन जगावे व वारंवार जन्मास येऊन मरावे ॥16-178॥

तियें गर्भमेदमुसें । रक्तमूत्ररसें ।
वोंतीव होऊनि असे । तें लाजिरवाणें ॥16-179॥

गर्भातील त्या मेदाच्या मुशीत रक्त व वीर्य या रसांचा ओतलेला पुतळा होऊन राहणे ते लाजिरवाणे होय. ॥16-179॥

हें बहु असो देहपणें । नामरूपासि येणें ।
नाहीं गा लाजिरवाणें । तयाहूनी ॥16-180॥

हे फार बोलणे पुरे. आपण देहच आपण आहोत अशी समजूत ठेऊन नामरूप यांचा अंगीकार याहून दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही. ॥16-180॥

ऐसैसिया अवकळा । घेपे शरीराचा कंटाळा ।
ते लाज पैं निर्मळा । निसुगा गोड ॥16-181॥

अशी दुर्दशा होते म्हणून ते शरीराची शिसारी घेतात. जड देहाशी तादात्म्य करून रहाण्याची लाज समजुतदार पुरुषास असते. पण निर्लज्ज पुरुषाला शरीराशी तादात्म्य करून राहाण्याचे बरे वाटते. ॥16-181॥

आतां सूत्रतंतु तुटलिया । चेष्टाचि ठाके सायखडिया ।
तैसें प्राणजयें कर्मेंद्रियां । खुंटे गती ॥16-182॥

आता कळसूत्री बाहुली नाचवण्याची दोरी तुटली म्हणजे त्या बाहुलीची हालचाल बंद पदते त्याप्रमाणे प्राणांच्या जयाने कर्मेंद्रियांचे व्यापार बंद पडतात ॥16-182॥

कीं मावळलिया दिनकरु । सरे किरणांचा प्रसरु ।
तैसा मनोजयें प्रकारु । ज्ञानेंद्रियांचा ॥16-183॥

अथवा सूर्य मावळाल्यावर जसा किरणांचा विस्तार नाहीसा होतो त्याप्रमाणे मन जिंकले असता ज्ञानेंद्रियांचे व्यापार बंद पडतात. ॥16-183॥

एवं मनपवननियमें । होती दाही इंद्रियें अक्षमें ।
तें अचापल्य वर्में । येणें होय ॥16-184॥

याप्रमाणे मन व प्राण यांचे नियमन केले म्हणजे दहाही इंद्रिये पंगु होतात. अचापल्य जे म्हणतात ते या वर्माने होते. ॥16-184॥

आतां ईश्वरप्राप्तीलागीं । प्रवर्ततां ज्ञानमार्गीं ।
धिंवसेयाचि आंगी । उणीव नोहे ॥16-185॥

मरणासारखी वाईट गोष्ट प्राप्त झाली व तीही अग्निप्रवेशाने करण्याचा प्रसंग आला परंतु ती गोष्ट नवर्‍याच्या हेतूने करावयाची असल्यामुळे पतिव्रता स्त्री त्या गोष्टीला मोजीतच नाही. ॥16-185॥

वोखटें मरणा{ऐ}सें । तेंही आलें अग्निप्रवेशें ।
परी प्राणेश्वरोद्देशें । न गणीचि सती ॥16-186॥

त्याप्रमाणे आत्मनाथाच्या चिंतेमुळे विषयरूप विषाची बाधा नाहीशी करून शून्याच्या काटेरी मार्गाने धावणे त्यास आवडते. ॥16-186॥

तैसें आत्मनाथाचिया आधी । लाऊनि विषयविषाची बाधी ।
धांवों आवडे पाणधी । शून्याचिये ॥16-187॥

निषेध त्याच्या आड येत नाही त्याला विधीची भीड पडत नाही व महासिद्धीची आवड त्याच्या जीवात उत्पन्न होत नाही. ॥16-187॥

न ठाके निषेधु आड । न पडे विधीची भीड ।
नुपजेचि जीवीं कोड । महासिद्धीचें ॥16-188॥

अशा प्रकारे परमेश्वराकडे अंत:करण सहज आपोआप धाव घेते. आध्यात्मिक तेज हे त्याला म्हणतात. ॥16-188॥

ऐसें ईश्वराकडे निज । धांवे आपसया सहज ।
तया नांव तेज । आध्यात्मिक तें ॥16-189॥

आता ‘आपण सर्वही सहन करतो’ या विचाराने येणार्‍या मोठेपणाच्या योगाने जे गर्वाला न येणे तीच क्षमा होय. ते कसे तर ज्याप्रमाणे देह जरी आपल्यावरील सर्व केसांना धारण करतो तरी ‘आपण सर्व केस धारण करतो’ याची त्यास खबरही नसते त्या प्रमाणे. ॥16-189॥

आतां सर्वही साहातिया गरिमा । गर्वा न ये तेचि क्षमा ।
जैसें देह वाहोनि रोमा । वाहणें नेणें ॥16-190॥

आणि विषयसेवनाविषयी इंद्रियांची प्रवृत्ति हद्दीबाहेर वाढली असता अथवा प्रारब्ध योगाने रोग खवळले असता अथवा प्रिय वस्तूचा वियोग व अप्रिय वस्तूचा योग झाला असता ॥16-190॥

आणि मातलिया इंद्रियांचे वेग । कां प्राचीनें खवळले रोग ।
अथवा योगवियोग । प्रियाप्रियांचे ॥16-191॥

या सर्वांचा एकाच वेळी पूर आला असता तो सहन करण्यास जे धैर्य अगस्ति होऊन उभे रहाते (प्रतिकार करण्यास तयार होते) ॥16-191॥

यया आघवियांचाचि थोरु । एके वेळे आलिया पूरु ।
तरी अगस्त्य कां होऊनि धीरु । उभा ठाके ॥16-192॥

आकाशामधे मोठ्या जोराने धुराचा लोट सहसा उठला असता त्या धुराच्या लोटाला जसा वारा एका झुळुकेसारखा गिळून टाकतो ॥16-192॥

आकाशीं धूमाची रेखा । उठिली बहुवा आगळिका ।
ते गिळी येकी झुळुका । वारा जेवीं ॥16-193॥

अर्जुना त्याप्रमाणे आधिभौतिक आधिदैविक व आध्यात्मिक ताप प्राप्त झाले असता त्या सर्वांस जे धैर्य गिळून टाकते ॥16-193॥

तैसें अधिभूताधिदैवां । अध्यात्मादि उपद्रवां ।
पातलेयां पांडवा । गिळुनि घाली ॥16-194॥

आता ईश्वरप्राप्तीचे दोन मार्ग हे ज्ञान व योग (अष्टांग योग) यांचे आचरण करीत असता अंगामधे धैर्याचा कमीपणा नसतो. ॥16-194॥

ऐसें चित्तक्षोभाच्या अवसरीं । उचलूनि धैर्या जें चांगावें करी ।धृति म्हणिपे अवधारीं । तियेतें गा ॥ १९६ ॥ याप्रमाणे चित्तात गडबड होण्याचे प्रसंगी जी सहनशीलतेला उचलून धरून चांगला पराक्रम गाजवते तिला धृति (धैर्य) असे म्हणतात ऐक.

आतां निर्वाळूनि कनकें । भरिला गांगें पीयूखें ।
तया कलशाचियासारिखें । शौच असें ॥16-195॥

आता सोने शुद्ध करून त्याची घागर केली व त्यात गंगेचे अमृततुल्य पाणी भारून ठेवले त्या गंगेच्या पाण्याने भरून ठेवलेल्या आतबाहेर स्वच्छ असलेल्या सोन्याच्या घागरीप्रमाणे शौच (शुद्धपणा) आहे. ॥16-195॥

जे आंगीं निष्काम आचारु । जीवीं विवेकु साचारु ।
तो सबाह्य घडला आकारु । शुचित्वाचाचि ॥16-196॥

ज्याचे शरीराच्या ठिकाणी कर्माचे निष्काम आचरण आहे व अंत:करणात खराखरा विवेक आहे (आत्मानात्मविचार) आहे तो आतबाहेर शुचित्वाची मूर्तीच बनलेली आहे. ॥16-196॥

कां फेडित पाप ताप । पोखीत तीरींचे पादप ।
समुद्रा जाय आप । गंगेचें जैसें ॥16-197॥

अथवा गंगेचे पाणी जगाचे पाप व ताप नाहीसे करीत आणि काठावरील झाडांचे पोषण करीत समुद्राला जाऊन मिळाते ॥16-197॥

कां जगाचें आंध्य फेडितु । श्रियेचीं राउळें उघडितु ।
निघे जैसा भास्वतु । प्रदक्षिणे ॥16-198॥

अथवा जगाचा अंधार नाहीसा करीत अथवा लक्ष्मीचे निवासस्थान जे सूर्यविकासी कमळ त्याचा विकास करीत सूर्य जसा प्रदक्षिणेला निघतो ॥16-198॥

तैसीं बांधिलीं सोडिता । बुडालीं काढिता ।
सांकडी फेडिता । आर्तांचिया ॥16-199॥

त्याप्रमाणे अविद्येने बांधलेल्याला मुक्त करीत संसारसमुद्रात बुडालेल्यांना बाहेर काढीत व अध्यात्मादि दु:खांनी पीडलेल्यांच्या संकटांचे निवारण करीत ॥16-199॥

किंबहुना दिवसराती । पुढिलांचें सुख उन्नति ।
आणित आणित स्वार्थीं । प्रवेशिजे ॥16-200॥

फार काय सांगावे ? रात्रंदिवस दुसर्‍याचे सुख वाढवीत वाढवीत आत्महितात प्रवेश करणे ॥16-200॥

वांचूनि आपुलिया काजालागीं । प्राणिजाताच्या अहितभागीं ।
संकल्पाचीही आडवंगी । न करणें जें ॥16-201॥

एवढेच काय ? पण आपल्या कामाकरता प्राणिमात्रांच्या अहिताविषयी संकल्पाचीही आडकाठी जे न करणे (म्हणजे आपल्या कामाकरता कोणाही प्राण्याचे अहित झाले तरी त्याची पर्वा नाही असा विचारही मनात जे न आणणे) ॥16-201॥

पैं अद्रोहत्व ऐशिया गोष्टी । ऐकसी जिया किरीटी ।
तें सांगितलें हें दिठी । पाहों ये तैसें ॥16-202॥

अर्जुना अद्रोहत्व अशा ज्या गोष्टी तू ऐकतोस ते अद्रोहत्व तुला प्रत्यक्ष दृष्टीने पहाता येईल अशा तर्‍हेने हे सांगितले आहे. ॥16-202॥

आणि गंगा शंभूचा माथां । पावोनि संकोचे जेवीं पार्था ।
तेवीं मान्यपणें सर्वथा । लाजणें जें ॥16-203॥

आणि अर्जुना शंकराच्या मस्तकावर येऊन गंगा जशी संकोचित झाली त्याप्रमाणे स्वत: मानाला योग्य असूनही लोकांनी मानले असता जे पूर्णपणे लज्जित होणे ॥16-203॥

तें हें पुढत पुढती । अमानित्व जाण सुमती ।
मागां सांगितलेंसे किती । तेंचि तें बोलों ॥16-204॥

अर्जुना अमानित्व जे म्हणतात ते हे समज. तेच ते पुन्हा किती सांगू ? ॥16-204॥

एवं इहीं सव्विसें । ब्रह्मसंपदा हे वसत असे ।
मोक्षचक्रवर्तीचें जैसें । अग्रहार होय ॥16-205॥

याप्रमाणे या सव्वीस गुणांच्या रूपाने हे ब्रह्मऐश्वर्य वास्तव्य करीत आहे. मोक्षरूपी सार्वभौम राजाचे हे सव्वीस गुण जणुकाय दिलेले गाव अगर इनामी जमिनी आहेत. ॥16-205॥

नाना हे संपत्ति दैवी । या गुणतीर्थांची नीच नवी ।
निर्विण्णसगरांची दैवी । गंगाचि आली ॥16-206॥

अथवा या सव्वीस गुणरूप तीर्थांनी नित्य नवी भरलेली अशी ही दैवी संपत्तिरूपी गंगा विरक्तपुरुषरूपी सगरांच्या दैवाने प्राप्त झाली आहे. ॥16-206॥

कीं गणकुसुमांची माळा । हे घेऊनि मुक्तिबाळा ।
वैराग्यनिरपेक्षाचा गळा । गिंवसीत असे ॥16-207॥

अथवा मुक्तिरूपी मुलगी या सव्वीस गुणारूपी फुलांची माळा घेऊन वैराग्याने निरपेक्ष झालेल्या पुरुषाचा गळा शोधित आहे. ॥16-207॥

कीं सव्विसें गुणज्योती । इहीं उजळूनि आरती ।
गीता आत्मया निजपती । नीरांजना आली ॥16-208॥

अथवा सव्वीस गुणरूपी वाती पेटवून (जणु काय) गीता ही आपला पती जो आत्मा त्याला आरती ओवाळण्याकरता आली आहे. ॥16-208॥

उगळितें निर्मळें । गुण इयेंचि मुक्ताफळें ।
दैवी शुक्तिकळें । गीतार्णवींची ॥16-209॥

गीतारूपी समुद्रातील दैवी संपत्तिरूपी शिंपला आहे व त्या शिंपल्याच्या शकलातून ही सव्वीस गुणरूपी बाहेर पदणारी निर्मळ मोत्ये आहेत ॥16-209॥

काय बहु वानूं ऐसी । अभिव्यक्ती ये अपैसी ।
केलें दैवी गुणराशी । संपत्तिरूप ॥16-210॥

फार काय वर्णन करू ? आपोआप स्पष्ट होईल अशा रीतीने दैवीसंपत्तीच्या गुणांच्या समुदायाचे वर्णन केले. ॥16-210॥

आतां दुःखाची आंतुवट वेली । दोषकाट्यांची जरी भरली ।
तरी निजाभिधानी घाली । आसुरी ते ॥16-211॥

आता सु:खाची बळकट वेली (असून) दोषरूपी काट्यांनी जरी ती भरलेली आहे तरी ती आसुरी संपत्ती मी माझ्या सांगण्याच्या व्याख्यानात घालतो. ॥16-211॥

पैं त्याज्य त्यजावयालागीं । जाणावी जरी अनुपयोगी ।
तरी ऐका ते चांगी । श्रोत्रशक्ती ॥16-212॥

परंतु आसुरी संपत्ति ही त्याज्य असल्यामुळे जरी अनुपयोगी आहे तरी तिचा त्याग करण्याकरता ती जाणली पाहिजे. म्हणून तू ती आसुरी संपत्ति कानाच्या चांगल्या बळाने ऐक. ॥16-212॥

तरी नरकव्यथा थोरी । आणावया दोषींघोरीं ।
मेळु केला ते आसुरी । संपत्ति हे ॥16-213॥

तरी नरकातील दु:ख वाढवण्याकरता भयंकर दोषांनी जो जमाव केला ती ही आसुरी संपत्ति होय. ॥16-213॥

नाना विषवर्गु एकवटु । तया नांव जैसा बासटु ।
आसुरी संपत्ती हा खोटु । दोषांचा तैसा ॥16-214॥

अथवा सर्व विषे एकत्र झाली म्हणजे त्याला जसे कालकूट विष नाव आहे त्याप्रमाणे सर्व दोषांच्या लगडीला आसुरी संपत्ति हे नाव आहे. ॥16-214॥

तरी तयाचि असुरां । दोषांमाजीं जया वीरा ।
वाडपणाचा डांगोरा । तो दंभु ऐसा ॥16-215॥

अर्जुना त्या आसुर दोषांमधे ज्याची मोठेपणाची ख्याती आहे तो दंभ असा आहे. ॥16-215॥

जैसी आपुली जननी । नग्न दाविलिया जनीं ।
ते तीर्थचि परी पतनीं । कारण होय ॥16-216॥

ज्याप्रमाणे आपली आई ही तीर्थाप्रमाणे पावन करणारी आहे परंतु लोकात तिची उघडपणे निर्भत्सना केली असता ती अधोगतीला नेण्याला कारण होते. ॥16-216॥

कां विद्या गुरूपदिष्टा । बोभाइलिया चोहटां ।
तरी इष्टदा परी अनिष्टा । हेतु होती ॥16-217॥

अथवा गुरूने उपदेशिलेली (ब्रह्म) विद्या ही इष्ट फल देणारी खरी परंतु ती चव्हाट्यावर प्रसिद्ध केली असता अकल्याणास कारणीभूत होते. ॥16-217॥

पैं आंगें बुडतां महापूरीं । जे वेगें काढी पैलतीरीं ।
ते नांवचि बांधिलिया शिरीं । बुडवी जैसी ॥16-218॥

आपण स्वत: महापुरात बुडत असतांना जी नाव (होडी) आपल्याला त्वरित काढून पलीकडच्या काठाला पोचवते ती नावच जर आपण डोक्यावर बांधली तर जशी आपणाला बुडवते. ॥16-218॥

कारण जें जीविता । तें वानिलें जरी सेवितां ।
तरी अन्नचि पंडुसुता । होय विष ॥16-219॥

अर्जुना जगण्याला कारण अन्न ते खात असतांना वर्णन करून वाजवीपेक्षा जास्त खाल्ले असता (अजीर्णामुळे) ते अन्नच विषासारखे मारक होते. ॥16-219॥

तैसा दृष्टादृष्टाचा सखा । धर्मु जाला तो फोकारिजे देखा ।
तरी तारिता तोचि दोखा- । लागीं होय ॥16-220॥

त्याप्रमाणे इहपरलोकी साह्य करणारा जो धर्म तो प्रसिद्ध केला असता तो तारणारा धर्म पातकाला कारण होतो. ॥16-220॥

म्हणौनि वाचेचा चौबारा । घातलिया धर्माचा पसारा ।
धर्मुचि तो अधर्मु होय वीरा । तो दंभु जाणे ॥16-221॥

म्हणून आपण केलेल्या सर्व धर्माचा विस्तार वाचेच्या चव्हाट्यावर ठेवला असता अर्जुना तो धर्मच अधर्म होतो आणि तोच दंभ असे समज. ॥16-221॥

आतां मूर्खाचिये जिभे । अक्षरांचा आंबुखा सुभे ।
आणि तो ब्रह्मसभे । न रिझे जैसा ॥16-222॥

आता मूर्खाच्या जिभेवर एखाद्या अक्षराचा शिंतोडा पडला असता (त्याला चार अक्षरे आली असता) तो ब्रह्मदेवाच्या सभेमधे समाधान पावत नाही. (प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सभेला तुच्छ मानतो). ॥16-222॥

कां मादुरी लोकांचा घोडा । गजपतिही मानी थोडा ।
कां कांटियेवरिल्या सरडा । स्वर्गुही नीच ॥16-223॥

अथवा तबेला ठेवणार्‍या लोकांचा तबेल्यातील ठणबंदी घोडा जसा ऐरावतालाही कमी योग्यतेचा समजतो अथवा काटेरी कुंपणावरील सरड्याला स्वर्गही ठेंगणा वाटतो. ॥16-223॥

तृणाचेनि इंधनें । आगी धांवे गगनें ।
थिल्लरबळें मीनें । न गणिजे सिंधु ॥16-224॥

गवताच्या जळणाने जशा अग्नीच्या ज्वाळा आकाशात धावतात अथवा डबक्यातील मासा आपल्या डबक्याच्या बळावर समुद्र मोजीत नाही. ॥16-224॥

तैसा माजे स्त्रिया धनें । विद्या स्तुती बहुतें मानें ।
एके दिवसींचेनि परान्नें । अल्पकु जैसा ॥16-225॥

एक दिवसाच्या परान्नाने जसा दरिद्री पुरुष उन्मत्त होतो तसा तो स्त्रिया धन विद्या स्तुती व बहुमान यांनी मस्त होतो. ॥16-225॥

अभ्रच्छायेचिया जोडी । निदैवु घर मोडी ।
मृगांबु देखोनि फोडी । पणियाडें मूर्ख ॥16-226॥

ढगांची छाया मिळाली असता जसा निदैवी पुरुष आपले घर मोडतो अथवा ज्याप्रमाणे मूर्ख मनुष्य मृगजळ पाहून तळे फोडून टाकतो ॥16-226॥

किंबहुना ऐसैसें । उतणें जें संपत्तिमिसें ।
तो दर्पु गा अनारिसें । न बोलें घेईं ॥16-227॥

फार काय सांगावे ? संपत्तीच्या योगाने अशा तर्‍हेने मस्त होणे तोच दर्प आहे असे समज. वेगळे काही बोलावयास नको. ॥16-227॥

आणि जगा वेदीं विश्वासु । आणि विश्वासीं पूज्य ईशु ।
जगीं एक तेजसु । सूर्युचि हा ॥16-228॥

आणि सर्व जगाच्या विश्वासाचे ठिकाण एक वेद आहे अथवा सर्व विश्वाचा एक ईश्वरावर पूज्यभाव आहे. या जगात तेजस्वी असा एक (निर्विवादपणे) ज्याप्रमाणे सूर्यच आहे ॥16-228॥

जगस्पृहे आस्पद । एक सार्वभौमपद ।
न मरणें निर्विवाद । जगा पढियें ॥16-229॥

अथवा सार्वभौम राजाची गादी हेच ज्याप्रमाणे सर्व जगाच्या महत्वाकांक्षेचे एक ठिकाण आहे अथवा आपण मरू नये हे निर्विवादपणे सर्व जगाला आवडते ॥16-229॥

म्हणौनि जग उत्साहें । यातें वानूं जाये ।
कीं तें आइकोनि मत्सरु वाहे । फुगों लागे ॥16-230॥

(जगाचा वेदाच्या ठिकाणी विश्वास आहे व ईश्वर जगाला वंद्य आहे). म्हणून जर आनंदाने कोणी यांचे (वेद व ईश्वर यांचे) वर्णन करू लागले तर ते ऐकून यांच्याविषयी मत्सर वाहतो व गर्वाने फुगतो. ॥16-230॥

म्हणे ईश्वरातें खायें । तया वेदा विष सूयें ।
गौरवामाजीं त्राये । भंगीत असे ॥16-231॥

तो म्हणतो मी ईश्वराला खाईन. त्या वेदाला विष घालीन. आपला मोठेपणा मिरवण्यात तो आपले बळ नाहीसे करतो. ॥16-231॥

पतंगा नावडे ज्योती । खद्योता भानूची खंती ।
टिटिभेनें आपांपती । वैरी केला ॥16-232॥

पतंगाला दिव्याची ज्योत आवडत नाही काजव्याला सूर्याचा त्रास वाटतो अथवा टिटवीने समुद्राशी वैर मांडले ॥16-232॥

तैसा अभिमानाचेनि मोहें । ईश्वराचेंही नाम न साहे ।
बापातें म्हणे मज हे । सवती जाली ॥16-233॥

त्याप्रमाणे ‘मी’ या नावाच्या भुलीने त्याला ईश्वराचे नावही सहन होत नाही व वेदाला म्हणतो मला ही एक सवतच झाली आहे. ॥16-233॥

ऐसा मान्यतेचा पुष्टगंडु । तो अभिमानी परमलंडु ।
रौरवाचा रूढु । मार्गुचि पै ॥16-234॥

अशा प्रकारे त्यास मान्यतेचा असा मोठा ताठा असतो व तो अभिमानी पुरुष अतिशय उन्मत्त असून रवरव नरकाला जाण्याचा जो रहदारीचा मार्ग तो हा (पुरुष समजावा). ॥16-234॥

आणि पुढिलांचें सुख । देखणियाचें होय मिख ।
चढे क्रोधाग्नीचें विख । मनोवृत्ती ॥16-235॥

आणि दुसर्‍याचे सुख पहावयाचे निमित्त झाले की वृत्तीत क्रोधाचे विष चढते. ॥16-235॥

शीतळाचिये भेटी । तातला तेलीं आगी उठी ।
चंद्रु देखोनि जळे पोटीं । कोल्हा जैसा ॥16-236॥

तापलेल्या तेलाची व थंड पाण्याची भेट झली असता त्या तापलेल्या तेलात जसा जाळ उत्पन्न होतो (अथवा) ज्याप्रमाणे चंद्राला पाहून कोल्हा मनात जळत असतो ॥16-236॥

विश्वाचें आयुष्य जेणें उजळे । तो सूर्यु उदैला देखोनि सवळे ।
पापिया फुटती डोळे । डुडुळाचे ॥16-237॥

ज्या सूर्याच्या योगाने विश्वाचे आयुष्य उजळते तो प्रात:काळी उगवलेला सूर्य पाहून घुबडाचे डोळे फुटतात. ॥16-237॥

जगाची सुखपहांट । चोरां मरणाहूनि निकृष्ट ।
दुधाचें काळकूट । होय व्याळीं ॥16-238॥

जगाला पहाट झाली की सुख होते परंतु चोराला पहाट ही मरणापेक्षा वाईट वाटते अथवा सर्पामधे दुधाचे काळकूट विष होते ॥16-238॥

अगाधें समुद्रजळें । प्राशितां अधिक जळे ।
वडवाग्नी न मिळे । शांति कहीं ॥16-239॥

वडवाग्नी (जसजसे अधिकाधिक) अगाध समुद्राचे पाणी पितो तसतसा तो अधिकाधिक भडकतो. त्याची कधी तृप्ति होत नाही. ॥16-239॥

तैसा विद्याविनोदविभवें । देखे पुढिलांचीं दैवें ।
तंव तंव रोषु दुणावे । क्रोधु तो जाण ॥16-240॥

त्याप्रमाणे विद्या विनोद ऐश्वर्य इत्यादिकांनी युक्त अशी दुसर्‍याची भाग्ये जो जो पहातो तो तो जो संताप दुप्प्ट होतो तो क्रोध समज. ॥16-240॥

आणि मन सर्पाची कुटी । डोळे नाराचांची सुटी ।
बोलणें ते वृष्टी । इंगळांची ॥16-241॥

आणि ज्याचे मन सर्पाचे वारुळ असते (म्हणजे ज्याच्या मनात घातक संकल्प असतात) ज्याचे डोळे म्हणजे बाणांची वृष्टि आहे व ज्याचे बोलणे म्हणजे निखर्‍यांची वृष्टीच होय. ॥16-241॥

येर जें क्रियाजात । तें तिखयाचें कर्वत ।
ऐसें सबाह्य खसासित । जयाचें गा ॥16-242॥

इतर ज्या त्याच्या सर्व क्रिया त्या पोलादाच्या कर्वतीसारख्या असतात. याप्रमाणे ज्याचे अंतर्बाह्य कठोर आहे ॥16-242॥

तो मनुष्यांत अधमु जाण । पारुष्याचें अवतरण ।
आतां आइक खूण । अज्ञानाची ॥16-243॥

तो मनुष्यांमधे अधम आहे असे समज. तो कठिणपणाची मूर्ती आहे. आता अज्ञानाचे लक्षण ऐक. ॥16-243॥

तरी शीतोष्णस्पर्शा । निवाडु नेणें पाषाणु जैसा ।
कां रात्री आणि दिवसा । जात्यंधु तो ॥16-244॥

तरी ज्याप्रमाणे दगड थंड व उष्ण या स्पर्शाचा भेद जाणत नाही अथवा जन्मांध जसा रात्र व दिवस हा भेद जाणत नाही ॥16-244॥

आगी उठिला आरोगणें । जैसा खाद्याखाद्य न म्हणे ।
कां परिसा पाडु नेणें । सोनया लोहा ॥16-245॥

अग्नि खावयास उठला म्हणजे जसा खाण्याचे कामी योग्यायोग्य म्हणत नाही अथवा परीस हा लोखंड व सोने यातील भेद जाणत नाही ॥16-245॥

नातरी नानारसीं । रिघोनि दर्वी जैसी ।
परी रसस्वादासी । चाखों नेणें ॥16-246॥

अथवा ज्याप्रमाणे स्वयंपाकाची पळी अनेक रसात प्रवेश करते पण ती रसाची रुचि जाणत नाही. ॥16-246॥

कां वारा जैसा पारखी । नव्हेचि गा मार्गामार्गविखीं ।
तैसे कृत्याकृत्यविवेकीं । अंधपण जें ॥16-247॥

अथवा वारा जसा मार्गामार्गाची परीक्षा करणारा नसतो (म्हणजे वारा जसा बर्‍या-वाईट मार्गांनी वहात असतो) त्याप्रमाणे कृत्याकृत्याच्या विचाराविषयी जे आंधळेपण असते ॥16-247॥

हें चोख हें मैळ । ऐसें नेणोनियां बाळ ।
देखे तें केवळ । मुखींचि घाली ॥16-248॥

हे स्वच्छ हे मळकट असे न जाणून लहान मूल जी वस्तु पाहाते ती केवळ मुखातच घालते ॥16-248॥

तैसें पापपुण्याचें खिचटें । करोनि खातां बुद्धिचेष्टे ।
कडु मधुर न वाटे । ऐसी जे दशा ॥16-249॥

त्याप्रमाणे पुण्य व पाप यांची सरभेसळ करून ती खिचडी बनवून खात असता त्याच्या बुद्धीच्या व्यापारास ती चांगली-वाईट असे काहीच तारतम्य कळेनासे होते. अशी जी परिस्थिती ॥16-249॥

तिये नाम अज्ञान । या बोला नाहीं आन ।
एवं साही दोषांचें चिन्ह । सांगितलें ॥16-250॥

तिला अज्ञान हे नाव आहे. या बोलण्यात काही अन्यथा नाही. अशा प्रकारे दंभादि सहाही दोषांची लक्षणे सांगितली. ॥16-250॥

इहींच साही दोषांगीं । हे आसुरी संपत्ति दाटुगी ।
जैसें थोर विषय सुभगे अंगीं । अंग सानें ॥16-251॥

या दंभादि सहा दोषांच्याच अंगांनी ही आसुरी संपत्ती बलवान झालेली आहे. (ही जरी सहाच दोषांनी बनलेली आहे तरी ही कमी समजू नये ते कसे तर) ज्याप्रमाणे एखाद्या सुंदर स्त्रीचा बांधा आटोपशीर असला तरी तिच्यात कामेच्छा फार असते. ॥16-251॥

कां तिघा वन्हींच्या पांती । पाहतां थोडे ठाय गमती ।
परी विश्वही प्राणाहुती । करूं न पुरे ॥16-252॥

अथवा तीन अग्नींची (प्रलयाग्नि विद्युताग्नि व वडवाग्नि) पंगत (संख्या) पाहता ते थोडे आहेत असे वाटते. पण ते (जर खायला निघाले तर) त्यांना प्राणाहुति करण्याला विश्वही पुरणार नाही. ॥16-252॥

धातयाही गेलिया शरण । त्रिदोषीं न चुके मरण ।
तया तिहींची दुणी जाण । साही दोष हे ॥16-253॥

कफ वात व पित्त यांचा क्षोभ झाला असता ब्रह्मदेवाला जरी शरण गेले तरी देखील मरण चुकत नाही. त्या तीन दोषांची हे सहा दोष दुप्पट आहे असे समज. (मग ते किती भयंकर असतील ?) ॥16-253॥

इहीं साही दोषीं संपूर्णीं । जाली इयेचि उभारणी ।
म्हणौनि आसुरी उणी । संपदा नव्हे ॥16-254॥

या संपूर्ण सहा दोषांनी या आसुरी संपत्तीची उभारणी झाली आहे. म्हणून आसुरी संपत्ती कमी आहे असे नाही. ॥16-254॥

परी क्रूरग्रहांची जैसी । मांदी मिळे एकेचि राशी ।
कां येती निंदकापासीं । अशेष पापें ॥16-255॥

परंतु अनिष्ट ग्रहांचा योग जसा एकाच राशीला यावा अथवा निंदकाजवळ जशी सर्व पापे येतात ॥16-255॥

मरणाराचें आंग । पडिघाती अवघेचि रोग ।
कां कुमुहूर्तीं दुर्योग । एकवटती ॥16-256॥

मरणार्‍या पुरुषाचे शरीर जसे सर्व रोग व्यापतात अथवा वाईट मुहूर्ताचे ठिकाणी वाईट योग एकत्र होतात. ॥16-256॥

विश्वासला आतुडवीजे चोरा । शिणला सुइजे महापुरा ।
तैसें दोषीं इहीं नरा । अनिष्ट कीजे ॥16-257॥

अथवा शेळीचे आयुष्य संपत आले म्हणजे तिला सात नांग्यांच्या इंगळीचा योग व्हावा त्याप्रमाणे हे सर्वच्या सर्व सहाही दोष (ज्याचा नाशकाल येतो) त्यास प्राप्त होतात. ॥16-257॥

कां आयुष्य जातिये वेळे । शेळिये सातवेउळी मिळे ।
तैसे साही दोष सगळे । जोडती तया ॥16-258॥

एखाद्यावर विश्वास ठेवलेल्या मनुष्यास जसे (ज्याच्यावर विश्वास ठेवला) त्याने चोराकडून सापडवावे अथवा दमलेल्या भागलेल्या मनुष्यास जसे महापुरात घालावे त्याप्रमाणे या सहा दोषांकडून मनुष्याचे अकल्याण केले जाते. ॥16-258॥

मोक्षमार्गाकडे । जैं यांचा आंबुखा पडे ।
तैं न निघे म्हणौनि बुडे । संसारीं तो ॥16-259॥

मोक्षाच्या मार्गाने जाणारावर जर यांचा (दंभादि सहा दोषांचा) शिंतोडा पडला (म्हणजे यांचा त्या मोक्षमार्ग्यास थोडासा संबंध झाला) तर ‘मी संसारातून निघणारच नाही असे म्हणून तो संसारात बुडी देतो. ॥16-259॥

अधमां योनींच्या पाउटीं । उतरत जो किरीटी ।
स्थावरांही तळवटीं । बैसणें घे ॥16-260॥

अर्जुना जो अधम योनीच्या पायर्‍यांनी उतरत उतरत (अधम योनीत खाली खाली जन्म घेत घेत) स्थावर योनींच्याही तळापर्यंत येऊन पडतो. ॥16-260॥

हें असो तयाच्या ठायीं । मिळोनि साही दोषीं इहीं ।
आसुरी संपत्ति पाहीं । वाढविजे ॥16-261॥

हे बोलणे राहू दे. हे सहा दोष एकत्र होऊन त्यांच्याकडून त्याच्या ठिकाणी आसुरी संपत्ति वाढवली जाते पहा. ॥16-261॥

ऐसिया या दोनी । संपदा प्रसिद्धा जनीं ।
सांगितलिया चिन्हीं । वेगळाल्या ॥16-262॥

अशा या लोकात प्रसिद्ध असलेल्या दोन्ही संपत्ती वेगवेगळ्या लक्षणांनी सांगितल्या. ॥16-262॥

इया दोन्हींमाजीं पहिली । दैवी जे म्हणितली ।
ते मोक्षसूर्यें पाहली । उखाचि जाण ॥16-263॥

या दोहोमधील पहिली जी दैवी संपत्ति म्हणून म्हटलेली आहे ती मोक्षरूपी सूर्याने उजाडलेली पहाटच आहे असे समज. ॥16-263॥

येरी जे दुसरी । संपत्ति कां आसुरी ।
ते मोहलोहाची खरी । सांखळी जीवां ॥16-264॥

इतर दुसरी जी आसुरी संपत्ति ती मोहरूपी लोखंडाची जिवाला खरोखर सांखळी (बेडी) होय. ॥16-264॥

परी हें आइकोनि झणें । भय घेसी हो मनें ।
काय रात्रीचा दिनें । धाकु धरिजे ॥16-265॥

परंतु हे आसुरी संपत्तीचे वर्णन ऐकून कदाचित् तू मनात भय घेशील हो (तर तुला भिण्याचे कारण नाही. कारण) दिवसाने रात्री धाक धरावा काय ? ॥16-265॥

हे आसुरी संपत्ति तया । बंधालागीं धनंजया ।
जो साही दोषां ययां । आश्रयो होय ॥16-266॥

अर्जुना ही आसुरी संपत्ती त्याला बंधनकारक होते की जो ह्या सहा दोषांना आश्रय होतो. ॥16-266॥

तूं तंव पांडवा । सांगितलेया दैवा ।
गुणनिधी बरवा । जन्मलासी ॥16-267॥

अर्जुना तू तर सांगितलेल्या दैवी संपत्तीतील गुणांचा चांगला ठेवाच जन्मला आहेस. ॥16-267॥

म्हणौनि पार्था तूं या । दैवी संपत्ती स्वामिया ।
होऊनि यावें उवाया । कैवल्याचिया ॥16-268॥

म्हणून अर्जुना तू या दैवी संपत्तीचा स्वामी होऊन मोक्षाच्या सुखाला प्राप्त हो. ॥16-268॥

आणि दैवां आसुरां । संपत्तिवंतां नरां ।
अनादिसिद्ध उजगरा । राहाटीचा आहे ॥16-269॥

आणि दैवी संपत्तिवान व आसुरी संपत्तिवान लोकांचे वागणुकीचे अनादिसिद्ध मार्ग आहेत. ॥16-269॥

जैसें रात्रीच्या अवसरीं । व्यापारिजे निशाचरीं ।
दिवसा सुव्यवहारीं । मनुष्यादिकीं ॥16-270॥

ज्याप्रमाणे रात्रीचे वेळी निशाचरांनी पिशाच वगैरेंनी व्यापार करावा व दिवसा चांगल्या व्यवहारामधे वागणूक करावी ॥16-270॥

तैसिया आपुलालिया राहाटीं । वर्तती दोन्ही सृष्टी ।
दैवी आणि किरीटी । आसुरी येथ ॥16-271॥

त्याप्रमाणे अर्जुना दैवी सृष्टीचे व आसुरी सृष्टीचे लोक या जगात आपापल्या वागणुकीच्या रीतीने वागतात. ॥16-271॥

तेवींचि विस्तारूनि दैवी । ज्ञानकथनादि प्रस्तावीं ।
मागील ग्रंथीं बरवी । सांगितली ॥16-272॥

या ग्रंथाच्या मागच्या भागात ज्यावेळेस ज्ञान सांगण्याचा प्रसंग आला त्याही वेळेस मी दैवी संपत्तीचा चांगला विस्तार केला होता. ॥16-272॥

आतां आसुरी जे सृष्टी । तेथिंची उपलऊं गोठी ।
अवधानाची दिठी । दे पां निकी ॥16-273॥

आता आसुरी संपत्तीचे जे लोक आहेत त्यांची गोष्ट विस्तार करून सांगू. तू अवधानाची चांगली दृष्टी दे. ॥16-273॥

तरी वाद्येंवीण नादु । नेदी कवणाही सादु ।
कां अपुष्पीं मकरंदु । न लभे जैसा ॥16-274॥

तर वाद्याशिवाय जसा नाद कोणालाही शब्द देत नाही (ऐकू येत नाही) अथवा फुलावाचून जसा सुवास मिळत नाही ॥16-274॥

तैसी प्रकृति हे आसुर । एकली नोहे गोचर ।
जंव एकाधें शरीर । माल्हातीना ॥16-275॥

त्याप्रमाणे ही आसुरी प्रकृति जेथपर्यंत एखाद्या शरीराचा आश्रय धरीत नाही तोपर्यंत ही एकटी अनुभवाला येत नाही. ॥16-275॥

मग आविष्कारला लांकुडें । पावकु जैसा जोडे ।
तैसी प्राणिदेहीं सांपडे । आटोपली हे ॥16-276॥

मग ज्याप्रमाणे लाकडात अग्नि प्रगट झाला म्हणजे तो प्राप्त होतो त्याप्रमाणे प्राण्यांच्या देहात ही सापडली गेली असता ही अनुभवास येते. ॥16-276॥

ते वेळीं जे वाढी ऊंसा । तेचि आंतुला रसा ।
देहाकारु होय तैसा । प्राणियांचा ॥16-277॥

त्यावेळी ज्याप्रमाणे उसाची जी वाढ असते तीच आतल्या रसाची वाढ असते त्याप्रमाणे हिने निश्चय केलेल्या प्राण्याचा देहाकार जसा वाढेल तशीच ती आत वाढत असते. ॥16-277॥

आतां तयाचि प्राणियां । रूप करूं धनंजया ।
घडले जे आसुरीया । दोषवृंदीं ॥16-278॥

अर्जुना आता जे प्राणी आसुरी प्रकृतीच्या दोषांच्या वाढीने बनलेले असतात त्यांचे वर्णन करू. ॥16-278॥

तरी पुण्यालागीं प्रवृत्ती । कां पापाविषयीं निवृत्ती ।
या जाणणेयाची राती । तयांचें मन ॥16-279॥

तर पुण्याविषयी प्रवृत्ति अथवा पापाविषयी निवृत्ति यांना जाणण्याची रात्र त्यांचे मन असते. (म्हणजे पुण्यकर्म करावे पापकर्म करू नये हा विचार त्यांच्या मनात केव्हाही येत नाही). ॥16-279॥

निगणेया आणि प्रवेशा । चित्त नेदीतु आवेशा ।
कोशकिटु जैसा । जाचिन्नला पैं ॥16-280॥

ज्याप्रमाणे कोशकीट आपले घर बांधण्याच्या भरात आत जाण्या येण्याला दार ठेवले पाहिजे इकडे लक्ष न देता घर तयार करून त्यात कोंडला जातो ॥16-280॥

कां दिधलें मागुती येईल । कीं न ये हें पुढील ।
न पाहातां दे भांडवल । मूर्ख चोरां ॥16-281॥

अथवा आपण दिलेले भांडवल हे परत येईल किंवा न येईल या पुढील गोष्टीकडे लक्ष न देता जसा मूर्ख मनुष्य एखाद्या चोराला भांडवल देतो ॥16-281॥

तैसिया प्रवृत्ति निवृत्ति दोनी । नेणिजती आसुरीं जनीं ।
आणि शौच ते स्वप्नीं । देखती ना ते ॥16-282॥

त्याप्रमाणे (पुण्यकर्माकडे) प्रवृत्ति व (पापकर्मापासून) निवृत्ति या दोन्ही आसुरी लोकांकडून जाणल्या जात नाहीत. आणि शुचित्व तर ते स्वप्नात सुद्धा पहात नाहीत. ॥16-282॥

काळिमा सांडील कोळसा । वरी चोखी होईल वायसा ।
राक्षसही मांसा । विटों शके ॥16-283॥

एखादे वेळी कोळसा काळेपणा टकील शिवाय कावळा पांढरा होईल कदाचित राक्षस देखील मांसाला विटू शकेल ॥16-283॥

परी आसुरां प्राणियां । शौच नाहीं धनंजया ।
पवित्रत्व जेवीं भांडिया । मद्याचिया ॥16-284॥

परंतु अर्जुना आसुरी संपत्तीवान प्राण्यांना शुचित्व (कधीही) नाही. (ते कसे तर) ज्याप्रमाणे दारूच्या भांड्याला कधीही पवित्रत्व यावयाचे नाही त्याप्रमाणे. ॥16-284॥

वाढविती विधीची आस । कां पाहाती वडिलांची वास ।
आचाराची भाष । नेणतीचि ते ॥16-285॥

शास्त्राच्या विधीची आशा वाढवतील अथवा वडिलांची आचरणाची रीत पाहातील अथवा धर्मशास्त्राने सांगितलेल्या आचाराने वागतील ही गोष्ट ते जाणत नाहीत. ॥16-285॥

जैसें चरणें शेळियेचें । कां धावणें वारियाचें ।
जाळणें आगीचें । भलतेउतें ॥16-286॥

ज्याप्रमाणे शेळी वाटेल ते चरते अथवा वारा वाटेल तिकडे वहातो किंवा अग्नी वाटेल त्या पदार्थाला जाळतो ॥16-286॥

तैसें पुढां सूनि स्वैर । आचरती ते गा आसुर ।
सत्येंसि कीर वैर । सदाचि तयां ॥16-287॥

त्याप्रमाणे स्वच्छंदीपणा पुढे करून ते असुर आचरण करतात व त्यांचे नेहेमीचेच सत्याशी वाकडे असते. ॥16-287॥

जरी नांगिया आपुलिया । विंचू करी गुदगुलिया ।
तरी साचा बोली बोलिया । बोलती ते ॥16-288॥

जर विंचू आपल्या नांगीने गुदगुल्या करील तर ते खरे भाषण करतील. ॥16-288॥

आपानाचेनि तोंडें । जरी सुगंधा येणें घडे ।
तरी सत्य तयां जोडे । आसुरांतें ॥16-289॥

जर गुदद्वाराने सुगंधाचे येणे घडेल तर त्या आसुरांना सत्याची प्राप्ती होईल. ॥16-289॥

ऐसें ते न करितां कांहीं । आंगेंचि वोखटे पाहीं ।
आतां बोलती ते नवाई । सांगिजैल ॥16-290॥

याप्रमाणे ते काही एक न करता स्वभावत:च वाईट असतात पहा. आता त्यांच्या बोलण्याचा विलक्षणपणा सांगण्यात येईल. ॥16-290॥

एर्‍हवीं करेयाच्या ठायीं चांग । तें तयासि कैचें नीट आंग ।
तैसा आसुरांचा प्रसंग । प्रसंगें परीस ॥16-291॥

एरवी उंटाचे अवयव मग त्यात चांगले नीट अंग ते कोठचे ? त्याप्रमाणे असुरांचा प्रसंग आहे. पण प्रसंगानुसार सांगतो ऐक. ॥16-291॥

उधवणीचें जेवीं तोंड । उभळी धुंवाचे उभड ।
हें जाणिजे तेवीं उघड । सांगों ते बोल ॥16-292॥

धुराड्याचे तोंडातून जसे धुराचे लोट निघतात त्याप्रमाणे हे (पुढील) त्या असुरांचे बोलणे आहे असे समज. ती बोलणी स्पष्ट सांगतो. ॥16-292॥

तरी विश्व हा अनादि ठावो । येथ नियंता ईश्वररावो ।
चावडिये न्यावो अन्यावो । निवडी वेदु ॥16-293॥

तर विश्व हे ठिकाण अनादि चालत आलेले आहे व याचे नियमन करणारा राजा ईश्वर आहे व न्याय व अन्याय यांचा निवाडा वेद चावडीवर करतात. ॥16-293॥

वेदीं अन्यायीं पडे । तो निरयभोगें दंडे ।
सन्यायी तो सुरवाडें । स्वर्गीं जिये ॥16-294॥

वेदाच्या दृष्टीने जो अन्यायी ठरतो त्यास नरकभोगाची शिक्षा होते व त्याच्या (वेदाच्या) दृष्टीने जो न्यायी ठरतो तो सुखाने स्वर्गात राहातो. ॥16-294॥

ऐसी हे विश्वव्यवस्था । अनादि जे पार्था ।
इयेतें म्हणती ते वृथा । अवघेंचि हें ॥16-295॥

अर्जुना अशी ही जी जगातली व्यवस्था पुरातान कालापासून चालत आलेली आहे तिला हे असुर हे सर्वच थोतांड आहे असे म्हणतात. ॥16-295॥

यज्ञमूढ ठकिले यागीं । देवपिसें प्रतिमालिंगीं ।
नागविले भगवे योगी । समाधिभ्रमें ॥16-296॥

यज्ञांचे ज्यांना वेड आहे ते यज्ञांनी फसले देवाचे ज्यांना वेड आहे ते प्रतिमा (मूर्ति) व लिंग यांनी फासले. भगवे वस्त्र धारण करणारे संन्यासी व योगी हे समाधीच्या भ्रमाने फासले. ॥16-296॥

येथ आपुलेनि बळें । भोगिजे जें जें वेंटाळें ।
हें वांचोनि वेगळें । पुण्य आहे ? ॥16-297॥

या जगात आपल्या सामर्थ्याने जे जे प्राप्त करून घेता येईल ते ते भोगावे याशिवाय निराळे पुण्य कोठे आहे ? ॥16-297॥

ना अशक्तपणें आंगिकें । वेगळवेंटाळीं न टकें ।
ऐसा गादिजेवीण विषयसुखें । तेंचि पाप ॥16-298॥

अथवा शरीराच्या अशक्तपणामुळे निरनिराळे भोग गोळा करता येत नाहीत. अशा तर्‍हेने जे विषयसुखापासून पिडले जाणे तेच पाप होय. ॥16-298॥

प्राण घेपती संपन्नांचे । ते पाप जरी साचें ।
तरी सर्वस्व हाता ये तयांचें । हें पुण्यफळ कीं ? ॥16-299॥

श्रीमंतांचे प्राण घेणे हे जर खरोखर पाप आहे तर त्यांचे सर्वस्व आपल्या हाती येते हे खात्रीने पुण्याचे फळ नाही काय ? ॥16-299॥

बळी अबळातें खाय । हेंचि बाधित जरी होय ।
तरी मासयां कां न होय । निसंतान ? ॥16-300॥

बलवान हा अशक्ताला खातो हेच जर बाधक असेल तर माशांचे निसंतान का होत नाही ? ॥16-300॥

आणि कुळें शोधूनि दोन्ही । कुमारेंचि शुभलग्नीं ।
मेळवीजती प्रजासाधनीं । हेतु जरी ॥16-301॥

आणि दोन्ही कुलांचा शोध करून मुलगा व मुलगी यांचे शुभ ग्रहांनी युक्त अशा वेळी लग्न केले जावे हाच जर प्रजेचे उत्पत्तीविषयी हेतु असेल ॥16-301॥

तरी पशुपक्षादि जाती । जया मिती नाहीं संतती ।
तयां कोणें प्रतिपत्तीं । विवाह केले ? ॥16-302॥

तर पशुपक्षादी ज्या जाति आहेत ज्यांच्या संततीची गणती नाही त्यांचे कोणत्या विधिविधानाने लग्न केले ? ॥16-302॥

चोरियेचें धन आलें । तरी तें कोणासि विष जालें ? ।
वालभें परद्वार केलें । कोढी कोणी होय ? ॥16-303॥

चोरीचे द्रव्य कोणाजवळ आले तर ते कोणाला विष झाले आहे काय ? विषयावरील प्रेमाने जर कोणी व्यभिचार केला तर तो कोडी होतो की काय ? ॥16-303॥

म्हणौनि देवो गोसांवी । तो धर्माधर्मु भोगवी ।
आणि परत्राच्या गांवीं । करी तो भोगी ॥16-304॥

म्हणून देव मालक आहे तो धर्माधर्म भोगावयास लावतो आणि जो येथे जे करतो ते तो परलोकाच्या गावी भोगतो ॥16-304॥

परी परत्र ना देवो । न दिसे म्हणौनि तें वावो ।
आणि कर्ता निमे मा ठावो । भोग्यासि कवणु ? ॥16-305॥

परंतु लोक (भोगावयाचे ठिकाण) अथवा (भोगवणारा) देव हे दोन्ही प्रत्यक्ष दिसत नाहीत म्हणून म्हणून ते व्यर्थ आहेत आणि धर्माधर्म करणारा (देह) तर मरून जातो. मग भोगायला ठिकाण कोण ? ॥16-305॥

येथ उर्वशिया इंद्र सुखी । जैसा कां स्वर्गलोकीं ।
तैसाचि कृमिही नरकीं । लोळतु श्लाघे ॥16-306॥

या भोगाच्या कामी इंद्र जितका उर्वशीच्या योगाने स्वर्गलोकात सुखी आहे तितकाच नरकात लोळाणारा किडा देखील स्वत:ला सुखी समजतो. ॥16-306॥

म्हणौनि नरक स्वर्गु । नव्हे पापपुण्यभागु ।
जे दोहीं ठायीं सुखभोगु । कामाचाचि तो ॥16-307॥

म्हणून नरक व स्वर्ग ही पाप व पुण्य यांनी मिळाणारी ठिकाणे नाहीत. कारण की दोन्ही ठिकाणी कामाचाच सुखभोग (सारखा) आहे. ॥16-307॥

याकारणें कामें । स्त्रीपुरुषयुग्में ।
मिळती तेथ जन्मे । आघवें जग ॥16-308॥

ह्या कारणास्तव स्त्री व पुरुषांची जोडपी जेथे कामाच्या योगाने एकत्र होतील तेथे सर्व जग उत्पन्न होते. ॥16-308॥

आणि जें जें अभिलाषें । स्वार्थालागीं हें पोषे ।
पाठीं परस्परद्वेषें । कामचि नाशी ॥16-309॥

आणि आपल्या फायद्याकरिता जे जे लागेल ते ते सर्व कामाकडून पोसले जाते नंतर परस्परात द्वेष निर्माण करून कामच जगाचा नाश करतो ॥16-309॥

एवं कामावांचूनि कांहीं । जगा मूळचि आन नाहीं ।
ऐसें बोलती पाहीं । आसुर गा ते ॥16-310॥

ह्याप्रमाणे जगाला कामाशिवाय दुसरे काहीही मूळ नाही. असे ते असुर बोलतात पहा. ॥16-310॥

आतां असो हें किडाळ । बोली न करूं पघळ ।
सांगतांचि सफोल । होतसे वाचा ॥16-311॥

आता हे वाईट बोलणे पुरे. ह्यासंबंधीच्या बोलण्याने व्याख्यानाचा विस्तार करीत नाही हे बोलण्यातच वाचा निष्फळ होते. ॥16-311॥

आणि ईश्वराचिया खंती । नुसधियाचि करिती चांथी ।
हेंही नाहीं चित्तीं । निश्चयो एकु ॥16-312॥

आणि ईश्वराच्या तिरस्काराने ते नुसतीच बडबड करतात इतकेच नव्हे त्य़ासंबंधीचा त्यांचे मनात (ईश्वर नाही हा) एक दृढ निश्चय झालेला असतो ॥16-312॥

किंबहुना उघड । आंगी लाऊनियां पाखांड ।
नास्तिकपणाचें हाड । रोंविलें जीवीं ॥16-313॥

फार काय सांगावे ? अंगामधे उघडपणे धर्मलंडपणा भरून या (नास्तिकांच्या) अंत:करणाचे वेशीत नास्तिकपणाचे हाड रोवलेले असते. ॥16-313॥

ते वेळीं स्वर्गालागीं आदरु । कां नरकाचा अडदरु ।
या वासनांचा अंकुरु । जळोनि गेला ॥16-314॥

त्यावेळेस स्वर्गाविषयी आदर अथवा नरकाविषयी भय ह्या वासनांचा अंकुर त्यांच्या चित्तात जळून गेलेला असतो. ॥16-314॥

मग केवळ ये देहखोडां । अमेध्योदकाचा बुडबुडा ।
विषयपंकीं सुहाडा । बुडाले गा ॥16-315॥

मग अर्जुना अपवित्र उदकाच्या बुडबुड्याप्रमाणे केवळ क्षणिक जे शरीर त्या शरीररूपी खोड्यात सापडून विषयरूपी चिखलात बुडतात. ॥16-315॥

जैं आटावें होती जळचर । तैं डोहीं मिळतीं ढीवर ।
कां पडावें होय शरीर । तैं रोगा उदयो ॥16-316॥

ज्यावेळेस जलचरांचा नाश व्हावयाचा असतो त्यावेळेस त्या डोहावर धीवर प्राप्त होतात. अथवा शरीर पडण्याची वेळ आली म्हणजे रोगांचा उदय होतो. ॥16-316॥

उदैजणें केतूचें जैसें । विश्वा अनिष्टोद्देशें ।
जन्मती ते तैसे । लोकां आटूं ॥16-317॥

जगाचे अनिष्ट होण्याकरताच धूमकेतूचा उदय होतो त्याप्रमाणे लोकांचा नाश होण्याकरता ते आसुरी लोक जन्मास येतात. ॥16-317॥

विरूढलिया अशुभ । फुटती तैं ते कोंभ ।
पापाचे कीर्तिस्तंभ । चालते ते ॥16-318॥

पाप उगवल्यावर त्याला जे कोंब फुटतात ते ते आसुरी लोक होत व आसुरी लोक पापाचे चालते बोलते कीर्तिस्तंभच स्मारक आहेत. ॥16-318॥

आणि मागांपुढां जाळणें । वांचूनि आगी कांहीं नेणें ।
तैसें विरुद्धचि एक करणें । भलतेयां ॥16-319॥

आणि मागेपुढे असलेल्या पदार्थास जाळावयाचे यावाचून दुसरे जसे अग्नीला ठाऊक नाही त्याप्रमाणे वाटेल त्याला एक विरुद्धच करावयाचे (एवढेच ते आसुरी लोक जाणतात). ॥16-319॥

परी तेंचि गा करणें । आदरिती संभ्रमें जेणें ।
तो आइक पार्था म्हणे । श्रीनिवासु ॥16-320॥

अर्जुना परंतु तेच विरुद्ध करण्याचे काम ज्या उत्साहाने ते आरंभ करतात तो त्यांचा उत्साहाचा प्रकार ऐक असे श्रीकृष्ण म्हणाले. ॥16-320॥

तरी जाळ पाणियें न भरे । आगी इंधन न पुरे ।
तयां दुर्भरांचिये धुरे । भुकाळु जो ॥16-321॥

तर मासे धरण्याचे जाळे पाण्याने भरत नाही अग्नीला लाकडे कधी पुरेशी होत नाहीत अशा कधीही तृप्त न होणार्‍या वस्तूंमधे जो पहिल्या प्रतीचा हपापलेला आहे ॥16-321॥

तया कामाचा वोलावा । जीवीं धरुनिया पांडवा ।
दंभमानाचा मेळावा । मेळविती ॥16-322॥

असा जो काम अर्जुना त्या कामाचा जीवाभावाने आश्रय करून दंभ व मान यांचा समुदाय जमवतात. ॥16-322॥

मातलिया कुंजरा । आगळी जाली मदिरा ।
तैसा मदाचा ताठा तंव जरा । चढतां आंगीं ॥16-323॥

अगोदरच हत्ती माजलेला व त्यात आणखी दारूची भर पडलेली (म्हणजे तो अधिकच उन्मत्त होतो) त्याप्रमाणे हा आसुरी प्रवृत्तीचा मनुष्य मूळचाच मदाच्या ताठ्याने भरलेला असून त्यात आणखी म्हातारपण शरीरावर येऊ लागले म्हणजे तो अधिकच ताठून जातो. ॥16-323॥

आणि आग्रहा तोचि ठावो । वरी मौढ्या{ऐ}सा सावावो ।
मग काय वानूं निर्वाहो । निश्चयाचा ॥16-324॥

आणि हट्टाला जागा तोच. त्याशिवाय मूर्खपणासारखा साह्य करणारा (असे असल्यावर) मग त्याच्या निश्चयाची स्थिरता काय वर्णन करावी ? ॥16-324॥

जिहीं परोपतापु घडे । परावा जीवु रगडे ।
तिहीं कर्मीं होऊनि गाढे । जन्मवृत्ती ॥16-325॥

ज्याच्या योगाने दुसर्‍याला पीडा होईल परक्या जीवाचा नाश होईल अशा कर्मात ते असुर जन्मभर पक्के वतनदार होऊन रहातात. ॥16-325॥

मग आपुलें केलें फोकारिती । आणि जगातें धिक्कारिती ।
दाहीं दिशीं पसरिती । स्पृहाजाळ ॥16-326॥

मग आपण केलेल्या गोष्टीचा मोठा गाजावाजा करतात व सर्व जगाला तुच्छ मानतात व आपले हावरूपी जाळे दाही दिशांना पसरतात. ॥16-326॥

ऐसेनि गा आटोपें । थोरियें आणती पापें ।
धर्मधेनु खुरपें । सुटलें जैसें ॥16-327॥

याप्रमाणे वर सांगितलेल्या विकारांनी व्यापले जाऊन ते असुर पाप वाढवतात. ज्याप्रमाणे देवाला धर्मार्थ सोडून दिलेली गाय गवत धान्य वहैरे सरसकट तोडीत जाते ॥16-327॥

याचि एका आयती । तयाचिया कर्मप्रवृत्ती ।
आणि जिणियाही परौती । वाहती चिंता ॥16-328॥

याच एका सामुग्रीने त्यांची कर्मप्रवृत्ती असते आणि ते असुर जगण्याच्याही पलीकडली चिंता वाहवत असतात. ॥16-328॥

पाताळाहूनि निम्न । जियेचिये उंचीये सानें गगन ।
जें पाहातां त्रिभुवन । अणुही नोहे ॥16-329॥

जी चिंता पाताळापेक्षा खोल असून तिच्या उंचीच्या मानाने आकाश ठेंगणे आहे व तिच्या विस्ताराकडे पाहिले असता त्रिभुवन हे अणूएवढेही नाही ॥16-329॥

ते योगपटाची मवणी । जीवीं अनियम चिंतवणी ।
जे सांडूं नेणें मरणीं । वल्लभा जैसी ॥16-330॥

नवीनच संन्यासदीक्षेबरोबर आलेल्या नियमांची जशी सारखी घोकणी लागते त्याप्रमाणे त्याच्या अंत:करणात अमर्याद चालणारी विचंचना असते अथवा पतिव्रता स्त्री पति मेला तरी त्याचा त्याग करण्याचा विचारही मनाला शिवू न देता त्याच्याबरोबर सती जाते तशी अखेरपर्यंत न सोडणारी चिंता त्याच्याबरोबर असते. ॥16-330॥

तैसी चिंता अपार । वाढविती निरंतर ।
जीवीं सूनि असार । विषयादिक ॥16-331॥

असार जे विषयादिक त्याविषयी इच्छा मनात ठेऊन ते निरंतर अशी अमर्याद चिंता वढवतात. ॥16-331॥

स्त्रिया गाइलें आइकावें । स्त्रीरूप डोळां देखावें ।
सर्वेंद्रियें आलिंगावें । स्त्रियेतेंचि ॥16-332॥

स्त्रियांचे गायन ऐकावे स्त्रीचे रूप डोळ्यांनी पहावे व सर्वेंद्रियानी स्त्रीलाच आलिंगन द्यावे ॥16-332॥

कुरवंडी कीजे अमृतें । ऐसें सुख स्त्रियेपरौतें ।
नाहींचि म्हणौनि चित्तें । निश्चयो केला ॥16-333॥

ज्या सुखावरून अमृत ओवाळून टाकावे असे सुख स्त्रीशिवाय इतर ठिकाणी नाहीच असा त्यांच्या मनाने निश्चय केलेला असतो. ॥16-333॥

मग तयाचि स्त्रीभोगा- । लागीं पाताळ स्वर्गा ।
धांवती दिग्विभागा । परौतेही ॥16-334॥

मग त्याच स्त्रीभोगाकरता पाताळ स्वर्ग व दाही दिशांच्या विभागापलीकडेही धावतात. ॥16-334॥

आमिषकवळु थोरी आशा । न विचारितां गिळी मासा ।
तैसें कीजे विषयाशा । तयांसि गा ॥16-335॥

ज्याप्रमाणे मासा विचार न करता मोठ्या आशेने आमीषाची उंडी गिळातो त्याप्रमाणे विषयांच्या ठिकाणी त्यांनी आपली आसक्ति ठेवल्यामुळे त्यांची स्थिती होते. ॥16-335॥

वांछित तंव न पवती । मग कोरडियेचि आशेची संतती ।
वाढऊं वाढऊं होती । कोशकिडे ॥16-336॥

इच्छित तर त्यास प्राप्त होत नाही मग कोरड्याच आशेपासून आशा वाढवीत वाढवीत कोशकिडे होतात. ॥16-336॥

आणि पसरिला अभिलाषु । अपूर्णु होय तोचि द्वेषु ।
एवं कामक्रोधांहूनि अधिकु । पुरुषार्थु नाहीं ॥16-337॥

आणि जी इच्छा वाढवलेली असेल ती अपूर्ण होणे तोच द्वेष होय. याप्रमाणे कामक्रोधापेक्षा (त्यांच्या मते) अधिक योग्यतेचा पुरुषार्थ नाही. ॥16-337॥

दिहा खोलणें रात्रीं जागोवा । ठाणांतरीयां जैसा पांडवा ।
अहोरात्रींही विसांवा । भेटेचिना ॥16-338॥

अर्जुना दिवसा यजमानापुढे चालणे व रात्री जागणे (पहारा करणे) असा पहारा करणार्‍या शिपायास जसा रात्रंदिवस विसावा मिळतच नाही ॥16-338॥

तैसें उंचौनि लोटिलें कामें । नेहटती क्रोधाचिये ढेमे ।
तरी रागद्वेष प्रेमें । न माती केंही ॥16-339॥

त्याप्रमाणे कामाने उंचावरून लोटले असता क्रोधाच्या खडकावर आपटतात तरी विषयावरील प्रेमाने (कोडगे बनून) विषयासंबंधीची आवड व द्वेष ही कोठे मावत नाहीत एवढी वाढवतात. ॥16-339॥

तेवींचि जीवींचिया हांवा । विषयवासनांचा मेळावा ।
केला तरी भोगावा । अर्थें कीं ना ? ॥16-340॥

त्याचप्रमाणे अंत:करणात हाव असल्याने विषयवासनांचा समुदाय गोळा केला खरा पण त्या अनेक विषयभोगांच्या वासना तृप्त करण्यास द्रव्य पाहिजे ना ? ॥16-340॥

म्हणौनि भोगावयाजोगा । पुरता अर्थु पैं गा ।
आणावया जगा । झोंबती सैरा ॥16-341॥

म्हणून विषयभोगाची पूर्तता होण्यास पुरेल इतके द्रव्य आणावयाकरता मनाला येईल तसे जगाला लुटतात. ॥16-341॥

एकातें साधूनि मारिती । एकाचि सर्वस्वें हरिती ।
एकालागीं उभारिती । अपाययंत्रें ॥16-342॥

एकाला संधि साधून मारतात एकाचे सर्वस्व हरण करतात व एकाकरता अपायकारक युक्त्या योजतात. ॥16-342॥

पाशिकें पोतीं वागुरा । सुणीं ससाणें चिकाटी खोंचारा ।
घेऊनि निघती डोंगरा । पारधी जैसें ॥16-343॥

फासे पोती जाळी कुत्री ससाणे चिकाटे भाले वगैरे घेऊन जसे पारधी डोंगराकडे निघतात. ॥16-343॥

ते पोसावया पोट । मारूनि प्राणियांचे संघाट ।
आणिती ऐसें निकृष्ट । तेंही करिती ॥16-344॥

ते पारधी आपले पोट भरण्याकरता जसे प्राण्यांचे समुदाय मारून आणतात. तसे नीच काम ते आसुरी प्रकृतीचे लोकही करतात. ॥16-344॥

परप्राणघातें । मेळविती वित्तें ।
मिळाल्या चित्तें । तोषणें कैसें ॥16-345॥

दुसर्‍यांच्या प्राणांचा घात करून द्रव्य मिळावतात व ते द्रव्य मिळाल्यावर चित्ताच्या ठिकाणी कसा संतोष मानतात. ॥16-345॥

म्हणे आजि मियां । संपत्ति बहुतेकांचिया ।
आपुल्या हातीं केलिया । धन्यु ना मी ? ॥16-346॥

तो म्हणतो बहुतेकांचे द्रव्य मी आज आपल्या हाती आणले तेव्हा आता मी धन्य नाही काय ? ॥16-346॥

ऐसा श्लाघों जंव जाये । तंव मन आणीकही वाहे ।
सवेंचि म्हणे पाहे । आणिकांचेंही आणूं ॥16-347॥

असा जो जो आपली (गर्वाने) स्तुती करतो तो तो मनात आणखीच लोकांना लुटण्याची हाव बाळगतो व लागलीच म्हणतो की उद्या आणखी दुसर्‍याचे द्रव्य आणू. ॥16-347॥

हें जेतुलें असे जोडिलें । तयाचेनि भांडवलें ।
लाभा घेईन उरलें । चराचर हें ॥16-348॥

हे जेवढे द्रव्य मिळवले आहे त्याच्या भांडवलावर उरलेले स्थावरजंगमात्मक जगत् मी फायद्यात प्राप्त करून घेईन. ॥16-348॥

ऐसेनि धना विश्वाचिया । मीचि होईन स्वामिया ।
मग दिठी पडे तया । उरों नेदी ॥16-349॥

अशा रीतीने विश्वाच्या धनाला मी एकटाच मालक होईन. मग माझी दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याला मी उरू देणार नाही. (त्याचा नाश करीन). ॥16-349॥

हे मारिले वैरी थोडे । आणीकही साधीन गाढे ।
मग नांदेन पवाडें । येकलाचि मी ॥16-350॥

आजपर्यंत (शत्रू) मारले परंतु हे थोडे असून आणखीही बलाढ्य (शत्रु) संधी साधून मारीन. मग मीच एकटा महत्वाने नांदेन. ॥16-350॥

मग माझी होतील कामारीं । तियेंवांचूनि येरें मारीं ।
किंबहुना चराचरीं । ईश्वरु तो मी ॥16-351॥

जे माझे दास होतील त्याशिवाय इतरांना मी मारीन. फार काय सांगावे ? चराचरात ईश्वर जो आहे तो मी आहे. ॥16-351॥

मी भोगभूमीचा रावो । आजि सर्वसुखासी ठावो ।
म्हणौनि इंद्रुही वावो । मातें पाहुनि ॥16-352॥

मी भोगरूपी भूमीचा राजा आहे (सर्व भोगांचा मालक असल्याकारणाने आज सर्व सुखाला मी स्थान आहे. म्हणून माझ्यशी तुलना करून पाहिली असता इंद्र देखील तुच्छ आहे. ॥16-352॥

मी मनें वाचा देहें । करीं ते कैसें नोहे ।
कें मजवांचूनि आहे । आज्ञासिद्ध आन ? ॥16-353॥

मी मनाने वाचेने अगर देहाने ते कसे होणार नाही ? ज्याची आज्ञा सिद्धवत आहे असा माझ्याशिवाय दुसरा कोठे आहे ? ॥16-353॥

तंवचि बळिया काळु । जंव न दिसें मी अतुर्बळु ।
सुखाचा कीर निखिळु । रासिवा मीचि ॥16-354॥

बिनजोड जो मी त्या मला पाहिले नाही तोपर्यंतच काळ हा बलवान आहे. सुखाची केवळ खरोखर रास मीच आहे. ॥16-354॥

कुबेरु आथिला होये । परी तो नेणें माझी सोये ।
संपत्ती मजसम नव्हे । श्रीनाथाही ॥16-355॥

कुबेर संपन्न आहे परंतु त्यास माझ्या ऐश्वर्याची योग्यता नाही. संपत्तीचे बाबतीत लक्ष्मीपती भगवान देखील माझी बरोबरी करणार नाही. ॥16-355॥

माझिया कुळाचा उजाळू । कां जातिगोतांचा मेळू ।
पाहतां ब्रह्माही हळू । उणाचि दिसे ॥16-356॥

माझ्या कुळाची शुद्धता अथवा जातीचा व गोताचा समुदाय पहाता ब्रह्मदेव देखील हलका व कमीच दिसतो. ॥16-356॥

म्हणौनि मिरविती नांवें । वायां ईश्वरादि आघवे ।
नाहीं मजसीं सरी पावे । ऐसें कोण्ही ॥16-357॥

म्हणून ईश्वर वगैरे सर्व आपली नावे व्यर्थ मिरवतात. माझ्याशी बरोबर पावेल असा कोणी नाही. ॥16-357॥

आतां लोपला अभिचारु । तया करीन मी जीर्णोद्धारु ।
प्रतिष्ठीन परमारु । यागवरी ॥16-358॥

आता जारण-मारण वगैरे लोपले आहे त्यांचा मी जीर्णोद्धार करीन व यज्ञाचे योगाने दुसर्‍याचा काटा काढावा (नाश करावा) अशी रीत प्रवारात आणीन. ॥16-358॥

मातें गाती वानिती । नटनाचें रिझविती ।
तयां देईन मागती । ते ते वस्तु ॥16-359॥

मला जे गातील अथवा जे माझे वर्णन करतील अथवा नाचण्याने किंवा सोंगे आणून करमणूक करतील ते जी वस्तु मागतील ती ती वस्तु मी त्यांना देईन. ॥16-359॥

माजिरा अन्नपानीं । प्रमदांच्या आलिंगनीं ।
मी होईन त्रिभुवनीं । आनंदाकारु ॥16-360॥

मादक पदार्थांच्या खाण्यापिण्याने व तरुण स्त्रियांच्या आलिंगनाने मी त्रिभुवनात आनंदाची मूर्ती होईन. ॥16-360॥

काय बहु सांगों ऐसें । ते आसुरीप्रकृती पिसें ।
तुरंबिती असोसें । गगनौळें तियें ॥16-361॥

फार काय सांगू ? आसुरी प्रकृतीने असे वेडे झालेले ते अशा त्या आकाशाच्या फुलांचा अपरिमित वास घेतात. ॥16-361॥

ज्वराचेनि आटोपें । रोगी भलतैसें जल्पे ।
चावळती संकल्पें । जाण ते तैसें ॥16-362॥

ज्वराने व्यापल्यावर रोगी जसा वाटेल तसा बडबडतो त्याप्रमाणे ते मनोरथांची वाटेल तशी बडबड करीत असतात असे समज. ॥16-362॥

अज्ञान आतुले धुळी । म्हणौनि आशा वाहटुळी ।
भोवंडीजती अंतराळीं । मनोरथांच्या ॥16-363॥

अज्ञानरूपी धुळीत सापडले म्हणून आशारूपी वावटाळीने मनोरथरूपी आकाशात (ते) फिरवले जातात. ॥16-363॥

अनियम आषाढ मेघ । कां समुद्रोर्मी अभंग ।
तैसे कामिती अनेग । अखंड काम ॥16-364॥

आषाढ मनिन्यातील मेघ जसे अमर्यादित येत असतात अथवा समुद्रावर लाटा जशा एकसारख्या येत रहातात तसे आसुरी स्वभावाचे लोक सदोदित अनेक इच्छा करीत असतात ॥16-364॥

मग पैं कामनाचि तया । जीवीं जाल्या वेलरिया ।
वोरपिली कांटिया । कमळें जैसीं ॥16-365॥

मग त्या कामनाच अंत:करणात वेलीच्या जाळ्या झाल्या. जशी काट्यावरून कमळे ओढावीत (म्हणजे त्या कमळांच्या जशा चिंधड्या होतात) ॥16-365॥

कां पाषाणाचिया माथां । हांडी फुटली पार्था ।
जीवीं तैसें सर्वथा । कुटके जाले ॥16-366॥

अथवा अर्जुना दगडावर मातीची घागर फुटली असता जसे तिचे तुकडे तुकडे होतात त्याप्रमाणे (त्यांच्या) अंत:करणाचे अगदी तुकडे तुकडे झालेले असतात. ॥16-366॥

तेव्हां चढतिये रजनी । तमाची होय पुरवणी ।
तैसा मोहो अंतःकरणीं । वाढोंचि लागे ॥16-367॥

रात्र जशीजशी वाढते तसतसा अंधकार वाढत जातो त्याप्रमाणे तेव्हा अंत:करणात मोह वाढू लागतो. ॥16-367॥

आणि वाढे जंव जंव मोहो । तंव तंव विषयीं रोहो ।
विषय तेथ ठावो । पातकासी ॥16-368॥

आणि जो जो मोह वाढतो तो तो विषयांच्या ठिकाणी वाढ व्हावयास लागते व जेथे विषय असतात तेथे पापांना आश्रय असतो. ॥16-368॥

पापें आपलेनि थांवें । जंव करिती मेळावे ।
तंव जितांचि आघवे । येती नरकां ॥16-369॥

पापे आपल्या बळाने जो जो गर्दी करतात तो तो जिवंतपणीच सर्व नरक येतात (सर्व दु:खे येतात). ॥16-369॥

म्हणौनि गा सुमती । जे कुमनोरथां पाळिती ।
ते आसुर येती वस्ती । तया ठाया ॥16-370॥

म्हणून हे शुद्ध बुद्धीच्या अर्जुना या वाईट वासना बाळगणारे जे असुर ते त्या नरकात रहावयास येतात. ॥16-370॥

जेथ असिपत्रतरुवर । खदिरांगाराचे डोंगर ।
तातला तेलीं सागर । उतताती ॥16-371॥

ज्या नरकाचे ठिकाणी तरवारीच्या पानांची झाडे आहेत खैराच्या निखार्‍यांचे डोंगर आहेत व तापलेल्या तेलाचे समुद्र उसळत आहेत ॥16-371॥

जेथ यातनांची श्रेणी । हे नित्य नवी यमजाचणी ।
पडती तिये दारुणीं । नरकलोकीं ॥16-372॥

ज्या ठिकाणी यतनांची पंगतची पंगत ही यमाची जाचणी नित्यश: नवी नवीच होत असते अशा त्या भयंकर नरकालोकात ते आसुरी स्वभावाचे लोक पडतात. ॥16-372॥

ऐसे नरकाचिये शेले । भागीं जे जे जन्मले ।
तेही देखों भुलले । यजिती यागीं ॥16-373॥

अशा शेलक्या नरकाचे भागीदार जे जे जन्मले आहेत तेही भ्रमिष्ट होऊन यज्ञ करतांना दिसतात. ॥16-373॥

एर्‍हवीं यागादिक क्रिया । आहाण तेचि धनंजया ।
परी विफळती आचरोनियां । नाटकी जैसी ॥16-374॥

एरवी यज्ञादिक कर्मांचे जे फळ आहे तेच वास्तविक त्यांच्या आचरणाने प्राप्त व्हावयाचे परंतु नाटकी लोकांप्रमाणे त्या कर्माच्या आचरणाचा नुसता देखावा करून ते असुर त्या कर्माचरणास निष्फळ करतात. ॥16-374॥

वल्लभाचिया उजरिया । आपणयाप्रति कुस्त्रिया ।
जोडोनि तोषिती जैसियां । अहेवपणें ॥16-375॥

वाईट चालीच्या स्त्रिया आपल्या प्रियकराचा आश्रय करून तोच आपला पति समजून जशा आपणास सौभाग्यवती मानून मनात संतोषित होतात. ॥16-375॥

तैसें आपणयां आपण । मानितां महंतपण ।
फुगती असाधारण । गर्वें तेणें ॥16-376॥

त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी आपण महंतपणा मानून त्या गर्वाने अतिशय फुगतात. ॥16-376॥

मग लवों नेणती कैसे । आटिवा लोहाचे खांब जैसे ।
कां उधवले आकाशें । शिळाराशी ॥16-377॥

मग लोखंडाचे ओतीव खांब जसे लवत नाहीत त्याप्रमाणे नम्र होण्याचे त्यास ठाऊक नसते. अथवा आकाशात उंच गेलेल्या पर्वताप्रमाणे ते लीनता जाणत नाहीत. ॥16-377॥

तैसें आपुलिये बरवे । आपणचि रिझतां जीवें ।
तृणाहीहूनि आघवें । मानिती नीच ॥16-378॥

त्याप्रमाणे आपल्या चांगुलपणाने आपणच आपल्या मनात संतुष्ट होऊन गवतापेक्षा देखील इतर सर्व हलके मानतात. ॥16-378॥

वरी धनाचिया मदिरा । माजूनि धनुर्धरा ।
कृत्याकृत्यविचारा । सवतें केलें ॥16-379॥

शिवाय धनरूपी दारूने मस्त होऊन अर्जुना करण्य़ास योग्य काय व अयोग्य काय हे विसरून त्यांनी आपणास (जगा) वेगळे केले (म्हणजे आपण जगाहून कोणी मोठे आहोत असे समजू लागले). ॥16-379॥

जया आंगीं आयती ऐसी । तेथ यज्ञाची गोठी कायसी ।
तरी काय काय पिसीं । न करिती गा ? ॥16-380॥

ज्यांच्याजवळ अशी सामुग्री आहे तेथे यज्ञाची गोष्ट कसली ? परंतु अरे वेडे काय करीत नाहीत ? ॥16-380॥

म्हणौनि कोणे एके वेळे । मौढ्यमद्याचेनि बळें ।
यागाचींही टवाळें । आदरिती ॥16-381॥

म्हणून कोण्या एखाद्या वेळेला मूर्खपणारूपी दारूच्या बळाने यज्ञांचीही नक्कल करतात. ॥16-381॥

ना कुंड मंडप वेदी । ना उचित साधनसमृद्धी ।
आणि तयांसी तंव विधी । द्वंद्वचि सदा ॥16-382॥

कुंड मंडप वेदी वगैरे काही एक नसते. योग्य साधनांचा पुरवठा नसतो व विधीचे व त्यांचे नेहेमी वाकडेच असते. ॥16-382॥

देवां ब्राह्मणांचेनि नांवें । आडवारेनहि नोहावें ।
ऐसें आथी तेथ यावें । लागे कवणा ? ॥16-383॥

देवा-ब्राह्मणांच्या नावाने चुकून पुढे आलेला वारा देखील त्यांना खापत नाही असे जेथे आहे तेथे मग कोणास यावे असे वाटेल ? ॥16-383॥

पैं वासरुवाचा भोकसा । गाईपुढें ठेवूनि जैसा ।
उगाणा घेती क्षीररसा । बुद्धिवंत ॥16-384॥

ज्याप्रमाणे हिकमती लोक वासरू मेलेल्या गाईच्या पुढे त्या मेलेल्या वासराचा भोत (मेलेल्या वासराच्या कातडीने मढवून तयात केलेले कृत्रिम वासरू) ठेऊन तिच्या कासेत असेल नसेल तेवढ्या दुधाचा झाडा घेतात. ॥16-384॥

तैसें यागाचेनि नांवें । जग वाऊनि हांवें ।
नागविती आघवें । अहेरावारी ॥16-385॥

त्याप्रमाणे आपल्या हावेला सर्व जग अर्पण करून यज्ञाच्या निमित्ताने आहेराच्या रूपाने सर्व जगाला लुटतात. ॥16-385॥

ऐशा कांहीं आपुलिया । होमिती जे उजरिया ।
तेणें कामिती प्राणिया । सर्वनाशु ॥16-386॥

आपल्या उत्कर्षासाठी असे जे काही होमहवन करतात त्याच्या योगाने सर्व प्राण्यांचा नाश इच्छितात. ॥16-386॥

मग पुढां भेरी निशाण । लाउनी ते दीक्षितपण ।
जगीं फोकारिती आण । वावो वावो ॥16-387॥

मग पुढे नौबत डंका वगैरे लाऊन ते असुर आपणच आपले दीक्षितपण जगात उगीच व्यर्थ प्रसिद्ध करतात. ॥16-387॥

तेव्हां महत्त्वें तेणें अधमा । गर्वा चढे महिमा ।
जैसे लेवे दिधले तमा । काजळाचे ॥16-388॥

तेव्हा त्या दीक्षितपणाच्या महत्वाने त्या नीच आसुरी मनुष्यांचा गर्व अधिक वाढतो. ज्याप्रमाणे अगोदरच काळेकुट्ट असलेल्या अंधारास जसे आणखी काजळाचे लेप द्यावेत ॥16-388॥

तैसें मौढ्य घणावे । औद्धत्य उंचावे ।
अहंकारु दुणावे । अविवेकुही ॥16-389॥

त्याप्रमाणे मूर्खपणा दृढ होतो उद्धटपणा वाढतो व अहंकार आणि अविचारही दुप्पट होतात. ॥16-389॥

मग दुजयाची भाष । नुरवावया निःशेष ।
बळीयेपणा अधिक । होय बळ ॥16-390॥

मग आपल्याशिवाय इतर कोणाचे नाव देखील मुळीच निघू नये एवढ्याकरता त्यांच्या सामर्थ्यास जास्तच जोर येतो. ॥16-390॥

ऐसा अहंकार बळा । जालिया एकवळा ।
दर्पसागरु मर्यादवेळा । सांडूनि उते ॥16-391॥

याप्रमाणे अहंकाराचा व बळाचा मिलाफ झाल्यावर उन्मत्तपणाचा समुद्र आपला किनारा टकून बाहेर वाढतो. ॥16-391॥

मग वोसंडिलेनि दर्पें । कामाही पित्त कुरुपे ।
तया धगीं सैंघ पळिपे । क्रोधाग्नि तो ॥16-392॥

मग उन्मत्तपणा अमर्याद वढल्यावर कामाचे पित्त खवळते. मग त्या उष्णतेने तो क्रोधाग्नि एकदम पेटतो. ॥16-392॥

तेथ उन्हाळा आगी खरमरा । तेलातुपाचिया कोठारा ।
लागला आणि वारा । सुटला जैसा ॥16-393॥

तेव्हा रखरखीत उन्हाळ्यात तेला तुपाच्या कोठाराला जसा अग्नि लागावा आणि त्यात वारा सुटावा ॥16-393॥

तैसा अहंकारु बळा आला । दर्पु कामक्रोधीं गूढला ।
या दोहींचा मेळु जाला । जयांच्या ठायीं ॥16-394॥

त्याप्रमाणे बळाचे साह्य मिळालेला व अहंकार व कामक्रोधांनी व्यापलेला उन्मत्तपणा या दोघांचा मिलाफ ज्यांच्या ठिकाणी झाला आहे ॥16-394॥

ते आपुलिया सवेशा । मग कोणी कोणी हिंसा ।
या प्राणियांते वीरेशा । न साधती गा ? ॥16-395॥

हे वीरश्रेष्ठा अर्जुना ते आपल्या स्वेच्छेनुरूप मग कोणकोणत्या हिंसेने या प्राण्यांना मारत नाहीत ? ॥16-395॥

पहिलें तंव धनुर्धरा । आपुलिया मांसरुधिरा ।
वेंचु करिती अभिचारा- । लागोनियां ॥16-396॥

अर्जुना प्रथम तर ते आपल्या मांसाला व रक्ताला जारण-मारणाकरता खर्च करतात. ॥16-396॥

तेथ जाळिती जियें देहें । यामाजीं जो मी आहें ।
तया आत्मया मज घाये । वाजती ते ॥16-397॥

त्या कामी ये देह जाळतात त्या देहामधे जो मी (आत्मरूपाने) आहे त्या मला (आत्म्याला) ते तडाखे बसतात. ॥16-397॥

आणि अभिचारकीं तिहीं । उपद्रविजे जेतुलें कांहीं ।
तेथ चैतन्य मी पाहीं । सीणु पावे ॥16-398॥

आणि ते जारण-मारण करणारे जितक्या वस्तूंना पीडा देतात त्या तितक्या ठिकाणी असलेला चैतन्यरूप आत्मा जो मी त्या मला दु:ख प्राप्त होते असे समज. ॥16-398॥

आणि अभिचारावेगळें । विपायें जे अवगळें ।
तया टाकिती इटाळें । पैशून्याचीं ॥16-399॥

आणि अभिचाराचाराच्या (जारण-मारणाच्या) तडाख्यातून जे क्वचित उरून राहिले असतील त्यांच्यावर दोषदृष्टीरूपी धोंड्यांचा (दगडांचा) मारा करतात. ॥16-399॥

सती आणि सत्पुरुख । दानशीळ याज्ञिक ।
तपस्वी अलौकिक । संन्यासी जे ॥16-400॥

पतिव्रता सत्पुरुष दानशील पुरुष याज्ञिक लोकोत्तर तपस्वी व संन्यासी ॥16-400॥

कां भक्त हन महात्मे । इयें माझीं निजाचीं धामें ।
निर्वाळलीं होमधर्में । श्रौतादिकीं ॥16-401॥

अथवा भक्त आणि महात्मे वगैरे ही माझी स्वत:ची घरे श्रौतादिक यज्ञक्रियांनी शुद्ध झालेली असतात. ॥16-401॥

तयां द्वेषाचेनि काळकूटें । बासटोनि तिखटें ।
कुबोलांचीं सदटें । सूति कांडें ॥16-402॥

त्यांना वाईट शब्दाचे बळकट व तीक्ष्ण बाण द्वेषरूपी विष चोपडून मारतात. ॥16-402॥

ऐसे आघवाचि परी । प्रवर्तले माझ्या वैरी ।
तयां पापियां जें मी करीं । तें आइक पां ॥16-403॥

याप्रमाणे सर्व प्रकारांनी जे माझ्याशी शत्रुत्व करण्यास प्रवृत्त झाले आहेत तर त्या पाप्यांना जे मी करतो ते तू ऐक. ॥16-403॥

तरी मनुष्यदेहाचा तागा । घेऊनि रुसती जे जगा ।
ते पदवी हिरोनि पैं गा । ऐसे ठेवीं ॥16-404॥

तरी मनुष्यदेहाचा आश्रय घेऊन जे जगाचा नाश करतात त्यांची ती मनुष्यपणाची पदवी हिसकावून घेऊन त्यास मी असे ठेवतो. ॥16-404॥

जे क्लेशगांवींचा उकरडा । भवपुरींचा पानवडा ।
ते तमोयोनि तयां मूढां । वृत्तीचि दें ॥16-405॥

की क्लेशरूपी गावाचा जो उकिरडा आहे संसाररूपी शहराचा जो पाणवठा आहे ती तमोयोनी त्या मूर्खांना (मी) वतनदारीसारखी देतो. ॥16-405॥

मग आहाराचेनि नांवें । तृणही जेथ नुगवे ।
ते व्याघ्र वृश्चिक आडवे । तैसिये करीं ॥16-406॥

मग खाण्याकरता जेथे गवतही उगवत नाही तसल्या अरण्यात मी त्यांना वाघ विंचू वगैरे करतो. ॥16-406॥

तेथ क्षुधादुःखें बहुतें । तोडूनि खाती आपणयातें ।
मरमरों मागुतें । होतचि असती ॥16-407॥

त्या अरण्यात भुकेच्या तीव्र वेदनांनी ते आपल्यास तोडून खात असतांना मरमरून पुन्हा (तेथे) उत्पन्न होतच असतात. ॥16-407॥

कां आपुला गरळजाळीं । जळिती आंगाची पेंदळी ।
ते सर्पचि करीं बिळीं । निरुंधला ॥16-408॥

अथवा आपल्या विषाच्या आगीने ज्यांच्या अंगाची त्वचा जळत असते ते बिळात अडकून राहिलेले सर्पच मी त्यांना करतो. ॥16-408॥

परी घेतला श्वासु घापे । येतुलेनही मापें ।
विसांवा तयां नाटोपे । दुर्जनांसी ॥16-409॥

परंतु आत घेतलेला श्वास बाहेर सोडण्यास जितका वेळ लागतो तितक्याही प्रमाणाने त्या दुर्जनास विसावा मिळत नाही. ॥16-409॥

ऐसेनि कल्पांचिया कोडी । गणितांही संख्या थोडी ।
तेतुला वेळु न काढी । क्लेशौनि तयां ॥16-410॥

अशा स्थितीत कोट्यावधी कल्पांची संख्या मोजली तरी थोडीच तितका वेळ त्यांना मी दु:खातून काढीत नाही. ॥16-410॥

तरी तयांसी जेथ जाणें । तेथिंचें हें पहिलें पेणें ।
तें पावोनि येरें दारुणें । न होती दुःखें ॥16-411॥

तर त्यास असुरास जेथे जावयाचे आहे तेथचा हा पहिला मुक्काम आहे. तेव्हा त्यास ज्या ठिकाणी जावयाचे आहे त्या ठिकाणचा विचार केला असता इतर (वर सांगितलेली) दु:खे त्याच्यापुढे काहीच भयंकर नाहीत. ॥16-411॥

हा ठायवरी । संपत्ति ते आसुरी ।
अधोगती अवधारीं । जोडिली तिहीं ॥16-412॥

त्या आसुरी संपत्तीच्या योगाने अशा या प्रकारची अधोगती त्यांनी मिळावलेली असते ऐक. ॥16-412॥

पाठीं व्याघ्रादि तामसा । योनी तो अळुमाळु ऐसा ।
देहाधाराचा उसासा । आथी जोही ॥16-413॥

नंतरा व्याघ्रादि तामसी योनीत देहाच्या आधाराचा असा जो थोडसा विसावा असतो ॥16-413॥

तोही मी वोल्हावा हिरें । मग तमचि होती एकसरें ।
जेथे गेलें आंधारें । काळवंडैजे ॥16-414॥

तोही ओलावा मी हिसकावून घेतो. मग ते आसुरी संपत्तीचे लोक अशा केवळ तमाच्याच मूर्ती बनतात की जेथे अंधार गेला असता काळवंडला जातो. ॥16-414॥

जयांची पापा चिळसी । नरक घेती विवसी ।
शीण जाय मूर्च्छी । सिणें जेणें ॥16-415॥

पाप ज्याची चिळस घेते व नरक ज्याचे भय घेतात व ज्या शीणाने (श्रमाने) शीण (श्रम) मूर्च्छा पावतो. ॥16-415॥

मळु जेणें मैळे । तापु जेणें पोळे ।
जयाचेनि नांवें सळे । महाभय ॥16-416॥

घाण ज्याच्या योगाने मळते ताप ज्याच्या योगाने पोळतो व ज्याचे नाव घेतले असता महाभय (मृत्यु) भय पावते ॥16-416॥

पापा जयाचा कंटाळा । उपजे अमंगळ अमंगळा ।
विटाळुही विटाळा । बिहे जया ॥16-417॥

पापांना ज्याचा कंटाळा असतो अशुभाला ज्यापासून अशुभ उत्पन्न होते व विटाळ सुद्धा ज्या विटाळाला भितो ॥16-417॥

ऐसें विश्वाचेया वोखटेया । अधम जे धनंजया ।
तें ते होती भोगूनियां । तामसा योनी ॥16-418॥

अर्जुना याप्रमाणे विश्वाच्या वाईटातील जे निकृष्ट ते (निकृष्ट ठिकाण) ते आसुरी लोक (व्याघ्रादि) तामस योनी भोगल्यावर होतात. ॥16-418॥

अहा सांगतां वाचा रडे । आठवितां मन खिरडे ।
कटारे मूर्खीं केवढे । जोडिले निरय ॥16-419॥

अरेरे त्या असुरांची कथा सांगतांना वाचा रडकुंडीला येते त्यांच्या कथेची आठवण झाली की मन मागे हटते. हाय हाय ! त्या मूर्खांनी केवेढा नरक प्राप्त करून घेतला आहे बरे ? ॥16-419॥

कायिसया ते आसुर । संपत्ति पोषिती वाउर ।
जिया दिधलें घोर । पतन ऐसें ॥16-420॥

ज्या आसुरी संपत्तीने असली भयंकर अधोगती दिली ती वाईट आसुरी संपत्ती ते असूर कशा करता वाढवतात ? ॥16-420॥

म्हणौनि तुवां धनुर्धरा । नोहावें गा तिया मोहरा ।
जेउता वासु आसुरा । संपत्तिवंता ॥16-421॥

म्हणून अर्जुना ज्या ठिकाणी आसुरी संपत्तिवाल्यांचे राहाणे असेल त्या बाजूला तू जाऊ नकोस ॥16-421॥

आणि दंभादि दोष साही । हे संपूर्ण जयांच्या ठायीं ।
ते त्यजावे हें काई । म्हणों कीर ? ॥16-422॥

आणि दंभादिकरून सहा दोष हे सर्वच्या सर्व ज्यांच्या ठिकाणी असतील त्यांचा त्याग करावा. हे खरोखर सांगितले पाहिजे काय ? ॥16-422॥

परी काम क्रोध लोभ । या तिहींचेंही थोंब ।
थांवे तेथें अशुभ । पिकलें जाण ॥16-423॥

परंतु काम क्रोध व लोभ या तिघांचे बंड जेथे माजले आहे तेथे पाप उत्पन्न झाले आहे असे समज. ॥16-423॥

सर्व दुःखां आपुलिया । दर्शना धनंजया ।
पाढाऊ हे भलतया । दिधलें आहाती ॥16-424॥

अर्जुना वाटेल त्यास आपली भेट होण्यास सुलभ जावे म्हणून सर्व दु:खांनी आपला मार्ग अचूक दाखवण्याकरता त्या कामक्रोधादिकांस वाटाडे म्हणून नेमून दिले आहे. ॥16-424॥

कां पापियां नरकभोगीं । सुवावयालागीं जगीं ।
पातकांची दाटुगी । सभाचि हे ॥16-425॥

अथवा पाप्याला नरकभोगात घालण्याकरता जगामधे ही (काम-क्रोध-लोभांची) पातकांची पराक्रमी सभाच आहे. ॥16-425॥

ते रौरव गा तंवचिवरी । आइकिजती पटांतरीं ।
जंव हे तिन्ही अंतरीं । उठती ना ॥16-426॥

जोपर्यंत हे तीन विकार अंत:करणात उठले नाहीत तोपर्यंतच रौरवादि भयंकर नरक आहेत असे परोक्ष रीतीने (पुराणांदिकातून) ऐकले जाते. ॥16-426॥

अपाय तिहीं आसलग । यातना इहीं सवंग ।
हाणी हाणी नोहे हे तिघ । हेचि हाणी ॥16-427॥

त्यांच्या योगाने अपाय सोपे आहेत. यांच्या योगाने यातना स्वस्त आहेत. हानि ही हानि नाही तर ते तिघे (मूर्तिमंत) हानि आहेत. ॥16-427॥

काय बहु बोलों सुभटा । सांगितलिया निकृष्टा ।
नरकाचा दारवंटा । त्रिशंकु हा ॥16-428॥

फार काय सांगू ? अर्जुना ते तिघे म्हणजे सांगितलेल्या निकृष्ट नरकाचा तीन खिळे मारलेला उंबराच आहे. ॥16-428॥

या कामक्रोधलोभां- । माजीं जीवें जो होय उभा ।
तो निरयपुरीची सभा । सन्मानु पावे ॥16-429॥

या कामक्रोधलोभामधे जो जीवाभावाने उभा असतो (म्हणजे तिघांचा आश्रय करतो) तो नरकरूपी नगराच्या सभेमधे सन्मान पावतो. ॥16-429॥

म्हणौनि पुढत पुढतीं किरीटी । हे कामादि दोष त्रिपुटी ।
त्यजावींचि गा वोखटी । आघवा विषयीं ॥16-430॥

म्हणून अर्जुना ह्या कामादि दोषांची सर्व बाबतीत निंद्य असलेली त्रिपुटी टाकावी असे मी तुला वारंवार बजावून सांगतो. ॥16-430॥

धर्मादिकां चौंही आंतु । पुरुषार्थाची तैंचि मातु ।
करावी जैं संघातु । सांडील हा ॥16-431॥

कोणीही जेव्हा या कामक्रोधलोभ यांच्या समुदायाची संगति सोडेल तेव्हाच त्याने धर्मादि चार पुरुषार्थांची गोष्ट करावी. व ॥16-431॥

हे तिन्ही जीवीं जंव जागती । तंववरी निकियाची प्राप्ती ।
हे माझे कान नाइकती । देवोही म्हणे ॥16-432॥

हे तिन्ही जोपर्यंत अंत:करणात जागृत आहेत तोपर्यंत कल्याणाची प्राप्ती होईल हे माझे कान ऐकत नाहीत असे देव देखील म्हणाले. असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात). ॥16-432॥

जया आपणपें पढिये । आत्मनाशा जो बिहे ।
तेणें न धरावी हे सोये । सावधु होईजे ॥16-433॥

ज्याचे आपल्या स्वत:वर प्रेम असेल व जो आत्मनाशाला भीत असेल त्याने या वाटेस (काम क्रोध व लोभ यांच्या मार्गास) जाऊ नये सावध व्हावे. ॥16-433॥

पोटीं बांधोनि पाषाण । समुद्रीं बाहीं आंगवण ।
कां जियावया जेवण । काळकूटाचें ॥16-434॥

पोटाशी दगड बांधून बाहूंच्या जोरावर जसे समुद्रात पोहणे अथवा जगण्याकरता जसे काळकूट विषाचे भोजन करणे ॥16-434॥

इहीं कामक्रोधलोभेंसी । कार्यसिद्धि जाण तैसी ।
म्हणौनि ठावोचि पुसीं । ययांचा गा ॥16-435॥

ह्या कामक्रोधांलोभांनी कार्यसिद्धी तशी आहे असे समज. म्हणून अर्जुना यांचा मागमूस नाहीसा कर. ॥16-435॥

जैं कहीं अवचटें । हे तिकडी सांखळ तुटे ।
तैं सुखें आपुलिये वाटे । चालों लाभे ॥16-436॥

जेव्हा कधी अकस्मात ही तीन कड्यांची साखळी तुटेल तेव्हा आपल्या वाटेने (आत्मानुभवाने) सुखाने चालण्यास मिळेल. ॥16-436॥

त्रिदोषीं सांडिलें शरीर । त्रिकुटीं फिटलिया नगर ।
त्रिदाह निमालिया अंतर । जैसें होय ॥16-437॥

त्रिदोषांनी (कफ वात पित्त यांचा अतिरेक) शरीरास टाकल्यावर जसे शरीरास आरोग्य होते किंवा त्रिकुटीचा (चोरी चहाडी व शिंदळकी यांचा) नाश झाल्यावर नगरात जशी सुखाने नांदणूक होते अथवा त्रिताप (आध्यात्मिक आधिभौतिक व आधिदैविक) नाहीसे झाल्यावर अंत:करण जसे आनंदित होते ॥16-437॥

तैसा कामादिकीं तिघीं । सांडिला सुख पावोनि जगीं ।
संगु लाहे मोक्षमार्गीं । सज्जनांचा ॥16-438॥

त्याप्रमाणे कामादिक तिघांनी जो पुरुष टाकला आहे तो जगामधे सुख पावून त्यास मोक्षमार्गात सज्जनांचा संग मिळतो. ॥16-438॥

मग सत्संगें प्रबळें । सच्छास्त्राचेनि बळें ।
जन्ममृत्यूचीं निमाळें । निस्तरें रानें ॥16-439॥

मग प्रबळ साधुसंगतीच्या योगाने सच्छास्त्राच्या साह्याने जन्ममृत्युरूपी माळरानातून पार पडतो. ॥16-439॥

ते वेळीं आत्मानंदें आघवें । जें सदा वसतें बरवें ।
तें तैसेंचि पाटण पावे । गुरुकृपेचें ॥16-440॥

त्यावेळी ज्या सर्व गावांमधे आत्मानंद नेहेमी राहात असतो असेच ते गुरुकृपारूपी सुंदर नगर त्यास प्राप्त होते. ॥16-440॥

तेथ प्रियाची परमसीमा । तो भेटे माउली आत्मा ।
तयें खेवीं आटे डिंडिमा । सांसारिक हे ॥16-441॥

मग तेथे (गुरुकृपेच्या गावात) आवडणार्‍या वस्तूतील शेवटली हद्द (सर्वात अत्यंत आवडता) जो माऊली आत्मा तो भेटतो. त्या क्षणीच संसाररूपी (जन्ममृत्युरूपी गडबद नाहीशी होते. ॥16-441॥

ऐसा जो कामक्रोधलोभां । झाडी करूनि ठाके उभा ।
तो येवढिया लाभा । गोसावी होय ॥16-442॥

ह्याप्रमाणे जो कामक्रोधलोभास पार नाहीसे करून अगदी मोकळा होतो तो एवढ्या लाभाचा मालक होतो. ॥16-442॥

ना हें नावडोनि कांहीं । कामादिकांच्याचि ठायीं ।
दाटिली जेणें डोई । आत्मचोरें ॥16-443॥

अथवा हे काही एक न आवडून कामादिकांच्याच ठिकाणी ज्या आत्मघातक्याने आपले डोके खुपसले आहे ॥16-443॥

जो जगीं समान सकृपु । हिताहित दाविता दीपु ।
तो अमान्यु केला बापु । वेदु जेणें ॥16-444॥

जो जगात सर्वांवर सारखी कृपा करणारा व हिताहित दाखवणारा दिवा असा जो वेदरूपी बाप त्यास जुमानीत नाही ॥16-444॥

न धरीचि विधीची भीड । न करीचि आपली चाड ।
वाढवीत गेला कोड । इंद्रियांचें ॥16-445॥

जो वेदादिकांच्या आज्ञेची भीड धरीतच नाही व ज्याला आत्महिताची चाडच नाही व जो इंद्रियांचेच लाड वाढवीत गेला ॥16-445॥

कामक्रोधलोभांची कास । न सोडीच पाळिली भाष ।
स्वैराचाराचें असोस । वळघला रान ॥16-446॥

कामक्रोधलोभांची कास सोडणारच नाही म्हणून त्यांना दिलेले वचन जो पाळतो व स्वेच्छाचाराच्या अफाट रानात ज्याने आश्रय केला आहे ॥16-446॥

तो सुटकेचिया वाहिणीं । मग पिवों न लाहे पाणी ।
स्वप्नींही ते कहाणी । दूरीचि तया ॥16-447॥

तो जन्ममरणाच्या सुटकेच्या ओघातील पाणी पिऊ शकत नाही एवढेच काय पण त्याला ती सुटकेची गोष्ट स्वप्नात देखील दूर असते. ॥16-447॥

आणि परत्र तंव जाये । हें कीर तया आहे ।
परी ऐहिकही न लाहे । भोग भोगूं ॥16-448॥

आणि परलोकास तर तो मुकतोच हे ठाम ठरल्यासारखे आहे. परंतु ऐहिक भोग देखील त्यास भोगावयास सापडत नाहीत. ॥16-448॥

तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडां रिघाला ।
कीं तेथही पावला । नास्तिकवादु ॥16-449॥

तरी माशांच्या लोभाने ब्राह्मण कोळ्यांच्या जातीत शिरला तो त्या कोळ्याच्या जातीतही त्याला ‘असला नास्तिक आम्हाला नको’ म्हणून घेईनात. (याप्रमाणे तो आपल्या जातीस व परक्या (कोळ्यांच्या) जातीसही मुकला). ॥16-449॥

तैसें विषयांचेनि कोडें । जेणें परत्रा केलें उबडें ।
तंव तोचि आणिकीकडे । मरणें नेला ॥16-450॥

त्याप्रमाणे विषयांच्या गोडीने ज्याने परलोक पालथा केला (घालविला) तो इतक्यातच मरणाने त्यास दुसरीकडे नेले. ॥16-450॥

एवं परत्र ना स्वर्गु । ना ऐहिकही विषयभोगु ।
तेथ केउता प्रसंगु । मोक्षाचा तो ? ॥16-451॥

ह्या प्रमाणे परलोक नाही व स्वर्ग नाही व ऐहिक विषयांचा भोगही नाही तेथे मोक्षाचा प्रसंग तो कोठला ? ॥16-451॥

म्हणौनि कामाचेनि बळें । जो विषय सेवूं पाहे सळें ।
तया विषयो ना स्वर्गु मिळे । ना उद्धरे तो ॥16-452॥

म्हणून कामाच्या बळाने जो आग्रहाने विषय सेवू पहातो त्याला विषय सुख मिळत नाही अथवा स्वर्ग मिळत नाही किंवा तो उद्धरतही नाही. ॥16-452॥

याकारणें पैं बापा । जया आथी आपुली कृपा ।
तेणें वेदांचिया निरोपा । आन न कीजे ॥16-453॥

बाबा अर्जुना याकरता ज्याला आपली स्वत:ची कीव असेल त्याने वेदाच्या आज्ञेबाहेर वागता कामा नये. ॥16-453॥

पतीचिया मता । अनुसरोनि पतिव्रता ।
अनायासें आत्महिता । भेटेचि ते ॥16-454॥

पतीच्या मताप्रमाने वागून पतिव्रता स्त्री सहजच स्वत:च्या कल्याणाला प्राप्त होते. ॥16-454॥

नातरी श्रीगुरुवचना । दिठी देतु जतना ।
शिष्य आत्मभुवना- । माजीं पैसे ॥16-455॥

अथवा श्रीगुरुवचनाच्या पालनाकडे दृष्टि देणारा शिष्य आत्मानुभवात प्रवेश करतो. ॥16-455॥

हें असो आपुला ठेवा । हाता आथी जरी यावा ।
तरी आदरें जेवीं दिवा । पुढां कीजे ॥16-456॥

हे राहू दे आपण (अंधारात) ठेवलेली वस्तु आपल्या हाताला यावी असे जर वाटेल तर ज्याप्रमाणे अगत्याने दिवा पुढे करावा. ॥16-456॥

तैसा अशेषांही पुरुषार्था । जो गोसावी हो म्हणे पार्था ।
तेणें श्रुतिस्मृति माथां । बैसणें घापे ॥16-457॥

त्याप्रमाणे अर्जुना संपूर्णही पुरुषार्थाचा (धर्म अर्थ काम मोक्षाचा) जो मालक होईन म्हणतो त्याने श्रुति व स्मृति यास बसण्यास आपले मस्तक घालावे. (श्रुति व स्मृति यांच्या आज्ञा शिरसावंद्या मानाव्या). ॥16-457॥

शास्त्र म्हणेल जें सांडावें । तें राज्यही तृण मानावें ।
जें घेववी तें न म्हणावें । विषही विरु ॥16-458॥

शास्त्र जे टाकावे म्हणून म्हणेल ते जरी राज्य असले तरी ते गवताच्या काडीप्रमाणे समजावे व शास्त्र जे घ्यावे म्हणून सांगेल ते जरी विष असले तरी प्रतिकूल समजू नये. ॥16-458॥

ऐसिया वेदैकनिष्ठा । जालिया जरी सुभटा ।
तरी कें आहे अनिष्टा । भेटणें गा ? ॥16-459॥

अर्जुना केवल याप्रमाणे वेदाच्या ठिकाणी जर एकनिष्ठ झाले तर अकल्याणाची गाठ कोठून पडणार ? ॥16-459॥

पैं अहितापासूनि काढिती । हित देऊनि वाढविती ।
नाहीं गा श्रुतिपरौती । माउली जगा ॥16-460॥

अकल्याणापासून काढणारी व हित देऊन वाढवणारी अशी श्रुतिशिवाय दुसरी कोणी माऊलीच जगात नाही. ॥16-460॥

म्हणौनि ब्रह्मेंशीं मेळवी । तंव हे कोणें न सांडावी ।
अगा तुवांही ऐसीचि भजावी । विशेषेंसीं ॥16-461॥

अशी ही श्रुति हित करणारी माऊली आहे. ती जीवाचे ब्रह्माशी ऐक्य करते. त्याअर्थी हिची कोणी हेळसांड करू नये. अरे तू देखील तिला एकनिष्ठपणे भज. ॥16-461॥

जे आजि अर्जुना तूं येथें । करावया सत्य शास्त्रें सार्थें ।
जन्मलासि बळार्थें । धर्माचेनि ॥16-462॥

कारण की अर्जुना सांप्रत तू धर्माचरणाचे जोरावर शास्त्रांना सार्थकता आणण्याकरता खरोखर जन्माला आला आहेस. ॥16-462॥

आणि धर्मानुज हें ऐसें । बोधेंचि आलें अपैसें ।
म्हणौनि आनारिसें । करूं नये ॥16-463॥

आणि धर्मानुज (धर्माचा धाकटा भाऊ) हे जे नाव तुला प्राप्त झाले आहे त्यावरून सहज हाच बोध होतो. म्हणून तू धर्माविरुद्ध वागू नकोस. ॥16-463॥

कार्याकार्यविवेकीं । शास्त्रेंचि करावीं पारखीं ।
अकृत्य तें कुडें लोकीं । वाळावें गा ॥16-464॥

करण्याला योग्य काय व अयोग्य काय याचा विचार करण्याचे कामी शास्त्रांनाच परीक्षा करणारे ठरवावे व अर्जुना या जगात जे करण्यास योग्य नसेल ते वाईट आहे म्हणून टाकावे. ॥16-464॥

मग कृत्यपणें खरें निगे । तें तुवां आपुलेनि आंगें ।
आचरोनि आदरें चांगें । सारावें गा ॥16-465॥

मग करण्यास योग्य म्हणून जे खरे निघेल ते तू स्वत: अतिशय आदराने आचरण करून पुरे करावेस. ॥16-465॥

जे विश्वप्रामाण्याची मुदी । आजि तुझ्या हातीं असें सुबुद्धी ।
लोकसंग्रहासि त्रिशुद्धी । योग्यु होसी ॥16-466॥

कारण की हे सात्विक बुद्धीच्या अर्जुना आज तुझ्या हातात विश्वप्रामाण्याचा शिक्का असल्यामुळे (तू ज्या आचरणावर प्रामाण्याचा शिक्का मारशील त्या आचरणास लोक प्रमाण मानीत असल्यामुळ) तू लोकसंग्रहाला खरोखर योग्य आहेस. ॥16-466॥

एवं आसुरवर्गु आघवा । सांगोनि तेथिंचा निगावा ।
तोहि देवें पांडवा । निरूपिला ॥16-467॥

याप्रमाणे आसुरी दोष समुदायाची लक्षणे सांगून आसुरी दोषांपासून सुटण्याचा प्रकारही देवाने अर्जुनाला सांगितला. ॥16-467॥

इयावरी तो पंडूचा । कुमरु सद्भावो जीवींचा ।
पुसेल तो चैतन्याचा । कानीं ऐका ॥16-468॥

यानंतर तो पंडूचा मुलगा अर्जुन आपल्या अंतःकरणांतील योग्य विचार देवाला विचारील. तो विचार तुम्ही चैतन्याच्या (चिताच्ता) कानांनी ऐका असे ज्ञानेश्वर श्रोत्यांना म्हणाले. ॥16-468॥

संजयें व्यासाचिया निरोपा । तो वेळु फेडिला तया नृपा ।
तैसा मीहि निवृत्तिकृपा । सांगेन तुम्हां ॥16-469॥

व्यासांच्या आज्ञेनुसार (सर्व इतिहास सांगून) संजयाने जसा त्या धृतराष्ट्राचा वेळ घालविला तसे मीही निवृत्तिनाथांच्या कृपेने तुम्हांला सांगेन. ॥16-469॥

तुम्ही संत माझिया कडा । दिठीचा कराल बहुडा ।
तरी तुम्हां माने येवढा । होईन मी ॥16-470॥

तुम्ही संतमंडळी जर माझ्यावर कृपादृष्टीचा वर्षाव कराल तर तुम्हाला मान्य होईल एवढा मी होईन. (म्हणजे तुम्हास पसंत पडेल असे व्याख्यान करणारा मी होईन). ॥16-470॥

म्हणौनि निज अवधान । मज वोळगे पसायदान ।
दीजो जी सनाथु होईन । ज्ञानदेवो म्हणे ॥16-471॥

म्हणून महाराज माझ्या व्याख्यानरूपी सेवेबद्दल मला आपले अवधानरूपी प्रसादाचे दान द्यावे म्हणजे मी समर्थ होईन असे ज्ञानेश्वर महाराज श्रोतेमंडळीस म्हणतात. ॥16-471॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रेश्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसंपद्विभागयोगोनाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥ ॥16-472॥