॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥
॥ अथ पंचदशोऽध्यायः ॥अध्याय पंधरावा॥
॥ पुरुषोत्तमयोग॥
आतां हृदय हें आपुलें । चौफाळुनियां भलें ।
वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरूंचीं ॥15-1॥
आता आपले शुद्ध असलेले अंत:करण चौरंग करून त्यावर श्रीगुरूंच्या पाउलांची स्थापना करू. ॥15-1॥
ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेंद्रिय कुड्मुळी ।
भरूनियां पुष्पांजुळी । अर्घ्यु देवों ॥15-2॥
श्रीगुरु व आपण एक आहोत अशा ऐक्यतेच्या समजूतरूपी ओंजळीत संपूर्ण इंद्रियरूपी कमळकळ्या भरून त्या पुष्पांजुळीचे अर्घ्य श्रीगुरुचरणांवर देऊ. ॥15-2॥
अनन्योदकें धुवट । वासना जे तन्निष्ठ ।
ते लागलेसे अबोट । चंदनाचें ॥15-3॥
एकनिष्ठतारूपी स्वच्छ पाण्याने स्नान घालून श्रीगुरूंच्या विषयी असलेली वासना तेच श्रीगुरूस (अनामिका नावाचे) गंधाचे बोट लाऊ. ॥15-3॥
प्रेमाचेनि भांगारें । निर्वाळूनि नूपरें ।
लेवऊं सुकुमारें । पदें तियें ॥15-4॥
श्रीगुरुविषयीचे प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्याचे घागर्यांचे वाळे सद्गुरूच्या सुकुमार पायात घालू. ॥15-4॥
घणावली आवडी । अव्यभिचारें चोखडी ।
तिये घालूं जोडी । आंगोळिया ॥15-5॥
अनन्यतेने शुद्ध झालेले सद्गुरुविषयीचे दृढ प्रेम हीच कोणी रणजोडवी ती सद्गुरूंच्या पायांच्या अंगठ्यात घालू. ॥15-5॥
आनंदामोदबहळ । सात्त्विकाचें मुकुळ ।
तें उमललें अष्टदळ । ठेऊं वरी ॥15-6॥
आनंदरूपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावांची उमललेली कमळकळी हेच कोणी एक आठ पाकळ्यांचे कमळ ते सद्गुरूंच्या पायावर वाहू. ॥15-6॥
तेथे अहं हा धूप जाळूं । नाहं तेजें वोवाळूं ।
सामरस्यें पोटाळूं । निरंतर ॥15-7॥
देहादेदिकांचा अभिनिवेश घेणारी जी अहंवृत्ती हाच कोणी एक धूप तो श्रीगुरुचरणांजवळ जाळू. या देहादिकांपकी मी कोणी नाही अशी जी उत्पन्न झालेली निरभिमान बोधवृत्ती हेच कोणी एक तेज त्या तेजाने श्रीगुरूस ओवाळू व त्या सद्गुरुचरणांस तदाकारतेने नेहेमी आलिंगन देऊ. ॥15-7॥
माझी तनु आणि प्राण । इया दोनी पाउवा लेऊं श्रीगुरुचरण ।
करूं भोगमोक्ष निंबलोण । पायां तयां ॥15-8॥
श्रीगुरूच्या दोन्ही पायात माझे शरीर व प्राण (स्थूलशरीर व लिंगशरीर) या दोन खडावा करून घालू व ऐहिक व पारत्रिक भोग व मोक्ष हे श्रीगुरुचरणांवरून उतारा म्हणून ओवाळून टाकू ॥15-8॥
इया श्रीगुरुचरणसेवा । हों पात्र तया दैवा ।
जे सकळार्थमेळावा । पाटु बांधे ॥15-9॥
ज्याच्या योगाने धर्म अर्थ काम व मोक्ष या सर्व पुरुषार्थांच्या सिंहासनावर राज्याभिषेक होतो त्या दैवास या श्रीगुरुचरणांच्या उपासनेस आम्ही योग्य होऊ. ॥15-9॥
ब्रह्मींचें विसवणेंवरी । उन्मेख लाहे उजरी ।
जें वाचेतें इयें करी । सुधासिंधु ॥15-10॥
ज्या दैवाच्या योगाने ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांती मिळेपर्यंत ज्ञान उत्कर्षाला पावते व जे दैव या वाचेला अमृताचा समुद्र करते ॥15-10॥