॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥
॥ अथ चतुर्दशोऽध्यायः ॥अध्याय चौदावा॥
॥ गुणत्रयविभागयोग ॥
जय जय आचार्या । समस्तसुरवर्या ।
प्रज्ञाप्रभातसूर्या । सुखोदया ॥14-1॥
अहो सर्व देवांमधे श्रेष्ठ (आत्मविषयक) बुद्धिरूपी प्रात:काळ करणारे सूर्य सुखाचा उदय करणारे श्रीगुरुमहाराज आपला जयजयकार असो. ॥14-1॥
जय जय सर्व विसांवया । सोहंभावसुहावया ।
नाना लोक हेलावया । समुद्रा तूं ॥14-2॥
तुम्ही सर्व जगास विश्रांतिस्थान अहात. ‘मी ब्रह्म आहे’ अशा भावनेस सेवन करविणारे (तुम्ही अहात). तुम्ही अनेक लोकरूपी लाटांचे समुद्र अहात. तुमचा जयजयकार असो. ॥14-2॥
आइकें गा आर्तबंधू । निरंतरकारुण्यसिंधू ।
विशदविद्यावधू- । वल्लभा जी ॥14-3॥
पीडितांना संकटातून सोडवणारे अखंड भरलेले (ओहोटी नसलेले) दयेचे समुद्र शुद्धविद्यारूप (अध्यात्मविद्यारूप) स्त्रीचे प्रियकर असे महाराज तुम्ही ऐका. ॥14-3॥
तू जयांप्रति लपसी । तया विश्व हें दाविसी ।
प्रकट तैं करिसी । आघवेंचि तूं ॥14-4॥
तू ज्यांना लपतोस त्यांना हे जग दाखवतोस (म्हणजे ज्यांच्यामधे तुझ्यासंबंधाने अज्ञान असते त्यांना तुझे स्वरूप न दिसता जग दिसते) व तू ज्यांना प्रगट होतोस त्यावेळी त्यांना सर्व तूच करतोस. (म्हणजे ज्यांच्यामधे तुझ्य़ासंबंधाने ज्ञान असते त्यांना जग न दिसता सर्व तूच दिसतोस.) ॥14-4॥
कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे । हा दृष्टिबंधु निफजे ।
परी नवल लाघव तुझें । जें आपणपें चोरें ॥14-5॥
दुसर्याची नजरबंदी करणे असा नजरबंदीचा खेळ (गारुडी लोकांस) उत्पन्न करता येतो. (पण त्यास आपली स्वत:ची नजरबंदी करता येत नाही). परंतु आपण आपल्याला चोरून रहाणे (स्वत:स स्वत: विषय न होणे) ही तुझी अद्भुत जादु आहे. (गुरु वा ब्रह्म हे जगतालाही आपले भान होऊ देत नाहीत व आपण सवत: ज्ञानरूप असल्यामुळे आपले भानही आपल्या ठिकाणी घेत नाहीत). ॥14-5॥
जी तूंचि तूं सर्वां यया । मा कोणा बोधु कोणा माया ।
ऐसिया आपेंआप लाघविया । नमो तुज ॥14-6॥
कारण की या सर्व जगताला तूच तू आहेस. (म्हणजे या जगात सर्व काही तूच आहेस). असे असून सुद्धा कोणाचे ठिकाणी तुझे ज्ञान आहे तर कोणाचे ठिकाणी तुझ्य़ासंबंधी माया (अज्ञान) आहे. असा जो तू स्वभावत: जादुगार त्या तुला नमस्कार असो. ॥14-6॥
जाणों जगीं आप वोलें । तें तुझिया बोला सुरस जालें ।
तुझेनि क्षमत्व आलें । पृथ्वियेसी ॥14-7॥
आम्हास असे वाटते की जगामधे पाणी ओले आहे ते पाणी तुझ्या ओलेपणाने चांगले द्रवयुक्त झाले आहे व पृथ्वीच्या ठिकाणी जी सहनशीलता आहे ती तुझ्या योगाने आहे. ॥14-7॥
रविचंद्रादि शुक्ती । उदो करिती त्रिजगतीं ।
तें तुझिया दीप्ती । तेज तेजां ॥14-8॥
सूर्य व चंद्र इत्यादिक शिंपले त्रैलोक्यात प्रकाश करतात. या तेजस्वी पदार्थात असणारे जे तेज ते तेज तुझ्यामुळे आहे. ॥14-8॥
चळवळिजे अनिळें । तें दैविकेनि जी निजबळें ।
नभ तुजमाजीं खेळे । लपीथपी ॥14-9॥
वायु जी हालचाल करतो महाराज ती तुमच्या बळाने करतो व आकाश तुमच्या स्वरूपामधे लपंडाव खेळते. ॥14-9॥
किंबहुना माया असोस । ज्ञान जी तुझेनि डोळस ।
असो वानणें सायास । श्रुतीसि हे ॥14-10॥
फार काय सांगावे ? महाराज अमर्याद असे जे मायाज्ञान (संपूर्ण अन्यथाज्ञान) त्याचेही प्रकाशक तुम्हीच अहात हे तुमचे वर्णन राहू दे. (कारण) हे वर्णन करणे श्रुतीलाही कष्टप्रद आहे. ॥14-10॥