॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥
॥ अथ द्वादशोऽध्यायः ॥अध्याय बारावा ॥
॥ भक्ति-योग॥
जय जय वो शुद्धे । उदारे प्रसिद्धे ।
अनवरत आनंदे । वर्षतिये ॥12-1॥
तू शुद्ध आहेस. तू उदार म्हणून प्रसिद्ध आहेस. गुरुकृपादृष्टिरूपी माते तुझा जयजयकार असो. ॥12-1॥
विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी ताठी ।
ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय ॥12-2॥
विषयरूपी सर्पाने दंश केला असता मूर्च्छा येते ती काही केल्या जात नाही. हे गुरुकृपादृष्टि तुझ्या योगाने ती मूर्च्छा नाहीशी होते आणि सर्पदंश झालेल्या प्राण्याची त्या विषयापासून सुटका होते. ॥12-2॥
तरी कवणातें तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी ।
जरी प्रसादरसकल्लोळीं । पुरें येसि तूं ॥12-3॥
प्रसन्नतारूप पाण्याच्या लाटांची जर तुला भरती येईल तर संसाराच्या त्रासाचे (अध्यात्मादि त्रिविध तापांचे) चटके कोणाला बसतील ? व खेद कसा बरे जाळू शकेल ? ॥12-3॥
योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे ।
सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ॥12-4॥
हे प्रेमळ माते भक्तांना अष्टांगयोगाच्या सुखाचे भोग तुझ्यामुळे प्राप्त होतात व भक्तांची ते ब्रह्म मी आहे’ अशा स्वरूपसिद्धीची प्राप्ती होण्याची तू हौस पुरवतेस. (ती कशी पुरवतेस ते पुढे स्पष्ट करतात.) ॥12-4॥
आधारशक्तीचिया अंकीं । वाढविसी कौतुकीं ।
हृदयाकाशपल्लकीं । परीये देसी निजे ॥12-5॥
आधारचक्रावर असलेल्या कुंडलिनीच्या मांडीवर तू आपल्या भक्तांना कौतुकाने वाढवतेस व त्यांना झोप येण्याकरता हृदयाकाशरूपी पाळण्यात घालून झोके देतेस. ॥12-5॥
प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं ।
आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ॥12-6॥
आत्मप्रकाशरूप ज्योतीने साधकरूपी बालकास ओवाळतेस आणि मन व प्राण यांचा निरोधकरणेरूपी खेळणी त्यांच्या हातात देतेस. व स्वरूपानंदाचे लहान मुलाना घालावयाचे दागिने साधकरूपी बालकांच्या अंगावर घालतेस. ॥12-6॥
सतरावियेचें स्तन्य देसी । अनुहताचा हल्लरू गासी ।
समाधिबोधें निजविसी । बुझाऊनि ॥12-7॥
सतरावी जीवनकलारूपी (व्योमचक्रातील चंद्रामृतरूपी) दूध देतेस आणि अनाहत ध्वनीचे गाणे गातेस. आणि समाधीच्या बोधाने समजूत घालून स्वरूपी निजवतेस. (स्थिर करतेस). ॥12-7॥
म्हणोनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझिया पाउलीं ।
या कारणें मी साउली । न संडीं तुझी ॥12-8॥
म्हणूण साधकांना तू आई आहेस व सर्व विद्या तुझ्या चरणांच्या ठिकाणी पिकतात. म्हणून मी तुझा आश्रय सोडणार नाही. ॥12-8॥
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी । तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी ।
तो सकलविद्यांचिये सृष्टीं । धात्रा होय ॥12-9॥
हे सद्गुरुचे कृपादृष्टि तुझ्या कृपेचा आश्रय ज्याला मिळेल तो सर्व विद्यारूप सृष्टीचा (उत्पन्न कर्ता) ब्रह्मदेवच बनतो. ॥12-9॥
म्हणोनि अंबे श्रीमंते । निजजनकल्पलते ।
आज्ञापीं मातें । ग्रंथनिरूपणीं ॥12-10॥
एवढ्याकरता हे आपल्या भक्तांचा कल्पतरु व श्रीमंत अशा आई तू मला हा ग्रंथ सांगण्याला आज्ञा दे. ॥12-10॥