॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥
॥ अथ एकादशोऽध्याय-अध्याय अकरावा ॥
॥ विश्वरूपदर्शनयोग ॥
आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोहीं रसीं ।
येथ पार्था विश्वरूपेंसीं । होईल भेटी ॥11-1॥
आता यानंतर अकराव्या अध्यायामधे (शांत व अद्भुत या) दोन रसांनी भरलेली कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे. ॥11-1॥
जेथ शांताचिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा ।
आणि येरांही रसां पांतिकरां । जाहला मानु
॥11-2॥
या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचारास आला आहे आणि इतर रसांनाही या दोन रसांच्या पंक्तीला बसण्याचा मान मिळाला आहे. ॥11-2॥
अहो वधुवरांचिये मिळणीं । जैशी वराडियां लुगडीं लेणीं ।
तैसे देशियेच्या सुखासनीं । मिरविले
रस ॥11-3॥
अहो, नवरानवरीच्या लग्नसमारंभात ज्याप्रमाणे वर्हाडी लोकांनाही वस्त्रे व दागिने मिळातात त्याप्रमाणे इतर रसांचीही मराठी भाषारूप पालखीत मिरवणूक होऊन त्यांना शोभा आली आहे. ॥11-3॥
परी शांताद्भुत बरवे । जे डोळियांच्या अंजुळीं घ्यावें ।
जैसे हरिहर प्रेमभावें । आले खेंवा
॥11-4॥
परंतु शांत व अद्भुत हे दोन चांगले रस या अध्यायात इतके मुख्यत्वाने आहेत की ते डोळ्यांना उघड दिसतील. जसे विष्णु व शंकर हे एका योग्यतेचे देव प्रेमभावाने एकमेकांस भेटावयास यावे ॥11-4॥
ना तरी अंवसेच्या दिवशीं । भेटलीं बिंबें दोनी जैशीं ।
तेवीं एकवेळा रसीं । केला एथ ॥11-5॥
अथवा अमावास्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्यबिंब व चंद्रबिंब यांच्यात अंतर रहात नाही (कारण ती बिंबे एकाच दिशेला असतात) त्याप्रमाणे या अध्यायात हे दोन रस एकत्र आले आहेत. ॥11-5॥
मीनले गंगेयमुनेचे ओघ । तैसें रसां जाहलें प्रयाग ।
म्हणौनि सुस्नात होत जग । आघवें एथ
॥11-6॥
ज्या प्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या दोन नद्यांचा संगम झाला आहे, त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत या दोन रसांचा मिलाफ होऊन अकरावा अध्याय हा प्रयागक्षेत्रच झाला आहे. म्हणून सर्व जग येथे स्नान करून पवित्र होते. ॥11-6॥
माजीं गीता सरस्वती गुप्त । आणि दोनी रस ते ओघ मूर्त ।
यालागीं त्रिवेणी हे उचित । फावली
बापा ॥11-7॥
ज्याप्रमाणे प्रयागक्षेत्रात गंगा व यमुना या दोन नद्यांचे ओघ प्रगट दिसतात व त्या दोन ओघांच्या मध्ये जशी सरस्वती नदी गुप्त आहे, त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत हे दोन रस प्रगट आहेत व या दोन रसात गीता ही गुप्त सरस्वतीच आहे. म्हणून बाप हो, ही योग्य त्रिवेणी सर्वांना प्राप्त झाली आहे. ॥11-7॥
एथ श्रवणाचेनि द्वारें । तीर्थीं रिघतां सोपारें ।
ज्ञानदेवो म्हणे दातारें । माझेनि केलें
॥11-8॥
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला कारणीभूत करून माझे गुरु जे निवृत्तिनाथ त्यांनी श्रवणाच्या द्वारे या त्रिवेणी तीर्थामधे प्रवेश करणे सोपे केले आहे. ॥11-8॥
तीरें संस्कृताचीं गहनें । तोडोनि मर्हा ठियां शब्दसोपानें ।
रचिली धर्मनिधानें ।
श्रीनिवृत्तिदेवें ॥11-9॥
धर्माची खाण जे माझे गुरु निवृत्तीनाथ त्यांनी मला कारणीभूत करून संस्कृतभाषारूपी कठिण (उंच डगरीचे) किनारे फोडून मराठी भाषेतील शब्दरूपी पायर्यांचा घाट बांधला ॥11-9॥
म्हणौनि भलतेणें एथ सद्भावें नाहावें । प्रयागमाधव विश्वरूप पहावें ।
येतुलेनि संसारासि
द्यावें । तिळोदक ॥11-10॥
म्हणून या त्रिवेणीसंगमात हवे त्याने आस्तिक्यबुद्धीने स्नान करून जसे प्रयागक्षेत्रात माधवाचे दर्शन घेतात, तसे तेथे विश्वरूप माधवाचे दर्शन घ्यावे आणि एवढे करून संसाराला तिलांजली द्यावी. (संबंध सोडावा). ॥11-10॥