॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥
॥ अथ दशमोऽध्यायः अध्याय दहावा ॥
॥ विभूतियोग ॥
नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा ।
पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥10-1॥
स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेल्या व विद्यारूपी कमलाचा विकास करणार्या व परावाणीचा विषय (स्वरूपस्थिती) हीच कोणी एक तरुण स्त्री, त्या स्त्रीशी विलास करणार्या श्रीगुरो, तुम्हाला माझा नस्कार असो. ॥10-1॥
नमो संसारतमसूर्या । अपरिमितपरमवीर्या ।
तरुणतरतूर्या । लालनलीला ॥10-2॥
अहो, संसाररूपी अंधाराचा नाश करणारे सूर्य, निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्याने युक्त, ज्वानीच्या भरात असलेल्या चौथ्या अवस्थेचे (तूर्येचे) स्नेहाने पालन करणे ही ज्यांची क्रीडा आहे, अशा श्रीगुरो, तुम्हास माझा नमस्कार असो ॥10-2॥
नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना ।
सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥10-3॥
अहो, सर्व जगाचे पालन करणारे, कल्याणरूपरत्नांची खाण असलेले, भक्तरूपी अरण्यातील चंदन असलेले आणि पूजा करण्यास योग्य असलेले देव, तुम्हास माझा नमस्कार असो ॥10-3॥
नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा ।
श्रुतिसारसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥10-4॥
शहाण्या चित्तरूपी चकोरास आनंद देणार्या चंद्रा, ब्रह्मानुभावाच्या राजा, वेदगुणांच्या समुद्रा व कामाला मोहित करणार्या, तुम्हास माझा नमस्कार असो ॥10-4॥
नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना ।
विश्वोद्भवभुवना । श्रीगुरुराया ॥10-5॥
शुद्ध भावाने भजन करण्यास योग्य पात्र असणारे, संसाररूपी हत्तींच्या गंडस्थळांचा नाश करणारे व विश्वाच्या उत्पत्तीचे ठिकाण असणारे, अहो श्रीगुरुनाथा तुम्हास माझा नमस्कार असो ॥10-5॥
तुमचा अनुग्रहो गणेशु । जैं दे आपुला सौरसु ।
तैं सारस्वतीं प्रवेशु । बाळकाही आथी ॥10-6॥
तुमची कृपा हाच कोणी गणेश, तो जेव्हा आपले सामर्थ्य देतो, तेव्हा सर्व विद्येमधे बालकाचा देखील प्रवेश होतो. तुम्हास माझा नमस्कार असो ॥10-6॥
जी दैविकीं उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा ।
तैं नवरससुधाब्धीचा । थावो लाभे ॥10-7॥
आपण जे गुरुदेव, त्या आपली उदार वाणी जेव्हा ‘भिऊ नकोस’ असे वचन देते, तेव्हा शांतादि नवरसरूपी दिव्यांचा ठाव लागतो म्हणजे नवरसरूपी दिवे प्रज्वलित केले जातात. तुम्हास माझा नमस्कार असो ॥10-7॥
जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयातें अंगिकारी ।
तो वाचस्पतीशीं करी । प्रबंधुहोडा
॥10-8॥
महाराज आपले प्रेम हेच कोणी सरस्वती, तिने जर मुक्याचा अंगीकार केला तर तो पैजेने बृहस्पतीबरोबर देखील वादविवाद करील. तुम्हास माझा नमस्कार असो ॥10-8॥
हें असो दिठी जयावरी झळके । कीं हा पद्मकरु माथां पारुखे ।
तो जीवचि परि तुके । महेशेंसीं
॥10-9॥
हे राहू द्या. ज्याच्यावर आपली कृपादृष्टी पडेल अथवा आपला वरदहस्त ज्याच्या मस्तकावर स्थिर राहील, तो जीवच खरा, पण तो शिवाच्या बरोबरीचा होईल. तुम्हास माझा नमस्कार असो ॥10-9॥
एवढें जिये महिमेचें करणें । तें वाचाबळें वानूं मी कवणें ।
कां सूर्याचिया आंगा उटणें ।
लागत असे ? ॥10-10॥
एवढ्या सर्व गोष्टी ज्या सामर्थ्याने होतात, त्याचे मी कोणत्या जास्त बोलण्याने वर्णन करू ? सूर्याचे शरीर चकाकित दिसावे म्हणून त्याच लोखंडाच्या आरशाप्रमाणे घासण्याची जरुरी आहे काय ? तुम्हास माझा नमस्कार असो ॥10-10॥