॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥
॥ अथ प्रथमोऽध्यायः – अध्याय पहिला ॥
॥ अर्जुनविषादयोग ॥
ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १ ॥
ॐकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानदेवांनी मंगल केले आहे.) हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ॐकारा, तुला नमस्कार असो. व स्वत: स्वत:ला जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ॐकारा तुझा जयजयकार असो. ॥१-१॥
देवा तूंचि गणेशु ।सकलार्थमतिप्रकाशु ।
म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ २ ॥
वरील विशेषणांनी युक्त अशा) देवा, सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तो तूच आहेस. निवृत्तिनाथांचे शिष्य (ज्ञानेश्वर महाराज) म्हणतात, महाराज ऐका. ॥१-२॥
हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।
जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥ ३ ॥
संपूर्ण वेद हीच त्या (त्या गणपतीची) उत्तम सजवलेली मूर्ती आहे, आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी सौंदर्य खुलून राहिले आहे. ॥१-३॥
स्मृति तेचि अवयव । देखा आंगीक भाव ।
तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥ ४ ॥
आता (त्या गणपतीच्या) शरीराची ठेवण पहा. (मन्वादिकांच्या स्मृति हेच त्याचे अवयव होत. त्या स्मृतीतील अर्थसौंदर्याने (ते अवयव म्हणजे लावण्याची केवळ खाणच बनले आहेत. ॥१-४॥
अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें ।
पदपद्धति खेवणें । प्रमेयरत्नांचीं ॥ ५ ॥
अठरा पुराणे हेच (त्याच्या) अंगवरील रत्नखचित अलंकार आहेत. त्यात प्रतिपादलेली तत्वे हीच रत्ने व छंदोबद्ध शब्द हीच त्यांची कोंदणे होत. ॥१-५॥
पदबंध नागर । तेंचि रंगाथिलेअंबर ।
जेथ साहित्य वाणें सपूर ।उजाळाचें ॥ ६ ॥
उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकित तलम तंतु आहेत. ॥१-६॥
देखा काव्य नाटका । जे निर्धारितां सकौतुका ।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि
॥ ७ ॥
पहा, कौतुकाने काव्य-नाटकांविषयी विचार केला असता ती काव्य-नाटके त्या गणपतीच्या पायातील लहान घागर्या असून त्या अर्थरूप आवाजाने रुणझुणत असतात. ॥१-७॥
नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी ।दिसती उचित पदें माझारीं । रत्नें भलीं ॥ ८ ॥
कारण त्यात प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता यांचा बारकाईने विचार केला असता यामधेही निवडक वेच्यांची काही चांगली रत्ने आढळतात. ॥१-८॥
तेथ व्यासादिकांच्या मतीं । तेचि मेखळा मिरवती ।
चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥ ९ ॥
येथे व्यासादिकांच्या बुद्धी हाच कोणी (त्या गणपतीच्या) कमरेला बांधलेला शेला शोभत आहे व त्याच्या पदराच्या दशा निर्दोषपणे झळकत आहेत. ॥१-९॥
देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेची भुजांची आकृति ।
म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हातीं
॥ १० ॥
पहा, सहा शास्त्रे म्हणून जी म्हणतात तेच गणपतीचे सहा हात आहेत आणि म्हणून भिन्न भिन्न मते हीच त्याच्या हातातील शस्त्रे आहेत. ॥१-१०॥