Home

||श्री एकनाथ महाराज हरिपाठ ||


हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥१॥
हरी मुखीं गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घेणें ॥२॥
जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगें हरिरूप ॥३॥
हरिरूप झालें जाणीव हरपले । मीतूंपणा गेलें हरीचे ठायीं ॥४॥
हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥

हरि बोला हरि बोला नातरी अबोला । व्यर्थ गलबला करूं नका ॥१॥
नको अभिमान नको नको मान । सोडीं मीतूंपण तोचि सुखी ॥२॥
सुखी त्याणें व्हावें जगा निववावें । अज्ञानी लावावे सन्मार्गासी ॥३॥
मार्ग जया कळे भावभक्तिबळें । जगाचिये मेळे न दिसती ॥४॥
जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥

ओळखिला हरी धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरीं सिद्धीसहित ॥१॥
सिद्धी लावी पिसें कोण तया पुसे । नेलें राजहंसें पाणी काय ॥२॥
काय तें करावें संदेहीं निर्गुण । ज्ञानानें सगुण ओस केलें ॥३॥
केलें कर्म झालें तेंचि भोगा आलें । उपजले मेले ऐसे किती ॥४॥
एका जनार्दनीं नाहीं यातायाती । सुखाची विश्रांती हरीसंगें ॥५॥

जें जें दृष्टी दिसे तें तें हरिरूप । पूजा ध्यान जप त्यासी नाहीं ॥१॥
वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्रीं देव । तयाविण ठाव रिता कोठें ॥२॥
वैष्णवांचें गुह्य मोक्षांचा एकांत । अनंतासी अंत पाहतां नाहीं ॥३॥
आदि मध्य अवघा हरि एक । एकाचे अनेक हरि करी ॥४॥
एकाकार झाले जीव दोन्ही तिन्ही । एका जनार्दनीं ऐसें केलें ॥५॥

नामाविण मुख सर्पाचें तें बीळ । जिव्हा काळसर्प आहे ॥१॥
वाचा नव्हे लांब जळो त्याचें जिणें । यातना भोगणें यमपुरीं ॥२॥
हरीविण कोणी नाहीं सोडविता । पुत्र बंधु कांता संपत्तिचे ॥३॥
अंतकाळीं कोणी नाहीं बा सांगाती । साधूचे संगतीं हरी जोडे ॥४॥
कोटि कुळें तारी हरि अक्षरें दोन्ही । एका जनार्दनीं पाठ केलीं ॥५॥

धन्य माय व्याली सुकृताचें फळ । फळ निर्फळ हरीविण ॥१॥
वेदांताचें बीज हरि हरि अक्षरें । पवित्र सोपारें हेंचि एक ॥२॥
योग याग व्रत नेम दानधर्म । नलगे साधन जपतां हरि ॥३॥
साधनाचें सार नाम मुखीं गातां । हरि हरि म्हणतां कार्यसिद्धी ॥४॥
नित्य मुक्त तोचि एक ब्रह्मज्ञानी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥

बहुतां सुकृतें नरदेह लाधला । भक्तीविण गेला अधोगती ॥१॥
पाप भाग्य कैसे न सरेचि कर्म । न कळेचि वर्म अरे मूढा ॥२॥
अनंत जन्मींचें सुकृत पदरीं । त्याचे मुखीं हरि पैठा होय ॥३॥
राव रंक हो कां उंच नीच याती । भक्तीविण माती मुखीं त्याच्या ॥४॥
एका जनार्दनीं हरि हरि म्हणतां । मुक्ती सायुज्यता पाठी लागे ॥५॥

हरिनामामृत सेवी सावकाश । मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढें ॥१॥
नित्य नामघोष जयाचे मंदिरीं । तेचि काशीपुरी तीर्थक्षेत्र ॥२॥
वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे । अविनाशासी पाहे नाश कैचा ॥३॥
एका तासामाजीं कोटि वेळा सृष्टी । होती जाती दृष्टि पाहें तोचि ॥४॥
एका जनार्दनीं ऐसें किती झालें । हरिनाम सेविलें तोचि एक ॥५॥
 ९
भक्तीविण पशु कशासी वाढला । सटवीने नेला कैसा नाहीं ॥१॥
काय माय गेली होती भूतापासीं । हरि न ये मुखासी अरे मूढा ॥२॥
पातकें करिता पुढें आहे पुसता । काय उत्तर देतां होशील तूं ॥३॥
अनेक यातना यम करवील । कोण सोडवील तेथें तुजला ॥४॥
एका जनार्दनीं सांगताहें तोंदें । आहा वाचा रडे बोलतांचि ॥५॥
१०
स्वहिताकारणें संगती साधूची । भावें भक्ति हरीची भेटी तेणें ॥१॥
हरि तेथें संत संत तेथें हरी । ऐसें वेद चारी बोलताती ॥२॥
ब्रह्मा डोळसातें वेदार्थ ना कळे । तेथें हे आंधळे व्यर्थ होती ॥३॥
वेदार्थाचा गोंवा कन्याभिलाष । वेदें नाहीं ऐसें सांगितलें ॥४॥
वेदांचीं हीं बीजाक्षरें हरी दोनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
११
सत्पद तें ब्रह्म चित्पद तें माया ।  आनंदपदीं जया म्हणती हरी ॥१॥
सत्पद निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण हरिपायीं ॥२॥
तत्सदिति ऐसें पैल वस्तूवरी । गीतेमाजी हरि बोलियेले ॥३॥
हरिपदप्राप्ती भोळ्या भाविकांसी । अभिमानियांसी नर्कवास ॥४॥
अस्ति भाति प्रिय ऐशीं पदें तिनी । एका जनार्दनीं तेंचि झालें ॥५॥
१२
नाकळे तें कळे कळे तें नाकळे । वळे तें ना वळें गुरुविणें ॥१॥
निर्गुण पावलें सगुणीं भजतां । विकल्प धरितां जिव्हा झडे ॥२॥
बहुरूपी घरी संन्यासाचा वेष । पाहोन तयास धन देती ॥३॥
संन्याशाला नाहीं बहुरूपियाला । सगुणीं भजला तेथें पावे ॥४॥
अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥
१३
ओळखिला हरि सांठविला पोटीं । होतां त्याची भेटी दुःख कैंचें ॥१॥
नर अथवा नारी हो कां दुराचारी । मुखीं गातां हरि पवित्र तो ॥२॥
पवित्र तें कुळ धन्य त्याची माय । हरि मुखें गाय नित्य नेमें ॥३॥
काम क्रोध लोभ जयाचे अंतरीं । नाहीं अधिकारी ऐसा येथें ॥४॥
वैष्णवांचें गुह्य काढिलें निवडुनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
१४
हरि बोला देतां हरि बोला घेतां । हांसतां खेळतां हरि बोला ॥१॥
हरि बोला गातां हरि बोला खातां । सर्व कार्य करितां हरि बोला ॥२॥
हरि बोला एकांतीं हरि बोला लोकांतीं । देहत्यागांतीं हरि बोला ॥३॥
हरि बोला भांडतां हरि बोला कांडतां । उठतां बैसतां हरि बोला ॥४॥
हरि बोला जनीं हरि बोला विजनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
१५
एक तीन पांच मेळा पञ्चवीसांच । छत्तिस तत्त्वांचा मूळ हरि ॥१॥
कल्पना अविद्या तेणे झाला जीव । मायोपाधी शिव बोलिजेति ॥२॥
जीव शिव दोन्ही हरिरूपीं तरंग । सिंधु तो अभंग नेणें हरी ॥३॥
शुक्तीवरी रजत पाहतां डोळां दिसे । रज्जूवरी भासे मिथ्या सर्प ॥४॥
क्षेत्र\-क्षेत्रज्ञातें जाणताती ज्ञानी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
१६
कल्पनेपासूनी कल्पिला जो ठेवा । तेणें पडे गोंवा नेणे हरी ॥१॥
दिधल्या वांचूनि फळप्राप्ति कैंची । इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥२॥
इच्छावे ते जवळी चरण हरीचे । चरण सर्व नारायण देतो तुज ॥३॥
न सुटे कल्पना अभिमानाची गांठी । घेतां जन्म कोटी हरि कैंचा ॥४॥
एका जनार्दनीं सांपडली खूण । कल्पना अभिमान हरि झाला ॥५॥
१७
काय पद्मनीचे षंढासी सोहळे । वांझेसी दोहाळे कैची होती ॥१॥
अंधापुढें दीप खरासी चंदन । सर्पासी दुधपान करूं नये ॥२॥
क्रोधि अविश्वासी त्यासी बोध कैंचा । व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नये ॥३॥
खळाची संगती उपयोगासी न ये । आपणा अपाय त्याचे संगे ॥४॥
वैष्णवीं कुपथ्य टाकिल वाळूनी । एका जनार्दनीं तेचि भले ॥५॥
१८
न जायेचि ताठा नित्य खटाटोप । मण्डुकीं वटवट तैसे ते गा ॥१॥
प्रेमावीण भजन नाकाविण मोती । अर्थाविण पोथी वाचुनी काय ॥२॥
कुंकवा नाहीं ठावे म्हणे मी आहेव । भावावीण देव कैसा पावे ॥३॥
अनुतापेवीण भाव कैसा राहे । अनुभवें पाहें शोधूनियां ॥४॥
पाहतां पाहणें गेलें तें शोधूनी । एका जनार्दनीं अनुभविलें ॥५॥
१९
परिमळ गेलिया वोस फुल देठीं । आयुष्या शेवटीं देह तैसा ॥१॥
घडीघडी काळ वाट याची पाहे । अजून किती आहे अवकाश ॥२॥
हाचि अनुताप घेऊन सावध । कांहीं तरी बोध करीं मना ॥३॥
एक तास उरला खट्वांग रायासी । भाग्यदशा कैसी प्राप्त झाली ॥४॥
सांपडला हरि तयाला साधनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
२०
करा रे बापांनो साधन हरीचें । झणीं करणीचें करूं नका ॥१॥
जेणें बा न ये जन्म यमाची यातना । ऐशिया साधना करा कांहीं ॥२॥
साधनाचें सार मंत्रबीज हरी । आत्मतत्त्व धरी तोचि एक ॥३॥
कोटि कोटि यज्ञ नित्य ज्याचा नेम । एक हरि नाम जपतां घडे ॥४॥
एका जनार्दनीं न घ्यावा संशय । निश्चयेंसी होय हरिरूप ॥५॥
२१
बारा सोळा जणी हरीसी नेणती । म्हणोनी फिरती रात्रंदिवस ॥१॥
सहस्र मुखांचा वर्णितां भागला । हर्ष जया झाला तेणें सुखें ॥२॥
वेद जाणूं गेला पुधें मौनावला । तें गुह्य तुजला प्राप्त कैंचें ॥३॥
पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा । दास सद्गुरूचा तोचि जाणे ॥४॥
जाणते नेणते हरीचे ठिकाणीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
२२
पिंडीं देहस्थिती ब्रह्मांडीं पसारा । हरिविण सार व्यर्थ भ्रम ॥१॥
शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिलमुनी । हरिसी जाणोनि हरिच झाले ॥२॥
या रे या रे धरूं हरिनाम तारूं । भवाचा सागरू भय नाहीं ॥३॥
साधुसंत गेले आनंदीं राहिले । हरिनामें झाले कृतकृत्य ॥४॥
एका जनार्दनीं मांडिलें दुकान । देतो मोलावीण सर्व वस्तु ॥५॥
२३
आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥
नको खेद करूं कोणत्या गोष्टीचा । पति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥
सकळ जीवांचा करितो सांभाळ । तुज मोकलील ऐसें नाहीं ॥३॥
जैसी स्थिति आहे तैशापरी राहें । कौतुक तूं पाहें संचिताचें ॥४॥
एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा । हरिकृपें त्याचा नाश झाला ॥५॥
२४
दुर्बळाची कन्या समर्थाने केली । अवदसा निमाली दरिद्राची ॥१॥
हरिकृपा होतां भक्तां निघती दोंदें । नाचती स्वानंदें हरिरंगीं ॥२॥
देव भक्त दोन्ही एकरूप झाले । मुळींच संचलें जैसें तैसें ॥३॥
पाजळली ज्योती कापुराची वाती । ओवाळितां आरती भेद नुरे ॥४॥
एका जनार्दनीं कल्पेंची मुराला । तोचि झाला ब्रह्मरूप ॥५॥
२५
मुद्रा ती पांचवी लावूनियां लक्ष । तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे ॥१॥
कानीं जें पेरिलें डोळां तें उगवलें । व्यापकें भारले तोचि हरि ॥२॥
कर्म-उपासना-ज्ञानमार्गीं झाले । हरिपाठीं आले सर्व मार्ग ॥३॥
नित्य प्रेमभावें हरिपाठ गाय । हरिकृपा होय तयावरी ॥४॥
झाला हरिपाठ बोलणें येथूनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥